Jump to content

फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स (हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द मोस्ट ऑनरेबल फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस
मागील लॉर्ड मिंटो
पुढील जॉन अॅडम

Monarch तिसरा जॉर्ज
चौथा जॉर्ज

Monarch चौथा जॉर्ज
मागील थॉमस मेटलँड
पुढील अलेक्झांडर जॉर्ज वूडफोर्ड

जन्म ९ डिसेंबर, १७५४ (1754-12-09)
काउंटी डाउन, आयर्लंड
मृत्यू २८ नोव्हेंबर, १८२६ (वय ७१)
नापोलीजवळ समुद्रात

फ्रांसिस एडवर्ड रॉडोन-हेस्टिंग्स, हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस तथा लॉर्ड रॉडोन किंवा द अर्ल ऑफ मोइरा (९ डिसेंबर, १७५४  २८ नोव्हेंबर, १८२६) एक आंग्ल-आयरिश राजकारणी आणि लष्करी अधिकारी होता. हा १८१३ ते १८२३ दरम्यान भारताचा गव्हर्नर-जनरल होता. याआधी त्याने अमेरिकन क्रांतिकारी युद्धादरम्यान आणि १७९४ मध्ये पहिल्या युतीच्या युद्धादरम्यान ब्रिटिश सैन्यात सेवा बजावली होती. आयर्लंडमध्ये, त्यांनी प्रातिनिधिक सरकार आणि राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठीची संयुक्त आयर्लंड चळवळ मोडून काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जबरदस्तीच्या धोरणावर टीका केली होती. १७९० मध्ये त्याने त्याचे मामा हंटिंगडनचे १० वे अर्ल फ्रान्सिस हेस्टिंग्ज इच्छेनुसार हेस्टिंग्स हे अतिरिक्त आडनाव लावायला सुरुवात केली.

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध

[संपादन]

बंकर हिलची लढाई

[संपादन]

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होताना रॉडॉन बोस्टन येथे ५ व्या रेजिमेंट ऑफ फूटच्या ग्रेनेडियर कंपनीत लेफ्टनंट म्हणून तैनात होता. त्याने प्रथम लेक्सिंग्टन आणि कॉनकॉर्डच्या लढाईत आणि बंकर हिलच्या लढाईत कारवाई केली. तेथे त्याने ग्रेनेडियर्ससोबत ब्रीड्स हिलवरील फसलेल्या दुसऱ्या हल्ल्यात आणि बालेकिल्ल्यावरील तिसऱ्या हल्ल्यात भाग घेतला होता. त्याचा वरिष्ठ अधिकारी कॅप्टन हॅरिस जखमी झाल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी हेस्टिंग्सने तिसऱ्या आणि शेवटच्या हल्ल्यासाठी कंपनीची कमान स्वीकारली. [] ब्रिटिश सैन्याची पिछेहाट होणार असे दिसल्यावर रॉडोन थेट बालेकिल्ल्यावर चालून गेला आणि तेथे त्याने युनियन जॅक फडकावला. जॉन बर्गोयन यांनी आपल्या बातमीपत्रात लिहिले की लॉर्ड रॉडोनने आजच्या दिवशी त्याच्या कीर्तीवर आयुष्यभराचे शिक्कामोर्तब करून घेतले आहे. या पराक्रमानंतर त्याला कॅप्टन पदी बढती मिळून ६३ व्या फूटमध्ये एक कंपनीची कमान त्याला देण्यात आली. []

कॅरोलिना आणि न्यू यॉर्कमधील मोहिमा, १७७५-७६

[संपादन]

रॉडोनला यानंतर जनरल सर हेन्री क्लिंटन यांचे सहाय्यक म्हणून केप फियर नदीवरील ब्रन्सविक टाउन, नॉर्थ कॅरोलिना येथे आणि नंतर दक्षिण कॅरोलिना येथील चार्ल्सटन शहराजवळच्या फोर्ट मूल्ट्री येथे मोहिमा केल्या. तो त्याच्यासोबत न्यू यॉर्कला परतला.[] लाँग आयलंडच्या लढाईदरम्यान तो क्लिंटन यांच्या मुख्यालयात होता. []

१५ सप्टेंबर रोजी रॉडोनने मॅनहॅटनमधील किप्स बे येथे होड्यांमधून आणि जमिनीवरून सैनिकांना घेउन हल्ला केला व तेथून तो पेल्स पॉइंटवरील चढाईमध्ये सहभागी झाला.[]

ऱ्होड आयलंड, इंग्लंड आणि न्यू यॉर्क

[संपादन]

८ डिसेंबर रोजी रॉडोन क्लिंटनसोबत ऱ्होड आयलंडवर उतरला आणि ब्रिटिश नौदलासाठी बंदरे सुरक्षित केली. १३ जानेवारी १७७७ रोजी, क्लिंटनसह, ते लंडनला निघाले आणि १ मार्च रोजी पोहोचले. लॉर्ड जॉर्ज जर्मेनच्या एका बॉल दरम्यान, तो लंडनला भेट देणाऱ्या लाफायेटशी भेटला. []

जुलैमध्ये रॉडोन अमेरिकेत परतला व थेट क्लिंटनसोबत न्यू यॉर्क मुख्यालयात गेला. त्याने न्यू यॉर्कच्या पठारावरील लढायांमध्ये भाग घेतला व ७ ऑक्टोबर रोजी वेस्ट पॉइंटजवळचा फोर्ट कॉन्स्टिट्यूशन हा किल्ला घेतला पण आल्बनी येथे जनरल बर्गोयनबरोबर मोर्चा साधायला त्याला उशीर झाला. []

३ सप्टेंबर १७७९ रोजी न्यू यॉर्कमध्ये त्यांचे क्लिंटनशी वाद झाल्यावर रॉडोनने अ‍ॅडज्युटंट जनरल पदाचा राजीनामा दिला. [] []

दक्षिणेतील मोहीम

[संपादन]

रॉडोन न्यू यॉर्कपासून चार्ल्सटनच्या वेढ्याकडे कुमक घेउन गेला. हे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी तेथे ठाण मांडून पूर्ण दक्षिण कॅरोलिना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड कॉर्नवॉलिसने रॉडोनला कॅम्डेन येथे १६ ऑगस्ट, १७८० रोजी तैनात केले. कॅम्डेनच्या लढाईत रॉडनने ब्रिटीश डाव्या फळीचे नेतृत्व केले. कॉर्नवॉलिसने व्हर्जिनियामध्ये परत जाताना रॉडोनला दक्षिणेतील सैन्याचा सरदार म्हणून नेमले..

जोशुआ रेनॉल्ड्स यांनी काढलेले लॉर्ड मोइराचे चित्र, १७९०

१७८१ मध्ये हॉबकर्क हिलच्या लढाईत मिळालेला विजय ही या युद्धातील रॉडोनची सर्वात उल्लेखनीय कामगिरी होती. यात रॉडोनने छोट्या शिबंदीसह उत्कृष्ट लष्करी डावपेच आणि दृढनिर्धाराने मोठ्या अमेरिकन फौजेला पराभूत केले. [१०] जनरल नॅथानियेल ग्रीनने आपला तोफखाना दुसरीकडे हलवला आहे असे समजून (चुकीने) रॉडोनने ग्रीनच्या डाव्या फळीवर हल्ला केला. येथे कडाडून हल्ला चढवून त्याने अमेरिकनांना विस्कळीत केले आणि तेथून अमेरिकनांची शक्ती कोलमडली. या अराजकतेत त्यांनी काढता पाय घेतला. [११]

ब्रिटिश जहागिर

[संपादन]

लॉर्ड हेस्टिंग्ज

[संपादन]

अमेरिकेहून इंग्लंडला परतल्यानंतर रॉडोनला राजा तिसऱ्या जॉर्जने १७८३ मध्ये, यॉर्क काउंटीमधील बॅरन रॉडोन म्हणून खिताब दिला. [१२] १७८७ मध्ये, तो प्रिन्स ऑफ वेल्सशी मैत्री करू लागला आणि त्याला हजारो पौंड कर्ज देऊ केले. १७८८ मध्ये तो रीजन्सी प्रकरणात अडकला.

१७८९ मध्ये रॉडोनच्या आईला हेस्टिंग्सचे बॅरनपद आपल्या भावाकडून वारसागत आले. आपल्या मामाच्या मृत्युपत्रातील इच्छेनुसार रॉडोनने हेस्टिंग्स हे आडनाव आपल्या नावात जोडले. [१०] १८०१ पासून फ्रांसिस रॉडोन लॉर्ड हेस्टिंग्स म्हणून युनायटेड किंग्डमच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये पदासीन झाला.

सप्टेंबर १८०३ मध्ये तो पूर्ण जनरलचे पद मिळाले व त्यासह तो स्कॉटलंडचा सर्वोच्च सेनापती झाला. यावेळी त्याने एडिनबराच्या दक्षिणेस असलेले विशाल डडिंगस्टन हाउस हा महाल भाड्याने घेतला.

१८०७मध्ये हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये प्रस्तावित गुलाम व्यापार कायदा (१८०७) वरील चर्चे दरम्यान हेस्टिंग्सने कायद्याला पाठिंबाल दिला आणि म्हणले की या सभागृहासमोर असलेले पुरावे या रक्ताच्या व्यापाराचा नायनाट करण्यासाठी पटवून देण्यासाठी पुरेसा आहे. आणि यातूनही तुम्हा सर्वांना पटले नाही तर मी तुमचे लक्ष बायबलच्या जुन्या कराराकडे वेधतो, ज्यात लिहिलेले आहे की लोकांशी असेच वागा जसे त्यांनी तुमच्याशी वागायला हवे आहे.[१३] ५ फेब्रुवारी १८०७ रोजी झालेल्या या चर्चेनंतर हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये हा कायदा मंजूर झाला व त्याने अटलांटिक गुलाम व्यापारातील ब्रिटिशांनी सहभाग बंद केला.

भारताचे गव्हर्नर-जनरल

[संपादन]
भारताचे गव्हर्नर-जनरल म्हणून मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्ज

प्रिन्स-रीजेंटच्या वशिल्याने ११ नोव्हेंबर, १८१२ रोजी हेस्टिंग्सची नेमणूक रोजी फोर्ट विल्यमच्या प्रेसीडेंसीचे गव्हर्नर-जनरल, म्हणजेच भारताचे गव्हर्नर-जनरल म्हणून झाली. [१४] गव्हर्नर-जनरल म्हणून हेस्टिंग्सची सद्दी उल्लेखनीय होती. त्यांनी गुरखा युद्धात नेपाळला धूळ चारून दक्षिण हिमालय ब्रिटिश भारतात विलीन केला तर तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात मराठ्यांवर संपूर्णपणे वर्चस्व मिळवले. याने भारताचा इतिहास पूर्णपणे बदलला. हेस्टिंग्सने १८१९ मध्ये युनायटेड किंग्डमसाठी सिंगापूर बेट खरेदी केले. [१५]

अँग्लो-नेपाळ युद्ध

[संपादन]

मे १८१३ मध्ये ब्रिटिशांनी नेपाळच्या गोरखांविरुद्ध युद्ध घोषित केले. हेस्टिंग्स ने जनरल बेनेट मार्ले यांच्या नेतृत्वाखाली काठमांडूवर ८,००० सैनिक, जनरल जॉन सलिव्हन वूड यांच्या नेतृत्वाखाली ४,००० सैनिक आणि जनरल सर डेव्हिड ऑक्टरलोनी यांच्या १०,००० सैनिकांसह अमरसिंग थापा विरुद्ध तसेच जनरल रॉबर्ट रोलो गिलेस्पी यांच्या ३,५०० सैनिकांसह नहान, श्रीनगर आणि गढवाल विरुद्ध हल्ला चढवला. यांपैकी फक्त ऑक्टरलोनीला काही यश मिळाले; गिलेस्पी मारला गेला. अनिर्णित वाटाघाटींनंतर हेस्टिंग्सने ऑक्टरलोनीला २०,००० सैनिकांची कुमक पाठवली. या सैन्याने २८ फेब्रुवारी रोजी मकवानपूरची लढाई जिंकली. त्यानंतर सुगौली करारानुसार गुरख्यांनी शरणागती पत्करली. [१६]

जानेवारी १८१७ मध्ये पेंढारींविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचे निमित्त काढून हेस्टिंग्सने पेशवा, होळकर, शिंदे आणि इतर मराठा सरदारांविरुद्ध युद्ध सुरू केले. यात हेस्टिंग्सने उत्तर भारतातील येथे सैन्याचे नेतृत्व केले तर दक्षिणेत जनरल सर थॉमस हिस्लॉपच्या नेतृत्वाखाली दख्खनचे सैन्य. पुण्यावर चालून गेले. तेथे माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनने पेशव्यांचा पराभव केला. नागपूरच्या लढाईत अप्पासाहेब भोसल्यांचा पराभव झाला. महिदपूरच्या लढाईत हिस्लॉपने होळकरचा पराभव केला. यानंतर भारतात ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व पुढील १५० वर्षांसाठी अबाधित राहिले. [१७]

हेस्टिंग्ज गार्डन्स, व्हॅलेटा येथील लॉर्ड हेस्टिंग्जची कबर

मृत्यू

[संपादन]

१८२४ मध्ये हेस्टिंग्सला माल्टाचे गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी एचएमएस रिव्हेंज जहाजाने परत इंग्लंडकडे जात असताना इटलीच्या नापोली शहराजवळ बोटीवरच त्याचा मृत्यू झाला. हेस्टिंग्सचे पार्थिव माल्टाची राजधानी व्हॅलेटा शहरातील हेस्टिंग्स गार्डन्स येथे एका मोठ्या संगमरवरी कबरीत पुरण्यात आले.

हेस्टिंग्सने वयाच्या ५०व्या वर्षी, १२ जुलै, १८०४ रोजी, फ्लोरा कॅम्पबेलशी लग्न केले. त्यांना सहा मुले झाली.

संदर्भ

[संपादन]
  1. (Paul David Nelson 2005)
  2. Nelson, Paul David (2005). Francis Rawdon-Hastings, Marquess of Hastings: Soldier, Peer of the Realm, Governor-General of India (इंग्रजी भाषेत). Fairleigh Dickinson Univ Press. ISBN 9780838640715.
  3. (Paul David Nelson 2005)
  4. (Paul David Nelson 2005)
  5. (Paul David Nelson 2005, p. 47)
  6. (Paul David Nelson 2005, p. 55)
  7. (Paul David Nelson 2005, p. 56)
  8. (Paul David Nelson 2005)
  9. (Paul David Nelson 2005)
  10. 1 2 Chisholm 1911, पान. 54.
  11. (Paul David Nelson 2005)
  12. "क्र. 12419". द लंडन गॅझेट. 1 March 1783. p. 1.
  13. "Slave Trade Abolition Bill. (Hansard, 5 February 1807)".
  14. (Paul David Nelson 2005, p. 148)
  15. "Francis Rawdon- Hastings, 1st Marquess of Hastings | eHISTORY". ehistory.osu.edu (इंग्रजी भाषेत). 2017-11-15 रोजी पाहिले.
  16. (Paul David Nelson 2005)
  17. Chisholm 1911, पान. 55.