भोर संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भोर संस्थान
Flag of the Maratha Empire.svg इ.स. १६९७इ.स. १९४८ Flag of India.svg
Flag of the Maratha Empire.svgध्वज
Bombay Prov south 1909.jpg
राजधानी भोर
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: शंकराजी नारायण पंतसचिव (इ.स. १६९७-१७०७)
अंतिम राजा: रघुनाथ शंकर पंतसचिव (इ.स. १९२२-१९५१)
अधिकृत भाषा मराठी
लोकसंख्या १,३७,२६८ (१९०१)
–घनता ३५.५ प्रती चौरस किमी


भोर संस्थान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक संस्थान होते. भोर संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या संस्थानांपैकी एक संस्थान होते.

पंतसचिव[संपादन]

भोर संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण हे छत्रपती राजाराम महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील सचिव होते.[१] पंतसचिव ह्या नावाने त्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी भोर संस्थानाचा कारभार पाहिला.

भोरच्या पंतसचिव घराण्याच्या राज्यकर्त्यांची नावे अशी

८ मार्च १९४८ रोजी हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले.

विभाग आठरावा : बडोदें ते मूर[संपादन]

भोर संस्थान- मुंबई, पुणे जिल्हा. हें संस्थान उ. अ. १८० ते १८० ४५' व पूर्व रेखांश ७३० १४' ते ७३० १५' यांत होते. संस्थानच्या राजधानीचें भोर हे शहर पुण्याच्या दक्षिणेस सुमारें ३० मैलांवर नीरा नदीच्या तीरीं वसलेलें असून सभोंवार सह्याद्रीचे फांटे आहेत ह्या गांवावरून महाड-पंढरपूर रस्ता वरंच्या घाटानें गेलेला आहे. भोर येथें नीरेस घाट आहे. राजवाडा, भोरेश्वर देवालय, रामबाग बंगला, हायस्कूल या पहाण्यासारख्या इमारती आहेत. राजवाडा भव्य व जुन्या पद्धतीनें बांधलेला आहे. हें शहर लहान पण टुमदार असून येथील हवापाणी चांगलें आहे. पुण्याचा जिल्हाधिकारी हा भोर संस्थानचा राजकीय एजंट आहे. या संस्थानचा प्रदेश पुणे, साताराकुलाबा(आजचा रायगड जिल्हा) या तीन जिल्ह्यांत विभागलेला आहे. संस्थानचे एकंदर पांच तालुके आहेत; पैकीं विचित्रगड राजगड, प्रचंडगड, व पौनमावळ हे पुणें जिल्ह्यांत; आणि पांचवा सुधागड हा कुलाबा जिल्ह्यांत आहे. सुधागडशिवाय चारी तालुक्यांचा प्रदेश घाटमाथ्यावरीलमावळांत आहे संस्थानांत एकूण ५०२ गांवें आहेत. संस्थानचें क्षे. फ. ९२५ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) १३०४१७ आहे. संस्थानचा ३/४ भाग डोंगराळ आहे. ३/४ जमीन तांबडी असून, पाण्याखालीं जमीन फार थोडी आहे. पाण्याचा पुरवठा बहुतेक विहिरींपासून होतो. घाटमाथ्यावरून निघालेल्या मोठ्या नद्या नीरा, मुठा, मुळा, वेळवंडीगुंजवाणी ह्या आहेत. याशिवाय लहान नद्याही आहेत. भोरापासून उत्तरेस सुमारें २ मैलांवर वेळवंडी नदीस भाटघर येथें धरणाचें मोठें काम केलेलें आहे. हें प्रथम ९० फूट उंच होतें, तें हल्लीं (१९२६) १५० फूट उंच करण्यांत येत आहे. या धरणाचें पाणी नीरा उत्तर व नीरा दक्षिण या नांवाच्या मोठाल्या कालव्यांतून फार दूरवर दुष्काळी जिल्ह्यांत नेलें आहे. या कामासाठीं संस्थाननें आपली पुष्कळशीं गांवें बुडूं दिलीं आहेत. घांटमाथ्यावर कोठें थंड, कोठें समशीतोष्ण हवा आहे व सुधागड तालुक्यांत उष्ण हवा आहे. घाटमाथ्यावर पाऊस सुमारें १० पासून १०० इंचांपर्यंत पडतो व सुधागडकडे १५० पर्यंत पडतो. घांटावर मुख्य धान्यें भात, नागली, वरी, जोंधळाबाजरी हीं आहेत. सुधागड तालुक्यांत मुख्य पीक भाताचें आहे. जंगलांत साग, हिरडा, जांभूळ, आंबा, फणस ही मुख्य झाडें आहेत. घाटमाथ्यावर सर्वत्र रानडुकरे व थोडे वाघही आहेत मुख्य लोकवस्ती हिंदूंची आहे. निर्गत माल भात, हिरडा व साग व आयात माल भाताशिवाय सर्व धान्यें व इतर सर्व त-हेचा माल संस्थानचें वार्षिक उत्पन्न सुमारें पांच लाखांचें आहे.

किल्ले[संपादन]

संस्थानांत विचित्रगड तालुक्यांत रोहिडा, राजगडांत राजगड, प्रचंडगडांत प्रचंडगड (तोरणा), पौनमावळांत तुंगतिकोना आणि सुधागडांत भोरपसरसगड असे एकंदर ७ किल्ले आहेत. बहुतेक किल्ले इतिहासप्रसिद्धच आहेत. राजगडाची बांधणी प्रेक्षणीय आहे. प्रचंडगड हा सर्व किल्ल्यांत उंच आहे. भोरापासून दक्षिणेस सुमारें ८ मैलांवर भोर व वाई यांच्या दरम्यान अंबाडखिंड उर्फ विश्रामघाट येथें संस्थानची धर्मशाळा, वाडा व अन्नसत्र आहे. येथील हवा पांचगणीसारखी थंड आहे. भोरच्या आग्नेय दिशेस अंबवडे येथें शंकराजी नारायण (पंतसचीव घराण्याचा मूळपुरूष) यांची समाधि आहे. राजगड तालुक्यांत बनेश्वर, विचित्रगडांत रायरेश्वर व सुधागडांत उन्हाळे हीं स्थळें पहाण्यासारखीं आहेत.

इतिहास[संपादन]

संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिला. हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. छत्रपती राजाराम महाराज जिंजीस गेले, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें छत्रपती राजारामानें शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) छत्रपती राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजाराम महाराजांनी त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें. महाराणी ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं. त्यानें मावळांत कांहीं वतनें जोरावारीनें मिळविलीं व आपलें संस्थान वाढविलें. पुढें छत्रपती थोरले शाहु महाराज दक्षिणेंत येण्यास निघाले तेव्हां महाराणी ताराबाईनें सर्व प्रधानमंडळीस व सरदारास बोलावून कळविलें कीं, हा शाहु खरा नसून तोतया आहे, तरी सर्वांनीं त्यास न मिळण्याबद्दल शपथ घ्यावी. तेव्हां सर्वांबरोबर शंकराजीनें शपथ घेतली. पुढें ताराबाईचा पराभव करून शाहू साता-यास आले व त्यांनी सर्व सरदारांनां भेटीस बोलाविलें तेव्हां अडचण आली; तींतून निसटण्यास शंकराजीनें भोरानजीक अंबवडें येथें जाऊन चतुर्थाश्रम घेतला; थोड्याच दिवसांत विष खाऊन तो वारला (१७०७ नोव्हेंबर).

नारो शंकर (१७०७-१७३७)[संपादन]

शंकराजीपंत समाधिस्थ झाल्यानंतर छत्रपती शाहूनीं त्याचा अज्ञान पुत्र नारोपंत यास सचीवपदाचीं वस्त्रें देऊन हे संस्थान आपल्या बाजूचें करून घेतलें. नारोपंत अल्पवयी असल्यामुळें त्याची मातोश्री येसूबाई व त्याचा मुतालिक हीं दोघें राज्याकारभार चालवूं लागलीं. येसूबाई चांगली कर्ती असून तिचें आपल्या अंमलदारावर वजन होतें. न्यायाच्या कामीं ती कोणाचीहि भीडभाड धरीत नसे. नारोपंताच्या कारकीर्दीत महत्त्वाच्या राजकीय गोष्टी घडल्या नाहींत. दमाजीराव थोरातावर छत्रपती शाहूनीं याला पाठविलें असतां दमाजीरावानें याचा पराभव करून याला बंदींत ठेवलें. त्याला पुढें बाळाजी विश्वनाथानें सोडविलें, त्याबद्दल येसूबाईनें बाळाजीस पुणें परगणा व पुरंधर किल्ला दिला. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशीं असलेल्या बेलसर गांवच्या एका रामोपासक कुळकर्ण्यानें श्रीरामाच्या मूर्ती त्यास चैत्र शु. ८ च्या दिवशीं आणून दिल्या व तेव्हांपासून भोरास रामनवमीचा उत्सव सुरू झाला. नारोपंताच्या वेळीं महाराज शाहूनीं साहोत्राबाब सचिवास वंशपरंपरा वतनी करून दिली.

चिमणाजी नारायण (१७३७-१६५७)[संपादन]

नारोपंतास पुत्र नव्हात. त्यानें दत्तक पुत्र घेऊन त्याचें नांव चिमणाजी ठेविलें. आजपर्यंत सचिवांचें राहण्याचें ठिकाण नेरें होतें. तेथील वाडा जळाल्यानें चिमणाजीनें इ. स. १७४० त भोर हें राजधानीचें ठिकाण केलें. पेशव्यांनीं याला तुंगतिकोना देऊन त्याऐवजीं सिंहगड किल्ला घेतला. चिमणाजी पेशव्यांच्या विरूद्ध वागत असे.

सदाशिव चिमणाजी (१७५८-१७८७)[संपादन]

हा चिमणाजीचा औरसपुत्र. यानें संस्थानचा ३० वर्षें उपभोग घेऊन तो १७८७ सालीं निवर्तला. हा निपुत्रिकच होता.

रघुनाथराव चिमणाजी (१७८७-१७९१)[संपादन]

सदाशिवपंत निपुत्रिक वारल्यामुळें त्याचा सख्खा धाकटा भाऊ रघुनाथ चिमणाजी सचीवपदाचा वारस झाला. याचा शंकरराव उर्फ बाबासाहेब नांवाचा पुत्र पुढें गादीवर बसला.

शंकरराव रघुनाथ (१७९१-१७९८)[संपादन]

याच्या कारकीर्दीत म्हणण्यासारख्या गोष्टी घडल्या नाहींत. याला पुत्रसंतान नव्हतें. हा १७९८ सालीं वारला. तेव्हां त्याचा दत्तक पुत्र चिमणाजीपंत हा गादीवर आला शंकररावाच्या अंगीं विशेष कर्तबगारी नव्हती; तो जरा भोळसट होता. त्याच्यावर देखरेख ठेवण्याकरितां नाना फडणविसांनीं बाजीराव मोरेश्वर याची योजना केली होती. हा मनुष्य हलकट व क्रूर होता. यानें शंकररावास जवळ जवळ बंदीवासांत ठेविलें होतें. त्याच्या हातून शंकररावाची सुटका महादजी शिंदे यानीं केली. दुसऱ्या बाजीरावानें एकदां शंकरराव कुटुंबासह जेजूरीस असतां त्याचा घात करण्याकरितां मारेकरी पाठविले होते. शंकरराव सखारामबापू बोकीलचा जांवई होय. रामशास्त्री न्यायाधीशाची मुलगी शंकररावाची दुसरी बायको होती.

संदर्भ[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.