पांढर्‍या पुठ्ठ्याचे गिधाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड
बंगाली गिधाड

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: ॲक्सिपिट्रिफॉर्मेस
कुळ: ॲक्सिपिट्रिडे
जातकुळी: जिप्स
जीव: जि. बेंगॉलेन्सिस
शास्त्रीय नाव
जिप्स बेंगॉलेन्सिस
(ग्मेलिन, १७८८)

पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड किंवा बंगाली गिधाड हा दक्षिण आणि आग्नेय आशियातील एक मृतभक्षक शिकारी पक्षी आहे. इ.स. १९९०पासून यांची संख्या झपाट्याने कमी झाली, तकी की, १९९२ ते २००७ या काळात यांची संख्या ९९.९ टक्क्यांनी कमी झाली.[२] त्यामुळे या पक्षाला आय.यू.सी.एन.च्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजातीचा दर्जा दिला गेला. १९८० च्या दशकात यांची संख्या काही कोटींमध्ये होती. याला "जगातील सर्वात मुबलक मोठा शिकारी पक्षी" मानले जात असे.[३] २०१६मध्ये यांची संख्या १०,००० पेक्षा कमी वर्तवण्यात आली आहे.[१]

ओळखण[संपादन]

प्रौढ गिधाडाच्या पंखाचे खालून काढलेले रेखाचित्र

हे देखील इतर गिधाडांप्रमाणे मध्यम आकाराचे गिधाड आहे. त्याचे पंख अतिशय रुंद आणि शेपटी लहान असते. त्याची लांबी ७५–९३ सेंमी, पंखांची लांबी १.९२–२.६ मी आणि वजन ३.५–७.५ किग्रॅ असते. प्रौढ गिधाडांची पांढरी पाठ, त्यांचे बूड आणि बाहेरील पिसांच्या आतील पिसे त्याच्या बाकीच्या गडद रंगाच्या शरीराहून वेगळे असतात, जे स्पष्ट दिसतात. शरीर मळकट काळसर तपकिरी आणि अंतर्बाह्य पिसे चंदेरी करडी असतात. डोके व मान भुरकट काळी; त्यांवर पिसे नसतात; मानेच्या बुडाशी पांढऱ्या पिसांचा झुपका, डोळे तपकिरी; चोच चंदेरी रंगाची, टोकाला काळी असते. अल्पवयीन गिधाड काळपट तपकिरी रंगाचे असते आणि प्रौढ होण्यासाठी त्याला ४ ते ५ वर्षांचा काळ लागतो. उडताना प्रौढ पक्ष्यांच्या पंखांचा मागचा भाग काळ्या रंगाचा दिसतो तर खालून पुढचा भाग पांढरा दिसतो.[४]

हे उत्तर व मध्य भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि आग्नेय आशियामध्ये उंच झाडांवर, अनेकदा मानवी वस्ती जवळ घरटे बनवतात आणि मादी एका वेळी फक्त एक अंड घालते. विणीच्या काळात ते बहुधा एका ठिकाणी वस्ती करून राहतात, स्थलांतर करत नाहीत.

व्यवहार आणि पर्यावरण[संपादन]

जेव्हा सकाळच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे तापलेली गरम हवा वर उठू लागते, तेव्हा बंगाली गिधाडे सक्रिय होतात, कारण गरम हवेच्या झोतांमध्ये उंच उड्डाण घेणे त्यांना सोपे जाते. ते एके काळी कलकत्त्यावर मोठ्या संख्येने दिसत असत.[५]

हे गिधाडदेखील मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर उदरनिर्वाह करणारे आहे. याची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे आकाशात उंचावर घिरट्या घालीत असताना जमिनीवर पडलेले मेलेले जनावर याला सहज दिसते. ते दिसताक्षणीच बरीच गिधाडे त्या ठिकाणी जमतात आणि मांसाचा फडशा पाडतात.[६] गिधाडांच्या एका गटाने बैलाच्या आख्ख्या मृतदेहाला २० मिनिटात खाऊन स्वच्छ केल्याचे पाहण्यात आले आहे. जंगलांमध्ये जेव्हा ते उंच उड्डाण घेते, तेव्हा वाघाने शिकार केल्याचे कळत असे. ते जुने सुकलेले हाडांचे तुकडेसुद्धा गिळतात. जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे ते नियमितपणे आंघोळ करतात आणि पाणी पितात. ज्या झाडांवर ते नियमितपणे वास्तव्य करतात, ती झाडे बऱ्याचदा त्यांच्या मलमूत्रामुळे पांढरी होतात आणि आम्लतेमुळे मरतात. त्यामुळे फळबागा व शेतमळ्यांमधील त्यांचा वावर लोकांना आवडत नाही.[७]

ॲलन ऑक्टेवियन ह्यूमने "शेकडो घरट्यांच्या" अभ्यासातून असे निरीक्षण नोंदवले की, हे पक्षी जवळच सोईस्कर कडे असूनसुद्धा मानवी वस्त्यांशेजारी मोठ्या झाडांवर घरटी बांधायचे. त्यांना वड, पिंपळ, अर्जुन आणि कडूलिंबाची झाडे आवडत असत.[८] नोव्हेंबर ते मार्च हा त्यांच्या विणीचा काळ असतो आणि अंडी जानेवारीमध्ये दिली जातात. अनेक जोडपी एकमेकांशेजारी घरटे बांधतात आणि एकटे घरटे अनेकदा तरुण पक्ष्याचे असते. घरट्यांचा व्यास ३ फूट आणि जाडी अर्धा फूट असते आणि आतल्या बाजूने हिरव्या पानांचा थर असतो. एकटे घरटे नियमितपणे वापरले जात नाही आणि कधी कधी राज गिधाड किंवा मोठी घुबडे त्यावर ताबा मिळवतात. मादी सामान्यत: एक अंडे देते जे पांढऱ्या रंगाचे असते आणि त्यात थोडीशी निळ्या-हिरव्या रंगाची छटा असते. अंडे नष्ट झाले तर मादी घरटेसुद्धा नष्ट करते. ३० ते ३५ दिवसांनी पिल्लू अंडे फोडून बाहेर येते. पिल्लू राखाडी रंगाचे असते. त्याचे पालक त्याला मांसाचे छोटे छोटे तुकडे भरवतात. पिल्लू साधारणत: तीन महिन्यांचे होईपर्यंत घरट्यात राहते.

बंदिवासातील एक गिधाड कमीत कमी बारा वर्ष जगले.

स्थिती आणि पतन[संपादन]

एके काळी या प्रजातीची गिधाडे मुबलक प्रमाणात अस्तित्वात होती. विशेषतः गंगेच्या मैदानी प्रदेशात ते मोठ्या संख्येने दिसत असत आणि या प्रदेशातील अनेक मोठ्या शहरातील रस्त्यांच्या कडेने असणाऱ्या झाडांवर घरटे बांधत असत. ह्यू व्हिस्लर याने त्याच्या भारतातील पक्ष्यांच्या गाईडमध्ये असे लिहिले आहे की, भारतातील सर्व गिधाडांमध्ये या प्रजातीची गिधाडे सर्वात जास्त आहेत.[९] टी.सी. जेर्डनने सुद्धा हे भारतातील सर्वाधिक संख्या असणारे गिधाड असून ते भारतात सगळीकडे मोठ्या संख्येने आढळतात असे निरीक्षण नोंदवले आहे.[१०]

१९९० च्या दशकापूर्वी त्यांना उपद्रव म्हणून पाहिले जात होते, विशेषतः विमानांच्या पक्ष्यांशी होणाऱ्या टक्करींमध्ये या पक्ष्यांचे प्रमाण जास्त होते म्हणून.[११][१२] १९४१ मध्ये चार्ल्स मॅक्‌कान याने ताडाच्या झाडांवर बसणाऱ्या गिधाडांच्या मलमूत्रामुळे झाडे मेल्याचे लिहिले आहे.[१३] १९९० मध्येच ही गिधाडे आंध्र प्रदेशमध्ये, विशेषतः गुंटूर आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये दुर्मीळ झाली होती. १९९० मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे त्या भागात असंख्य जनावरे मृत्युमुखी पडली, तेव्हा त्यांच्या मृतदेहांपाशी गिधाडे दिसली नाहीत.[१४]

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत बंगाली गिधाड तसेच भारतीय गिधाड आणि पातळ चोचीचे गिधाड या प्रजातींची संख्या भारत आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये ९९ टक्क्यांनी कमी झाली आहे.[१५] याचे प्रमुख कारण डायक्लोफिनॅक या जनावरांमधील सांधेदुखीच्या वेदना कमी करणाऱ्या औषधामुळे होणारी विषबाधा आहे. जेव्हा एखादे जनावर मरते आणि मरण्याच्या आधी काही वेळापूर्वी डायफिनॅक देण्यात आले असेल तर त्याच्या मृतदेहामध्ये या औषधाचा अंश राहतो. अश्या मृतदेहाला खाल्ल्याने ते रसायन गिधाडांच्या शरीरात जाते, त्यांचे मूत्राशय बंद पडते आणि त्यांचा मृत्यू होतो.[१६] हे औषध जिप्स प्रजातीच्या इतर पक्ष्यांसाठीसुद्धा विषारी असल्याचे सिद्ध झाले आहे.[१७]

एका वेगळ्या गृहीतकानुसार, यांच्या संख्येतील घट होण्याला, हवाई बेटांवरील पक्ष्यांच्या विलोपनाचे कारण होता तो पक्ष्यांचा मलेरिया कारणीभूत असू शकतो. .[१८] आणखी एका विचारानुसार, हवामानातील दीर्घकालीन बदल गिधाडांच्या ऱ्हासास जबाबदार असू शकतात.[१९]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b बर्डलाइफ इंटरनॅशनल. "जिप्स बेंगॉलेन्सिस". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. २३-०४-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)
 2. ^ Prakash, V; Pain, D.J.; Cunningham, A.A.; Donald, P.F.; Prakash, N.; Verma, A.; Gargi, R.; Sivakumar, S.; Rahmani, A.R. (2003). "Catastrophic collapse of Indian white-backed Gyps bengalensis and long-billed Gyps indicus vulture populations". Biological Conservation. 109 (3): 381–390. doi:10.1016/S0006-3207(02)00164-7.
 3. ^ ह्युस्टन, डी. सी. कंझर्वेशन स्टडीज ऑफ रॅप्टर्स (इंग्रजी भाषेत). pp. ४५६–४६६. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य)
 4. ^ पॅमेला रासमसेन, जे. सी. ॲंडरटन. बर्ड्‌स् ऑफ साऊथ एशिया : द रिप्लेय गाईड. व्हॉल्यूम २ (इंग्रजी भाषेत). pp. ८९–९०.CS1 maint: ref=harv (link)
 5. ^ कनिंगहॅम डी. डी. सम इंडियन फ्रेंड्ज ॲन्ड ॲक्वेन्टन्सेस; अ स्टडी ऑफ द वेज ऑफ बर्ड्‌ज ॲन्ड अदर ॲनिमल्स फ्रीक्वेंटिंग इंडियन स्ट्रीट्स ॲन्ड गार्डन्स (इंग्रजी भाषेत). pp. २३७–२५१. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य)
 6. ^ कर्वे, ज. नी. "गिधाड". मराठी विश्वकोश. खंड ५. मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.
 7. ^ सलीम अली, एस. डी. रिप्ले. हॅंडबुक ऑफ द बर्ड्‌ज ऑफ इंडिया ॲन्ड पाकिस्तान, खंड १ (इंग्रजी भाषेत). pp. ३०७–३१०.
 8. ^ ह्यूम ए. ओ. माय स्क्रॅप बुक ऑर रफ नोट्स ऑन इंडियन ऑर्निथॉलॉजी (इंग्रजी भाषेत). pp. २६–३१. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य)
 9. ^ व्हिस्लर, ह्यू. पॉप्यूलर हॅंडबुक ऑफ इंडियन बर्ड्‌ज (इंग्रजी भाषेत). pp. ३५४–३५६. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य)
 10. ^ जेर्डन टी. सी. द बर्ड्‌ज ऑफ इंडिया. खंड १ (इंग्रजी भाषेत). pp. १०–१२.
 11. ^ सतीशन, एस. एम. बर्ड स्ट्राईक्स कमिटी युरोप, कॉन्फरन्स प्रोसीडिंग्स (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (pdf) on 2016-03-03. 2017-05-05 रोजी पाहिले.
 12. ^ Singh, R. B. (1999). "Ecological strategy to prevent vulture menace to aircraft in India" (PDF). Defence Science Journal. 49 (2): 117–121.[permanent dead link]
 13. ^ McCann, C. (1941). "Vultures and palms". Journal of the Bombay Natural History Society. 42 (2): 439–440.
 14. ^ सतीशन, एस. एम., सतीशन एम. इंटरनॅशनल बर्ड स्ट्राईक कमिटी आयबीएससी२५/डब्ल्यूपी-एसए३ (PDF). Archived from the original (PDF) on 2015-09-24. 2017-05-05 रोजी पाहिले.
 15. ^ Prakash, V.; et al. (2007). "Recent changes in populations of resident Gyps vultures in India" (PDF). J. Bombay Nat. Hist. Soc. 104 (2): 129–135. Archived from the original (pdf) on 2012-10-15. 2017-05-05 रोजी पाहिले.
 16. ^ Green, Rhys E.; Newton, IAN; Shultz, Susanne; Cunningham, Andrew A.; Gilbert, Martin; Pain, Deborah J.; Prakash, Vibhu (2004). "Diclofenac poisoning as a cause of vulture population declines across the Indian subcontinent". Journal of Applied Ecology. 41 (5): 793–800. doi:10.1111/j.0021-8901.2004.00954.x.
 17. ^ Meteyer, Carol Uphoff; Rideout, Bruce A.; Gilbert, Martin; Shivaprasad, H. L.; Oaks, J. Lindsay (2005). "Pathology and proposed pathophysiology of diclofenac poisoning in free-living and experimentally exposed oriental white-backed vultures (Gyps bengalensis)". J. Wild. Dis. 41: 707–716. doi:10.7589/0090-3558-41.4.707.
 18. ^ Poharkar, A.; Reddy, P. A.; Gadge, V.A.; Kolte, S.; Kurkure, N. & Shivaji, S P. (2009). "Is malaria the cause for decline in the wild population of the Indian White-backed vulture (Gyps bengalensis)?" (pdf). Current Science. 96 (4): 553.
 19. ^ Hall, JC; Chhangani, A. K.; Waite, T. A.; Hamilton, I. M. (2012). "The impacts of La Niña induced drought on Indian Vulture Gyps indicus populations in Western Rajasthan". Bird Conservation International. 22 (3): 247–259. doi:10.1017/S0959270911000232.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत