Jump to content

प्रत्यक्षार्थवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रत्यक्षार्थवाद (पॉझिटिव्हिझम). ह्या तात्त्विक विचारप्रणालीची[] स्पष्ट मांडणी प्रथम ऑग्यूस्त काँत (१७९८-१८५७) या फ्रेंच विचारवंताने केली. ह्या विचारप्रणालीचा गाभा थोडक्यात असा मांडता येईल : इंद्रियांनुभवाने, निरीक्षणाने वस्तू आणि त्यांचे गुणधर्म, त्यांना घडणाऱ्या घटना ह्यांच्याशी आपला परिचय होतो व ह्या वस्तुस्थितींचे आणि घटनांचे स्पष्टीकरण वैज्ञानिक पद्धतीला अनुसरून आपण करतो. प्रत्यक्षार्थवादाचा मूलभूत सिद्धांत असा, की निरीक्षणावर आधारलेले आणि ज्याचे प्रामाण्य निरीक्षणाच्या निकषावर पारखले जाते असे जे वैज्ञानिक ज्ञान आहे तेच समग्र, प्रमाण ज्ञान होय, ह्याच्या पलीकडचे असे प्रमाण ज्ञान नसते. गणित आणि तर्कशास्त्र इंद्रियानुभवावर आधारलेली नसतात आणि ती ज्ञानात मोडतात, हे खरे आहे. पण ही शास्त्रे केवळ ‘आकारिक’ असतात ती केवळ संकल्पनांमधील संबंधांवर आधारलेली असतात ती वस्तूंविषयीची शास्त्रे नसतात आणि त्यांच्यात वस्तुस्थितीचे ज्ञान सामावलेले नसते. तेव्हा गणित आणि तर्कशास्त्र ही आकारिक शास्त्रे आणि इंद्रियानुभव व वैज्ञानिक पद्धती यांच्यावर आधारलेली विज्ञाने एवढीच ज्ञानाची व्याप्ती आहे, असे प्रत्यक्षार्थवाद मानतो आणि म्हणून ईश्वर, आत्मा इ. अतींद्रिय मानलेल्या वस्तूंशी संबंधित असलेला धर्म तसेच केवळ विवेकशक्तीच्या साह्याने इंद्रियानुभवापलीकडे असणाऱ्या अस्तित्त्वाचे ज्ञान मिळवू पाहणारी तत्त्वमीमांसा (मेटॅफिजिक्स) यांचे प्रामाण्य प्रत्यक्षार्थवाद नाकारतो. प्रत्यक्षार्थवादाच्या दृष्टीने अतींद्रिय अस्तित्त्वाचे ज्ञान मिळविणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य नव्हे. असे अस्तित्त्व नसते आणि म्हणून त्याचे ज्ञान मिळविण्याचा प्रश्नही उपस्थित होत नाही. तत्त्वज्ञानाचे कार्य म्हणजे आकारिक शास्त्रांची आणि विज्ञानांची सुसंगत व्यवस्था लावणे आणि ह्या ज्ञानापासून प्राप्त होणाऱ्या तत्त्वांच्या आधाराने मानवी जीवनाचे आणि समाजाचे नियमन करणे हे असते. नीतिशास्त्रात प्रत्यक्षार्थवाद हे सामान्यपणे सुखवादी होते. अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक सुख साधणारी कृत्ये नीतिमान असतात, असा त्यांचा नीतीचा निकष होता.

जरी आग्यूस्त काँत यांनी प्रत्यक्षार्थवादाची, ‘पॉझिटिव्हिझम’ हे नाव वापरून, प्रथम मांडणी केली, तरी डेव्हिड ह्यूम (१७११-७६) ह्या तत्त्ववेत्त्याच्या भूमिकेत ह्या मताचे सार आलेले आहे. प्रोटॅगोरस (इ. स. पू. सु. ४८०-४१०) हा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता, सेक्स्टस एंपिरिकस (इ. स. सु. २००) हा संशयवादी ग्रीक तत्त्ववेत्ता, प्येर बेल (१६४७-१७०६) हा आधुनिक संशयवादी व दीद्रोसारखे फ्रेंच ज्ञानोदयाचे तत्त्ववेत्ते अशी प्रत्यक्षार्थवादाची पूर्वपरंपरा सांगता येईल. काँत यांच्या प्रत्यक्षार्थवादाचा प्रभाव जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६-७३) आणि हर्बर्ट स्पेन्सर (१८२०-१९०३) ह्या इंग्रज विचारवंतांवर पडला. मिल यांनी मानवी ज्ञानाची आणि नीतीची उभारणी अनुभववादी तत्त्वांवर करण्याचा प्रयत्‍न केला, तर स्पेन्सर ह्यांनी ज्ञानाला व नीतीला उत्क्रांतीवादाची बैठक दिली. एर्न्स्ट माख (१८३८-१९१६) आणि रिखार्ट आव्हेनारिउस (१८४३-९६) हे प्रमुख जर्मन प्रत्यक्षार्थवादी होत. वैज्ञानिक संकल्पना व उपपत्ती आणि आपली निरीक्षणे ह्यांचा संबंध स्पष्ट करण्याचा ह्या विचारवंतांचा प्रयत्‍न होता. प्रत्यक्षार्थवादाचे सर्वांत आधुनिक रूप म्हणजे तार्किक प्रत्यक्षार्थवाद होय. ‘व्हिएन्ना वर्तुळ’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांच्या गटावर माख यांचा विशेष प्रभाव होता.

संदर्भ

[संपादन]

J. Logical Positivism, Glencoe. III., 1959.</ref>

  1. ^ Ithaca,, N. Y., (1963). Simon, W. M. European Positivism in the Nineteenth Century,.CS1 maint: extra punctuation (link)