मध्वराज व्यंकटेश तथा काकासाहेब शिंगरे (१८९४ ते १९६६)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

मध्वराज यांचा जन्म ११ ऑक्टोबर १८९४ रोजी पुणे येथे झाला. मातोश्री लक्ष्मीबाई यांचे १९०२ मध्ये तर वडील व्यंकटेश यांचे निधन १९०६ मध्ये झाले. अशा प्रकारे लहानपणातच आई वडिलांचे छत्र हरपल्यावर त्यांच्या आजीने (आईची आई) त्यांचे पालन पोषण केले. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालय (पुणे) येथे झाले. घरात आजी, पुतण्या- पुतणी अशा सर्वांची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे ते पुढे शिकू शकले नाहीत. पण पदवीप्राप्त सुशिक्षितांना लाजवेल अशी त्यांची विचारशक्ती, निर्णयशक्ती आणि बुद्धिमत्ता होती.

त्यांना सर्वजण काका (काकासाहेब) म्हणू लागले. त्यांना संगीताची फार आवड होती. ते उत्तम हार्मोनियम वादक होते. त्यांना खेळाचीही आवड होती. पूर्वजांप्रमाणे काकासाहेब पेशवेकालीन पोशाख करीत. पांढरा स्वच्छ सदरा त्यावर काळे जाकीट, बाराबंदी पांढरा स्वच्छ अंगरखा, धोतर व जरीकाठी गर्भ रेशमी डाळिंबी किंवा अंजिरी रंगाचा (पागोड्याच्या ऐवजी) रूमाल ते बांधत. सुडौल, सुदृढ बांधा, गौरवर्ण आणि सतेज आकर्षक चेहरा यामुळे ते या पेशवाई पोशाखात शोभून दिसत. प्रथमदर्शनी कोणावरही छाप पाडेल, आदराची भावना निर्माण करेल असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. कधी कधी ते जाकीट व डोक्यावर मखमली काळी टोपी घालत.

काकासाहेबांच्या प्रथम पत्नी जानकीबाई व त्यांच्या निधनानंतर द्वितीय पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांना अतिशय मोलाची साथ दिली. पुतण्या, पुतणी, सात मुले, सात मुली तसेच इतर काही आप्तेष्टही काकासाहेबांच्या कुटुंबात एकत्र राहत होते. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल भीतियुक्त आदर होता आणि आजही आहे. त्यांच्या घराला गोकुळाची उपमा दिली होती.

काकासाहेब अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी भारतभर(तिरुपती, बद्रीनाथ. कशी, गया, प्रयाग, हृषीकेश, मथुरा, द्वारका, उडपी) अनेक ठिकाणी आपल्या कुटुंबियांसमवेत स्वतःच्या मोटारींनी अनेक वेळा यात्रा केल्या. घरातही गौरी- गणपती, नवरात्रोत्सव, श्रीकृष्णजन्माष्टमी यासारखे उत्सव यथासांग पार पडत. तसेच सर्व प्रकारचे यज्ञयाग, ज्ञानसत्र त्यांच्या घरी चाले.

काकासाहेबांना व्यापार करण्याची तीव्र इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सुरुवातीला नोकरी करावी लागली (१९१७). पहिले २/३ महिने बिनपगारी. पुढे दरमहा १२ रुपये पगारावर दगडी कोळशाच्या वखारीत त्यांनी नोकरी सुरु केली. १९२१ मध्ये त्यांनी स्वतःची ' दि बेंगाल कोल सप्लाईंग फर्म ' ही कंपनी सुरु केली. आजही पुण्यातील मंगळवार पेठेत ही कंपनी चालू आहे.

काकासाहेबांनी अनेक छोटे-मोठे उद्योग सुरु केले - लाकडी कोळशाचा व्यापार, राखेचा व्यापार, विटांची भट्टी,  धान्याची एजन्सी, डिस्टेम्पर, सिनेमा थिएटर, हिरड्याचा व्यापार, व्हेजिटबल प्रॉडक्ट कं. , रेल्वेची चावी (रेल्वेचे रूळ स्लीपरच्या खोबळ्यात पक्के रहावे म्हणून पूर्वी स्प्रिंग वापरल्या जात त्याला चावी म्हणत.) विकणे , व्यंकटेश शेतकी मंडळ, टंकलेखन यंत्रे, वंगणाचे तेल , टायर्स , जळाऊ लाकूड, कंपास पेट्या इत्यादी. सर्वोदय मुद्रणालय ( स्वातंत्र्योत्तर काळात विधानसभेची पहिली निवडणूक झाली तिच्या मतदार याद्या याच छापखान्यात काकासाहेबांनी छापल्या) शिरवळ येथे शिंगरे रुग्णालय(१९४७ मध्ये सुरु केले पण १९४८ मध्ये काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी त्याला आग लावली) पुढे कोळशाच्या धंद्याची प्रगती होत गेली तसतशी अनेक वाहने त्यांनी घेतली. १९४३ मध्ये ते भोर संस्थानात मंत्री होते. तेथे त्यांनी बँकेची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भोरच्या जनतेस जीवनोपयोगी वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी अविरत कष्ट केले.

पुढील संस्थांचे ते सभासद, पदाधिकारी, सल्लागार होते - श्री गणेश वाचनालय(मोफत), पूना स्टीम कोल अँड कोक मर्चंट्स असोसिएशन, डेक्कन बँक्स असोसिएशन , महाराष्ट्र व्यापारी व कारखानदार परिषद, मुंबई प्रांतिक  खातेदार परिषद , पुणे घरमालक संघ, विद्या प्रसारिणी सभा, भोर स्टेट बँक.

जुन्या पिढीतील स्वकष्टाने लौकिक व संपत्ती मिळवणारे, स्वभावाने करारी. हिशोबी व व्यवहारदक्ष , अत्यंत साधे व सुसंस्कृत अशा काकासाहेबांची २१ ऑगस्ट १९६६ रोजी रात्री नित्यनियमाप्रमाणे दोन्ही कर जोडून देवाची प्रार्थना करत असताना अकस्मात प्राणज्योत मालवली.