मस्कऱ्या गणपती (निलज बु.)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मस्कऱ्या गणपती, निलज बु. या पानावरून पुनर्निर्देशित)
मस्कऱ्या गणपती, निलज बु.

विदर्भ किंबहुना नागपूरातील प्राचीन परंपरेतील ऐतिहासिक उत्सव म्हणजे 'हाडपक्या गणपती' किंवा मस्कऱ्या गणपती. गणेशेत्सव संपल्यानंतर सुरू होतो तो पितॄपक्ष. पितॄपक्षात सर्व धार्मिक कार्य, उत्सव काही प्रमाणात निषिद्ध असतात; परंतु नागपूरात/ विदर्भात हाडपक्या गणपती उत्सव साजरा केला जातो. या गणपती उत्सवाचे स्वरूप घरघुती नसून सार्वजानिक आहे. नव्वदीच्या दशकापर्यंत मोठ्या प्रमाणात सार्वजानिक रित्या हा उत्सव साजरा होत असत; परंतु आता काही मोजक्याच ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात आहे. आजही नागपूर आणि विदर्भातील अनेक तालुक्यात आणि गावागावात हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती उत्सव साजरा करण्यात येते. मोहाडी तालुक्यातील करडी क्षेत्रातील तुमसर-साकोली राज्यमार्ग क्रमांक ३५६ वर असलेल्या निलज बु. या गावात आजही ही भोसलेकालीन मस्कऱ्या गणपतीची परंपरा जपली जात आहे.

विदर्भात पितृपक्षाला हाडपक असे म्हणतात. हाडपकात बसविलेला हा 'हाडपक्या गणपती' होय. याच गणपतीला मस्कऱ्या गणपती या नावाने संबोधले जाते. राजे भोसले यांचे लढाईवरून नागपूरात आगमन झाल्यानंतर अनेक प्रथा परंपरांची सुरुवात नागपूरात झाली व पुढे ही परंपरा पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पसरली. भाद्रपद गणपती उत्सव त्यातील एक होय. आज ही परंपरा पूर्व विदर्भातील निलज बु सारख्या अनेक गावांमध्ये अस्तित्वात आहे.

मराठा साम्राज्याची सीमा अटके पासून कटकेपर्यंत पसरली होती असे आपण गर्वाने सांगतो. त्याच अटक ते कटक मधील कटक जिंकणारे पराक्रमी घराणे म्हणजे नागपूरचे भोसले. नागपूरकर भोसल्यांनी आपल्या पराक्रमाने महाराष्ट्रातील वऱ्हाडापासून पश्चिम बंगाल आणि ओडिशापासून उत्तर प्रदेशापर्यंत आपले साम्राज्य विस्तारले होते. हे एवढं मोठं विस्तीर्ण राज्य जिंकण्यासाठी नागपूरच्या शासकांनी अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा. अशाच एका पराक्रमी लढाईमुळे या हडपोक्या गणपतीची सुरुवात झालीय. इ. स. १७५५ मध्ये नागपूरकर भोसले घराण्यातील तत्कालीन राजे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले उर्फ चिमनाबापू हे बंगाल च्या स्वारीवर होते. बंगाल वर ऐतिहासिक विजय मिळवून परत येत असताना कुळाचारी गणपती चे विसर्जन झाले होते. त्यामुळे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले गणपती उत्सव साजरा करू शकले नाही. त्यावेळी राजपुरोहित व अन्य विद्वानांसोबत चर्चा  करून पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण चतुर्थी (भाद्रपद संकष्टी चतुर्थी) ला गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरविले, आणि त्यासोबत बंगाल वर ऐतिहासिक विजय मिळविण्याच्या आनंदोत्सव सुद्धा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले. लावण्या, नकला, खडी गंमत इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अनेक गंमत जमतीचे कार्यक्रम होत असत त्यात थट्टा-मस्करी इत्यादींचा भडीमार होत असत आणि मस्करी चा अपभ्रंश होऊन 'मस्कऱ्या' हे स्थानीय बोलीभाषेतील नाव प्रचलित झाले आणि हा गणपती ला  'मस्कऱ्या गणपती' नावाने सुद्धा प्रसिद्ध झाले. असे म्हणतात की, लोकमान्य टिळकांनी ह्याच गणपती उत्सवाची प्रेरणा घेऊन भाद्रपद गणपती उत्सव सार्वजानिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले. आजही मस्कऱ्या गणपती उत्सवाचे स्वरूप काहीसे असेच आहे. मोहाडी तालुक्यातील निलज बु. येथील ३५ वर्षांपेक्षा जुनी मस्कऱ्या गणपतीची परंपरा पाहिल्यास भोसलेकालीन मस्कऱ्या गणपतीची आठवण होते. या गणपती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आजपर्यंत गावातील या गणपती उत्सवाला आयोजित करणारी मंडळी बदलली; पण परंपरा मात्र कायम आहे.

आजही 'हाडपक्या गणपती' उत्सवाचा मुख्य सोहळा नागपूरातील सिनियर भोसले राजवाडा, महाल येथे आयोजित करण्यात येतो. श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले यांचे काळात हाडपक्या गणपती ची १२ हाताची,२१ फूट उंच मूर्ती स्थापन केली जात होती. आता सुद्धा त्याच प्रकारची मूर्ती स्थापन करण्यात येते. लावण्या, पोवाडे, खडी गंमत इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येते. नऊ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो.या दरम्यान भव्य महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. भाद्रपद कृष्ण द्वादशी ला गणपती उत्सवाची सांगता होऊन हाडपक्या गणपतीचे विसर्जन करण्यात येते.

मोहाडी तालुक्यातील निलज बु. गावात ३५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून अनंत चतुर्दशी नंतरच्या मस्कऱ्या गणेशोत्सवाची परंपरा आहे. तालुक्यातील निलज बु. हे जवळ-जवळ तीन हजार लोकसंख्येच गाव आहे. विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती हालकीची होती. गावात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. अशात गणेशोत्सव साजरा करणे म्हणजे पैशाचा नाहक अपव्यय. गावाच्या बाजूला देव्हाडा बु. येथे वैनगंगा साखर कारखाना सुरू करण्यात आला होता. कारखान्यातील वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. गणेशोत्सवानिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. उभा उत्सवात निलज बु. येथील नागरिक सहभागी व्हायचे. त्या ठिकाणी गेल्यानंतर गावातील काही युवकांना आपल्याही गावात गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना आली; पण, कारखान्यातील गणेशोत्सवाच्या तुलनेत आपला उत्सव कमी पडण्याची न्यूनगंडाची भावना त्यांच्या मनात आली. यावर उपाय म्हणून त्यांनी अनंत चतुर्दशीनंतर गणपती स्थापन करू असे ठरविले. थोरा-मोठ्यांशी चर्चा करून गावात मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले. १९८३ पासून गणपती विराजमान झाले. १९८३ सालीचा निलज बु. येथील प्रथम गणपती स्व. कवडू बडगे यांच्या अंगणात स्थापन करण्यात आले. पुढे पाच वर्षे ही परंपरा अविरत चालू होती. पण, नंतर मस्कऱ्या गणपतीला तीन वर्षांचा खंड पडला. नंतर गावातील काही युवकांनी १९९१ सालपासून पुढाकार घेऊन मोडलेली परंपरा पुन्हा सुरू केली व ही परंपरा जोपासत आहेत. मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळाचे पूर्व सदस्य धनवर बडगे सांगतात की, त्यावेळी आम्ही ५१ रुपयांची गणपतीची मूर्ती स्थापन केली होती. गावातील लोकांनी दिलेल्या वर्गणीतून १२०० रुपये गोळा केले होते. यातून १० दिवसांचा गणेशोत्सव आनंदाने साजरा केला होता. मागच्या दोन वर्षांच्या कोरोना काळात मस्कन्या गणपती स्थापन करून उत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला होता. नागपूरच्या शासकांनी सुरू केलेल्या बाकी उत्सवांप्रमाणेच या गणेशोत्सवाला सुद्धा पूर्व विदर्भातील लोकांनी आपलंस केलंय. नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली जाते आणि थाटामाटात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.[१]

कलागुणांना चालना[संपादन]

मस्कऱ्या गणपतीच्या निमित्ताने गावात रांगोळी स्पर्धा, दांडपट्टा, संगीत नाटक, तमाशा, कव्वाल्या, भजन, कीर्तन, विविध प्रकारची मैदानी खेळ इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. पूर्वी तर मस्कऱ्या गणपतीच्या या कार्यक्रमात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्याथ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते.

बाह्य दुवे[संपादन]

https://www.esakal.com/vidarbha/tradition-mascarya-ganeshotsav-nilaj-35-years-345029

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मस्कऱ्या गणपतीने दिली या गावाला ओखळ...३५ वर्षांपासूनची परंपरा..वाचा सविस्तर". eSakal - Marathi Newspaper. 2022-12-26 रोजी पाहिले.