मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मुळा नदी
उगम आजोबा डोंगर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी १५५ किमी (९६ मैल)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २२७५.८६
ह्या नदीस मिळते प्रवरा नदी
उपनद्या कास, मंधाळ, काळू
धरणे ज्ञानेश्वरसागर

मुळा नदी सह्याद्री पर्वताच्या आजोबा डोंगराजवळ उगम पावते. ही प्राचीन नदी आहे. उगमापासून १३६ किलोमीटर वाहत आल्यावर बारागाव((नांदूर) (तालुका राहुरी)(जिल्हा अहमदनगर) परिसरात तिला अडवून तिच्यावर धरण बांधण्यात आले आहे. इसवी सन १९५८ ते १९७२ दरम्यान बांधण्यात आलेले हे मातीचे धरण जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजे २६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहे. धरणाचा पाया खोदताना काही भागात वाळू, काही भागात चिकणमाती, गेरू व कारा दगडाचे थर सापडले. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. देशात पहिल्यांदा जलविरोधी कॉंक्रीटचा पडदा या धरणाच्या पायात बांधून त्याला मजबुती देण्यात आली. धरणाच्या भिंतीची लांबी २८५६ मीटर, तर उंची ४८.१७ मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४८ चौरस किलोमीटर आहे. पाण्याखाली १३ हजार २०० एकर जमीन गेली आहे. धरणाला डावा व उजवा असे दोन कालवे असून त्यातून राहुरी, नेवासे, शेवगावपाथर्डी तालुक्यातील शेतीला पाणी पुरवले जाते. धरणाच्या भिंतीलगत पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह असून तेथून जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. या जलाशयाला 'ज्ञानेश्वर सागर' असे नाव देण्यात आले आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात मासेमारी चालते. नौकानयनासाठी हे उत्तम स्थान आहे. नगरपासून सुमारे ३५-४० किलोमीटर अंतरावर असलेले हे मुळा धरण पाहण्यासारखे आहे.[ संदर्भ हवा ]

पुढे मुळा नदी राहुरी शहरामधून पुढे जाऊन नेवासे आणि राहुरीच्या सीमेवर असलेल्या राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे प्रवरा नदीला मिळते, त्या ठिकाणी संगमेश्वराचे मंदिर असून निसर्गरम्य असे वातावरण आहे. प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे.

विशेष[संपादन]

पुणे जिल्ह्यातली मुळा नदी वेगळी आहे.

संदर्भ[संपादन]

पहा: जिल्हावार नद्या , जिल्हावार धरणे