Jump to content

फ्रान्सचा दहावा शार्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

 

दहावा शार्ल
राजा शार्ल ६७ वर्षांचे असताना काढलेले चित्र
फ्रान्सचा राजा
राज्य कारकीर्द १६ सप्टेंबर १८२४ – २ ऑगस्ट १८३०
राज्याभिषेक २९ मे १८२५
रेंस कॅथेड्रल
Predecessor फ्रान्सचा अठरावा लुई
उत्तराधिकारी पहिला लुई फिलिप
(फ्रेंचचा राजा म्हणून)
फ्रेंच राजगदीचा विधीवादी दावेदार
Reign २ ऑगस्ट १८३० – ६ नोव्हेंबर १८३६
उत्तराधिकारी लुई आंत्वान, आंगूलेमचा ड्यूक
जन्म शार्ल फिलिप, आर्त्वाचा काउंट
९ ऑक्टोबर, १७५७ (1757-10-09)
व्हर्सायचा राजवाडा, फ्रान्स
मृत्यु ६ नोव्हेंबर, १८३६ (वय ७९)
गोर्त्स, ऑस्ट्रियन साम्राज्य
दफन कोस्तान्येवित्सा मठ, स्लोव्हेनिया
जोडीदार
Issue
House बूर्बों
वडील लुई, फ्रान्सचा दोफें
आई जाक्सनची मारी जोसेफे
धर्म कॅथलिक
स्वाक्षरी

दहावा शार्ल (शार्ल फिलिप; ९ ऑक्टोबर १७५७ – ६ नोव्हेंबर १८३६) हा १६ सप्टेंबर १८२४ ते २ ऑगस्ट १८३० पर्यंत फ्रान्सचा राजा होता. [] राज्याभिषेक न झालेल्या सतराव्या लुईचा काका आणि माजी राज्यकर्ते राजे सोळावा लुईअठरावा लुई यांचा धाकटा भाऊ असलेल्या त्याने, वनवासात असलेल्या अठराव्या लुईला पाठिंबा दिला. १८१४ मध्ये बूर्बों राजघराण्याच्या पुनर्संस्थापनेनंतर, शार्ल ( गृहीत वारस म्हणून) अति-राजनिष्ठांचा नेता बनला. हा गट फ्रेंच दरबारातील एक कट्टर राजेशाहीवादी गट होता, जो दैवी हक्काने मिळणाऱ्या संपूर्ण राजेशाहीचे समर्थन करत होता आणि संवैधानिक राजेशाही, प्रजासत्ताकवाद, उदारमतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याही सवलती आणि १८१४ च्या सनदेद्वारे प्रदान केलेल्या नागरी स्वातंत्र्याच्या हमींना विरोध करत असे. १८२० मध्ये आपला मुलगा शार्ल फेर्दीनांद, बेरीचा ड्यूक याच्या हत्येनंतर शार्लने फ्रेंच दरबारात प्रभाव मिळवला आणि १८२४ मध्ये तो आपला भाऊ अठरावा लुईचा उत्तराधिकारी झाला.

१८२५ मध्ये त्याच्या राज्याभिषेकावेळी, त्याने शाही स्पर्शाची प्रथा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कारकिर्दीत नियुक्त केलेल्या सरकारांनी सामंतशाहीच्या निर्मूलनासाठी पूर्वीच्या जमीनदारांना कर्जरोखेधारकांच्या (म्हणजेच, मध्यमवर्गीय फ्रेंच नागरिकांच्या) खर्चावर नुकसान भरपाई दिली, कॅथलिक चर्चची शक्ती वाढवली आणि धर्मद्रोहासाठी मृत्युदंडाची शिक्षा पुन्हा लागू केली, ज्यामुळे उदारमतवादी-बहुमत असलेल्या प्रतिनिधी सभागृहाशी संघर्ष निर्माण झाला.

शार्लने आपल्या नागरिकांचे लक्ष देशांतर्गत अडचणींपासून विचलित करण्यासाठी अल्जेरियाच्या फ्रेंच विजयाला सहमत दिली आणि नाकेबंदी उठवण्याच्या व हैतीच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याच्या बदल्यात हैतीला मोठी नुकसानभरपाई देण्यास भाग पाडले. त्याने शेवटी युवराज जुल द पोलिन्याक यांच्या पंतप्रधानपदी एक पुराणमतवादी सरकार नियुक्त केले, जे १८३० च्या फ्रेंच विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांनी जुलैतील अध्यादेशांद्वारे प्रतिनिधी सभागृह बरखास्त केले, मताधिकार मर्यादित केला आणि वृत्तपत्र परिनिरीक्षण पुन्हा लागू केली. एका आठवड्याच्या आत, पॅरिसमध्ये शहरी दंगली उसळल्या, ज्यामुळे १८३० ची जुलै क्रांती झाली, आणि परिणामी त्याला पदत्याग करावा लागला व पहिला लुई फिलिप फ्रान्सचा राजा म्हणून निवडला गेला. तो बूर्बों राजघराण्याच्या वरिष्ठ शाखेतील शेवटचा फ्रेंच शासक होता. पुन्हा एकदा वनवासात पाठवल्यावर, शार्लचा १८३६ मध्ये गोरित्स्या येथे मृत्यू झाला, जो तेव्हा ऑस्ट्रियन साम्राज्याचा भाग होता.

बालपण

[संपादन]
कॅथरीन रीड यांनी काढलेले शार्ल-फिलिपचे व्यक्तिचित्र, १७६४

फ्रान्सचा शार्ल फिलिपचा जन्म १७५७ मध्ये व्हर्सायच्या राजवाड्यात झाला. तो दोफें लुई आणि त्याची बायको, दोफीन मारी जोसेफेचा सर्वात लहान मुलगा होता. शार्लला त्याचे आजोबा, तत्कालीन राजा पंधरावा लुई यांनी जन्मतःच आर्त्वाचा काउंट ही पदवी दिली होती.

कुटुंबातील सर्वात लहान पुरुष असल्याने, शार्ल कधी राजा होईल असे वाटत नव्हते. त्याचा थोरला भाऊ, बूर्गान्याचा ड्यूक लुई, १७६१ मध्ये अनपेक्षितपणे वारला, ज्यामुळे शार्लवारसा हक्काच्या रांगेत एक पातळी वर सरकला. त्याचे बालपण फ्रान्सच्या मुलांच्या शिक्षिका, मादाम द मार्सां यांनी वाढवले. 

१७६५ मध्ये त्याचे वडिल वारल्यानंतर, शार्लचा सर्वात मोठा हयात असलेला भाऊ, लुई ओगिस्त, नवीन दोफें (फ्रेंच सिंहासनाचा वारस) बनला. त्या दोघांची आई मारी जोसेफे, जी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून कधीच सावरली नाही, मार्च १७६७ मध्ये क्षय रोगामुळे मरण पावली. [] यामुळे शार्ल वयाच्या नवव्या वर्षी, त्याचे भावंडं लुई ओगिस्त, लुई स्तानिस्लास, प्रोव्हांसचा काउंट, मारी क्लोतील्द आणि एलिजाबेत यांच्यासह अनाथ झाला. पंधरावा लुई २७ एप्रिल १७७४ रोजी आजारी पडला आणि १० मे रोजी वयाच्या ६४व्या वर्षी देवीच्या आजाराने मरण पावला [] त्याचा नातू लुई-ओगिस्त हा त्याच्यानंतर फ्रान्सचा सोळावा राजा लुई म्हणून राजगादीवर बसला. []

लग्न आणि खाजगी जीवन

[संपादन]
१७९८ मधील आर्त्वाचा काउंट म्हणून शार्ल, हेन्री-प्येर दान्लू यांनी काढलेले चित्र

नोव्हेंबर १७७३ मध्ये, शार्लने सावेच्या मारी तेरेसाशी लग्न केले. १७७५ मध्ये, मारी तेरेसाने लुई आंत्वान नावाच्या मुलाला जन्म दिला, ज्याला सोळाव्या लुईने आंगूलेमचा ड्यूक बनवले. लुई-आंत्वान हा बूर्बों राजघराण्याच्या पुढच्या पिढीतील पहिला होता, कारण राजा आणि प्रोव्हांसच्या काउन्टला अद्याप कोणतेही मूल झाले नव्हते, ज्यामुळे पॅरिसमधील पत्रकार सोळाव्या लुईच्या कथित नपुंसकतेची खिल्ली उडवली. [] तीन वर्षांनंतर, १७७८ मध्ये, शार्लचा दुसरा मुलगा, शार्ल फेर्दीनांद, जन्मला आणि त्याला बेरीचा ड्यूक ही पदवी दिली. []

संकट आणि फ्रेंच क्रांती

[संपादन]

शार्लची राजकीय जागृती १७८६ मध्ये राजेशाहीच्या पहिल्या मोठ्या संकटापासून सुरू झाली, जेव्हा हे स्पष्ट झाले की पूर्वीच्या लष्करी मोहिमांमुळे (खास करून सप्त-वार्षिक युद्ध आणि अमेरिकन क्रांती ) राज्य दिवाळखोर झाले होते आणि टिकून राहण्यास आर्थिक सुधारणांची गरज होती. शार्लने उमराव वर्गाचे आर्थिक विशेषाधिकार काढून टाकण्याला पाठिंबा दिला, पण कॅथलिक चर्च किंवा उमराव वर्गाला मिळणाऱ्या सामाजिक विशेषाधिकारांमध्ये कोणतीही कपात करण्याबद्दल त्याचा विरोध होता. ते असे मानत होते की राजेशाही उलथवून न टाकता फ्रान्सच्या आर्थिक व्यवस्थेत सुधारणा केली पाहिजे. त्यांच्याच शब्दांत, "दुरुस्तीची वेळ होती, पाडण्याची नाही." []

सोळाव्या लुईने शेवटी, १५० वर्षांहून अधिक काळ न भरलेल्या सामान्य-वर्गाची बैठक मे १७८९ मध्ये आर्थिक सुधारणांना मान्यता देण्यास बोलावली गेली. त्याची बहीण एलिजाबेतसोबत, शार्ल कुटुंबातील सर्वात पुराणमतवादी होता [] आणि त्याने तिसऱ्या वर्गाच्या ( जनसाधारणचे प्रतिनिधित्व करणाऱ्या) मतदानाचा अधिकार वाढवण्याच्या मागण्यांना विरोध केला. यामुळे त्याच्या भावाने त्याच्यावर टीका केली आणि "plus royaliste que le roi" ("राजापेक्षा जास्त राजेशाहीवादी") असल्याचा आरोप केला. जून १७८९ मध्ये, तिसऱ्या वर्गाच्या प्रतिनिधींनी फ्रान्सला नवीन संविधान देण्याच्या उद्देशाने स्वतःला राष्ट्रीय सभा घोषित केले. []

बॅरन द ब्रतोय यांच्या सहकार्याने, शार्लने उदारमतवादी अर्थमंत्री जाक नेकेर यांना पदच्युत करण्यासाठी राजकीय आघाड्या जुळवून आणल्या होत्या. जेव्हा शार्लने मूळ योजनेपेक्षा खूपच आधी, ११ जुलै रोजी ब्रतोयला माहीत नसाताना नेकेरला पदावरून दूर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या योजना उलटल्या. ब्रेतोयसोबतच्या त्याच्या राजकीय युतीचा ऱ्हास सुरू झाला, जो शेवटी परस्पर द्वेषापर्यंत बिघडले. [ <span title="This claim needs references to reliable sources. (July 2020)">संदर्भ आवश्यक</span> ]

नेकर यांच्या बडतर्फीमुळे १४ जुलै रोजी बास्तीयवर हल्ला झाला. सोळावा लुई आणि मारी आंत्वानेच्या संमतीने, शार्ल आणि त्याचे कुटुंब इतर अनेक दरबाऱ्यांसह तीन दिवसांनंतर, १७ जुलै रोजी फ्रान्स सोडून गेले. यामध्ये राणीची आवडती, पोलिन्याकची डचेससुद्धा होती. [१०] त्याच्या पलायनाचे ऐतिहासिक कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या सुरक्षेची वैयक्तिक भीती होती. परंतु, अलिकडच्या संशोधनातून असे दिसून येते की, राजाने आपल्या भावाच्या जाण्याला आधीच मंजुरी दिली होती, कारण लुईला स्वतःला व्हर्सायहून पॅरिसला हलवल्यानंतर, राजेशाहीचा प्रवक्ता म्हणून काम करण्यासाठी एक जवळचा नातेवाईक मोकळा राहील, हे सुनिश्चित करण्याचा तो एक मार्ग होता. [११]

वनवासातील आयुष्य

[संपादन]
लंडन, मेफेर येथील ७२ साउथ ऑडली रस्त्यावर एक पाटी, जे १८०५ ते १८१४ दरम्यान त्याचे घर होते.

शार्ल आणि त्याच्या कुटुंबाने त्याच्या बायकोच्या मूळ गावी, सावेमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला, [१२] जिथे कॉंदे कुटुंबातील काही जण त्यांना येऊन मिळाले. [१३] दरम्यान, पॅरिसमध्ये, सोळावा लुई राष्ट्रीय सभेसोबत संघर्ष करत होता, जी मूलगामी सुधारणांसाठी वचनबद्ध होती आणि तिने १७९१ चे संविधान लागू केले होते. मार्च १७९१ मध्ये, विधानसभेने एक राजप्रतिनिधी विधेयक देखील मंजूर केले, ज्यात राजाच्या अकाली मृत्यूच्या प्रसंगासाठी तरतूद होती. जोपर्यंत त्याचा वारस लुई-शार्ल अल्पवयीन होता, तोपर्यंत प्रोव्हांसचा काउंट, ओर्लेयोंचा ड्यूक किंवा, या दोघांपैकी कोणीही उपलब्ध नसल्यास, निवडणुकीद्वारे निवडलेली व्यक्ती राजप्रतिनिधी बनायला हवी होती, आणि असे करताना शार्लचे अधिकार पूर्णपणे डावलले जात होते, जो राजघराण्याच्या वंशपरंपरेत प्रोव्हांसचा काउंट आणि ओर्लेयोंचा ड्यूक यांच्यामध्ये होता. [१४]

त्याकाळी शार्लने तोरिनो (इटलीमध्ये) सोडले आणि तो जर्मनीतील ट्रीयर येथे गेला, जिथे त्याचे काका, जाक्सनचे क्लेमां वेंसेस्लास, हे तत्कालीन आर्चबिशप-मतदार होते. शार्लने फ्रान्सवर प्रति-क्रांतिकारी आक्रमणाची तयारी केली होती, पण मेरी आंत्वानेतच्या एका पत्रामुळे ते आक्रमण पुढे ढकलले. त्यानंतर राजघराणे पॅरिसमधून निसटले आणि मोंमेदी येथे फ्रान्स्वा क्लोद अमूर, बुयेचा मार्की यांच्या नेतृत्वाखालील नियमित सैन्याच्या तुकडीत सामील झाले. [१५]

वारेन येथे पळून जाण्याचा प्रयत्न थांबवल्यानंतर, शार्ल कोब्लेन्झकडे गेला, जिथे त्याने, नुकताच पळून आलेल्या प्रोव्हांसच्या काऊंटने आणि काँदेच्या राजकुमारांनी मिळून फ्रान्सवर आक्रमण करण्याचा आपला इरादा जाहीर केला. प्रोव्हांसचा काउंट मदतीसाठी विविध युरोपीय सम्राटांना निरोप पाठवत होता, तर शार्लने ट्रीयरच्या मतदारप्रांतामध्ये एक निर्वासित दरबार स्थापन केला. २५ ऑगस्ट रोजी, पवित्र रोमन साम्राज्य आणि प्रशियाच्या शासकांनी पिल्नित्स घोषणापत्र जारी केले, ज्यामध्ये इतर युरोपीय देशांना फ्रान्समध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते. [१६]

१ जानेवारी १७९२ रोजी, राष्ट्रीय सभेने सर्व स्थलांतरितांना देशद्रोही घोषित केले, त्यांचे हक्क रद्द केले आणि त्यांच्या जमिनी जप्त केल्या. [१७] या उपाययोजनेनंतर राजेशाहीचे निलंबन केले आणि शेवटी सप्टेंबर १७९२ मध्ये ती संपुष्टात आणण्यात आली. राजघराण्याला तुरुंगात टाकले आणि माजी राजा व माजी राणी यांना शेवटी १७९३ मध्ये फाशी दिली गेली. [१८] तरुण माजी दोफें, वयाच्या दहाव्या वर्षी, १७९५ मध्ये तुरुंगात असताना आजारपण आणि तीव्र दुर्लक्षामुळे मरण पावला. [१९]

१७९२ मध्ये जेव्हा फ्रेंच क्रांतीची युद्धे सुरू झाली, तेव्हा शार्ल ब्रिटनला पळून गेला, जिथे राजा तिसऱ्या जॉर्जने त्याला भरघोस भत्ता दिला. शार्ल त्याची प्रेयसी लुईस द पोलास्त्रों हिच्यासोबत एडिनबरा आणि लंडनमध्ये राहत होता. [२०] जून १७९५ मध्ये आपल्या पुतण्याच्या मृत्यूनंतर अठरावा लुई, त्याचा मोठा भाऊ, व्हेरोना आणि नंतर मिटाऊ येथील येलगाव्हा राजवाड्यात स्थलांतरित झाला, जिथे १० जून १७९९ रोजी शार्लचा मुलगा लुई आँत्वान याने सोळाव्या लुईच्या एकमेव जिवंत मुली, मारी तेरेस हिच्याशी लग्न केले. १८०२ मध्ये, शार्लने आपल्या भावाला काही हजार पाउंड देऊन मदत केली. १८०७ मध्ये, अठरावा लुई ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाला. [२१]

बूर्बों पुनर्स्थापना

[संपादन]
पोलीन ओझू यांनी काढलेलेदहाव्या शार्लचे पुनरागमन

जानेवारी १८१४ मध्ये, शार्ल दक्षिण फ्रान्समधील आघाडीच्या सैन्यात सामील होण्यासाठी गुप्तपणे लंडनमधील आपले घर सोडून गेला. तोपर्यंत चाकाच्या खुर्ची अवलंबून असलेल्या अठराव्या लुईने, शार्लला फ्रान्सच्या राज्याचा लेफ्टनंट जनरल म्हणून नियुक्त करणारे सनदपत्र दिले. ३१ मार्च रोजी दोस्त राष्ट्रांनी पॅरिस ताब्यात घेतले. एका आठवड्यानंतर नेपोलियनने पदत्याग केला. सेनेटने बूर्बों राजेशाहीच्या पुनर्संस्थापनेची घोषणा केली आणि अठराव्या लुईला फ्रान्सचा राजा म्हणून घोषित केले. शार्ल (आता संभाव्य वारस) १२ एप्रिल रोजी राजधानीत आले [२२] आणि अठरावा लुई ब्रिटनहून येईपर्यंत त्यांनी राज्याचे लेफ्टनंट-जनरल म्हणून काम पाहिले. राजप्रतिनिधी म्हणून आपल्या अल्प कार्यकाळात, शार्लने अठराव्या लुईला कोणतीही कल्पना न देता एक अति-राजनिष्ठ गुप्त पोलीस दल तयार केले, जे थेट त्यालाच अहवाल देत होते. ते पाच वर्षांहून अधिक काळ चालले. [२३]

पॅरिसवासीयांनी अठराव्या लुईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आणि त्याने त्विलरी राजवाडा ताब्यात घेतला. [२४] आर्त्वाचा काउंट पाव्हियों द मार्स मध्ये राहत होता आणि आंगूलेमचा ड्यूक पाव्हियों द फ्लॉर मध्ये राहत होता, जिथून सेन नदी दिसत होती. [२५] राजवाड्यात पोहोचल्यावर आंगूलेमची डचेस बेशुद्ध पडली, कारण त्यामुळे त्यांना तीच्या कुटुंबाच्या तेथील कैदेच्या, तसेच १० ऑगस्ट १७९२ रोजी राजवाड्यावर झालेल्या हल्ल्याच्या आणि स्विस रक्षकांच्या हत्याकांडाच्या भयंकर आठवणी ताज्या झाल्या. [२४]

कब्जा करणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या सैन्याच्या सल्ल्यानुसार, अठराव्या लुईने एक उदारमतवादी संविधान, १८१४ चे सनद [२६] लागू केले, ज्यामध्ये द्विसदनी कायदेमंडळ, ९०,००० लोकांचे मतदारसंघ आणि धर्म स्वातंत्र्याची तरतूद होती. [२७] शंभर दिवसांनंतर, १८१५ मध्ये नेपोलियनच्या सत्तेवर झालेल्या संक्षिप्त पुनरागमनानंतर, [२८] श्वेत दहशतीचा मुख्य भर अशा नागरी प्रशासनाच्या शुद्धीकरणावर होता जे जवळजवळ पूर्णपणे बूर्बों राजेशाहीच्या विरोधात गेले होते. सुमारे ७०,००० अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केले. वॉटर्लूच्या लढाईनंतर नेपोलियनच्या सैन्याचे अवशेष बरखास्त केले आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. मार्शल ने देशद्रोहासाठी फाशी दिली आणि मार्शल ब्रुनची जमावाने हत्या केली. [२९] नेपोलियनला पाठिंबा देणाऱ्या सु. ६,००० व्यक्तींवर खटला चालवला. दक्षिण फ्रान्समध्ये सु. ३०० जमावबळीच्या घटना घडल्या, खास करून मार्सेलमध्ये, जिथे इजिप्तला परतण्याच्या तयारीत असलेल्या नेपोलियनच्या अनेक मामलुक सैनिकांची त्यांच्या छावणीत कत्तल केली.

राजाचा भाऊ आणि संभाव्य वारस

[संपादन]
राज्याभिषेकानंतर शार्ल दहाव्यांचा पॅरिसमध्ये प्रवेश ( लुई-फ्रान्स्वा लेजन, १८२५)

जरी राजाने उदारमतवादी सनद ठेवली, शार्लने संसदेतील अति-राजनिष्ठ सदस्यांना, जसे की जुल द पोलिन्याक, लेखक फ्रान्स्वा-रेने द शातोब्रियां आणि जोसेफ विलेल यांना आश्रय दिला. [३०] अनेक वेळी, शार्लने आपल्या भावाच्या उदारमतवादी मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि अठराव्या लुईने त्यांना बरखास्त न केल्यास देश सोडून जाण्याची धमकी दिली. [३१] दुसरीकडे, लुईला अशी भीती होती की त्याच्या भावाच्या आणि संभाव्य वारसाच्या अति-राजनिष्ठ प्रवृत्तींमुळे कुटुंबाला पुन्हा एकदा वनवासात जावे लागेल (आणि शेवटी तसेच घडले).

१४ फेब्रुवारी १८२० रोजी, शार्लचा धाकटा मुलगा, बेरीचा ड्यूक, याची पॅरिस ऑपेरा येथे हत्या करण्यात आली . [३२] [३३] या नुकसानीमुळे केवळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नाही, तर राज्याधिकारही धोक्यात आला, कारण शार्लचा मोठा मुलगा, आंगूलेमचा ड्यूक, निःसंतान होता. बूर्बोंच्या मुख्य वंशात पुरुष वारसांच्या अभावामुळे सिंहासन ओर्लेयोंचा ड्यूक आणि त्याच्या वारसांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली, ज्यामुळे पुराणमतवादी अतिरेकी भयभीत झाले. संसदेत सालिक कायदा रद्द करण्यावर चर्चा झाली, ज्या कायद्याने स्त्रियांना उत्तराधिकारातून वगळले होते आणि जो दीर्घकाळ अभेद्य मानला जात होता. तथापि, बेरीच्या ड्यूकची विधवा, नापोली व सिचिल्याची कारोलिन, गर्भवती असल्याचे कळण्यात आले आणि २९ सप्टेंबर १८२० रोजी तिने हेन्री, बोर्दूचा ड्यूक या मुलाला जन्म दिला. [३४] त्याचा जन्म 'दैवी देणगी' म्हणून गौरवला आणि फ्रान्सच्या लोकांनी त्याच्या जन्माच्या उत्सवासाठी शॅतो द शांबॉर खरेदी केले. [३५]

राज्य

[संपादन]

अधिरोहण आणि राज्याभिषेक

[संपादन]
फ्रान्स्वा जेरार यांनी काढलेले दहाव्या शार्लचा राज्याभिषेक .

शार्लचा भाऊ अठराव्या लुईची प्रकृती १८२४ च्या सुरुवातीपासून खालावत होती. [३६] त्यांच्या पायांना आणि पाठीच्या कण्याला कोरडा आणि ओला कोथ झाल्यामुळे, त्याच वर्षी १६ सप्टेंबर रोजी, जवळपास ६९ वर्षांच्या वयात राजाचे निधन झाले. शार्ल, जो आता ६६ वर्षांचा होता, फ्रान्सचा दहावा राजा शार्ल म्हणून त्याच्यानंतर राजगदीवर बसला [३७] २९ मे १८२५ रोजी, राजा शार्लचा रेंसच्या कॅथेड्रलमध्ये अभिषेक करण्यात आला, जे फ्रेंच राजांच्या राज्याभिषेकाचे पारंपरिक ठिकाण आहे; १७७५ पासून ते वापरात नव्हते, कारण अठराव्या लुईने वाद टाळण्यासाठी आणि त्याची प्रकृती खूपच नाजूक असल्यामुळे हा समारंभ टाळला होता. [३८] पॅरिसमधील नोत्र-देमच्या आदरणीय कॅथेड्रलमध्ये नेपोलियनने आपल्या क्रांतिकारी साम्राज्याचा अभिषेक केला होता; पण आपल्या पूर्वजांच्या सिंहासनावर आरूढ होताना, शार्लने राजेशाहीच्या सुरुवातीच्या काळापासून फ्रान्सच्या राजांनी वापरलेल्या राज्याभिषेकाच्या जुन्या जागेचा पुन्हा वापर केला. [३९] तेथे झालेला शेवटचा राज्याभिषेक १७७५ मध्ये झालेला सोळाव्या लुईचा राज्याभिषेक होता.

फ्रान्सची दुसरी क्रांती

[संपादन]
२५ जुलैचा महान 'नटक्रॅकर'(अडकिट्टा, पश्चिमात्य संस्कृतीत एक पात्र). या व्यंगचित्रात, दहावा शार्ल 'सनद' असे लिहिलेला चेंडू दातांनी फोडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला तो फोडता येत नाही.

२ मार्च १८३० रोजी सभागृहांचे अधिवेशन भरले, पण शार्लच्या उद्घाटनपर भाषणाला अनेक प्रतिनिधींकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी राजाच्या मंत्र्याला सभागृहांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक करणारे विधेयक मांडले आणि १८ मार्च रोजी, २२१ प्रतिनिधींनी, ३० मतांच्या बहुमताने, बाजूने मतदान केले. तथापि, राजाने सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय आधीच घेतला होता आणि १९ मार्च रोजी सभागृह निलंबित करण्यात आले. [४०]

२३ जूनच्या निवडणुकीत सरकारला अनुकूल बहुमत मिळाले नाही. ६ जुलै रोजी, राजा आणि त्याच्या मंत्र्यांनी, सनदेच्या कलम १४ मध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत दिलेल्या तरतुदीनुसार, संविधान निलंबित केले. २५ जुलै रोजी, सें-क्लू येथील राजवाड्यात, शार्लने चार अध्यादेश जारी केले ज्याद्वारे वृत्तपत्र्यांवर परिनिरीक्षण लादण्यात आली, नव्याने निवडलेले सभागृह बरखास्त करण्यात आले, मतदान प्रणाली बदलण्यात आली आणि सप्टेंबरमध्ये नवीन प्रणालीनुसार निवडणुका जाहीर केल्या. [४१] [४२]

त्या अध्यादेशांचा उद्देश जनतेचा असंतोष शमवणे हा होता, पण त्यांचा नेमका उलट परिणाम झाला. ॲदोल्फ तियेर, अर्मां कारेल आणि इतरांनी जानेवारी १८३० मध्ये स्थापन केलेल्या नास्यॉनाल दैनिकाच्या मुख्यालयासमोर पत्रकार निषेधासाठी जमले. सोमवार, २६ जुलै रोजी, सरकारी वृत्तपत्र ले मॉनीतोर उनिवेर्सेल ने अध्यादेश प्रकाशित केले आणि तियेरने ४३ पत्रकारांच्या सहीने बंडाचे आवाहन प्रसिद्ध केले: [४३] "कायदेशीर व्यवस्था आता संपली आहे, बळ वापरणे सुरू झाले आहे... आपण आता ज्या परिस्थितीत आहोत, त्यात आज्ञापालन करणे हे कर्तव्य राहिलेले नाही!" [४४] संध्याकाळी, पॅले-रॉयलच्या बागांमध्ये जमाव जमला आणि ते "बुर्बों मुर्दाबाद!" व "सनद चिरायू होवो!" अशा घोषणा देऊ लागले. पोलिसांनी बागा बंद करताच, जमाव जवळच्या रस्त्यावर पुन्हा जमला जिथे त्यांनी रस्त्यावरील दिवे फोडले.

प्रतिनिधी सभागृहाच्या सदस्यांनी मार्मोंच्याकडे पाच सदस्यीय शिष्टमंडळ पाठवून, चार अध्यादेश रद्द करून आंदोलकांना शांत करण्याचा सल्ला राजाला देण्याची विनंती केली. मार्मोंच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी राजाकडे अर्ज केला, पण परिस्थितीची नाजूक अवस्था लक्षात आल्यावर शार्लने कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला आणि त्याच दुपारी आपल्या मंत्र्यांना बरखास्त केले. त्या संध्याकाळी, सभागृहाचे सदस्य जाक लाफीतच्या घरी जमले आणि त्यांनी राजा शार्लकडून सिंहासन घेण्यासाठी लुई फिलिपची निवड केली, तसेच शहरभर भित्तिपत्रक लावून आपला निर्णय जाहीर केला. दिवसाच्या अखेरीस, शार्लच्या सरकारचा अधिकार पूर्णपणे वितळला होता. [४५]

३१ जुलै रोजी मध्यरात्रीनंतर काही मिनिटांनी, जनरल ग्रेसो यांनी पॅरिसवासी सें-क्लू निवासस्थानावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची चेतावणी दिल्यावर, दहाव्या शार्लने आंगूलेमचा ड्यूक, जो सैन्यासोबत मागे राहिला, आणि आंगूलेमची डचेस, जी विशी येथे स्नानविधीसाठी गेली होती, यांना वगळून आपल्या कुटुंबासह आणि दरबारासह व्हर्सायमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पॅरिसमध्ये, लुई फिलिपने राज्याच्या लेफ्टनंट जनरल पदाचा कार्यभार स्वीकारला. [४६] शार्लचा व्हर्सायचा मार्ग अव्यवस्थित सैन्य आणि पळून गेलेल्या सैनिकांनी भरलेला होता. व्हर्सायच्या राजवाड्याचे राज्यपाल, मार्क्वी द वेराक, शाही मिरवणूक शहरात प्रवेश करण्यापूर्वी राजाला भेटायला आले, हे सांगण्यासाठी की राजवाडा सुरक्षित नाही, कारण क्रांतिकारक तिरंगा परिधान केलेल्या व्हर्सायच्या राष्ट्रीय रक्षकांनी प्लास द'आर्म ताब्यात घेतला होता. त्यानंतर शार्ल पहाटे पाच वाजता त्रियानों निघाला. [४७] त्याच दिवशी नंतर, आंगूलेमचा ड्यूक आपल्या सैन्यासह सें-क्लूहून आल्यानंतर, शार्लने रांबूयेकडे कूच करण्याचा आदेश दिला, जिथे ते मध्यरात्रीच्या थोड्या वेळापूर्वी पोहोचले. १ ऑगस्टच्या सकाळी, घडामोडी कळल्यानंतर विशीहून घाईघाईने निघालेल्या आंगूलेमच्या डचेस रांबूये येथे पोहोचल्या.

दुसऱ्या दिवशी, २ ऑगस्ट रोजी, राजा शार्लने आपला मुलगा दोफें याला डावलून, अजून दहा वर्षांचाही न झालेल्या आपला नातू हेन्री, बोर्दूचा ड्यूक याला राज्याधिकार देऊन पदत्याग केला. सुरुवातीला, आंगूलेमच्या ड्यूकने (दोफें) फ्रान्सच्या सिंहासनावरील आपले हक्क सोडून देणाऱ्या दस्तऐवजावर सही करण्यास नकार दिला. मायेच्या डचेसच्या म्हणण्यानुसार, "वडील आणि मुलामध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यांचे आवाज आम्हाला शेजारच्या खोलीतूनही ऐकू येत होते." शेवटी, वीस मिनिटांनंतर, आंगूलेमच्या ड्यूकने अनिच्छेने आपल्या वडिलांच्या घोषणापत्रावर सही केली: [४८]

“माझ्या बंधो, माझ्या प्रजेला भेडसावणाऱ्या किंवा भविष्यात त्यांच्यावर ओढवू शकणाऱ्या संकटांमुळे मी इतका व्यथित झालो आहे की, ती संकटे टाळण्याचे उपाय शोधल्याशिवाय मला राहवत नाही. म्हणूनच, माझ्या नातवाच्या—बोर्दूच्या ड्यूकच्या—हितार्थ मी पदत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या भावना जाणणाऱ्या दोफेंनेही आपल्या हक्कांचा त्याच्या पुतण्याच्या हितार्थ त्याग केला आहे. त्यामुळे, राज्याचा लेफ्टनंट-जनरल या नात्याने, पाचव्या हेन्रीचा राजगादीवर झालेला राज्यारोहणाचा अधिकार जाहीर करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर येते. तसेच, नव्या राजाचा अल्पवयीन काळ संपेपर्यंत राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालविला जाईल, त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचेही तुम्ही पाहावे. यापुढील अनर्थ टाळण्याच्या उद्देशाने, मी येथे केवळ या व्यवस्था नमूद करून थांबतो. माझे हे निर्णय तुम्ही राजनैतिक प्रतिनिधींना कळवावेत आणि माझ्या नातवाला ‘पाचवा हेन्री’ या नावाने राजा म्हणून मान्यता देणारी घोषणा होताच, शक्य तितक्या लवकर मला तिची माहिती द्यावी.”

 

लुई फिलिपने त्या दस्तऐवजाला लक्ष दिले नाही आणि ९ ऑगस्ट रोजी सभागृहाच्या सदस्यांकडून स्वतःला फ्रान्सचा राजा म्हणून घोषित करवून घेतले.

दुसरा वनवास आणि मृत्यू

[संपादन]
गोरित्स्या येथील कोरोनिनी क्रोनबर्ग राजवाडा, जिथे शार्लने आपल्या आयुष्याचा शेवटचा महिना घालवला.

जेव्हा १४,००० लोकांचा जमाव हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा राजघराण्याने रांबूये सोडले आणि १६ ऑगस्ट रोजी लुई फिलिपने पुरवलेल्या पत्र नौकेतून युनायटेड किंगडमसाठी प्रवास सुरू केला. ब्रिटिश पंतप्रधान, वेलिंग्टनचा ड्यूक यांनी त्यांना ब्रिटनमध्ये सामान्य नागरिक म्हणून यावे लागेल असे कळवल्यावर, कुटुंबातील सर्व सदस्यांनी टोपणनावे धारण केली; शार्लने स्वतःला "पॉन्त्योचा काउंट" असे संबोधले. ब्रिटिशांनी बूर्बों घराण्याचे थंडपणे स्वागत केले, आणि त्यांच्या आगमनानंतर नव्याने स्वीकारलेले तिरंगा झेंडे त्यांच्यासमोर उपहासाने फडकवले. [४९] दहाव्या शार्लच्या पाठोपाठ त्याचे सावकारही लवकरच ब्रिटनमध्ये आले, ज्यांनी त्याच्या पहिल्या वनवासादरम्यान त्याला प्रचंड रक्कम कर्ज म्हणून दिली होती आणि ती अद्याप पूर्णपणे परत करायची होती. तथापि, शार्लच्या बायकोने लंडनमध्ये जमा केलेले पैसे कुटुंब वापरू शकले. [४९] बूर्बों घराण्याला डोर्सेटमधील लुलवर्थ राजवाड्यात राहण्याची परवानगी होती, पण ते लवकरच एडिनबरातील होलीरूड राजवाड्यात, [४९] रीजेंट टेरेसवर बेरीच्या डचेस जवळ राहायला गेले.

ऑस्ट्रियाचे पहिल्या फ्रांसिसच्या आमंत्रणावरून, बूर्बों राजघराणे १८३२/३३ च्या हिवाळ्यात प्राग येथे स्थलांतरित झाले आणि त्यांना प्राग राजवाड्यात राहण्याची सोय दिली. [५०] सप्टेंबर १८३३ मध्ये, बोर्दूच्या ड्यूकचा १३ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बूर्बों विधीवादी प्रागमध्ये जमले होते. त्यांना भव्य सोहळ्यांची अपेक्षा होती, पण शार्लने केवळ आपल्या नातवाच्या प्रौढतेची घोषणा केली. [५१] त्याच दिवशी, शातोब्रियांच्या खूप मनधरणीनंतर, शार्ल आपल्या सुनेला भेटायला तयार झाला, जी भेट १३ ऑक्टोबर १८३३ रोजी लेओबन येथे झाली. तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळल्यावर डचेसच्या मुलांनी तिला भेटण्यास नकार दिला. शार्लने डचेसच्या मागण्या नाकारल्या, पण त्यांची दुसरी सून, आंगूलेमच्या डचेसने विरोध दर्शवल्यानंतर ते शेवटी सहमत झाले.

मार्च १८३५ मध्ये ऑस्ट्रियन सम्राट फ्रांसिसच्या मृत्यूनंतर, बूर्बों राजघराण्याने प्राग राजवाडा सोडला, कारण नवीन सम्राट फेर्डिनांटला तो राज्याभिषेक सोहळ्यांसाठी वापरायचा होता. बूर्बों राजघराणे सुरुवातीला तेप्लीत्स येथे स्थलांतरित झाले. त्यानंतर, फेर्डिनांटने प्राग राजवाड्याचा वापर सुरू ठेवल्यामुळे, त्यांच्यासाठी किर्चबर्ग किल्ला खरेदी केला. परिसरात पटकीची साथ पसरल्यामुळे तेथे जाणे पुढे ढकलण्यात आले. [५२] दरम्यान, शार्ल ऑक्टोबर १८३५ मध्ये ऑस्ट्रियाच्या भूमध्य सागरी किनाऱ्यावरील उबदार हवामानाकडे रवाना झाला. इलिरियाच्या राज्यात गोरित्स्या येथे पोहोचल्यावर तो पटकीने आजारी पडला आणि ६ नोव्हेंबर १८३६ रोजी त्याचा मृत्यू झाला [३३] गावकऱ्यांनी आपल्या खिडक्यांवर काळे शोकवस्त्र घातले. शार्ल यांना फ्रान्सिसी कोस्तान्येविका मठातील (आता नोव्हा गोरिका, स्लोव्हेनिया येथे) घोषणाची आमची माताच्या चर्चमध्ये दफन केले, जिथे त्यांचे अवशेष त्यांच्या कुटुंबाच्या अवशेषांसह एका अंधारकोठडीत आहेत. [५२] देशाबाहेर दफन करण्यात आलेले ते फ्रान्सचे एकमेव राजे आहेत. [५३] [५४] मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये शार्ल दहाव्यांचे अवशेष इतर फ्रेंच सम्राटांसोबत सें-देनीच्या बॅसिलिकामध्ये दफन करावेत, अशी मागणी करणारी एक चळवळ सुरू झाली होती, [५३] [५४] जरी बूर्बों राजघराण्याचे सध्याचे प्रमुख लुई आल्फोंस यांनी २०१७ मध्ये सांगितले की त्यांच्या पूर्वजांचे अवशेष अबाधित राहावेत अशी त्यांची इच्छा आहे. [५५]

संदर्भ

[संपादन]

Page साचा:Reflist/styles.css has no content.

  1. Parmele, Mary Platt (1908). A Short History of France. Scribner. p. 221.
  2. Évelyne Lever, Louis XVI, Librairie Arthème Fayard, Paris (1985), p. 43.
  3. Antonia Fraser, Marie Antoinette: the Journey, pp. 113–116.
  4. Charles Porset, Hiram sans-culotte? Franc-maçonnerie, lumières et révolution: trente ans d'études et de recherches, Paris: Honoré Champion, 1998, p. 207.
  5. Fraser, pp. 137–139.
  6. Fraser, p. 189.
  7. Willsher, Kim (27 September 2016). "France calls for remains of King Charles X to be returned from Slovenia". The Guardian (इंग्रजी भाषेत). ISSN 0261-3077. 7 August 2023 रोजी पाहिले.
  8. Fraser, p. 326.
  9. Fraser, pp. 274–278.
  10. Fraser, p. 338.
  11. Price, Monro (2003). The Fall of the French Monarchy. pp. 93–94. ISBN 978-0-3304-8827-3.
  12. Fraser, p. 340.
  13. Nagel, Susan (18 March 2008). Marie Thérèse: Child of Terror. Bloomsbury Publishing USA. p. 65. ISBN 978-1-5969-1057-7. OCLC 177826440. OL 12443706M.
  14. Fraser, p. 383.
  15. Price, p. 170
  16. Nagel, p. 113.
  17. Nagel, p. 118.
  18. Fraser, pp. 399, 440, 456; Nagel, p. 143.
  19. Nagel, p. 152-153.
  20. Nagel, p. 207.
  21. Nagel, pp. 210, 222, 233–235.
  22. Nagel, p. 153.
  23. Price, pp. 11–12.
  24. 1 2 Nagel, pp. 253–254.
  25. Price, p. 50.
  26. "Charles X". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 24 February 2019 रोजी पाहिले.
  27. Price, pp. 52–54.
  28. Price, pp. 72, 80–83.
  29. Price, p. 84.
  30. Price, pp. 91–92.
  31. Price, pp. 94–95.
  32. Merriman, John M.; Winter, J. M. (2006). Europe 1789 to 1914: encyclopedia of the age of industry and empire. Detroit, Mich.: Charles Scribner's Sons. ISBN 978-0-6843-1496-9. OCLC 76769541.
  33. 1 2 Price, Munro (2007). The Perilous Crown: France between Revolutions. Macmillan. pp. 185–187. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "perilouscrown" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  34. Price, p. 109.
  35. McConnachie, James (2004). Rough Guide to the Loire. London: Rough Guides. p. 144. ISBN 978-1-8435-3257-6.
  36. Lever, Évelyne (1988). Louis XVIII (फ्रेंच भाषेत). Paris: Librairie Arthème Fayard. p. 553.
  37. Price, pp. 113–115.
  38. Price, pp. 119–121.
  39. Redhead, T. W. (January 2012). The French Revolutions. BoD – Books on Demand. p. 176. ISBN 978-3-8640-3428-2.
  40. Price, pp. 130–132.
  41. Price, pp. 136–138.
  42. The International Encyclopedia of Revolution and Protest
  43. Castelot, André, Charles X, Librairie Académique Perrin, Paris, 1988, p. 454 आयएसबीएन 2-2620-0545-1
  44. Le régime légal est interrompu; celui de la force a commencé... L'obéissance cesse d'être un devoir!
  45. Price, pp. 158, 161–163.
  46. Price, pp. 173–176.
  47. Castelot, Charles X, p. 482.
  48. Castelot, Charles X, p. 491.
  49. 1 2 3 Nagel, pp. 318–325.
  50. Nagel, pp. 327–328.
  51. Nagel, pp. 340–342.
  52. 1 2 Nagel, pp. 349–350.
  53. 1 2 Haus, Hélène (25 September 2016). "Et si les cendres du roi Charles X étaient transférées à la basilique Saint-Denis?" [Are the remains of Charles X to be transferred to Basilica of St Denis?]. Le Parisien (फ्रेंच भाषेत). 20 February 2017 रोजी पाहिले.
  54. 1 2 A. K. (28 September 2016). "Francozi želijo ostanke Karla X. in družine iz Slovenije: "Pripadajo naši domovini"" [The French wish the remains of Charles X and family to be brought from Slovenia: "They belong to our homeland"] (स्लोव्हेनियन भाषेत). RTV Slovenija. 20 February 2017 रोजी पाहिले.
  55. Al. Ma. (19 February 2017). "Francoski princ Burbonski želi, da njegovi predniki ostanejo pokopani na Kostanjevici" [A French prince of Bourbon wishes the remains of his ancestors to remain at Kostanjevica] (स्लोव्हेनियन भाषेत). RTV Slovenija. 20 February 2017 रोजी पाहिले.