Jump to content

प्रेमाची ताकद (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुन्हेगारांना प्रेमाने हाताळल्यास त्यांच्यातील चांगुलपणाचा परिपोष होऊ शकतो हे सूचित करणारी ही कथा आहे.

कथेचा आशय

[संपादन]

ही कथा इटलीमधील गुब्बियो शहरातील आहे. या शहराच्या जवळच्या जंगलात सध्या एका मोठ्या लांडग्याने धुमाकूळ घातला होता. आल्यागेलेल्या माणसांवर तो हल्ला करत असे. त्यामुळे गावात त्याची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे लोक रस्त्यांवरूनही जाण्याचे धाडस करत नव्हते. हळूहळू सगळे व्यवहार ठप्प होऊ लागले. शेवटचा उपाय म्हणून घाबरलेली माणसे सेंट फ्रान्सिसकडे गेली.  

अखेरीस, सेंट फ्रान्सिसने त्या भयानक प्राण्याचा सामना करण्याचा निर्णय घेतला. तो शहराबाहेर गेला, त्याच्या मागे अनेक पुरुष आणि स्त्रिया दूरवर चालत गेल्या. जसा फ्रान्सिस जंगलाजवळ आला, तशी त्या लांडग्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. आणि अतिशय रागाने तो फ्रान्सिसकडे पाहू लागला. पण फ्रान्सिस अजिबात विचलित झाला नाही. त्याने शांतपणे एक इशारा केला आणि तो लांडगा त्याच्या पायाजवळ एखाद्या कोकरासारखा शांतपणे पडला.

"बंधू लांडग्या," सेंट फ्रान्सिसने त्याला सांगितले, "तू आजवर येथे खूप नुकसान केले आहेस. वास्तविक एखाद्या खुनी इसमाला जी शिक्षा मिळते ती तुला दिली जाईल. सर्व लोक तुझा तिरस्कार करतात. पण मी तुझ्यात आणि माझ्या गुब्बियोच्या मित्रांमध्ये शांतता प्रस्थापित करू इच्छितो.''

एका माणूस आपल्याला बंधू  असे संबोधतो आहे आणि आपल्याला न घाबरता आपल्याशी काही बोलू पाहत आहे, यामुळे तो लांडगा आश्चर्यचकित झाला होता. सेंट फ्रान्सिसचे बोलणे ऐकून लांडग्याने मान झुकवली आणि शेपूट हलवले.

"बंधू," फ्रान्सिस पुढे म्हणाला, "मी तुला वचन देतो की जर तू या लोकांबरोबर शांतता-करार पाळलास तर ते तुझ्याशी दयाळूपणे वागतील आणि तुला दररोज अन्न देतील. तेव्हा, आता यापुढे या लोकांचे, त्याच्या पिकांचे आणखी नुकसान न करण्याचे वचन मला देतोस का?''

मग लांडग्याने त्याचे डोके खूप खाली झुकवले आणि त्याचा उजवा पंजा सेंटच्या हातात ठेवला. अशा प्रकारे त्यांनी एकमेकांशी करार केला. मग फ्रान्सिसने लांडग्याला गुब्बियोच्या बाजारात नेले आणि त्याने नुकतेच लांडग्याला जे सांगितले ते जमलेल्या नागरिकांसमोर पुन्हा सांगितले आणि लांडग्याने त्याच्या चांगल्या वर्तणुकीची हमी म्हणून पुन्हा एकदा सेंटच्या हातात आपला पंजा ठेवला.

पुढे तो लांडगा त्या शहरात दोन वर्षे राहिला आणि त्याने कोणालाही इजा केली नाही. दररोज शहरातील लोक त्याला त्याचे अन्न आणून देत असत. लोकांच्या मनातील त्याच्याविषयीची भीती कमी झाली. जेव्हा तो मरण पावला तेव्हा ते सर्व लोक त्याच्यासाठी शोक करू लागले. इतके परिवर्तन त्या क्रूर लांडग्यामध्ये झाले होते.

तात्पर्य

[संपादन]

या कथेमध्ये लांडगा हा लोकांनी खूप तिरस्कार केलेल्या काही मोठ्या गुन्हेगाराचे प्रतिनिधित्व करतो. जे लोक वाया गेलेले आहेत असे समाज मानत असतो, त्यांच्यातही चांगलेपणाचे काही बीज अजूनही शिल्लक असते, जे थोड्याशा प्रेमाने जागृत होऊ शकते. [१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.