महागोंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महागोंड, हे आजरा तालुक्यातील गांव राजकीयदृष्या जागरुक असलेले गांव म्हणून ओळखले जाते. या गावाला महागोंड आणि महागोंडवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. प्रामुख्याने शेती हा या गावांतील लोकांचा व्यवसाय आहे.

महागोंड हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या तालुक्याच्या गावापासून १६ किमी. अंतरावर असलेले व निसर्ग सौंदर्याने नटलेले असे हे गाव आहे. सह्याद्री खोऱ्यामध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेले या गावाला डोंगराळ भाग असल्यामुळे या गावाला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.तसेच गावाला पठारी भागही असल्यामुळे रानटी प्राण्यांचा वावर जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे येथे साप, ससे, गवे,रानडुक्करे,भेकरे, वनगाई,लांडगे-कोल्हे इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तसेच मोर, चिमणी, कोकिळा, पोपट इत्यादी पक्षीही मोठ्या प्रमाणात दिसतात.

या गावचे ग्रामदैवत बाळोबादेव आहे.

महागोंडगावचे वैशिष्ट्य म्हणजे "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रभागी असलेल्या शाहीर द.ना.गव्हाणकर आणि कला महर्षी बाबुराव पेंटर यांचे हे जन्मगाव अाहे.

आजरा पंचायत समितीच्या भादवण पंचायत समिती मतदार संघात, तसेच जिल्हा परिषद उत्तूर मतदार संघात हे गाव येते. कागल विधान सभा मतदार संघामध्ये हे गांव आहे.

महागोंड हे गाव परिसरातील एकूण आठ गावांतील मध्यवर्ती ठिकाण आहे.

येथे दहावीपर्यंत हायस्कूल, दूरध्वनी केंद्र व पोस्ट ऑफीस आहे. हालेवाडी, वडकशिवाले, वझरे, महागोंडवाडी, घागरवाडी या खेडयातील मुलांना शिक्षणासाठी येथील हायस्कूलचा आधार आहे. दूरद्वनिकेंद्राची क्षमता २००० फोन्सची आहे. तसेच बीएसएनएल आणि आयडिया या कंपनीचे मोबाईल टॉवर या गावात आहेत. त्यामुळे या कंपनींची मोबाईल धारकांची संख्याही मोठी आहे. गावात तीन दूधसंस्था आणि एक पतसंस्था तर तरुण मंडळांची संख्या दोन आहे. तसेच ब श्रेणी असलेले वाचनालय आहे. अशी वाचनालये आजरा तालुक्यात सात ते दहा आहेत त्या यादीत महागोंड येथील वाचनालयाचे नांव आहे.

गावच्या सुरुवातीलाच डाव्या-बाजूला गावातील प्राथमिक केंद्र शाळा आहे. ही केंद्रीय प्राथमिक शाळाही या परिसरातील शाळांची मध्यवर्ती शाळा आहे. त्या परिसरात पिण्याची पाण्याची टाकी बांधली आहे. शाळेभोवती सिमेंटचा बांधलेला कठडा व शाळेच्या परिसरात विविध फुलझाडांनी विस्तारलेली बाग यामुळे शाळा खूप सुंदर दिसते.

विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आजरा, उत्तूर आणि गडहिंग्लज या शहरांचा आधार घ्यावा लागतो.

येथील लोकांना येथून जवळच असलेल्या बाजारासाठी उत्तूर तसेच तालुका आजरा आणि शेजारचा तालुका गडहिंग्लजला जावे लागते. वैद्यकीय सेवेसाठीही या तीन शहरांचा आधार घ्यावा लागतो. या गावात नोकरदारांची संख्याही मोठी आहे. हे. घरातील एकजण नोकरीसाठी मुंबईला किंवा पुणे अशा बाहेरगावी गेलेला पहायला मिळतो. शासकीय नोकरदारांची संख्या मोठी आहे. मात्र या गावचा विकास झालेला तसा पहायला मिळत नाही. राजकीयदृष्टया जागरूक म्हटले तरी राजकारणी लोकांनी आपल्या स्वार्थामुळे गावच्या विकासासाठी झुकते माप कधीच दिलेले नाही, हा गावाला मोठा शाप आहे. या लोकांनी आपली स्वतःची कामे अनेक करून घेतली, मात्र गावाच्या कामांना फार महत्त्व दिले नाही. आज गावातील रस्ता खराब आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण अद्याप चुकलेली नाही. पाणीटंचाईग्रस्त म्हणून या गावाची दुसरी ओळख आहे. हे गाव आजही १९९१ साली लोकवर्गणीतून बांधलेल्या विंधण विहिरीवर पाण्यासाठी अवलंबून आहे. चिकोत्रा धरणाचे येणारे पाणी कुठे मुरले ही ग्रामस्थांना अद्याप कळलेले नाही.

त्याचप्रमाणे गावच्या सुरुवातीलाच बस-स्थानक आहे. गावातील ग्रामस्थांना व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसची खास सोय आहे. त्यामुळे आजू-बाजूच्या वाड्या-वस्त्यांना त्याचा झाला आहे.गावच्या सुरुवातीपासून ते गावाच्या आतपर्यंत फुल-झाडे ,नारळ,केळी,पेरू,आंबा,चिंच,इत्यादी झाडे लावली आहेत.

गावात प्रवेश करतेवेळी डाव्या-बाजूला "लक्ष्मीचे छोटे आकर्षक मंदिर आहे. मंदिराकडे पाहिल्यानंतर अतिशय लहान आकारात मंदिर दिसत असलेतरी या मंदिरात श्रद्धेने येणारे लोक फार मोठ्या प्रमाणावर आहेत.मंदिरामध्ये लक्ष्मीची लहानशी मूर्ती असून अगदी मंदिरासमोर छोटा चबुतराही आहे.जमिनीपासून चबुतऱ्याची उंची ३ फुटाची असून ५ फुटापर्यंत मंदिराचा छोटा गाभा आहे.मंदिराची जवळपासची स्वच्छता दररोज नित्य नियमाने केली जाते.मंदिराच्या समोर सायंकाळी दिवा लावण्यात येतो.गावात कोणत्याही प्रकारची ईडा-पीडा येण्यापासून ही लक्ष्मी रोखते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. मंदिराच्या आख्यायिकेबाबत वेगळी अशी कहाणी नसून रोगराई तसेच गावासाठी बाधक असणाऱ्या गोष्टी गावात प्रवेश करू नयेत यासाठी मंदिराची उभारणी गावच्या बाहेर असल्याचेही गावातील पुरातन मंडळी सांगतात.त्यामुळे

गावातील तरुण मंडळीनी एकत्रितपणे " एक गाव एक गणपती " याप्रमाणे गावामध्ये एकच सार्वजनिक गणपती बसवला जातो.

गावाच्या मध्यभागी " श्री विठठ्ल मंदिर आहे. कापशी सरकारच्या काळात विठठ्ल-रुक्मिणी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. १९६० च्या दरमान जुने दगड मातीचे मंदिर व टुमदार असे कौलारू मंदिर बांधण्यात आले आहे.वर्षभरात रामनवमी,हनुमान जयंती,आषाढी व कार्तिक एकादशी असे कार्यक्रम साजरे केले जातात. चैत्र शु.पंचमी ते द्वादशी अखेर अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो.गावामध्ये दरवर्षी विठठ्ल-रुक्माई देवाचा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्यावेळी सप्ताहात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन व जागर असा कार्यक्रम असतो. माघ वारीला गावातून पंढरपूरला प्रत्येक वर्षी पायी वारी जाते. गावामध्ये गणेश-चतुर्थी, दसरा हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करतात. झिम्मा-फुगडी व गौरी गणपती गाण्यांच्या स्पर्धा ठेवल्या जातात. त्या काळात शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी निबंध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येतात. कार्यक्रमांना त्यामुळे गावातील ग्रामस्थ सुद्धा उपस्थित असतात.

त्याचप्रमाणे गावात ऐक छोटेसे "हनुमान मंदिरआहे.गावातील तरुणांना शरीर कमवता यावे.म्हणून कापशी सरकारांच्या काळात हे " श्री बाळोबा मंदिर बांधले. ते महागोंड गावचे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे.देवळात स्वयंभू पाषण रूपात देवता आहे.नवसाला पावणारा शी देवाची ख्याती आहे. अडी-अडचणी दूर करण्यासाठी कौल लावून भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात.

१९५५ साली गाव वर्गणी व कापशी सरकार यांच्या सहकार्याने या देवळाचा जीर्णोद्धार करून मंदिर दगड आणि चुना यांनी बांधून वर पत्र्यांचे छप्पर केले गेले. पत्रे गंजून बाद होत आल्याने १९७४ साली ग्रामस्थ मंडळ मुंबई व गाव वर्गणी जमा करून वरचे छप्पर कौलारू करण्यात आले. याचवेळी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी चांदीची पालखी तयार केली. शिवाय थोडीफार मदत देवस्थान मंडळ कोल्हापूर यांनीही केली. दर पाच वर्षांनी देवाची यात्रा भरते. प्रत्येक सोमवारी देवाची पालखी गावात येते. महागोंड ग्रामस्थ मंडळ मुंबई व गावातील ग्रामस्थ यांनी मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाल्याशिवाय यात्रा करायची नाही असा निश्चय केला व २००७ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवून त्यांच्याकडूनच मंदिर बांधून घेण्याचे गावकऱ्यांनी ठरले. अंदाजे २२ लाख रुपये खर्चून २००८ साली मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिराचा परिसरही वाढविण्यात आला आहे. बाळोबा म्हणजेच महादेवाचा अवतार मानला जातो. मंदिर पूर्व-पश्चिम आहे. सोमवार, गुरुवार आणि पंचवार्षिक यात्रेच्यावेळी मंदिरात भाविकांची गर्दी जास्त असते. दररोज सकाळी पूजा-अर्चा गुरव करतात.

बाळोबा देवालयाच्या उत्तरेस शंभर फुटाच्या अंतरावर "भावेश्वरी मंदिरहे छोटेसे टुमदार दगडी मंदिर आहे. तिथे देवीची दगडी मूर्ती आहे. दररोज गुरव पूजा-अर्चा करतात. मंगळवार व शुक्रवार हे दिवस देवीचे पूजे-अर्चेसाठी विशेष मानले जातात.

भावेश्वरी मंदिराशेजारी "महादेव मंदिर आहे. पूर्वीच्या काळच्या या मंदिराची रचना अतिशय वेगळी आहे. पूर्वी रेखीव आकारात मंदिर होते. मंदिरात मध्यभागी रेखीव आकारात पिंडी असून अनेक लोक भक्ति-भावाने या पिंडीला नत-मस्तक होतात. मंदिराच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव काम असलेले अनेक दगड आहेत. या दगडांकडे पाहिल्यानंतर त्या काळातल्या कोरीव कामाबद्दल उत्कंठता वाढते. या दगडामध्ये विविध प्रकारच्या मूर्ती तयार केल्या आहेत. या मंदिराच्या सभोवती हिरवळ असल्याने पावसाळ्यात मंदिर परिसर अतिशय सुंदर वाटतो.मंदिराचा आकार लहान असला तरी मंदिरात आल्यानंतर वेगळ्या प्रकारचे समाधान लाभते.

महागोंड गावापासून चारशे मीटर आंतरावर महागोंडवाडी हे छोटेसे गाव आहे.त्या गावाचा संपूर्ण कार्यभार हा महागोंड या ग्रामपंचायतीमधून चालतो. या गावच्या उत्तरेस " दत्त मंदिर बांधले आहे. गावातील ग्रामस्थ जास्तकरून दत्ताचे भक्त आहेत. त्यामुळे ते दररोज दर्शनासाठी मंदिरात जातात.मंदिरामध्ये दत्ताची भव्य मूर्ती व मंदिराचा आतील गाभारा पाहून मन प्रसन्न होऊन जाते.

गावाचे प्रशासन :-

गावचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालविला जातो. ग्रामपंचायतीची स्थापना २३ जून १९५६ रोजी झाली. ग्रामपंचायतीचे एकूण ९ सदस्य आहेत, त्यापैकी तीन महिला आहेत.

विकासापासून दूर असलेल्या बाबी : रस्ते, पिण्याचे पाणी, पाझर तलाव, एसटी स्थानक, स्मशान भूमी, हायस्कूल इमारत, बाळोबादेव मंदिरा परिसरातील सुशोभीकरण, वाचनालय इमारत, वैद्यकीय सेवेसाठी केंद्र  
विकास काय झाला : २२ लाख रुपये खचरून बाळोबा ग्रामदैवताचे मंदिर, हायस्कूलची इमारत, चिकोत्रा पाणीपुरवठा ही अर्धवट योजना.
राजकीय बलाबल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच मात्र इतर सदस्य समिश्र पक्षांचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे समांतर वर्चस्व हे विकास खुंटल्याचे कारण : गटतटाचे राजकारण, देसाई -पाटील वाद, स्वार्थीपणा, एकमेकांची कुरघोडी, तरुणांचे दुर्लक्ष.
लक्षवेधी :दरवर्षी होणारा गावचा हरिनाम सप्ताह

आठवणीतील गावचे सुपुत्र शाहीर द.ना. गव्हाणकर, कलामहर्षि बाबूराव पेंटर, माजी संरपंच दत्तात्तय पाटील, माजी सरपंच सिद्राम पाटील, पांडूतात्या गव्हाणकर, कृष्णा वस्ताद,

पाण्यासाठी दाहीदिशा :-

चिकोत्रा धरणातून गावात पाणी आले म्हणून फटाक्यांची आतिशबाजी झाली. चुरमुरे उधळले.. गंगा आली हो अंगणी असे म्हणत..गुलाल उधळला. मात्र त्या ३६ लाख रुपये खर्च केलेल्या योजनेतून आज महागोंडकरांना घागरभर सुद्धा पाणी मिळत नाही. लोकवर्गणीतून मारलेल्या विंधण विहिरीचा आधारच या गावाला उरला आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर या विभागाचे आमदार असताना 2008 साली चिकोत्रा धरणातून महागोंड गावासाठी महाजल ही 36 लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. ही योजना मंजूर झाल्यानंतर सेवा संस्था, लोकवर्गणी व देवालयाच्या दान पेटी तसेच लोकवर्गणीतून सुमारे 3 लाख 60 हजार ही रक्कम देण्यात आल्यावर या योजनेचे काम सुरू झाले व दीड वर्षात पूर्णत्वासही आणले. गावापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या चिकोत्रा धरण प्रकल्पाखाली जॅकवेल आणि पाण्याची टाकी बांधण्यात आली. दोन विद्युप पंप जोडून नळ योजनेद्वारे महागोंड आणि महागोंडवाडी गावात पाणी आणण्यात आले. सुरुवातील पाणी आणताना अडचणी आल्या. तरीही फेब्रुवारी 2009 रोजी या योजनेचे यात्रेनिमित्ताने गावात पाणी आणले. गावात पाणी आल्यामुळे गावात गगणभेदी फटाके वाजले, गुलाल उधळला त्यानंतर मात्र ही योजनाच आता बंद अवस्थेत आहे. लाखो रुपये खर्च केलेल्या या योजनेचे पाईप उंदराने कुडतरले. सद्यस्थितीत या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. योजना बंद असली तरी वापरलेले 25 हजार वीज बील ग्रामपंचायतीवर थकीत आहे. शासनाने 36 लाख रुपये खर्च केले मात्र आज गावाला पाणी मिळत नाही ही खंत ग्रामस्थांची आहे. पै -पै साठवून ग्रामस्थांनी दिलेल्या 10 टक्के पैशाच्या बदल्यात आज त्यांना घागरभर पाणीही मिळत नाही. ठेकेदार आणि पाणीपुरवठा सदस्यांना एकत्र करून ही योजना कार्यान्वित करण्यात ग्रामपंचायत उदासीन आहे. या योजनेत पुढाकार घेतलेल्या सदस्यांविषयी ग्रामस्थांची नाराजी आहे. या योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे. खर्च केलेल्या पैशावरही संशयही निर्माण होत आहे. योजना राबविली ते पाणीपुरवठा समितीचे सदस्य वीजबील भरा आणि मग बोला असे आवाहन करीत असले तरी ही योजना यशस्वी होईल याबाबत खात्री त्यांना देता येत नाही. गावातील राजकरणामुळे ही योजना पूर्ववत कार्यान्वित होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

महागोंडकरांना लोकवर्गणीतून आणि जिल्हापरिषदेच्या माध्यमातून १९९३ साली खोदलेल्या विंधण विहिरीचाच आधार आहे. गेली २४ वर्षे ही विंधण विहीर गावाला साथ देत आहे. त्यानंतर सार्वजनिक विहीरी शेजारी 2000 साली जिल्हा परीषदेच्या विशेष घटक योजनेतून मारलेल्या विंधण विहीरीचे पाणी मिळते या दोन्ही विंधण विहिरीचे पाणी सार्वजनिक पाणीपुरवठय़ाच्या विहिरीत टाकले आहे. हे पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना मोठय़ा रांगा लावाव्या लागतात. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर हा पाणीपुरवठा बंद होतो. तीस वर्षापूर्वीची आंबेओहळ ओढय़ानजीक जॅकवेल खोदून पाणी योजना राबविण्यात आली. परंतु हे पाणी फेब्रुवारीनंतर संपते उन्हाळयाच्या काळात या गावाला तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. आता गावचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या याचा विचार करता उपलब्ध पाणी अत्यंत अपुरे आहे. चिकोत्रा प्रकल्पाच्या पाण्यावर आधारित योजना मार्गी लागल्याशिवाय या खेडय़ाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार नाही. लाखो रुपये खर्च केलेली योजनेबाबत ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही योजना पूर्वपदावर आणण्यास राजकारण विसरून पुढे येण्याची गरज आहे.