Jump to content

मुठभर धान्य (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भेटवस्तूचे मोल तिच्या किमतीवर नाही तर त्या पाठीमागच्या भावनेवर अवलंबून असते हे सांगणारी ही लोककथा.

कथेचा आशय

[संपादन]

तुर्कस्तानमध्ये जलाल नावाचे एक सुज्ञ आणि सुप्रसिद्ध गुरू होते. त्यांची शिकवण ऐकण्याची इच्छा असलेल्या दोन तुर्क एके दिवशी त्याच्या भेटीला आले. खाली हाताने कसे जाणार? म्हणून ते दोघे जण त्यांच्यापाशी जे काही होते ते घेऊन जलाल यांच्या भेटीला गेले.  ते खूप गरीब होते. त्यांच्यापाशी देण्यासारखे दुसरे काहीच नव्हते, म्हणून घरात जेवढे मूठभर धान्य होते तेवढे घेऊन ते आले होते. मोठ्या भक्तिभावाने त्यांनी ती भेटवस्तू जलाल यांना अर्पण केली. जलाल यांनी ती प्रेमाने स्वीकारली. पण त्याच वेळी त्यांच्या आजूबाजूला जो शिष्यवर्ग बसलेला होता, तो या दोन तुर्काकडे तुच्छतेने पाहू लागला. चाणाक्ष जलाल यांच्या नजरेतून हे गोष्ट सुटली नाही. बोलण्याच्या ओघात त्यांनी महंमद पैगंबर यांची गोष्ट सांगायला सुरुवात केली.

"एकदा महंमद पैगंबर यांना त्यांचे एक काम पूर्ण करण्यासाठी संपत्तीची गरज होती. त्यामुळे 'तुम्हाला जे काही देणे शक्य आहे ते मला द्या,' असे त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितले. काहींनी त्यांची अर्धी मालमत्ता आणली, तर काही जणांनी स्वतःच्या मालमत्तेपैकी एक तृतीयांश मालमत्ता महंमद पैगंबर यांना दान दिली. अबू बकरने आपली सर्व संपत्ती दान केली. सर्व अनुयायांची मिळून, महंमद पैगंबर यांच्याकडे बरीच संपत्ती जमा झाली. त्यांना मोठ्या प्रमाणात पशुधन मिळाले, शस्त्रास्त्रे मिळाली. एक गरीब स्त्री पण महंमद पैगंबर यांची भक्त होती.  आपणही काही दान द्यावे असे त्या स्त्रीला वाटले. काहीशा संकोचाने पण अतीव श्रद्धेने त्या स्त्रीने महंमद पैगंबर यांना तीन खजूर आणि केकचा एक तुकडा देऊ केला.  हे पाहून अनेकजण हसले, परंतु प्रेषिताने त्यांना सांगितले की त्यांना एक स्वप्न पडले होते. त्यामध्ये त्यांना असे दिसले की,  एक देवदूत हातामध्ये तराजू घेऊन उभे होते. सर्व अनुयायांनी दिलेली संपत्ती एका पारड्यात आणि या गरीब स्त्रीने दिलेली भेट दुसऱ्या पारड्यात असे ठेवण्यात आले होते. आणि तरीही तो तराजू संतुलित झाला होता. बाकीच्यांनी स्वतःचा विचार करून, आपल्या मालमत्तेपैकी आंशिक संपत्ती दिली होती पण या स्त्रीने मात्र तिच्याकडे जे काही होतेनव्हते ते सारेच देऊ केले होते. त्यामुळे तिचे पारडे जड ठरले होते. ''

गोष्ट सांगून पूर्ण करता करता जलाल यांनी शिष्यवर्गाकडे कटाक्ष टाकला आणि विचारले, '' समजले?'' शिष्यवर्गाला बोध मिळाला होता. सर्वांनी माना खाली घालून उत्तर दिले, ''हो महाराज, समजले आम्हाला.'' झाल्या प्रसंगाने दोन्ही तुर्क आनंदाने भरून गेले आणि त्यांच्या मूठभर धान्याबद्दल हसण्याचे धाडस आता कोणीही करणार नव्हते.

तात्पर्य

[संपादन]

प्रामाणिक अंतःकरणाने अर्पण केलेल्या एका छोट्या भेटवस्तूचे मोल महागड्या भेटवस्तूंइतकेच असते, ही शिकवण या कथेतून जलाल यांनी दिली आहे.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.