Jump to content

मकरंद घाणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वीर मकरंद घाणेकर हे एक सेकंड लेफ्टनंट लष्करी अधिकारी होते. त्यांनी वयाच्या बावीस व्या वर्षी पाकिस्तानशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली.

बालपण व शिक्षण

[संपादन]

घाणेकर ह्यांचा जन्म १९ जुलै १९४९ रोजी विलेपार्ले येथे झाला. तो कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा होता. तो अभ्यास आणि खेळात हुषार होता. त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार आणि स्वतःच्या आवडीनुसार मकरंद ह्यांनी बारावी परीक्षा दिल्यानंतर लगेचच डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आणि आपल्या मिलिटरी कारकिर्दीला शुभारंभ केला.

सैनिकी शिक्षण

[संपादन]

त्यांनी लगेचच गनिमी काव्याच्या डावपेचांचे प्रशिक्षण घेतले व त्यामध्ये प्राविण्य मिळविले. हे प्रशिक्षण झाल्यावर त्यांची मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली.

वीरमरण

[संपादन]

भारत आणि पाकिस्तान मधील इसवी सन १९७१ चा बांगला युद्धाचा काळ होता. भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तान (हल्लीचा बांगलादेश) मधील कोटचंदपूर इलाखा जिंकला होता. रात्रीच्या अंधारात मकरंद ह्यांची तुकडी कोटचंदपूरहून जेशोर शहराकडे मार्गक्रमण करीत होती.चित्रा नदी आणि कोपोथाखो नदी ह्यामध्ये कोटचंदपूर आहे. चित्रा नदीवरील पूल पाकिस्तानी सैन्याने उडवून दिला होता. त्याच्या भागातून मकरंद ह्यांची तुकडी पुढे जात होती. मकरंद ह्यांनी एक हातबॉंब फेकून पाकिस्तानी सैन्याचा अंदाज घेतला परंतु पाकिस्तानी सैनिकांकडून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे मकरंद ह्यांच्या तुकडीने पुढे मार्गक्रमण चालू ठेवले. अचानक पाकिस्तानी सैन्याचा हल्ला चालू झाला. मकरंद ह्यांची तुकडी संख्येने लहान होती. तरीसुद्धा मकरंद ह्यांनी आपल्या बंदुकीने एका मोठ्या हुद्द्यावर असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला यमसदनी पाठवले. पाकिस्तानी सैन्य शेकड्यांनी चाल करून आले. तलावाच्या बाजूने भारतीय तुकडी पुढे जात असतानाच एका पाकिस्तानी सैनिकाने मकरंद ह्यांच्या डोक्यावर बंदुकीचा दस्ता जोरात मारला आणि त्या जीवघेण्या आघाताने मकरंद हे तलावात कोसळले. तोपर्यंत मकरंद ह्यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भारतीय सैनिकांनी शेकडो शत्रूसैनिक ठार केले होते.नंतर भारतीय सैन्याची कुमकसुद्धा आली.जेशोर शहर ही ताब्यात आले. परंतु मकरंद घाणेकर हे भारतीय सैन्याचे उमदे अधिकारी भारतीय सैन्याने गमावले होते. फक्त २२ वर्षे वयाचे भारतीय लष्करी अधिकारी मकरंद रघुनाथ घाणेकर आपल्या मायभूमीसाठी कामी आले. ह्याच स्फूर्तिदायक शौर्यगाथेचे स्मृती जीवंत ठेवण्यासाठी विलेपार्ले पूर्व येथील एक रस्ता गेली ५३ वर्षे वीर मकरंद घाणेकर मार्ग म्हणून ह्या पार्लेकर असलेल्या वीरास सलामी करीत आहे.

शौर्य पुरस्कार

[संपादन]

वीर मकरंद रघुनाथ घाणेकर ह्यांनी पाकिस्तानशी इसवी सन १९७१ च्या लढाईत ज्या असामान्य शौर्याची प्रचिती दिली त्या शौर्याबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र बहाल केले.

रस्ता नामकरण

[संपादन]

विलेपार्ले हे मुंबई शहराच्या विलेपार्ले भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. विलेपार्ले मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ मंदगतीच्या लोकलगाड्या थांबतात. मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ विलेपार्ले रेल्वे स्थानक येथून जवळ आहे.विलेपार्ले रेल्वे स्थानकामुळे विलेपार्ले पूर्वविलेपार्ले पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. विलेपार्ले पूर्व भागात रेल्वे स्थानक परिसरात वीर मकरंद घाणेकर मार्ग आहे.मुंबई महापालिकेने मकरंद घाणेकर ह्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन ज्या पार्ले येथे त्यांचा जन्म झाला तेथील एका महत्त्वाच्या मार्गाला वीर मकरंद घाणेकर मार्ग असे नाव देऊन त्यांच्या वीरश्रीचा सन्मान केला आहे. []

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स,१२ नोव्हेंबर २०२४