महाळुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाळुंग वनस्पती मूळ भारतातील असून भारताच्या पूर्व भागातील वनांत, हिमालयाच्या पायथ्याजवळील प्रदेशात तसेच महाराष्ट्राच्या पश्‍चिम घाटात ही वनस्पती वाढलेली दिसून येते .

महाळुंग

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही लिंबू वर्गात मोडणारी मूळ वनस्पती आहे.

या वनस्पतीची नावे प्रामुख्याने - म्हाळुंग, बीजपूरक, मातुलुंग, बिजाहृ, फलपुरक, अम्ल-केसर, बीजपूरक, सुमनःफल इ. प्राचीन काळापासून प्रचलित आहेत.

अरुची दूर करून तोंडाची रूची वाढवते म्हणून त्याला "मातुलुंग" किंवा "रूचक" असे म्हणतात. महाळुंग भूक वाढवणारे, हृदयास हितकर( ह्रृद्य), घशातील कफ कमी करून कंठ शुद्धी करणारे, रक्त व मांस धातूला शक्ती देणारे, तृषाशामक, खोकला, दमा, अरुची, उलटी, जुलाब, पोटदुखी, पोटात गोळा येणे, मूळव्याध, मलबद्धता, जंत (कृमी) दातांची कीड या आजारांमध्ये गुणकारी आहे.

महाळुंगाचे केसर, साल, रस, गर तथा मूळ अशा सर्व भागांचा वेगवेगळ्या आजारांच्या चिकित्सेत उपयोग होतो.

मधरं मातुलुंग तु शीतं रूचिकर मधु ।
गुरू वृष्यं दुर्ज्जरं च स्वादिष्टं च त्रिदोषनुत ॥
पित्तं दाहं रक्‍तदिषान्विबंधश्‍वास्वकासकान ।
क्षयं हिक्‍कां नाशयेश्‍च पूर्वरेवमुदाहृतम् ॥

अर्थ: गोड म्हाळूंग हे शीतल, रुचिकारक, मधुर, भारी (जड) वीर्यवर्धक, दुर्जर, स्वादिष्ट तसेच त्रिदोष, पित्त, दाह, रक्‍तसंबंधित विकार, मलबंध, श्‍वासविकार, खोकला, क्षय आणि उचकी दूर करते.

आयुर्वेदाच्या अनेक प्राचीन तसेच अर्वाचीन ग्रंथात या वनस्पतीच्या विविध औषधी गुणधर्माचे वर्णन पाहायला मिळते. ‘बृहत्निघंटु रत्नाकर’ या ग्रंथमालिकेतील ‘शालीग्राम निघंटु’ या ग्रंथात म्हाळुंगाच्या विविध औषधी उपयोगाबाबत सविस्तर माहिती पाहायला मिळते. महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील आयुर्वेद महामहोपाध्याय म्हणून गौरवल्या गेलेल्या शंकर दाजीशास्त्र पदे यांच्या ‘वनौषधी गुणादर्श’ या 1893 साली रचलेल्या ग्रंथात म्हाळूंग हे फळ बावीस प्रकारच्या आजारावर औषधी म्हणून गुणकारी असल्याचे म्हटले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करून सुलभ प्रसूतीसाठी केला जाणारा उपयोग होय.

महाळुंग ही वनस्पती काटेरी असून दोन - तीन मी. उंच वाढते. पाने संयुक्त, एकाआड एक व एकदली असून पर्णिका लांबट, अंडाकृती व दंतुर असतात. पानांवर तेलग्रंथी असून पाने चुरगळल्यावर तेल बाहेर पडून त्यांचा सुगंध दरवळतो.

फुले पांढरी किंवा गुलाबी व द्विलिंगी असतात. फळ देठाकडे आकाराने मोठे व जाडसर असते १२–१५ सेंमी. लांब असते. देठाकडे खवले जास्त असतात. त्याची साल जाड व तेलकट असते याचे आयुर्वेदिक औषधी मध्ये महत्वाचे स्थान आहे . फळाचा रंग प्रथम हिरवा असतो व नंतर पिवळा होतो. फळ चवीला आंबट व किंचित कडवट असते यात रस अजिबात आढळत नाही. फळाच्या टोकाला फुगवटा असतो. काही फळांत कधीकधी दोन-तीन फुगवटे दिसून येतात.

गळलिंबू आणि महाळुंग या दोन विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. गळलिंबू हे दिसायला महाळुंग शी मिळतेजुळते असून ते लांबट निमुळते असते आणि त्यावरील खवले कमी जाडीचे असतात.

सांस्कृतिक[संपादन]

भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये पण आदिशक्‍ती किंवा जगत्जननी या स्वरूपाच्या देवीच्या हातामध्ये हे फळ देवीने धारण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात श्री. महालक्ष्मी देवी (अंबाबाई)चे मंदिर आहे, कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच आदिशक्‍ती. तिच्या उजव्या हातात हे फळ धारण केलेले असून धर्मशास्त्राप्रमाणे या फळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे दिसून येते. जैन मूर्तीशास्त्रात चोवीस तीर्थंकरांचे चोवीस यक्ष आणि चोवीस यक्षिणींपैकी तीस मूर्तींच्या हातात हे फळ असल्याचे उल्लेख पाहायला मिळतात. गणेश उपासनेत महागणपती या गणेशाच्या हातात पण म्हाळूंग आहे, तर आपल्या परंपरातील अनेक देव, देवतामूर्ती म्हाळूंग धारण केलेल्या पाहायला मिळतात. जगभरातील भिन्‍न भिन्‍न संस्कृतीमध्ये देव मूर्तींना हे फळ धारण केलेले दाखवले जाते. यामागे या वनस्पतीच्या महत्त्वाच्या औषधी गुणधर्माचे प्रतीक आहे.

महाळुंग या वनस्पतीचे फळ दैवज्ञ ब्राम्हण समाजातील लग्नकार्यात ओटी भरणे या कार्यक्रमात केला जातो.

बाह्य दुवे[संपादन]