महारोगी सेवा समिती
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर येथे आहे.
नॉर्वेच्या डॉ. गेऱ्हार्ड आरमॉर हॅन्सेन यांनी १८७३ साली कुष्ठरोगाला कारणीभूत असणाऱ्या ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्री’ या जीवाणूचा शोध लावला. या रोगावर औषधोपचार, लस वगैरे शोधण्यासाठी संशोधन सुरू झालं. हा शोध लागण्यापूर्वी कुष्ठरोगाची लागण झालेल्या व्यक्तीविषयी अशी ठाम जागतिक धारणा होती, की पूर्वजन्माचे पातक म्हणूनच याला कुष्ठरोग झाला आहे. आणि त्या पापाची फळं हा या जन्मात भोगतो आहे! कुष्ठरोगाला कारणीभूत जीवाणूचा शोध लागला तरी दुर्दैवाने समाजमनात कुष्ठरुग्णांबद्दल असलेली घृणा, त्यांची होणारी अवहेलना, उपेक्षा मात्र तशीच टिकून होती.
त्यामुळे कुष्ठरोगासंबंधी वैद्यकीय दृष्टिकोन महत्त्वाचा होताच; पण मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून कुष्ठरोगाचा विचार करणं आणि कृती कार्यक्रम राबवणं हे जास्त आव्हानात्मक आणि अवघड काम आहे, हे बाबांना लक्षात आलं होतं. त्यांनी कुष्ठपीडितांसाठी एक स्वास्थ्य कार्यक्रम तयार केला आणि १९ ऑगस्ट १९४९ रोजी आपल्या काही मित्रांच्या मदतीने ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. कुष्ठपीडितांवर औषधोपचार आणि त्यांचे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन हे नव्या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट ठरलं.[१]
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी उभ्या केलेल्या सेवाकार्याची ख्याती बदलत्या पिढीला, विशेषतः तरुणांना या सेवाकार्याशी जोडून घेण्यासाठी 'महारोगी सेवा समिती'चे कार्यालय पुण्यात सुरू झाले आहे. तसेच महारोगी सेवा समिती, दत्तपूर, जि. वर्धा येथेही कार्यरत आहे.
बाबा आमटे
[संपादन]वरोर येथील श्रीमंत जमीनदार कुटुंबामध्ये १९१४ मध्ये जन्म झाला. एकदा त्यांनी अत्यंत वाईट परिस्थीतीमधील व्यंग असलेला कुष्ठरुग्ण पाहिला आणि त्यांचे जीवनच बदलून गेले. त्यांनी त्यांची पत्नी साधनासह संपूर्ण जीवन कुष्ठरुग्णांच्या सेवेतच घालविण्याचे ठरविले. शासनाकडुन त्यांनी ५० एकर वैराण जमीन घेतली .जून १९५१ मध्ये वरोरा येथे बाबांनी महारोगी सेवा समिती स्थापून आनंदवन निर्माण केले. बाबांना डेमियन पुरस्कार मिळाला. मेगॅसेसे आणि पदमविभुषण या पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.[२]
आनंदवन
[संपादन]समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे ‘आनंदवन’![३]
केबीसीच्या कर्मवीर या भागासाठी डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या भागाचे मुंबईत चित्रीकरण झाले. त्यापूर्वी काही महिन्यांआधी केबीसीच्या रिसर्च टीमने हेमलकसा येथे येऊन लोकबिरादरी प्रकल्पाच्या कार्याचे चित्रीकरण केले होते. अमिताभ यांना आमटे दाम्पत्याविषयीची माहिती देण्यात आली. इकडे अमिताभ आमटेंच्या भेटीसाठी उत्सुक असताना डॉ. प्रकाश आणि मंदा हे दाम्पत्यही महानायकाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आतूर होते. मुंबईत सेटवर पोहचताच डॉ. प्रकाश आणि अमिताभ यांची गळाभेट झाली. केबीसी चित्रीकरणाच्या विश्रांतीदरम्यान अमिताभ यांनी २५ लाख रुपये देण्याचा मनोदय व्यक्त केला.
कार्यक्रम संपताच कुठल्याही घोषणेशिवाय २५ लाखांची रक्कम महारोगी सेवा समिती वरोराद्वारा संचालित लोकबिरादरी प्रकल्पाच्या खात्यात त्यांनी जमा केली. जिंकलेल्या रकमेचा लोकबिरादरीला फायदा होईल मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कोट्यवधी लोकांपर्यंत हेमलकसाचे काम आज पोहचले आहे. त्याचा मला विलक्षण आनंद आहे, असे मनोगत डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.[४]
लोकबिरादरी प्रकल्पावर नितांत प्रेम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक तसेच सर्व भारतातील जनतेचे आम्ही ऋणी आहोत. या दुर्गम भागात सुसज्ज दवाखान्यात चांगली आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, बांबू हस्तकला, पाण्यासाठी गावागावात मोठे तलाव व गावविकास अशा कार्यातून आदिवासीबांधवांचा विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहोत, नव्हे करीत राहणार. गेल्या ४५ वर्षांत प्रकल्पनिर्मितीत हजारो लोकांनी आर्थिक सहभाग दिला आहे. त्याशिवाय एवढे काम उभे करणे अवघड झाले असते, असेही आमटे यांनी म्हणले आहे.[५]
बाह्य दुवे
[संपादन]- https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/baba-amte-work-for-leprosy-patient-1430463
- https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/anandvan-baba-amte-1197001
- https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/amitabh-bachchan-gives-25-lakh-to-prakash-amte[permanent dead link]
- https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/to-reach-the-work-of-amte-/articleshow/67095980.cms Archived 2019-10-30 at the Wayback Machine.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ आमटे, विकास. "महारोगी सेवा समितीचे बीजारोपण". 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम". https://arogya.maharashtra.gov.in. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "आनंदवन समाजभान अभियान". 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "त्यागापुढे भारावला महानायक". 2019-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "त्यागापुढे भारावला महानायक". 2019-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.