Jump to content

बिंदादिन महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिंदादिन महाराज (१८३०:हांडिया तालुका,उत्तर प्रदेश, भारत - १९१८) हे भारतीय कथक नर्तक होते. त्यांनी कथकचे लखनौ घराणे स्थापन केले.[]

बालपण आणि शिक्षण

[संपादन]

बिंदादिन (मूळ नाव: वृंदावन प्रसाद) []महाराजांचा जन्म १८३० मध्ये अलाहाबाद जिल्ह्याच्या हांडिया तालुक्यात झाला. त्यांच्या कुटुंबात काही पिढ्या कथक नृत्याची परंपरा होती. त्यांचे वडील दुर्गाप्रसाद हेसुद्धा कथक नर्तक होते. बिंदादिन यांनी कथक नृत्याची तालीम वडील दुर्गाप्रसाद आणि काका ठाकूरप्रसाद यांच्याकडून घेतली. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून कथक नृत्य शिकायला सुरुवात केली आणि तीन वर्षे केवळ "तिग दा दिग दिग" या बोलांचा सराव केला.[]

लखनौचे नवाब वाजिदअली शाह यांच्या दरबारात पखवाज वादक कुडाऊ सिंग यांच्याबरोबर झालेल्या जुगलबंदीत बारा वर्षाचे बिंदादिन सरस ठरले आणि त्यांच्यावर खुश होऊन नवाबाने त्यांना संपत्ती देऊन त्यांचा गौरव केला, अशी कथा सांगितली जाते.

कारकीर्द

[संपादन]

बिंदादिन महाराज हे उत्तम गायकसुद्धा होते. त्यांनी खास कथकसाठी हजारो ठुमऱ्या आणि बंदिशी रचल्या आहेत. त्यांनी ठुमऱ्यांच्या बरोबरच दादरा, धृपद, होरी, खयाल, टप्पा, भजने अशा प्रकारच्या काव्यरचनासुद्धा केल्या. त्यांच्या काव्यात हिंदी, उर्दू, ब्रज आणि मैथिली अशा अनेक भाषा आढळतात. खास कथकसाठी ही काव्ये लिहीलेली असल्यामुळे त्यात नृत्याची बढत करण्यासाठी जागा निर्माण केलेल्या आहेत. ही काव्ये विशेषतः कृष्ण-लीलांवर आधारित आहेत. 'बिंदा कहत' या ओळी या रचनाच्या शेवटी आढळतात. त्यांच्या रचनांचे संकलन 'रस गुंजन' या पुस्तकामध्ये पंडित बिरजू महाराज यांनी केले आहे.[]

बिंदादिन महाराज यांनी लखनौ येथे कथक नृत्याचे प्रशिक्षण देणारी शाळा सुरू केली. आपले बंधू कालिकाप्रसाद यांच्याबरोबर त्यांनी कथक नृत्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. []भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान त्यांनी लखनौबाहेर पडून भोपाळ, नेपाळ अशा ठिकाणी प्रवास केला आणि आपल्या कलेचे सादरीकरण करून रसिकांची दाद आणि मोठी बिदागीही मिळवली.[] त्या काळातील ठुमरी गायिका गौहर जान, जोहरा बाई या बिंदादिन महाराजांच्या शिष्या होत्या.[]

कौटुंबिक माहिती

[संपादन]

बिंदादिन महाराजांना अपत्य नव्हते. त्यांचे बंधू कालिकाप्रसाद यांना अच्छन महाराज, लच्छन महाराज आणि शंभू महाराज हे तीन मुलगे होते. बिंदादिन महाराजांनी आपले पुतणे अच्छन महाराज यांना कथक नृत्याची सर्वात जास्त तालीम दिली. बिरजू महाराज हेसुद्धा बिंदादिन महाराजांच्या कुटुंबातीलच आहेत.

बिंदादिन महाराजांच्या काही प्रसिद्ध रचना

[संपादन]

प्रसिद्ध रचना

  • झुलत राधे नवल किशोरे
  • आवन लचक लचक ब्रज नारी
  • नीर तत ढंग – कथकचे लक्षणगीत

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b Banerjee, Projesh; Banerji, Projesh (1986). Dance in Thumri (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 978-81-7017-212-3.
  2. ^ मानव संसाधन विकास मंत्रालय,, भारत सरकार (८ जुलै २०२०). "पाठशाला" (PDF). http://epgp.inflibnet.ac.in/. External link in |website= (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)
  3. ^ "रस गुंजन-Rasa Gunjan by Birju Maharaj - Popular Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-08 रोजी पाहिले.
  4. ^ Banerji, Projesh (1983). Kathak Dance Through Ages (इंग्रजी भाषेत). Humanities Press.
  5. ^ Banerjee, Projesh; Banerji, Projesh (1986). Dance in Thumri (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 978-81-7017-212-3.
  6. ^ Banerjee, Projesh; Banerji, Projesh (1986). Dance in Thumri (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 978-81-7017-212-3.