बरारी घाटाची लढाई
| दिनांक | ९ जानेवारी १७६० |
|---|---|
| स्थान | बरारी, दिल्ली, भारत |
| परिणती | दुराणीचा विजय. दिल्ली काबीज करुन शाहजहाँ तिसऱ्याला मुघल सम्राटपदी बसवले. |
| युद्धमान पक्ष | |
|---|---|
| सेनापती | |
| दत्ताजी शिंदे जानकोजी शिंदे साबाजी शिंदे |
अहमदशाह अब्दाली, कुतुबशाह रोहिला |
| सैन्यबळ | |
| ८०,००० घोडदळ | नेमकी माहिती नाही |
| बळी आणि नुकसान | |
| १,००० घोडेस्वार | नेमकी माहिती नाही |
बरारी घाटाची लढाई किंवा बुराडी घाटाची लढाई ही अहमदशाह अब्दालीच्या दुर्राणी-रोहिला-अफगाण आणि मराठ्यांच्या सैन्यामधील लढली गेली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईची जणू नांदी असलेल्या या लढाईत मराठ्यांचा सडकून पराभव झाला आणि त्यांचे अनेक सरदार यात मारले गेले. ही लढाई पानिपतच्या लढाईची पूर्वतयारीच होती. यानंतर मराठ्यांच्या शक्तीला भगदाड पडले आणि भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली.
पार्श्वभूमी
[संपादन]तराओरीच्या लढाईत दुराण्यांकडून पराभव झाल्यानंतर दत्ताजी राव शिंदेने दिल्लीकडे माघार घेतली आणि मजल-दरमजल करीत मराठा सैन्य २९ डिसेंबर रोजी सोनीपतला पोहोचले. त्यांनी मुघल वजीर इमाद-उल-मुल्कला दिल्लीची तटबंदी मजबूत करण्यासाठी आदेश पाठविलेले होते परंतु वजीराने मराठ्यांचा विश्वासघात केला आणि दिल्लीला वाऱ्यावर सोडलेले होते स्थानिक प्रजा मराठ्यांचा अतिद्वेष करीत असल्यामुळे त्यांच्याकडून मदत किंवा रसदीसाठी अवलंबून राहणे शक्य नव्हते. दुराणी आता पुन्हा चाल करून येणार आणि लवकरतच पुन्हा एकदा लढाईला तोंड फुटणार याचा अंदाज येउन दत्ताजीने आपले सैन्य बरारी घाटावर पोचवले. ४ जानेवारी रोजी यमुना नदीच्या दोन्ही तीरांवर मराठे आणि दुराणी ठाण मांडून बसलेले होते. शत्रूने नदी ओलांडून चाल करू नये म्हणून मराठा सैनिकांना यमुना नदीच्या छोटे ओढे, नाले यांच्यावर गस्त बसवण्याचे आदेश देण्यात आले. ६ जानेवारी रोजी दत्ताजी दिल्लीला गेला आणि तेथील सगळ्या बाजारबुणग्यांना त्याने रेवाडीला पाठवून दिले.
लढाई
[संपादन]८-९ जानेवारीच्या रात्री अब्दालीने मराठ्यांच्या फळीची चाचपणी करण्याचे आणि शक्य झाले तर यमुना ओलांडून पाहण्याचा प्रयत्न केला. नजीब उद-दौला आणि इतर रोहिला सरदार उंट आणि लहान हत्तींच्या तुकडीसह त्याच्या बरोबर होते. प्रत्येक जनावरावर हलक्या तोफा आणि शिबंदीकडे बंदुका होत्या. त्यांच्या बरोबर तोफखान्याचे सैनिकही होते. एके ठिकाणी अब्दालीने नदी ओलांडली आणि तो अलीकडील तीरावर दडून बसला परंतु हे मराठ्यांच्या टेहळ्यांनी पाहिले. रोहिल्यांचा पिछाडीचा भाग अफगाण घोडेस्वारांनी संरक्षित केला होता. हे पाहून साबाजी शिंदेने दत्ताजीला ही बातमी कळवली आणि आपले फक्त तलवारी आणि भाल्यांनी सज्ज असलेले सैनिक घेउन तो शत्रूवर चालून गेला. यात तो दुराण्यांच्या जाळ्यात अडकला. जसे मराठा सैन्य जवळ आले तसे उंच गव आणि झुडुपांच्या मागून लपलेल्या दुराणी बरकंदाजांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. मराठ्यांची दाणादाण उडत असल्याचे कळताच दत्ताजी कुमकीसाठी धावून गेला. शत्रूच्या बलाबलाची माहिती न घेताच त्याने फक्त तलवारी घेऊन आपल्या मुठभर सैनिकांसह अफगाणांवर हल्ला केला. यावेळच्या धुमश्चक्रीत एक गोळी दत्ताजीला लागून तो ठार झाला. [१] [२] त्याच्या मदतीला आलेल्या जानकोजी शिंदेलाही गोळी लागली आणि तो रणांगणावर बेशुद्ध पडला. दत्ताजीचा धाकटा भाऊ जोतिबा देखील युद्धात लढताना पडला. आपले सेनापती आणि अनेक म्होरके मारले गेलेले पाहून मराठ्यांचा धीरच खचला आणि त्यांनी लढाईतून पळ काढला. तोपर्यंत मराठ्यांचे सुमारे १,००० सैनिक कामी आले होते. दिल्लीकडे पळत सुटलेल्या मराठ्यांचा अफगाण आणि रोहिल्यांनी पाठलाग केला आणि कचाट्यात सापडलेल्या अनेक मराठ्यांना ठार मारले. नजीब खानचा बोलविता धनी कुतुबशाह रोहिला याला दत्ताजीचा मृतदेह सापडला. तेथे त्याचा तो शिरच्छेद करण्यात आला आणि दत्ताजीचे डोके नजीब आणि अब्दाली दोघांनाही दाखवण्यात आले.
आख्यायिका
[संपादन]या ठिकाणी एक आख्यायिका आहे की कुतुबशाहला रणांगणावर दत्ताजी शिंदे गंभीर जखमी परंतु जिवंत अवस्थेत सापडला. त्याने उपहासाने जमिनीवर पडलेल्या दत्ताजीला क्यूं पटेल, और लडेंगे? असा सवाल केला. आपली आता धडगत नाही हे माहिती असून सुद्धा त्यावेळी दत्ताजीने हां हां, क्यूं नही? बचेंगे, तो और भी लडेंगे. असे उत्तर दिले.
हे ऐकून चवताळलेल्या कुतुबशाहने दत्ताजीचा शिरच्छेद केला आणि त्याचे डोके लाथाडून लावले.
हे ऐकल्यावर मराठ्यांंचे उत्तरेकडील सरसेनापती विश्वासराव पेशवे आणि सदाशिवराव भाऊ यांचा तीव्र संताप झाला.
परिणाम
[संपादन]९ जानेवारी रोजी विजयी अफगाण सैन्याने दिल्ली शहरात प्रवेश केला. लढाईत बरेवाईट झाल्यास दिल्ली शहराची खैर नाही हे माहिती असल्याने तेथील बव्हंश लोक शहर सोडून पळून गेलेले होते. उरलेले लोक दारे-खिडक्या लावून लपून बसले. अफगाण्यांनी अशा उजाड शहरात प्रवेश केला. त्याआधी इमाद-उल-मुल्क संपूर्ण मुघल सरकारदफ्तर आणि सैन्यासह निघून गेलेला होता. लाल किल्ला शिबंदी नसल्याने एकही चकमक न होता अब्दालीच्या हातात पडला. त्याने शाहजहान तिसरा याला मुघल सम्राटपदी बसवले आणि आपल्या सैन्याला त्याची लाज न काढण्याचे आदेश दिले.[३] [४]
यानंतर काहीच दिवसांत १४ जानेवारी, १७६१ रोजी दुराणी आणि मराठ्यांमध्ये पानिपत येथे घनघोर संग्राम झाला. यातसुद्धा मराठ्यांचा सपशेल पराभव होउन त्यांची वाताहत उडाली. पानिपतच्या लढाईनंतर अब्दालीने पंजाब आणि अफगाणिस्तानकडे कूच केले असले तरी दिल्लीचा कोणी वाली उरला नाही आणि मुघल सम्राट हे नावापुरते बाहुले उरला. याच सुमारास पूर्वेकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने उचल खाल्लेली होती. त्यांनी ही संधी घेत हळूहळू भारतात पाय पसरविले आणि भारतात ब्रिटिश साम्राज्याची पकड मजबूत करणे सुरू केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Battle of Barari Ghat | Sepoy Mutiny, British Raj & Bengal Army | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2025-03-25 रोजी पाहिले.
- ^ Maratha Generals and Personalities: A gist of great personalities of Marathas (इंग्रजी भाषेत). Pratik gupta. 2014-08-01.
- ^ Jaswant Lal Mehta, Advanced Study in the History of Modern India 1707-1813, p. 268-9
- ^ Jaswant Lal Mehta, p. 269