मारिया माँटेसॉरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मारिया टेक्ला आर्टेमिसिया माँटेसॉरी (३१ ऑगस्ट, १८७० - ६ मे, १९५२:नूर्डविक, नेदरलँड्स) या इटालियन डॉक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी पुरस्कृत केलेली लहान मुलांसाठीची शिक्षणपद्धती जगभरात वापरली जाते.

माँटेसॉरींनी लहानपणी मुलांच्या शाळेत प्रवेश घेउन अभियंता होण्याचे ठरविले होते परंतु नंतर हा बेत बदलून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोमच्या सापिएंझा विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळविणाऱ्या पहिल्या काही स्त्रियांमध्ये त्या होत्या. त्या १८९६ साली पदवीधर झाल्या.

प्रारंभिक कारकीर्द[संपादन]

१८९६ ते १९०१ पर्यंत, मॉन्टेसरी यांनी तथाकथित "फ्रेनेस्थेनिक" मुलांसोबत काम केले आणि संशोधन केले - संज्ञानात्मक विलंब, आजारपण किंवा अपंगत्व अनुभवणारी मुले यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणे, अभ्यास करणे, बोलणे आणि लेखन प्रकाशित करणे या गोष्टी सुरू केल्या. महिला अधिकार आणि शिकण्यात अडचणी असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली.[१]

मारिया माँन्टेसरी

भारतातील वास्तव्य[संपादन]

माँटेसॉरी थियोसोफिकल सोसायटीच्या सदस्या होत्या. १९३९मध्ये त्या चेन्नईच्या थियोसोफिकल सोसायटीमध्ये आपल्या शिक्षणपद्धतीचा वर्ग घेण्यासाठी आल्या होत्या.[२] १९४०मध्ये इटलीने जर्मनीच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केल्यावर युनायटेड किंग्डमने आपल्या साम्राज्यातील सगळ्या इटालियन व्यक्तींना जेरबंद केले. यांत माँटेसॉरी यांचा मुलगा मारियो सुद्धा होता. मारिया माँटेसॉरींना थियोसोफिकल सोसायटीच्या आवारात बंदिस्त ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांनी मारियोला आपल्या आईबरोबर राहण्यास परवानगी दिली गेली. त्यानंतर दोघेही चेन्नई व कोडाईकॅनाल येथे राहिले होते. त्यांना भारतात शिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मारिया व मारियो दोघेही महायुद्ध संपेपर्यंत भारतातच राहिले व १९४६मध्ये ते नेदरलँड्स व युरोपला परतले.

१९७० साली प्रकाशित करण्यात आलेले टपाल तिकीट

शिक्षणपद्धती[संपादन]

मॉन्टेसरी यांनी निरीक्षणांवर आधारित, बालवाडीतील मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक पद्धती लागू केल्या. त्या त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि पद्धतीचे वैशिष्ट्य बनल्या. त्यांनी जड फर्निचरच्या जागी,मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे यांचा वापर सुरू केला. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आणि स्वयंपाक करणे, झाडू मारणे, धान्य निवडणे, भाजीपाला निवडणे यासारख्या कृतींचा समावेश शिक्षणामध्ये केला.[१]

त्यांच्या भारतातील वास्तव्यात त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयोगांवर आधारित व्याख्याने दिली, प्रशिक्षण वर्ग चालविले. त्यांच्या हाताखाली अकराशे शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आणि माँटेसरी शाळा सुरू केल्या. त्याच्या कार्याचा प्रभाव भारतात गिजुभाई बधेका, सरलादेवी साराभाई आणि ताराबाई मोडक यांच्यावर पडला. त्यांनी सुरुवातीला माँटेसरी संघ स्थापन केला. [३]

लेखन[संपादन]

द सिक्रेट ऑफ चाईल्डहुड [३]

बाह्य दुवे[संपादन]

मॉन्टेसरी पद्धत आणि श्रीअरविंद यांची सर्वंकष शिक्षण पद्धत यांतील अनुबंध

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Kramer, Rita (1988). Maria Montessori : a biography. Reading, Mass.: Addison-Wesley Pub. Co. ISBN 0-201-09227-1. OCLC 18289858.
  2. ^ Trabalzini 2011, पान. 165.
  3. ^ a b सुरेखा दीक्षित (२०२२). फुलायचे दिवस. SMILE.