Jump to content

मोतीराम बाळकृष्ण वेलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोतीराम बाळकृष्ण वेलकर हे एक स्वातंत्र्य सैनिक होते.

मोतीराम बाळकृष्ण वेलकर
जन्म: मार्च ७, १८८३
गिरगाव, मुंबई , महाराष्ट्र, भारत
मृत्यू: ऑक्टोबर ७, १९५०
मुंबई,महाराष्ट्र
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म: हिंदू
प्रभाव: लोकमान्य टिळक,चाफेकर बंधू,काळकर्ते परांजपे.
वडील: बाळकृष्ण वेलकर
पत्नी: कृष्णा जयकर


बालपण व शिक्षण

[संपादन]

डॉ.मोतीराम वेलकर यांचा जन्म इसवी सन १८८३ मध्ये ७ मार्च रोजी मुंबई येथील गिरगाव परिसरातील ठाकूरद्वारमधील नाथमाधव गल्लीत झाला.बँरिस्टरजयकर हे डॉ.मोतीराम वेलकर यांचे नातेवाईक होते.लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले होते.लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू,त्यांचे वडील इत्यादी लोकांच्या प्रभावामुळे ते राष्ट्राभिमानी होते.रामवाडीत असलेल्या रामाच्या मंदिरात ते चाफेकर बंधू आणि त्यांचे वडील हरिभाऊ ह्यांची कीर्तने ऐकत असत.लोकमान्य टिळकांचे केसरी व काळकर्ते परांजपे यांचे काळ ही वर्तमानपत्रे ते शाळेत असल्यापासून वाचत असत. इसवी सन १९०० साली त्यांनी मुंबई विद्यापीठाची मँट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज येथे डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेतला.परंतु लोकमान्य टिळकांच्या सोबत स्वातंत्र्य चळवळीच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेतल्यामुळे त्यांना मेडिकलची शेवटची परीक्षा देता आली नाही. नंतर त्यांनी इसवी सन १९११ साली मेडिकलची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले व ते डॉक्टर होऊन आपला दवाखाना अग्यारी लेन मध्ये थाटून रुग्णसेवा करू लागले.

कौटुंबिक जीवन

[संपादन]

इसवी सन १९२० च्या जानेवारी महिन्यात डॉ. वेलकर यांनी डॉक्टर विश्वास जयकर यांच्या कन्या कृष्णा जयकर यांच्याशी विवाह केला. कृष्णा या क्वीन मेरी शाळेतून सीनिअर केंब्रिज पास झालेल्या होत्या.

स्वातंत्र्य लढा

[संपादन]

वेलकर हे पाठारे प्रभू समाजातील होते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष दीनानाथ हे सुरत येथून मुंबईला आले.पाठारे प्रभू समाज हा मुंबई येथील आद्य रहिवासी समाजांपैकी एक समाज आहे.ते मुंबईत १२ व्या शतकात आले. ह्या समाजातील लोक इंग्रजी शिक्षण घेऊन इंग्रजी अंमलात राजनिष्ठ होऊन अंमलदार झाले.ह्या समाजातील ज्येष्ठ नोकरदार मंडळी इंग्रज सत्तेची स्तुती करीत. छत्रपती शिवाजी महाराज,लोकमान्य टिळक यांच्याविषयीच्या डॉ. वेलकर यांच्या भाषणांनी त्यांचे पाठारे प्रभू समाजबांधव नाराज झाले.त्यांच्या समाजातील ज्येष्ठ लोकांना डॉ. वेलकर यांच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाबद्दल चिंता वाटू लागली आणि त्यांनी पाठारे प्रभू समाजाची सभा बोलावून डॉ. मोतीराम वेलकर ह्यांना पाठारे प्रभू समाजसंस्थेतून काढून टाकण्यात आले. डॉ. वेलकर यांनी नंतर बँ.मुकुंदराव जयकर यांच्या साहाय्याने पाठारे प्रभूप्रोग्रेसिव्ह असोसिएशन अशी नवी संस्था स्थापन केली. त्यांनी दासनवमी,दसरा,दत्तजयंती उत्सव आपल्या ज्ञातीमध्ये चालू केले. डॉ. साठे यांच्या बरोबरीने ते टिळकांच्या उत्सव मंडळाचे चिटणीस झाले. त्यांनी त्यांच्या पाठारे प्रभू समाजातील तरुण मंडळीचे स्वयंसेवक दल तयार करून मुंबई येथील इंनफ्लूएंजाच्या साथीच्या रोगात अहोरात्र काम केले. स्मशानभूमीत अनेक प्रेते पडलेली असत त्यांना स्वयंसेवक नंबर देऊन लाकडाची जमवाजमव करून अंत्यसंस्कार करीत. डॉ. वेलकर त्यावेळी आजारी पडले परंतु प्रभुकृपेने मरणाच्या दारातून वाचले.

स्वातंत्र्य चळवळ

[संपादन]

लोकमान्य टिळक हे सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्य चळवळीला मरगळ आलेली होती. इसवी सन १९१४ साली लोकमान्य टिळक काळ्या पाण्याची शिक्षा भोगून परत आलेतेव्हा पुन्हा स्वातंत्र्य चळवळीला वेग आला. लोकमान्य टिळक नंतर चिरोल खटल्यासाठी इंग्लंड येथे गेले. डॉ. वेलकर व डॉ. साठे यांना लोकमान्य टिळकांनी इंडियन होमरूलच्या आणि लेबर लीगच्या शिष्टमंडळात समाविष्ट केले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर डॉ. वेलकर यांनी साधारणपणे दहा वर्षे काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम केले. इसवी सन १९२१ च्या महात्मा गांधी यांच्या कायदेभंग चळवळीत डॉ. वेलकर यांनी भाग घेतला.काँग्रेसचे मुस्लीम धोरण न रुचल्याने डॉ. वेलकर यांनी काँग्रेस सोडून हिंदू महासभेचे सदस्यत्व स्वीकारले. इसवी सन १९३० ते १९३५ पर्यंत ते हिंदू महासभेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते.

सार्वजनिक जीवन

[संपादन]

इसवी सन १९१९ ते १९३५ पर्यंत डॉ. वेलकर हे मुंबई महानगरपालिकेचे सभासद होते. इसवी सन १९२२ ते १९२६ पर्यंत ते विधान परिषदेचे सभासद होते. इसवी सन १९२४ साली मुंबई कायदे काऊन्सिलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील निर्बंध सरकारने काढावेत यासाठी ठरावाच्या बाजूने डॉ. वेलकर यांनी भाषण केले परंतु तो ठराव पास झाला नाही. इसवी सन १९३७ साली बँरिस्टर जमनादास मेहता यांच्या पाठपुराव्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्थानबद्धतेतून सुटका झाली. इसवी सन १९२० ते १९२६ पर्यंत डॉ. वेलकर हे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस होते. काही काळ ते मुंबई मेडिकल युनियन चे अध्यक्ष होते. आयुष्याच्या उत्तरार्धात ते हिंदू महासभेत सक्रीय झाले.

डॉ.एम.बी.वेलकर मार्ग

[संपादन]

काळबादेवी परिसरातील चिराबाजार येथील चेऊलवाडी येथे असलेल्या एका रस्त्याला डॉक्टर मोतीराम बाळकृष्ण वेलकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल व त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण राहावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने डॉ.एम बी वेलकर मार्ग असे नामकरण करून त्यांना गौरविण्यात आले आहे.चिरा बाजारातील दुकानावर असलेल्या नावाच्या पाट्यांनी डॉ. वेलकर यांची स्मृती जपून ठेवली आहे.

मृत्यू

[संपादन]

इसवी सन १९५० मध्ये ७ ऑक्टोबर रोजी डॉ. वेलकर यांचे निधन झाले.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, गुरुवार,४ सप्टेंबर २०२५.लेखक -अरुण भंडारे-इतिहास विषयाचे अभ्यासक (संदर्भ पुस्तक -लोकमान्य टिळक आणि डॉ. वेलकर, लेखक-प्रताप वेलकर)