मिलिंद जोशी
मिलिंद गोविंदराव जोशी (माणकेश्वरकर) हे एक मराठी लेखक आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील माणकेश्वर हे त्यांचे मूळ गाव असून त्यांचे शालेय शिक्षण बार्शीला झाले.पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. व्यवसायाने स्थापत्य अभियंता असून शब्दांचे बांधकाम करण्यातही ते वाकबगार आहेत. प्रचंड जनसंपर्क, अफाट व्यासंग, शैलीदार लेखन, अमोघ वक्तृत्व, कुशल प्रशासन आणि सकारात्मक साहित्यकारणी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते २०१६पासून कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उपक्रमांद्वारे महाराष्ट्र साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख केले. नुकतेच एप्रिल, २०२५ला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचेही ते अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी आजवर ललितलेखन, कथा, व्यक्तिचित्रे, तत्त्वचिंतनात्मक, चरित्र व आत्मपर अशा विविध वाङ्मयप्रकारातील सुमारे २१हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी नामवंत वृत्तपत्रात स्तंभलेखनही केले आहे. अमोघ वक्तृत्वशैलीमुळे पुण्याच्या नामवंत वसंत व्याख्यानमालेसह महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच बृहन्महाराष्ट्र आणि परदेशातही विविध विषयांवर त्यांची शेकडो व्याख्याने झाली आहेत. महाराष्ट्राततील अनेक प्रतिष्ठित साहित्य संमेलनाची अध्यक्षपदेही त्यांनी भूषविली आहेत.
पुस्तके
[संपादन]- आपली मुलं घडविताना (व्यक्तिमत्त्वविकास)
- एका परिसाची कथा (कथासंग्रह)
- ऐसी कळवळ्याची जाती (व्यक्तिचित्रणे)
- खेळ (कथासंग्रह)
- चरित्रं अशी घडतात (बाबासाहेब पुरंदरे ते जगदीश खेबुडकर अशा २५ जणांची व्यक्तिचित्रणे)
- तमाच्या तळाशी (कथासंग्रह)
- पानगळ (कथासंग्रह)
- पाहावे आपणासी आपण (स्वयं-विकास)
- प्राचार्य (प्रा. शिवाजीराव भोसले यांचे चरित्र)
- शिक्षणातील आनंदयात्री (अनुभवकथन)
- संतसाहित्य आणि आजची पिढी (संतसाहित्य)