भक्तीचे माहात्म्य (लोककथा)
भक्तीचे माहात्म्य अधोरेखित करणारी ही कहाणी आहे. ही भारतीय साहित्यामधील प्रचलित लोककथा आहे.
कथेचा आशय
[संपादन]फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका अरण्यामध्ये एक तपस्वी आणि एक भक्त अनेक वर्षांपासून साधना करत होते. प्रवास करता करता नारदमुनी एकदा त्यांच्या जवळून जात होते, तेव्हा त्यांच्यापैकी त्या तपस्वी व्यक्तीने त्यांना विचारले, “भगवान, आपण नेहमी वैकुंठामध्ये जात असता, श्रीविष्णुंना भेटत असता. तर तेवढे त्यांना माझ्या वतीने विचाराल का की, मला त्यांचे दर्शन कधी होईल?"
थोडे पुढे गेल्यावर नारदांना एक भक्त भेटतो. "मला श्रीविष्णुंचे दर्शन कधी होईल, असे माझ्या वतीने त्यांना विचाराल का?" त्यानेही नारदांना अशीच विनंती केली.
नारद वैकुंठागमन करून पुन्हा त्या अरण्यात येतात. तपाचरण करणाऱ्या त्या व्यक्तीला ते सांगतात, "तुम्ही ज्या झाडाखाली बसून तपस्या करत आहात त्या झाडाला जितकी पाने आहेत तितक्या जन्मानंतर तुम्हाला श्रीविष्णुंचे दर्शन होईल." हे ऐकून ते तपस्वी पूर्णपणे खचून जातात, नाउमेद होतात आणि त्यांचा साधनेवरील विश्वासच उडतो. ते साधना करणे सोडून देतात. ''मी एवढी तपश्चर्या केली पण मला देव प्रसन्न होत नाही. म्हणजे देव-बिव सब झुठ आहे,'' असे ते म्हणतात. नारदमुनी त्यांच्याकडे पाहून फक्त स्मितहास्य करतात आणि पुढे जातात.
नंतर नारदमुनी दुसऱ्या भक्ताकडे जातात. आणि पहिल्याला जे सांगितले होते, तेच ते यालाही सांगतात. तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि तो आनंदाने बागडू लागतो आणि म्हणतो, "वा! म्हणजे मला श्रीविष्णुंचे दर्शन होणार आहे तर! किती भाग्यवान आहे मी!” नारदमुनींच्या त्या अभिवचनाने त्याला इतका आनंद होतो की तो भान हरपून बसतो आणि तत्क्षणी त्याला श्रीविष्णुंचा साक्षात्कार होतो.
तात्पर्य
[संपादन]ईश्वराचा साक्षात्कार कधी होणार ते आपल्या एकाग्रतेवर आणि आपल्या भक्तीच्या उत्कटतेवर, प्रयत्नसातत्यावर अवलंबून असते, हे या कथेतून लक्षात येते.[१]
संदर्भ
[संपादन]- ↑ Sri Aurobindo (2013). Letters on Yoga - II. THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. 29. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. p. 470.