पेशव्यांचे मराठी सैन्यदल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.


मराठी सेनादल[संपादन]

मराठा सैनिक

मराठी सेनादल हे अनेक धर्मांच्या आणि अनेक देशांच्या सेनांचे मिळून बनलेले असे. त्यामुळे त्याच्यात एकसंधीपणाच नाही असे कोणाला वाटल्यास नवल नाही. त्यांना एक ठरावीक असा गणवेश दिलेला नसतो आणि त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून त्यांच्यात फारशी शिस्त नसावी असेच बघणाऱ्याला वाटते. चिलखतधारी सैनिक खूपच वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. त्यांच्या डोक्यावरचा जिरेटोप कानावरून असतो व जवळ जवळ खांद्यापर्यंत येतो. अंगरखा कापसाच्या जाड रजईसारखा बनवलेला असतो व याच्यावर लोखंडी साखळ्यांची जाळी बसवलेली असते.

सेनादलातील तुकड्या[संपादन]

हिंदुस्तानातील ज्या जातिजमातींचे लोक लढवय्ये म्हणून ओळखले जातात, असे सर्व हिंदू व मुसलमान लोक, सैन्यात पराक्रम गाजविण्यासाठी मोठे उत्सुक असतात. पेशवे स्वतः ब्राम्हण असले तरी त्यांनी सैनिकी पेशा पूर्णपणे अंगिकारलेला आहे. त्यांचेच अनुकरण करून अनेक ब्राम्हण कुटुंबांनी अगदी साध्या सैनिकाच्या हुद्यापासून हा पेशा स्वीकारलेला दिसतो. सैनिक किंवा सरदार यांना समाजात जो मान मिळतो तो राजकारण किंवा इतर कोणत्याही पेशातल्या व्यक्तीला मिळत नाही.

देशातील सर्वसाधारण हिंदू किंवा मुसलमान सैनिकापेक्षा उत्तरेकडून आलेले व्यावसायिक सैनिक जास्त कडवे वाटतात. या उत्तरेकडून आलेल्या सैनिकात, समरकंदकडून आलेले मुघल, इराणच्या व कंदहारच्या बाजूने आलेले पठाण व कास्पियन समुद्राजवळचे तुर्की या सर्वांचा समावेश होतो. यातले खूपसे सैनिक स्वतःचे हत्यार व घोडा घेऊन सैन्यात येतात. व युद्ध करण्याशिवाय त्यांना इतर काही रस नसतो. यातले काही पायी चालणारे सैनिक स्वतःची बंदुक घेऊनही येतात यांना नजीब म्हणून ओळखले जाते. या सैनिकांनी युरोपियन सैन्यांची शिस्त अंगिकारली असल्याने त्यांना सैन्यात लगेच नोकरी मिळू शकते.

या शिवाय पेशव्यांच्या सैन्यात, रजपूत सैनिकांच्या स्वतःचा ध्वज असलेल्या तुकड्या असतात. रजपूत लढवय्यांच्यात, इतर सैनिकात अभावानेच दिसणारे, शौर्य, उदारपणा व खाल्या मिठाला जागण्याची वृत्ती हे गुण भरपूर असल्याने ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत. हे सैनिक अजमेरच्या आजूबाजूच्या प्रदेशातून येतात व स्वातंत्र्याची महति यांच्याइतके दुसरे कोणीही जाणत नसतील. पूर्वेकडून आलेले पुरभय्ये सैनिकांच्याही स्वत;च्या तुकड्या असतात. हे सर्व व्यावसायिक सैनिक असल्याने यांच्यात नियमितपणा आणि त्यांना नोकरी देणाऱ्या पेशव्यांच्याबद्दल संपूर्ण निष्ठा हे गुण आढळतात.

या लढवय्या सैनिकांखेरीज, मराठा सैन्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पेंढारी आणि बाजारबुणगे. या लोकांच्या हातात ठरावीक हत्यार असे नसते. एकदा मुख्य सैन्याने एखादा प्रदेश काबीज केला की त्या प्रदेशात लूटमार करणे हे या लोकांचे काम असते. घराच्या कड्या, कुलपे, बिजागऱ्यांपासून ते साठवून ठेवलेले धान्य यापर्यंत सर्व गोष्टींची हे लुट करतात. त्यांना पगार मिळत नाही पण मिळालेल्या लूटीत वाटा मिळतो.

सैन्य व अधिकारी वर्गाच्या सामानाची हलवाहलव करण्यासाठी उंटदलाचा वापर केला जातो. या साठी सैन्याच्या छावणीत एक उंटदल तयार असते.

रघुनाथराव पेशवे

घोडदल[संपादन]

मराठ्यांच्या सैन्यातले घोडदल तीन वर्गांत विभागलेले असते. पहिल्या वर्गातले घोडेस्वार सैनिक, हुजुरत किंवा खाशीपागा या नावाने ओळखले जातात. हे घोडदल पेशव्यांचे स्वतःचे असते व त्यातील सैनिक अत्यंत वरिष्ठ दर्जाचे लढवय्ये असतात. दुसऱ्या वर्गातील घोडदल हे जहागिरदारांचे व मनसबदारांचे असते तर तिसऱ्या वर्गाच्या घोडदलात मुसलमान, पुरभय्ये वगैरे व्यावसायिक लढवय्ये मोडतात. घोड्यांची निगा राखणारे साईस या दलात दिसत नाहीत व सैनिकच स्वतः घोड्यांची निगा राखतात. जेंव्हा घोड्यांना खाण्यासाठी गवत किंवा इतर गोष्टी मिळू शकत नाहीत तेंव्हा हे सैनिक गवताची जमिनीत असलेली मुळे खणून काढतात व स्वच्छ धुवून घोड्यांना खायला देतात. मराठी सैनिक घोडे आणि रत्नसंपत्ती यांनाच सर्वात जास्त मान देताना दिसतात. अतिशय उमदे असे अरबी घोडे जरी पागेत असले तरी मराठा सैनिक त्यांच्या भीमथडी तट्टांनाच युद्धासाठी प्राधान्य देतात.

अधिकार साखळी व अधिकारी वर्ग[संपादन]

मराठी सैन्यात कुशलता किंवा ज्येष्ठता यावर आधारित अशी अधिकार साखळी नसते. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मनसबदार म्हणतात. या अधिकारी किंवा सरदारांचे एका ठरावीक संख्येच्या घोडेस्वार सैनिकांवर अधिपत्य असते.(उदा. पाच हजार, पाचशे). युरोपमधल्या जुन्या सरंजामशाही मधल्या सरदारांसारखी ही प्रथा आहे. या सरदारांना त्यांची वतने किंवा जहागिरी असतात, व या जहागिरीत ते स्वतंत्र्यरित्या कारभार चालवतात. जेंव्हा कधीही त्यांना पेशव्यांचा हुकुम होतो तेंव्हा आपल्या हाताखालचे इतर दुसरे सरदार व सैनिक घेऊन या जहागिरदारांना, पेशव्यांच्या सैन्यामधे सामिल व्हावे लागते. या व्यवस्थेमुळे युरोपियन सैन्यात जी अधिकार साखळी व शिस्त दिसते त्याचा काहीसा अभाव मराठी सैन्यात दिसतो. त्यामुळे कधी पहिली गोळी झाडायची किंवा कधी ताशे बडवायचे याची शिस्त लावणे हे सेनापतीसाठी मोठे कठिण काम बनते.

सेनादलातील तुकड्यांना स्वतःचे ध्वज असतात. पेशव्यांचा ध्वज हा त्रिकोणी आकाराचा व जांभळ्या रंगाचा असतो व त्यावर सोनेरी जरीचे काम केलेले असते. बहुतेक ध्वज लाल रंगाचे असतात. काही तुकड्या ते उंच उभारतात तर काही मध्यम उंचीवर असतात. अतिशय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घोड्यांचे खोगिर व डोके यावर तिबेटहून आणलेले तिबेटी गाईंच्या केसांची झालर लावलेली असते. या सरदारांच्या एका बाजूला असलेल्या एका सेवकाने त्यांच्या डोक्यावर जरीचे काम केलेली मखमली छत्री धरलेली असते तर दुसऱ्या बाजूचा सेवक चवरी ढाळत असतो. सेनापती त्यांना मिळालेल्या एखाद्या मानसन्मानाच्या बिरुदाने ओळखले जातात.

पेशवे आणि इतर अतिशय वरिष्ठ अधिकारी युद्धाच्या आणि इतरही वेळी हत्तींचा वापर करतात. या साठी एक हत्तीदल तयार ठेवले जाते.

सवाई माधवराव पेशवे व मंत्री

निर्णय घेण्याची पद्धत[संपादन]

युद्धक्षेत्रावर असले तरी पेशव्यांची राज्यकारभार चालविण्याची पद्धत पुण्यातून चालणाऱ्या कारभारपद्धतीसारखीच असते. रोज संध्याकाळी सर्व महत्त्वाचे अधिकारी आणि मंत्री पेशव्यांच्या दरबारात जमतात. राजकारण, युद्धाची हालहवाल, व इतर महत्त्वाच्या बाबतींवर चर्चा होते व पुढच्या दिवसासाठी फर्माने सोडली जातात. तक्रारी ऐकल्या जातात, अन्याय दूर केले जातात व न्यायही दिला जातो.

मराठ्यांच्या सैन्याची मला नवीन समजलेली एक व्युहरचना म्हणजे जेंव्हा शत्रुचे एखादे गांव काबीज करावयाचे असते त्या वेळी त्या गावाभोवती दिलेला वेढा. या व्युहामधे वेळ खूप लागत असला तरी एकदाही बंदुक न झाडता तुम्ही विजय मिळवू शकता.


शस्त्रे व हत्यारे[संपादन]

एका तुकडीतल्या सर्वांच्याकडे सारखीच हत्यारे कधीच नसतात. काही सैनिकांकडे ढाल तलवार असते. ठासून भरण्याच्या दारूच्या बंदुका(Musket) काही जणांकडे असतात. या शिवाय धनुष्य-बाण, भालाधारक सैनिकही दिसतात. काही जण अग्निबाण उडवण्यातले तज्ञ असतात. काही जणांजवळ परशु (Battle Axe) असतो. परंतु सर्व सैनिकांजवळ तलवार (Sabre) ही असतेच. तलवारी नेहमी धारदार व उत्तम रित्या परजलेल्या असतात. तुर्की किंवा इराणी सैनिक बहुतांशी वक्री(Curved Blade) तलवार वापरतात. घोडेस्वार मराठा सैनिकांना दुहेरी धारेची, सरळ तलवार पसंत असते. या तलवारीला ते ‘अल्मन’ (German) म्हणतात व दमास्कसवरून येणाऱ्या या तलवारींसाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतात. त्यांची ही तलवार चालविण्याची कुशलता अतिशय उत्तम असते.

अतिशय त्रासदायक वाटणारे मराठ्यांचे अग्निबाण म्हणजे 2 इंच व्यासाची व 8 ते 10 इंच लांबीची एक लोखंडी नळी असते. ही नळी एखाद्या भाल्याला बांधली जाते. नंतर या नळीत दारु भरून ती वातीच्या साहाय्याने पेटविली जाते. हा अग्नीबाण जर योग्य दिशा देऊन सोडला तर शत्रूपक्षात मोठा गोंधळ आणि घबराट उडवून देतो. मात्र मराठ्यांना उखळी तोफेचे ज्ञान नसावे असे वाटते.

निरिक्षणकार[संपादन]

जेम्स फोर्ब्सजेम्स मॅकिनटॉश या दोन तरुण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पेशव्यांच्या मराठी सैन्यदलावर संशोधन केले. जेम्स फोर्ब्स ची मराठी सैन्याबद्दलची वरील निरिक्षणे बघितले की दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. हिंदुस्थानावर कबजा करायचा असला तर एक ना एक दिवस, शेवटचे युद्ध आपल्याला मराठ्यांच्याच सैन्याशी करावे लागणार आहे, हे इंग्रज सेनानी पूर्णपणे जाणून होते. त्यामुळे शत्रूची बलस्थाने कोणती? त्याचे नाजुक अंग कोणते? याची संपूर्ण माहिती इंग्रज जमा करत होते. त्यासाठीच जेम्स फोर्ब्ससारखा कुशाग्र निरिक्षण करणारा त्यांनी 17 वर्षे फक्त निरिक्षण करणे आणि चित्रे काढणे यासाठी नोकरीवर ठेवला होता. याच्या उलट इंग्रज सेनेची अधिकार साखळी, शिस्त हे सगळे डोळ्यासमोर दिसत असून व त्याचे परिणाम सतत भोगायला लागत असून (पराभवांच्या रूपाने) पेशव्यांसकट सर्व मराठी सेनान्यांनी आपल्या सैन्यात व युद्धनीतीत काहीही बदल किंवा सुधारणा केली नाही. कदाचित अखेरीस झालेल्या त्यांच्या दुर्दैवी पराभवाचे एक कारण हा निष्काळजीपणाही असू शकेल.