बाळ गंगाधर खेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाळासाहेब खेर या पानावरून पुनर्निर्देशित)

बाळासाहेब गंगाधर खेर (ऑगस्ट २४, इ.स. १८८८ - मार्च ८, इ.स. १९५७) हे स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.

जीवन[संपादन]

बाळासाहेब खेरांचा जन्म ऑगस्ट २४, इ.स. १८८८ साली रत्‍नागिरी येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे बालपण कुंदगोळ (त्या काळातील जमखंडी) येथे गेले. नंतर शाळेत असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि मग गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आज्ञेवरून त्यांनी आपले शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले. विल्सन कॉलेज, मुंबई येथून १९०८ साली त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. तेव्हा त्यांना संस्कृतामध्ये प्रथम आल्याबद्दल 'भाऊ दाजी लाड पुरस्कार' मिळाला. पुढे कायद्याचे शिक्षण घेऊन ते वकील झाले.

मुंबईतूनच १९२२ साली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांची हुशारी, वक्तव्य आणि विचार यांच्या जोरावर पदार्पणातच त्यांना स्वराज्य पक्षाचे सचिवपद बहाल करण्यात आले. असहकार चळवळीच्या वेळी १९३० आणि १९३२ साली त्यांनी पहिल्यांदा आठ महिने आणि त्यानंतर दोन वर्षे कारावास भोगला.

ब्रिटिशांनी १९३५ साली कायद्यात काही सुधारणा केल्या आणि त्यानुसार प्रांतांना काही अंशी स्वायत्तता बहाल करण्यात आली. मुंबई प्रांताचे विभाजन होऊन सिंध प्रांत वेगळा करण्यात आला. नव्या मुंबई प्रांतात निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (काही ठिकाणी पंतप्रधान असाही उल्लेख आढळतो) झाले. सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर सन १९४० नंतर परत एकदा ते भातीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी झाले.

स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आणि नंतर १९५२ सालापर्यंत ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री राहिले. याच काळात ते शिक्षणमंत्रीही होते. त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून घेतलेले अनेक निर्णय (उदा० शालेय वर्ष जून ते मे ऐवजी एप्रिल ते मार्च करणे, शाळेत पाचवीपासून इंग्रजी न शिकवता ते आठवीपासून शिकवणे, वगैरे) त्यांना एकतर मागे घ्यावे लागले किंवा पुढच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकाने ते रद्द केले.

बाळासाहेबांना त्यांच्या साध्या आणि विनयशील स्वभावामुळे सज्जन म्हटले जात असे. त्यांच्या सज्जनपणामुळे त्यांनी महात्मा गांधींसहित काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मने जिंकली होती. ते अतिशय उत्तम वक्ते होते. त्यांच्या भाषणात खुसखुशीतपणा असायचा. एरवी बोलतानाही ते मिस्कील टीका-टिप्पणी करण्यात प्रसिद्ध होते.

१९५४ साली पहिल्यांदा नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात बाळासाहेबांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या शेवटच्या काळात ते पुण्यात स्थायिक झाले होते. तेथेच ८ मार्च १९५७ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली.

पुरस्कार[संपादन]