पूर्व प्रमाण वेळ विभाग
पूर्व प्रमाण वेळ विभाग किंवा ईस्टर्न टाईम झोन (ET)[१] हा एक आंतरराष्ट्रीय कालविभाग आहे ज्यामध्ये पूर्व अमेरिकेची संयुक्त संस्थानांमधील २३ राज्यांचा काही भाग किंवा संपूर्ण भाग, पूर्व कॅनडाचे काही भाग, काही कॅरिबियन बेटे आणि मेक्सिकोमधील किंताना रो राज्य समाविष्ट आहे. या कालविभागामधील बहुतेक भागांमध्ये उन्हाळी प्रमाणवेळ पाळली जाते आणि त्यामुळे खालीलप्रमाणे आलटून पालटून पाळला जातो:
- पूर्व प्रमाण वेळ किंवा ईस्टर्न स्टँडर्ड टाईम (EST), जी जागतिक समन्वित वेळे पेक्षा पाच तास मागे (यूटीसी−०५:००) असते आणि शरद ऋतूच्या उत्तरार्धात व हिवाळ्यात पाळली जाते, आणि
- पूर्ण उन्हाळी प्रमाणवेळ किंवा ईस्टर्न डेलाइट टाईम (EDT), जी जागतिक समन्वित वेळेपेक्षा चार तास मागे (यूटीसी−०४:००) असते आणि वसंत ऋतू, उन्हाळा आणि शरद ऋतूच्या सुरुवातीला पाळली जाते.
पूर्व प्रमाण वेळ विभागामधील ज्या भागांमध्ये उन्हाळी प्रमाणवेळ (daylight saving time) पाळली जात नाही, तिथे पूर्व प्रमाण वेळ (ईस्टर्न स्टँडर्ड टाईम - EST) वापरली जाते; हा वेळ ग्रीनविचच्या पश्चिमेकडील ७५ व्या रेखांशावर आधारित आहे. उन्हाळी प्रमाणवेळेची अंमलबजावणी मार्च महिन्यातील दुसऱ्या रविवारी सुरू होते; त्यावेळी पहाटे २:०० वाजता (EST) घड्याळाची वेळ पुढे करून पहाटे ३:०० (EDT) केली जाते, ज्यामुळे तो दिवस २३ तासांचा होतो. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या रविवारी, पहाटे २:०० वाजता (EDT) घड्याळाची वेळ मागे करून पहाटे १:०० (EST) केली जाते, परिणामी तो दिवस २५ तासांचा होतो.
या क्षेत्रातील वेळ ही रॉयल ऑब्झर्व्हेटरी, ग्रीनविचच्या पश्चिमेकडील ७५ व्या रेखावृत्ताच्या सरासरी सौर वेळेवर आधारित आहे.
संदर्भयादी
[संपादन]- ↑ "Time Zone Abbreviations - Worldwide List". timeanddate.com. 2025-07-29 रोजी पाहिले.