मिकीनी ग्रीक
| मिकीनी ग्रीक | |
|---|---|
| प्रदेश | दक्षिण बाल्कन आणि क्रेते |
| पर्व | इ. स. पू. १६वी - १२वी शतके |
| भाषाकुळ |
हिंद-युरोपीय
|
| लिपी | रेखीय बी |
| भाषा संकेत | |
| ISO ६३९-३ | gmy |
|
| |
मिकीनी ग्रीक ही ग्रीक भाषेचा सर्वात जुना ज्ञात उपप्रकार आहे. ही भाषा मिकीनी ग्रीसमध्ये (इ.स.पू. १६व्या ते १२व्या शतकांच्या दरम्यान) मुख्य ग्रीक भूभाग आणि क्रेतेमध्ये बोलली जात होती. या रेखीय बी लिपीत लिहिल्या गेलेल्या या भाषेचे अवशेष क्रेतेमध्ये इ.स.पू. १४ व्या शतकापूर्वीच्या शिलालेखांमध्ये सापडतात. हे शिलालेख बव्हंश मध्य क्रेतेमधील क्नोस्सोस, तसेच पेलोपोनेसच्या नैऋत्येकडील पिलोस इथे सापडलेल्या मातीच्या पाट्यांवर आहेत. इतर पाट्या मिकीनाइ, तिरिन्स आणि थेबेस येथे आणि पश्चिम क्रेतेमधील खानिया येथे सापडल्या आहेत. [१] या भाषेला मिकीनी ग्रीसमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या मिकीनीचे नाव दिले आहे.
या लिपीतील शिलालेखांचा बराच काळ उलगडा झालेला नव्हता. या लिखाणाबद्दल अनेक भाषा सुचवल्या गेल्या होत्या. मायकेल व्हेंट्रिस यांनी ॲलिस कोबर यांच्या संशोधनाचा आधार घेत १९५२ मध्ये त्या लिपीचा उलगडा केला. [२]
संग्रह
[संपादन]मिकीनी काळाच्या ग्रीक लेखनाच्या संग्रहात LM २(उत्तर मिनोसी २) ते LH३B (उत्तर हेलेनी ३ B) पर्यंतच्या रेखीय बी लिपीतील सुमारे ६,००० पाट्या आणि खापरांचे तुकडे आहेत. आतापर्यंत कोणतेही रेखीय बी स्मारक किंवा गैर-रेखी बी लिपीतील लिप्यंतरण सापडलेले नाही.
काफकानिया दगडावर सर्वात जुना माहीती असलेला मिकीनी शिलालेख असल्याचा दावा केला जातो, जो इ.स.पू. १७व्या शतकातील असल्याचे मानले जाते. परंतु, त्याच्या सत्यतेबद्दल मोठ्या प्रमाणावर शंका घेतली जाते आणि रेखीय बी वरील बहुतेक विद्वत्तापूर्ण अभ्यासांमधून त्याला पूर्णपणे वगळले आहे. [३] [४] [५]
रेखीय बी शिलालेखासाठी सर्वात जुनी सर्वमान्य तारीख क्नोस्सोसच्या 'रथ शिलालेखांची खोली' च्यामधील शिलालेखाची आहे, जे LM २ ते LM ३ A काळातील, म्हणजेच इ.स.पू. १५व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १४व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांपर्यंतचे मानले जातात. [६]
ग्रीक वैशिष्ट्ये
[संपादन]मिकीनीमध्ये आधीच ग्रीक भाषेचे वैशिष्ट्य असलेले खालील ध्वनींचे बदल झाले होते आणि त्यामुळेच ती ग्रीक मानली जाते: [७]
ध्वन्यात्मक बदल
[संपादन]- स्वरांच्या सुरुवातीला आणि मध्ये येणाऱ्या *s चा /h/ असा उच्चार.
- घोष महाप्राणांचा अघोषीकरण.
- अक्षररूप द्रव ध्वन्यांना /ar, al/ किंवा /or, ol/ केले जाते; अक्षररूप अनुनासिकांना /a/ किंवा /o/ केले जाते.
- *kj आणि *tj हे स्वराच्या आधी /s/ बनतात.
- सुरुवातीचे *j हे /h/ बनते किंवा z होते (नेमके ध्वनी माहीत नाही, शक्यतो [dz] ).
- *gj आणि *dj हे /z/ होतात.
- *-ti हे/-si/ होते (हे अतिकी-यवनी, आर्कादो-किप्री आणि आयोली भाषांमध्ये देखील आढळते, परंतु दोरिसी, बोयॉती किंवा थेस्साली या भाषांमध्ये नाही).
पदरचनाशास्त्रीय बदल
[संपादन]- कर्तृवाचक नामे तयार करण्यास -eus चा वापर
- उत्तम पुरुषी एकवचनी प्रत्यय -ei
- क्रियापदाचे मूळरूप प्रत्यय -ein, जो -e-en पासून संक्षिप्त झाला आहे.
शाब्दिक बाबी
[संपादन]- केवळ ग्रीक शब्द:
- 𐀣𐀯𐀩𐀄, क़ा-सि-रे-उ, *gʷasiléus (आजचे ग्रीक: βασιλεύς, बासिलेउस, "राजा")
- 𐀏𐀒, का-को, *kʰalkós (आजचे ग्रीक: χαλκός, खालकोस, "कांस्य")
- दुसऱ्या भाषांमधले माहीत असलेले शब्दांचे ग्रीक रूप:
- 𐀷𐀙𐀏, वा-ना-का, *wánaks (आजचे ग्रीक: ἄναξ, आनाक्स, "अधिपती, राजा, नेते"[८], कदाचित मराठीच्या 'वाणी' शब्दासोबत सजाती)[९]
- 𐀷𐀙𐀭, वा-ना-सा, *wánassa (आजचे ग्रीक: ἄνασσα, आनास्सा, "राणी")[१०]
- 𐀁𐀨𐀺, ए-रा-वो or 𐀁𐁉𐀺, ए-रै-वो, *élaiwon (आजचे ग्रीक: ἔλαιον, एलायोन, "जैतूनाचे तेल")
- 𐀳𐀃, ते-ओ, *tʰehós (आजचे ग्रीक: θεός, थेओस, "देव")
- 𐀴𐀪𐀡, ति-रि-पो, *tripos (आजचे ग्रीक: τρίπους, त्रीपूस, "तिपाई")
प्राचीन (होमरी) ग्रीकसोबत तुलना
[संपादन]| ओळ | मिकीनी ग्रीक (रेखीय बी लिपी) |
मिकीनी ग्रीकचे लिप्यंतरण | होमेरी ग्रीक (ग्रीक वर्णमाला: आजचे शुद्धलेखन) |
होमेरी ग्रीकचे लिप्यंतरण |
|---|---|---|---|---|
| 1 | 𐀗𐀛𐄁𐀀𐀸𐀆𐄁
𐀳𐀀𐄁 𐀟𐀩𐀷𐀆𐀃𐀍𐄁 𐀀𐀑𐀩𐀺𐄁 |
मोनिन अवेय्दे
थेहा पेलेवदेओह्यो अखिलेवोस |
Μῆνιν ἄειδε θεᾱ̀ Πηληϊάδεω Ἀχιλῆος | मेनिन् अएइदे थेआ
पेलेइआदेओ अखिलेओस |
| 2 | 𐀃𐀫𐀕𐀙𐄁
𐁀𐀘𐀹𐀊𐄁 𐀀𐀏𐀺𐄁𐀀𐀑𐀊𐄁 𐀁𐀳𐀐𐄁 |
प्;प्,एमाम
हा=मुर्विया अखाय्वोय्स अल्ग्या एथेऽके, |
οὐλομένην, ἣ μῡρί᾽ Ἀχαιοῖς ἄλγε᾽ ἔθηκε, | ओउलोमेनेन, हे
मुरि' अखाइलोस अल्गे' एथेके |
| 3 | 𐀡𐀩𐀷𐀆𐄁
𐀂𐀠𐀴𐀗𐄁 𐀢𐀱𐀏𐄁𐀀𐀹𐀅𐄁 𐀡𐀫𐀊𐀟𐀮𐄁 |
पोलेवास=दे
इफ्थिमोन्स प्सूखान्स अविदाय प्रोयाप्से |
πολλᾱ̀ς δ᾽ ἰφθῑ́μους ψῡχᾱ̀ς Ἄϊδι προΐαψεν | पोल्लास दिफ्थिमोउस
प्सूखास आइदी प्रोइआप्सेन |
| 4 | 𐀁𐀫𐀺𐄁𐁂𐀵𐀆𐄁
𐀸𐀫𐀨𐄁𐀳𐀄𐀐𐄁 𐀓𐀯𐄁 |
हेरोवोन,
अव्तोन्स=दे वेलोरा तेव्खे कुन्सी |
ἡρώων, αὐτοὺς δὲ ἑλώρια τεῦχε κύνεσσιν | हेरोओन, आउतोउस दे
हेलोरिया तेउखे कुनेस्सिन |
| 5 | 𐀃𐀺𐀜𐀂𐀤𐄁
𐀞𐀯𐄁𐀇𐀺𐀆𐄁𐀁𐀤𐀩𐀁𐀵𐄁𐀦𐀨𐄁 |
ओय्वोनोय्हि=क्वे
पान्सि, दिवोस=दे एक्वेलीतो ग्वोला, |
οἰωνοῖσί τε πᾶσι, Διὸς δ᾽ ἐτελείετο βουλή, | ओइओनोइसि ते पासि,
दिओस देतेलेइएतो बोउले, |
ध्वनीशास्त्र
[संपादन]
| प्रकार | ओष्ठ्य | दन्त्य | तालव्य | कण्ठ्य | कण्ठ्यद्वारीय | ||
|---|---|---|---|---|---|---|---|
| मध्यवर्ती | ओष्ठ्य. | ||||||
| अनुनासिक | m | n | |||||
| स्पर्श | अघोष | p | t | ts* | k | kʷ | |
| घोष | b | d | dz * | ɡ | ɡʷ | ||
| महाप्राणित | pʰ | tʰ | kʰ | kʰʷ | |||
| ऊष्मन् | s | h | |||||
| अन्तस्थ | j | w | |||||
| कंपन | r | ||||||
| पार्श्विक | l | ||||||
मिकीनीत काही पुरातन आद्य-हिंद-युरोपीय आणि आद्य-ग्रीक वैशिष्ट्ये जतन केलेली आहेत, जी वैशिष्ट्ये नंतरच्या प्राचीन ग्रीक भाषेत नसतात.
- ओष्ठ्यीकृत कण्ठ्य व्यंजने [ɡʷ, kʷ, kʷʰ], मिकीनी शुद्धलेखानाच्या लिप्यंतरणात ⟨q(क़)⟩ असे लिहिले जाते. [१२] इतर प्राचीन ग्रीक भाषांमध्ये, ओष्ठ्यीकृत काण्ठ्यांच्या जागी ओष्ठ्य /b, p, pʰ/, दन्त्य /d, t, tʰ/ किंवा कण्ठ्य व्यंजने /ɡ k kʰ/ संदर्भ आणि बोलीभाषेनुसार. उदाहरणार्थ, मिकीनी 𐀦𐀄𐀒𐀫 (क़ो-उ-को-रो), उच्चार gʷoukoloi, शास्त्रीय ग्रीकच्या βουκόλοι (बोउकोलोइ) "गुराखी" च्या समनार्थी व सजाती आहे.
- अर्धस्वर /j w/. दोन्ही प्रामाणिक अतिकी ग्रीकमध्ये लोप पावके, परंतु काही ग्रीक बोलीत /w/ राहिले आणि वाउ (ϝ) किंवा बेता (β) असे लिहिले गेले.
- स्वरांच्या मध्ये कण्ठ्यद्वारीय ऊष्मन् /h/.
मिकीनी शुद्धलेखनाच्या लिप्यंतरणात ⟨ z ⟩ असे लिहिलेल्या शब्दांच्या उच्चारणात अघोष आणि घोष संघर्षी /ts/ आणि /dz/ (वरील तक्त्यात तारकाचिन्हाने(*) दर्शविलेले) वापरले गेले असू शकत होते, अशी एक गृहीत कल्पना आहे. घोष /dz/ हा ध्वनी, हा प्रग्रीक काळाच्या घोष दन्त्य किंवा कण्ठ्य स्पर्श + *y ( *dy, *gy, *ɡʷy ) यांच्या समूहांपासून, किंवा काही विशिष्ट उदाहरणांमध्ये शब्दाच्या सुरुवातीला येणाऱ्या *y पासून विकसित झाला, आणि तो ग्रीक वर्णमालेतील ζ शी जुळतो. उदा., मिकीनी शब्द 𐀕𐀿, 𐀵𐀟𐀼 (मे-जो, तो-पे-जा), उच्चार मेद्जोस्, तोर्पेद्जा, शास्त्रीय ग्रीक μέζων, τράπεζα शी जुळतात. अघोष /ts/ प्रग्रीक अघोष किंवा अघोष महाप्राणित कण्ठ्य स्पर्शांच्या समूह आणि *y (*ky, *kʰy, *kʷy, kʷʰy) यांपासून विकसित झाले, आणि ग्रीक बोलींमधले -ττ- किंवा -σσ- यांच्याशी जुळतात. मिकीनी मध्ये या व्यंजनांचा स्पष्ट उच्चार अनिश्चित आहे.[१२]
किमान पाच स्वर /a e i o u/ होते, जे ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्ही असू शकतात.
शुद्धलेखन
[संपादन]
मिकीनी भाषा रेखीय बी लिपीमध्ये जतन केलेली आहे, ज्यात सु. २०० अक्षरी वर्ण आणि चित्रलिपी आहेत. रेखीय बी ही लिपी न उलगडलेल्या मिनोसी भाषेच्या रेखीय अ लिपीपासून तयार झाली असल्यामुळे, मिकीनी भाषेतील ध्वनी त्यात पूर्णपणे दर्शवले जात नाहीत. बोलचालीत वापरल्या जाणाऱ्या मोठ्या संख्येने अक्षरांचे प्रतिनिधित्व मर्यादित अक्षरी वर्णांद्वारे करावे लागते; विशेषतः, रेखीय बी लिपीत केवळ स्वरांत अक्षरांचे (स्वरांसोबत अंत होणारे) पूर्णपणे प्रतिनिधित्व करते, तर मिकीनी ग्रीक भाषेत व्यंजनांत अक्षरांचा (व्यंजनांनी अंत होणारे) वारंवार वापर केला जात असे.
यामुळे शुद्धेलेखनात सरलीकरण करावे लागले: [१२]
- 'द' आणि 'त' या दन्त्य व्यंजनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यंजनांसाठी घोष किंवा प्राण यांमधील फरक ठळकपणे दिसून आले नाहीत. उदा., 𐀁𐀒, ए-को, हे एकतर एगो ("मी") असू शकते किंवा एखो ("माझ्याकडे आहे") असे असू शकते.
- र आणि ल यांच्यात काही भेद दाखवले नाही आहे. उदा. 𐀣𐀯𐀩𐀄, क़ा-सि-रे-उ हे gʷasileus (शास्त्रीय ग्रीकमधील βασιλεύς, बासिलेउस, "राजा") आहे.
- घोगरे श्वास /h/ हे सामान्यतः समाविष्ट नसते, उदा. 𐀀𐀛𐀊, आ-नि-या हे हानिआई "लगाम" आहे. तथापि, 𐁀, आ2 पर्यायने वापरले जाते शब्दाच्या सुरुवातीला 'हा' आहे म्हणून.
- व्यंजन ल, म, न, र, स अक्षरांच्या अंताला वगळ्यण्यात येतात.
आकारविज्ञान
[संपादन]नामांची रूपे बहुधा ७ विभक्तींमध्ये बदलतात : प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, षष्ठी, सप्तमी, आणि संबोधन; ३ लिंगे : पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग; आणि ३ वचने : एकवचन, द्विवचन, अनेकवचन . तृतीया, चतुर्थी, आणि सप्तमी विभक्तींचे विलीनीकरण आधीच सुरू झाले होते, जे अतिकी ग्रीक भाषेपर्यंत पूर्ण झाले; तथापि, एक वेगळा तृतीया अनेकवचनी प्रत्यय -फी अजूनही शिल्लक होता. [१३] आधुनिक ग्रीक भाषेत, केवळ प्रथमा, द्वितीया, षष्ठी आणि संबोधन या विभक्ती त्यांच्या स्वतःच्या रूपशास्त्रीय प्रत्ययांसह स्वतःचे विभक्ती राहिले. [१४]
विशेषणे नामांशी विभक्ती, लिंग आणि वचनानुसार अन्वय लावतात . तुल्य-भाव -योस् प्रत्ययाने तयार होते; अतिशयोक्ती रूप आढळत नाही. [१५]
क्रियापदांचे बहुधा ३ काळांमध्ये संयुग्मन करतात: भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ; ३ अवस्था : पूर्ण व्याप्ती, पूर्णत्व, अपूर्णत्व ; ३ वचन : एकवचन, द्विवचन, अनेकवचन ; ४ अर्थ: स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ, इच्छार्थ ; ३ प्रयोग : कर्तरी, कर्मानुकर्तरी, कर्मणी ; ३ पुरुष : प्रथम, मध्यमा, उत्तम; क्रियापदाचे मूळरूप, आणि क्रियाविशेषणे . तथापि, सिद्ध झालेल्या रूपांमध्ये केवळ उत्तम पुरुष स्वार्थ आहेत, ज्यात बहुतेक रूपे वर्तमानकाळात आहेत, भविष्यकाळ आणि अभूतकाळातील रूपांची संख्या अति मर्यादित आहे, आणि एक पूर्ण भूतकाळाचे रूप आहे. -हेन प्रत्यय असलेले क्रियापदाचे मूळ रूप, तसेच कर्तरी आणि कर्मणी कृदंत देखील सिद्ध आहेत. [१६]
मिकीनी ग्रीक भाषेत क्रियापदाचा आगमन जवळजवळ पूर्णपणे अनुपस्थित आहे, केवळ एक ज्ञात अपवाद वगळता; 𐀀𐀟𐀈𐀐, आ-पे-दो-के (पिलोस Fr ११८४) परंतु ते दुसरीकडे आगमनाबिना दिसते, 𐀀𐀢𐀈𐀐 म्हणून. होमेरमध्ये कधीकधी या आगमनाला वगळतात.
संदर्भ
[संपादन]- ↑ Chadwick, John (1976). The Mycenaean World. Cambridge UP. ISBN 0-521-29037-6.
- ↑ "Cracking the code: the decipherment of Linear B 60 years on". University of Cambridge. 15 January 2023.
- ↑ थॉमस जॉ. पलेमा, "OL Zh 1: QVOVSQVE TANDEM?" Minos 37–38 (२००२–२००३), पृ. ३७३–३८५ पूर्ण ग्रंथ
- ↑ खेलेना तोमास (२०१७) "Linear B Script and Linear B Administrative System: Different Patterns in Their Development" in P. Steele (ed.) Understanding Relations Between Scripts: The Aegean Writing Systems, पृ. ५७–६८, क्र.२
- ↑ ॲना जडसन (२०२०) The Undeciphered Signs of Linear B, क्र. ५१३
- ↑ Driessen, Jan (2000). The Scribes of the Room of the Chariot Tablets at Knossos: Interdisciplinary Approach to the Study of a Linear B Deposit. Ediciones Universidad de Salamanca.
- ↑ Ventris & Chadwick 1973, पान. 68.
- ↑ "The Linear B word wa-na-ka". Palaeolexicon. Word study tool of ancient languages.
- ↑ Blažek, Václav (2009-01-01). "Dagmar S. Wodtko, Britta Irslinger, Carolin Schneider. 2008. Nomina im Indogermanischen Lexikon". Lingua Posnaniensis. 51 (1): 173–180. doi:10.2478/v10122-009-0013-y. ISSN 2083-6090.
- ↑ "The Linear B word wa-na-sa". Palaeolexicon. Word study tool of ancient languages.
- ↑ Wiseman 2010, पाने. 30–40.
- 1 2 3 Ventris & Chadwick 1973. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "FOOTNOTEVentrisChadwick1973" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Thompson 2024, पान. 239.
- ↑ ॲंड्रू गॅरेट, "Convergence in the formation of Indo-European subgroups: Phylogeny and chronology", in Phylogenetic methods and the prehistory of languages, सं. पीटर फोर्स्टर आणि कोलिन रेनफ्रू (केम्ब्रिज: मॅकडॉनाल्ड पुरातत्व संशोधन संस्था), २००६, पृ. १४०, उद्धृत इवो हायनाल, Studien zum mykenischen Kasussystem. बर्लिन, १९९५, या तरतूदासोबत की "मिकीनीचे विभक्ती अजूनही जरा वादग्रस्त आहे काही-काही ठिकाणी".
- ↑ Thompson 2024, पान. 243.
- ↑ Thompson 2024, पाने. 243–246.
स्रोत
[संपादन]