Jump to content

परिपूर्ण दान (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दानाचे महत्त्व वर्णन करणाऱ्या अनेक कथा परंपरेने चालत आलेल्या आहेत. त्यातली ही एक लोककथा आहे.

कहाणीचा सारांश

[संपादन]

कोणे एके काळी एक खूप गरीब आजीबाई होती. ती एका छोट्याशा चंद्रमौळी झोपडीत राहत असे. तिला कोणीतरी एक आंबा दिला होता. तिने त्यातील अर्धा आंबा खाल्ला आणि पुरवून पुरवून खावे अशा विचाराने दुसऱ्या दिवशीसाठी म्हणून उरलेला आंबा तसाच ठेवून दिला. नेमके त्या रात्रीच कोणीतरी तिच्या मोडकळीस आलेल्या दारावर टकटक केले आणि तिच्याकडे आसरा मागितला. दारावरील तो अतिथी आत आला आणि त्याने तिला सांगितले की, तो खूप भुकेला आहे आणि त्याला रात्रीपुरता आसरा हवा आहे. तेव्हा ती त्याला म्हणाली, “हे बघ, तुला उबदार वाटावे तर माझ्याकडे    शेकोटीसुद्धा नाहीये, तुला पांघरायला देण्यासाठी माझ्याकडे गोधडी पण नाहीये, माझ्याकडे फक्त अर्धा आंबा उरला आहे, तुला जर हवा असेल तर तो तेवढा मी तुला देऊ शकते. मी त्यातील अर्धा आंबा खाल्लेला आहे.” त्यावेळी त्या अतिथीच्या जागी भगवान शंकर प्रकट झाले. तिने तिच्याजवळ जे काही होते ते सर्व त्या अतिथीला देऊ केले होते आणि त्याचा परिणाम म्हणून, भगवान शंकराची कृपा तिला प्राप्त झाली. []

कहाणीचे तात्पर्य

[संपादन]

तुमच्यापाशी जे आहे, ते तुम्ही परमेश्वराला देऊ करा. तुम्ही जे आहात तेही परमेश्वराला देऊ करा; असे केलेत तर तुम्ही दिलेली भेटवस्तू परिपूर्ण असेल. आध्यात्मिक दृष्टीने ती परिपूर्ण असेल. तुमच्यापाशी किती संपत्ती आहे किंवा तुमच्या प्रकृतीमध्ये किती क्षमता आहेत ह्यावर ते अवलंबून नसते तर तुमच्या भेटवस्तूच्या परिपूर्णतेवर, म्हणजे तुमच्या त्या देणगीच्या समग्रतेवर तिचे मोल अवलंबून असते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ The Mother (1977). Questions and Answers 1956. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 08. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-670-4.
  2. ^ श्रीमाताजी (मीरा अल्फासा) (२०१९-०४-०१). डॉ.केतकी मोडक (ed.). "परिपूर्ण दान". अभीप्सा मराठी मासिक.