Jump to content

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पैदिमरी व्यंकट सुब्बाराव
जन्म नाव पैदिमरी व्यंकट सुब्बाराव
जन्म १० जून १९१६
मृत्यू १३ ऑगस्ट १९८८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा तेलुगू
प्रसिद्ध साहित्यकृती [भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञा

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव (तेलुगू लेखन : పైడిమర్రి వెంకటసుబ్బారావు ) (जन्म १० जून १९१६ - मृत्यू १३ ऑगस्ट १९८८) हे एक तेलुगू साहित्यिक होते. भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा त्यांनी लिहिली आहे.

अल्पचरित्र

[संपादन]

पैदिमरी व्यंकट सुब्बाराव हे आंध्रप्रदेशातील नालगोंडा ह्या जिल्ह्यातील अन्नेपर्थी ह्या गावचे रहिवासी होते. त्यांनी संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरबी ह्या भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते निसर्गोपचार-तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. विशाखापट्टणम् जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी ते अनेक वर्षे म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांनी लिहिलेली ‘कालाभरवाहू’ नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली होती[].

भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा

[संपादन]

आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणण्यासाठी म्हणून पैदिमरी व्यंकट सुब्बाराव ह्यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडल्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू ह्यांना ही प्रतिज्ञा दाखविली. त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला[].

भारतीय केंद्रशासनाच्या शिक्षणविभागाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या भारतीय शिक्षण-विकास (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया) ह्या समितीची ३१वी सभा तिचे पदसिद्ध अध्यक्ष तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ रोजी बंगळुरू येथे झाली होती. त्यात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा, महाविद्यालये ह्यांमध्ये तसेच राष्ट्रीय दिनांच्या दिवशी विद्यार्थ्यांना म्हणण्यासाठी एक प्रतिज्ञा असावी. त्यावेळी पैदिमरी व्यंकट सुब्बाराव ह्यांनी लिहिलेली प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व पुढे असेही सूचित करण्यात आले की, ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी. ह्या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. ह्य प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकांतील प्रतिज्ञेचा दर्जा न देता, तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला[].


संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • लांजेवार, नरेंद्र (२०१३). "राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?". महाराष्ट्र टाइम्स (२४ मार्च २०१३).[permanent dead link]