मुल्ला उमर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुल्ला मोहम्मद ओमर या पानावरून पुनर्निर्देशित)
चित्र:Mullah Omar (page 6 crop).jpg

मुल्ला उमर (इ.स. १९६०:चाह-इ-हिम्मत, कंदाहार प्रांत, अफगाणिस्तान - इ.स. २०१३) हा अफगाणिस्तानातील तालिबान या दहशतवादी संघटनेचा सर्वोच्च नेता आणि आध्यात्मिक गुरू होता.

सोव्हिएत रशियाच्या विरोधात मुल्ला उमर लढला. हरलेल्या सोव्हिएत फौजांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला. त्यानंतर मूलत्तत्त्ववादी मुसलमानांनी स्थापन केलेल्या तालिबानने इ.स. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानातले सरकार चालवले. कंदाहार ही त्यांची राजधानी होती. फक्त पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. तालिबानच्या राजवटीत इस्लामी शरिया (शरियत) या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. तेहरिके तालिबान पाकिस्तान या संघटनेची पाकिस्तानमधील शाखा होती. या संघटनेने पेशावरमधील शाळेवर हल्ला करून अनेक मुलांचा बळी घेतला.

सोव्हिएतच्या फौजांशी झालेल्या लढाईत मुल्ला उमरच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या लढाईनंतर मुल्ला उमरने अल कायदाच्या ओसामा बिन लादेनशी हातमिळवणी केली. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये युद्ध मोहीम उघडली, तेव्हा मुल्ला उमर भूमिगत झाला. त्याच्यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस लावले होते.

तालिबानने मुल्ला उमरचे चरित्र प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार मुल्ला उमरला स्वतःचे घर नव्हते, तसेच त्याचे परदेशात बँक खातेही नव्हते. त्याची विनोदबुद्धी फार चांगली होती, असे त्या चरित्रात म्हटले आहे. तालिबानमधीलच ’अफगाणिस्तान इस्लामिक मुव्हमेन्ट फिदाई महाज’ या बंडखोर गटातील नेते मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर व गुल आगा यांनी उमरला २०१३ सालच्या जुलै महिन्यात ठार केल्याची माहिती गटाचे प्रवक्ते काही हमजा यांनी दिली आहे.