प्रसंगावधानी गुलाम (लोककथा)
योग्य वेळी योग्य ती गोष्ट केली तर मोठ्या संकटातून कशी सुटका होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे ही लोककथा आहे.
कथेचा आशय
[संपादन]फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. गोष्ट आहे अरेबिया प्रांतातील हुसेनची. तो अतिशय सधन होता. मोठ्या अलिशान महालामध्ये तो राहत असे. त्याच्या दिमतीला अनेक नोकर-चाकर, अनेक गुलाम होते. मोठ्या ऐशारामात राहणाऱ्या हुसेनला कशाचीच ददात नव्हती. श्रीमंतीमुळे तो काहीसा उद्दाम झाला होता, पण तरीही त्याच्यामध्ये अजूनही काही चांगुलपणा शिल्लक होता.
एके दिवशी हुसेन जेवत असताना एक गोष्ट घडली. एक गुलाम उकळत्या गरम पाण्याचे भांडे घेऊन हुसेनच्या शेजारून जात होता. दुर्दैवाने थोडेसे पाणी हुसेनच्या अंगावर पडले. तो जोरजोराने ओरडू लागला. तो प्रचंड संतापला होता. त्या रागाच्या भरात तो त्या गुलामाला वाट्टेल तसे बोलू लागला. आजूबाजूचे गुलाम भयभीत होऊन, आता काय होणार म्हणून पाहू लागले.
एवढ्यात कशी कोण जाणे पण त्या गुलामाला बुद्धी झाली. गुडघे टेकून, कुराणमधील वचने तो म्हणू लागला. तो म्हणाला, "जे आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात त्यांना स्वर्गप्राप्ती होते." हुसेन एकदम भानावर आला. आणि म्हणाला, "मी रागावलो नाही." पुढे तो गुलाम म्हणू लागला, "...आणि जे क्षमा करतात त्यांच्यासाठी देखील स्वर्गाची द्वारे खुली होतात; कारण अल्ला दयाळू लोकांवर प्रेम करतो."
त्याचे ते बोलणे ऐकून हुसेनचा सर्व राग नाहीसा झाला होता. आता पूर्णपणे शांत होऊन त्याने गुलामाला उठवले आणि हुसेन म्हणाला, "मी तुला माफ केले आहे. आजपासून मी तुला मुक्त केले आहे. हे पहा, चांदीची ही चारशे नाणी घे. आणि आजपासून तुझ्या नवीन जीवनाला सुरुवात कर. जा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.''
तात्पर्य
[संपादन]अंतरंगात थोडेसे जरी चांगुलपण शिल्लक असेल तर त्या व्यक्तीला योग्य मार्गावर आणणे तुलनेने सोपे असते, हेच या कथेमधून लक्षात येते. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.