परडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोगवा मागायचे पात्र म्हणजे परडी. अंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची बाब. परडी, परसराम, पोत आणि कवड्याची माळ यासोबत परडीला महत्त्व आहे. ही अंबाबाईच्या पूजेची प्रतीके आहेत.नवरात्रात परडीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. आई भवानीच्या दरबारात परडीचे एक वेगळेच महत्त्व आहे. परडी आणि परसराम अशा जोडी भिक्षापात्र म्हणून प्रसिद्ध आहेत. परडी म्हणजे ताट आणि परसराम म्हणजे वाटी. परडी बारीक वीण करून बनविली जाते. परडी हे रोग दूर करण्याचे साधन मानले जायचे. हळद-कुंकू, लिंबू आणि प्रसाद घातलेली परडी एका गावातून दुसऱ्या गावात नेली जायची. अखेर ती समुद्रात विसर्जित केली जात असे. यामुळे साथरोग नाहीसे होतात, असा समज होता. आजही असाध्य आजारासाठी परडीचा उपाय शोधणारे अनेकजण आहेत. रोगाची साथ घालविण्यासाठी परडी विधी केला जात असल्याचा उल्लेख भारतीय संस्कृतिकोशात आढळतो.

परडी भरणे हा पूजाविधी आहे. परडी-कवड्यांची माळ घेऊन जोगवा मागणारे भक्त सर्व स्तरांतील आहेत. घरात जो पदार्थ असेल त्याचा नैवेद्य हे तुळजापूरच्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दररोज भवानीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. ज्या भागात जे पिकते तेच देवतांच्या नैवेद्याचा भाग असते. अशा कोणत्याही पदार्थाने परडी भरता येते.असा नैवेद्य घेऊन जाणे जसजसे अवघड होऊन गेले तसतसे शिधा सुरू झाला. त्यातही मीठ-पीठाचे महत्त्व वाढत गेले. गावोगावच्या महिला परड्या भरतात. मंदिरातील होमकुंडात हजारो लोक नवस म्हणून पीठा-मिठाच्या परड्या भरतात.

वेळूची परडी ही मातृदैवतांना आवडीची असल्याची आणि गर्वहरणाचे प्रतीक असल्याचा उल्लेख उपासक करतात. तुळजापूरातील पूजाऱ्यांच्या घरातील परडी वेगळी आहे.ताटातील मोठी वाटी किंवा वाडगे असा त्याचा आकार असून तुळजापूरातील काळभैरव मूर्तीच्या हातातदेखील अशाच प्रकारचे पात्र आहे. एखाद्याच्या घरात मृत्यू झाला तर सुतकानंतर परडी बदलली जाते. अगदी प्राचीन काळापासून भारतीय लोकजीवनात परडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.