म्हसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

म्हसा हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव आहे. कर्जतपासून ४२ कि.मी. तर मुरबाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात म्हसोबाचे (भगवान शंकराचे) प्राचीन मंदीर आहे, या मंदीरावरून गावास म्हसा हे नाव पडले. येथील सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेली गुरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेली म्हसोबाची यात्रा प्रसिद्ध आहे. गुरे खरेदीसाठी येथे तुंबळ गर्दी असते. पौष पौर्णिमेपासून मंदिराच्या सभोवती दहा दिवस ही यात्रा भरते. जवळपास २०० ते २५० एकर जमिनीवर गुरांची रांग उभी असते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, गुजरात राज्यातील भाविक यात्रेकरू दरवर्षी गुरे खरेदीसाठी येथे येतात, पौष वद्य प्रतिपदेला गुरांची विक्री सुरू होते. यात्रेत कपडे, मिठाई, बर्फी, खेळणी, ब्लॅंकेट, घोंगडय़ा, सोलापुरी चादरी, मेसूर, खाजा, पेढे आदींची दुकाने मोठय़ा प्रमाणात असतात. थंडीच्या दिवसात यात्रा येत असल्याने घोंगडय़ा, ब्लॅंकेट, स्वेटर, चादरींची शेकडो दुकाने येथे मांडलेली असतात. यात्रा काळात विविध प्रकारचे स्टॉल्स, सर्कस, मौत का कुआ, जायंट व्हील, फुगेवाले, तमाशांचे फ़ड आदींद्वारे लक्षावधी रुपयांची उलाढाल होते.