परशुराम कुंड (अरुणाचल प्रदेश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परशुराम कुंड हे अरुणाचल प्रदेशातील एक तीर्थक्षेत्र आहे. परशुराम कुंडाच्या जवळच परशुरामाचे एक मंदिर आहे. लोहित नदीच्या काठावर हे कुंड आहे.[१] ह्या कुंडाचे आणि मंदिराचे दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तजन येथे येतात. मंदिरात परशुरामाची शुभ्र संगमरवरी दगडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळते. कुंडामध्ये स्नान करण्याची सोय आहे. परशुरामाच्या मंदिरापासून ते कुंडापर्यंतचा डांबरी रस्ता २००४ साली पूर्ण झाला. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी यात्रेकरूंची राहण्याची व्यवस्था आहे. परशुराम कुंडाला ‘ब्रह्मकुंड’ असेही म्हणतात.[२]

परशुराम कुंड

संबंधित कथा[संपादन]

परशुरामाने या कुंडाच्या पाण्यामध्ये त्याचा परशू धुतला त्यामुळे पाण्याचा रंग लालसर झाला. तेव्हापासून या धारेला किंवा या नदीला ‘लोहित’ असे नाव पडले, अशी कथा ह्या नदीबद्दल सांगितली जाते. [२]

दळणवळण[संपादन]

तिनसुकिया शहरापासून साडे तीन तासांच्या अंतरावर परशुराम कुंड आहे. तिनसुकिया ते परशुराम कुंडाचे एकूण अंतर एकशे एकोणसाठ किलोमीटर एवढे आहे. तिनसुकिया ते वाक्रो हे अंतर १४४ किलोमीटर एवढे आहे. वाक्रो या गावापासून परशुराम कुंडापर्यंतचे अंतर हे १६ किलोमीटर एवढे आहे, तर चोक्खम ते परशुराम कुंडापर्यंतचे अंतर ५८ किलोमीटर आहे. परशुराम कुंड ते तेझू हे अंतर ४७ किलोमीटर एवढे आहे. परशुराम कुंडापर्यंत जाण्यासाठी बस, रेल्वे, ट्रक-टेम्पो इत्यादींचा उपयोग होतो.

परशुरामाची भारतातील अन्य मंदिरे[संपादन]

  • रत्‍नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशुराम येथे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे.
  • गोव्यात पैगिणी (इंग्रजी : Poinguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. या ठिकाणी परशुरामांचे कायमचे अस्तित्व आहे असे मानले जाते.
  • केरळात तिरुवलम आणि परशूर या दोन गावांत परशुरामाचे प्रत्येकी एक मंदिर आहे.

पहा[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ "Parshuram Kund | District Lohit, Government of Arunachal Pradesh | India" (इंग्रजी भाषेत). 2021-10-20 रोजी पाहिले.
  2. ^ a b बिनीवाले, अविनाश (२००८). पूर्वांचल. विजयानगर, पुणे ४११ ०३०: कॉन्टिनेन्टल प्रकाशन विजयानगर,पुणे ४११ ०३०. pp. २०७.CS1 maint: location (link)