मीशेल फॉकीन
मीशेल फॉकीन हे एक रशियन नर्तक व नृत्यालेखक होते. सेंट पीटर्झबर्ग (सध्याचे लेनिनग्राड) येथे जन्म. १८८८ साली तेथील ‘इंपीरिअल बॅले स्कूल’ मध्ये प्रवेश घेतला. नृत्याशिवाय चित्रकला आणि संगीत या विषयांतही त्याला रस होता. शिक्षणानंतर तो ‘मारिन्स्की थिएटर’ मध्ये नर्तक म्हणून काम करू लागला. १९०२ साली ‘इंपीरिअल बॅले स्कूल’ मध्ये प्रमुख नर्तक व शिक्षक म्हणून नेमणूक. १९०५ मध्ये आपल्या विद्यार्थांसाठी Acis et Gelatee या पहिल्या बॅलेचे नृत्यालेखन केले. द डाइंग स्वांन हे त्याचे सर्वांत प्रसिद्ध बॅले नृत्यही त्याने त्याची सहाध्यायी ⇨ आन्न पाव्हलॉव्हसाठी त्याच वर्षी निर्माण केले. १९०७ मध्ये त्याने Chopiniana नावाने बॅले नृत्य तयार केले. त्याची पुढे ले सिल्फिद या नावाने पुनर्रचना करण्यात आली. अमेरिकन नर्तकी ⇨ इझाडोरा डंकनच्या नृत्यकलेने तो प्रभावित झाला होता.
रशियन नर्तक ⇨ स्पिरग्येई द्यागिल्येफने त्याच्या ‘बॅले रसेस’ मध्ये नर्तक व नृत्यालेखक म्हणून भाग घेण्यासाठी फॉकीनला १९०९ मध्ये पॅरिसला बोलावले. तेथे त्याने नृत्यालेखन केलेल्या बॅलेंमध्ये प्रिन्स ईगॉरय (१९०९), शहरजादी (१९१०), द फायरबर्ड (१९१०), Petrouchka (१९११) आणि Le Spectre de la Rose (१९११) हे प्रसिद्ध होत. ‘बॅले रसेस’च्या यशाचा मोठा वाटा फॉकीनकडे जातो. तो १९१४ साली रशियाला परतला. १९१८ मध्ये त्याने देश सोडला. पुढे १९२५ साली न्यू यॉर्कमध्ये त्याने स्वतःची नृत्यसंस्था स्थापन केली व १९३२ मध्ये अमेरिकन नागरिकत्व पतकरले. ब्ल्यू बिअर्ड (१९४१), द रशियन सोल्जर (१९४२) हे त्याने ‘बॅले थिएटर’ साठी रचलेले उल्लेखनीय बॅले होत. त्याने एकूण साठ बॅलेंचे नृत्यालेखन केले.
बॅले नृत्यातील नृत्यालेखन, वेशभभूषा, संगीत आदी घटकांचा एकात्म परिणाम साधण्यावर फॉकीनचा भर होता. लंडन टाइम्सला लिहिलेल्या ४ जुलै १९१४ च्या पत्रात त्याने बॅलेच्या पुनर्रचनेविषयीची आपली तत्त्वे मांडली आहेत. ‘बॅले’चे चैतन्यदायी पुनरुज्जीवन करणारा कलावंत म्हणून त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याने पियानो शिकून त्यात प्रावीण्य मिळवले.
हेलन ऑफ ट्रॉय या बॅलेसाठी नृत्यालेखन करीत असता न्यू यॉर्क येथे त्याचे निधन झाले. मेम्वार्स ऑफ अ बॅले मास्टर हा त्याच्या आठवणींचा संग्रह त्याचा मुलगा व्ह्यिताल्ये फॉकीन याने इंग्रजीत भाषांतरित केला व छुजॉय यांनी तो संपादित केला (१९६१).