Jump to content

भानू अथय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भानू अथय्या

भानू अथय्या (पूर्ण नाव - भानुमती आण्णासाहेब राजोपाध्ये) (जन्म : कोल्हापूर, २८ एप्रिल १९२६, १५ ऑक्टोबर २०२०, मुंबई[]) या चित्रपट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार विजेत्या भारतीय वेशभूषाकार होत्या.

भानू अथय्या यांच्या आईचे नाव शांताबाई होते. वडील अण्णासाहेब राजोपाध्ये छत्रपतींचे पुरोहित होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून भानुमतींनी चित्रकलेशी दोस्ती केली. तर त्याच दरम्यान त्यांनी ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. भानुमती ९ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची चित्रकलेविषयीची आवड पाहून त्यांच्या आईने घरीच चित्रकलेसाठी शिक्षक ठेवले. शालेय शिक्षण संपताच त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षी त्यांना सुवर्णपदक मिळाले.

कार्य

[संपादन]

भानू अथय्या यांनी इ.स. १९५० पासून सुमारे १०० चित्रपटांसाठी काम केले आहे.

कारकीर्द

[संपादन]

एकोणीसशे साठच्या दशकात टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘ईव्ह्ज वीकली’मधील भानू यांची रेखाटने पाहून अभिनेत्री नरगिस प्रभावित झाल्या. नरगिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या ‘श्री ४२०’च्या वेशभूषेचे काम मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गुरुदत्त यांचा ‘साहिब, बीबी और गुलाम’, देव आनंद यांचा ‘गाईड’, ‘आम्रपाली’, शम्मी कपूर यांचा ‘ब्रह्मचारी’, शाहरूख खान यांचा ‘ओम् शांती ओम्’ इ. हिंदी चित्रपटांतून वेषभूषेचे काम करता करता त्यांना रिचर्ड अ‍ॅटेनबरोच्या ‘गांधी’साठी काम करण्याची संधी मिळाली आणि या चित्रपटातील गांधीजींच्या वेषभूषेसाठी भानू अथय्या यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले. जोम मोलो यांच्याबरोबर विभागून हे पारितोषिक मिळाले होते. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत. तसेच ‘लगान’, ‘स्वदेश’ यासारख्या चित्रपटांमधील कलाकारांच्या वेषभूषा त्यांनी समर्पकपणे साकारल्या. भानू यांनी अमोल पालेकरांच्या ‘महर्षी कर्वे’ या मराठी चित्रपटासाठीही वेषभूषा केली होती. दाक्षिणात्य वेषभूषाकार सत्येंद्र अथैय्या यांच्याशी त्यांनी विवाह केला.

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन". लोकमत. 2020-10-15. 2020-10-15 रोजी पाहिले.