नोत्र देम दे रेंस
| नोत्र देम दे रेंस | |
|---|---|
फ्रेंच: Cathédrale Notre-Dame de Reims | |
| जागा | Place du Cardinal Luçon, 51100
प्लास दु कार्दिनाल लुसों, ५११०० रेंस |
| देश | फ्रान्स |
| संप्रदाय | रोमन कॅथलिक |
सुई युरिस चर्च |
लॅटिन चर्च |
| वेबसाइट | www.cathedrale-reims.com |
नोत्र देम दे रेंस ; (अर्थ " रेंसची आमची माता "), ज्याला रेंस कॅथेड्रलसुद्धा म्हणतात, हे रेंसमधील एक कॅथलिक कॅथेड्रल आहे, जे रेंसच्या अर्चडाओसेसचे केंद्र आहे. हे कॅथेड्रल कुमारी मारियेला समर्पित होते आणि फ्रान्सच्या राजांच्या राज्याभिषेकासाठी हे पारंपरिक ठिकाण होते. हे कॅथेड्रल गॉथिक वास्तुकलेच्या सर्वात महत्त्वाच्या कलाकृतींपैकी एक मानले जाते. हे एक प्रमुख पर्यटन स्थळ असून, येथे दरवर्षी सु. दहा लाख पर्यटक येतात. [१] १९९१ मध्ये ते UNESCO चे जागतिक वारसा स्थान झाले [२]
असे मानले जाते की या कॅथेड्रलची स्थापना ५ व्या शतकाच्या सुरुवातीला बिशप निकासिउस यांनी केली होती. सुमारे एका शतकानंतर, रेंसचे बिशप संत रेमी यांनी येथे क्लोव्हिसला ख्रिस्ती बाप्तिस्मा दिला. हा संस्कार ग्रहण करणारा तो पहिला फ्रांकी राजा होता. सध्याच्या कॅथेड्रलचे बांधकाम १३ व्या शतकात सुरू झाले आणि १४ व्या शतकात पूर्ण झाले. उच्च गॉथिक वास्तुकलेचे एक प्रमुख उदाहरण असलेले हे चर्च, १२१० मध्ये आगीत नष्ट झालेल्या पूर्वीच्या चर्चच्या जागी बांधले होते. फ्रेंच क्रांतीदरम्यान फारसे नुकसान झाले नसले तरी, सध्याच्या कॅथेड्रलचा १९व्या शतकात मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार केला. पहिल्या महायुद्धादरम्यान त्याचे मोठे नुकसान झाले होते आणि २० व्या शतकात त्याची पुन्हा पुनर्बांधणी केली.
१९०५ च्या धर्म आणि राज्य विभक्तीकरणाच्या कायद्यानुसार, कॅथेड्रलची मालकी फ्रेंच राज्याकडे आहे, तर कॅथोलिक चर्चकडे त्याच्या विशेष वापरासाठी एक करार आहे. फ्रेंच सरकार त्याच्या जीर्णोद्धार आणि देखभालीसाठी पैसे देते. [३]
इतिहास
[संपादन]५ वे शतक – मेरोवेखी कॅथेड्रल
[संपादन]ज्युलियस सीझरने त्याच्या गॅलिक युद्धांच्या वृत्तांतात दुरोकोर्तोरुम नावाच्या रेमेस नावाच्या गॉल जमातीच्या वस्तीची नोंद केली होती. [२] उच्च रोमन साम्राज्याच्या काळात, ते ऱ्हाईनच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत पसरलेल्या प्रांताची राजधानी झाले आणि इ.स. ३ ऱ्या शतकात 'दुसरे बेल्जियम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोमन प्रांताची राजधानी होते. तेथील पहिले ख्रिस्ती चर्चला पहिले बिशप, रेंसचे संत सिक्स्तुस यांनी २५० ते ३०० च्या दरम्यान स्थापन केले.
५ व्या शतकाच्या सुरुवातीला, मेरोविखी काळात, बिशप निकासिउसने कॅथेड्रल त्याच्या सध्याच्या ठिकाणी हलवले, जी जागा पूर्वी सम्राट कॉन्स्टन्टाइनने बांधलेल्या गॅलो-रोमन स्नानगृहाने व्यापलेली होती. [४] [५] ४३१ मध्ये एफेसुसच्या परिषदेने तिचा उन्नत दर्जा स्थापित करण्याच्या निर्णयाची अपेक्षा करत, नवीन चर्च कुमारी मारियेला समर्पित केले. [६] नवीन कॅथेड्रल, ज्याचा बाह्यभाग चौरस आणि आतील भाग वर्तुळाकार होता, [७] [८] त्याचे माप अंदाजे २० मी x ५५ मी . [९] [२] १९९० च्या दशकात, सध्याच्या कॅथेड्रलच्या अगदी खाली असलेल्या या मूळ मेरोवेखी चर्चच्या बाप्तिस्मागृहाचे उत्खनन केले आणि जुन्या संरचनेचे अवशेष दिसून आले. [२]
फ्रांकांचा राजा पहिल्या क्लोव्हिसला तेथे सुमारे इ. स. ४९६ मध्ये संत रेमीच्या हाती बाप्तिस्मा दिला. या घटनेमुळे रेंस येथे फ्रान्सच्या राजांच्या राज्याभिषेकाची दीर्घ परंपरा सुरू झाली. [२] [१०] [११]
९वे शतक – कारोली कॅथेड्रल
[संपादन]८१६ मध्ये, फ्रांकांचा राजा आणि पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट, भक्त लुई, याचा चौथा पोप स्टीवन यांनी रेंस येथे राज्याभिषेक केला. [१२] राज्याभिषेक आणि त्यानंतरच्या उत्सवांमुळे सुरुवातीच्या कॅथेड्रलची वाईट अवस्था आणि अपुरा आकार उघड झाला. [१३] सु. ८१८ मध्ये, आर्चबिशप एबो आणि शाही वास्तुविशारद रुमाउड यांनी जुन्या शहराच्या तटबंदीतील दगड वापरून त्याच ठिकाणी जमिनीपासून एक खूप मोठे चर्च बांधायला सुरुवात केली. [१२] [१४]
८३५ मध्ये या कामाचा व्यत्यय झाला आणि नंतर सम्राट टकल्या शार्लच्या पाठिंब्याने नवीन आर्चबिशप एंकमार यांच्या नेतृत्वाखाली ते पुन्हा सुरू केले. चर्चचा आतील भाग सोन्याचा मुलामा, मोझाइक, चित्रे, शिल्पे आणि चित्रजवनिका या कलांनी सुशोभित केला. [१५] १८ ऑक्टोबर ८६२ रोजी, सम्राटाच्या उपस्थितीत, एंकमारने नवीन चर्चला लोकार्पण केले. [१६]
फ्रांसच्या राजांना राज्याभिषेक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गंधरसाने भरलेल्या पवित्र कुपीची प्रतिष्ठा, पहिल्या क्लोव्हिसचा तेथेच बाप्तिस्मा झाला होता, आणि रेंसच्या आर्चबिशपची राजकीय शक्ती, यांमुळे रेंस हे फ्रांसच्या राजकर्त्यांच्या राज्याभिषेकाचे नियमित ठिकाण झाले; ही परंपरा १०२७ मध्ये फ्रान्सच्या पहिल्या हेन्रीच्या राज्याभिषेकाने स्थापित झाली. फ्रान्सच्या भावी राजांपैकी उग कापे, दुसरा रॉबेर्त, सहावा लुई, पहिला जां, चौथा हेन्री, अठरावा लुई आणि पहिला लुई फिलिप हे सात जण सोडून बाकी सर्वांचा राज्याभिषेक रेंस येथे झाला.
कॅथेड्रलमध्ये इतर शाही समारंभही आयोजित केले जात होते. १९ मे १०५१ रोजी, फ्रान्सचा पहिला हेन्री आणि कीवच्या आन्नाचे लग्न कॅथेड्रलमध्ये झाला. [१७] ११३१ मध्ये रेंसच्या परिषदेचे आयोजन करताना, दुसऱ्या पोप इनोसंट यांनी कॅथेड्रलमध्ये राज्य करणारा राजा सहाव्या लुईचा मुलगा सातव्या लुईचा राज्याभिषेक केला. [१८] [१९]
- एका गॉथिक कलाकाराने काढलेला क्लोव्हिसचा बाप्तिस्मा (१४ वे शतक)
- सें-जीलच्या कलानिपुणने काढलेले क्लोव्हिसचा बाप्तिस्मा (१६ वे शतक)
- आर्चबिशप एंकमारच्या कबरीवरील कारोली कॅथेड्रलचे चित्र (९ वे शतक), जे १७९३ मध्ये नष्ट झाले.
१२ वे शतक – प्रारंभिक गॉथिक कॅथेड्रल
[संपादन]१२ व्या शतकापर्यंत, आर्कबिशप मोवाजेंचा सांसों (११४०-११६०) यांच्या महत्त्वाकांक्षेसाठी कारोली कॅथेड्रल खूप लहान होते. त्याने आधीच असलेले मुख्य सभागृह आणि आडवे सभागृह ठेवले, पण कॅथेड्रलच्या दोन्ही टोकांची पुनर्बांधणी करून त्यांचा विस्तार केला. पॅरिसच्या बाहेरील सें-दनीच्या शाही मठाच्या अनुकरणात, दोन जुळणारे बाजूचा मनोरा बांधण्यासाठी त्याने पश्चिम दर्शनी भाग आणि लगतचा मनोरा पाडला, ज्याच्या गायकवृंदाच्या समर्पण सोहळ्याला काही वर्षांपूर्वी तिथे स्वतः सांसों होता. [२] पूर्वेकडील टोकाला, त्याने एक मोठा गायकवृंद आणि एक प्रदक्षिणा मार्ग आणि पसरलेल्या प्रार्थनास्थळांचे वलय तयार केले. [७] शतकाच्या अखेरीस, मुख्य आणि आडवे सभागृह अजूनही कारोली शैलीचे होते तर चापपटल आणि दर्शनी भाग प्रारंभिक गॉथिक शैलीचे होते. [१०]
- कॅथेड्रलचा शिक्का, जो १२व्या शतकात ते कसे दिसत होते हे दाखवतो.
१३ वे-१४ वे शतक – उच्च गॉथिक कॅथेड्रल
[संपादन]६ मे १२१० रोजी, [२०] [२१] आर्धे कारोली आणि आर्धे प्रारंभिक गॉथिक कॅथेड्रल कथितरित्या "हलगर्जीपणामुळे" आगीत नष्ट झाले. [१०] बरोबर एक वर्षानंतर त्याच दिवशी, आर्चबिशप आल्बेरीक यांनी नवीन कॅथेड्रलच्या मुख्य चापपटल आणि प्रदक्षिणापथ यांची पहिली वीट ठेवली. [६] [२०] नवीन कॅथेड्रलचे काम उत्कृष्ट वेगाने चालले, कारण रेंस हे प्रमाणित आकाराचे दगड आणि इतर साहित्य वापरणाऱ्या पहिल्या इमारतींपैकी एक होते, त्यामुळे प्रत्येक दगड मोजून कापण्याची गरज नव्हती. [२] जुलै १२२१ मध्ये, कॅथेड्रलच्या पूर्वेकडील टोकावरील गरिजा वापरात आले. [२१] १२३० मध्ये, पश्चिम दर्शनी भागाचे काम सुरू झाले, यावरून असे दिसून येते की मुख्य सभागृहाचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले होते. [२]
१५ वे - १६ वे शतक
[संपादन]२५ ऑक्टोबर १४१५ रोजी ॲजिंकोर्टच्या लढाईत इंग्लंडच्या पाचव्या हेन्रीने फ्रान्सच्या सहाव्या शार्लच्या सैन्याचा पराभव केल्यानंतर, रेंससह उत्तर फ्रान्सचा बहुतेक भाग इंग्रजांच्या ताब्यात पडला. [२२] त्यांनी १४२९ पर्यंत रेंस आणि कॅथेड्रल ताब्यात ठेवले, जेव्हा आर्कच्या जोनने ते ताब्यात घेतले, ज्यामुळे १७ जुलै १४२९ रोजी शार्लला, जो त्यावेळी दोफें होता, राजा म्हणून राज्याभिषेक करता आला. [२३] तिच्या पराक्रमासाठी – जो शंभर वर्षांच्या युद्धातील एक निर्णायक क्षण होता – रेंस कॅथेड्रलमध्ये जोनच्या स्मरणार्थ दोन पुतळे उभारण्यात आले आहेत: एक चर्चच्या बाहेर आणि दुसरा चर्चच्या आत.
- शंभर वर्षांच्या युद्धाच्या रेंस मोहिमेत इंग्लंडचा तिसरा एडवर्ड तोफांसोबत रेंसला वेढा घालतो. मागे कॅथेड्रल दिसत आहे.
- जुल-ओजेन लनप्वो यांनी काढलेले १४२९ मधील सातव्या शार्लचा राज्याभिषेक, ज्यामध्ये उजवीकडे संत आर्कची जोनला दाखवली आहेत.
१७ वे - १८ वे शतक
[संपादन]१८ व्या शतकात कॅथेड्रलच्या आत पहिली मोठी पुनर्बांधणी झाली. १७४१ ते १७४९ च्या दरम्यान, खालच्या खिडक्या आणि मध्ययुगीन उपस्कर, मुख्य वेदी, गायकवृंदाची आसने आणि गायकवृंदाचा पडदा या सर्वांच्या जागी त्या काळातील धर्मशास्त्रीय गरजा आणि अभिरुचीला अधिक अनुरूप असे उपस्कर बसवले. प्रवेशद्वारांवरील शिल्पकलेचाही जीर्णोद्धार केला. [२]
१७९३ मध्ये, फ्रेंच क्रांतीदरम्यान, कॅथेड्रल बंद केले आणि थोड्या काळासाठी त्याचे धान्य कोठारात, आणि नंतर काही काळासाठी एका छद्म 'विवेक मंदिरा'त रूपांतर केले. उरलेले बहुतेक उपस्कर आणि अंत्यविधी स्मारके नष्ट केली, खजिन्यातील अवशेषपेट्या सोन्यासाठी वितळल्या आणि घंटा वितळवून तोफा बनवल्या. जमावाने भव्य प्रवेशद्वारावरील बऱ्याचशा शिल्पकलेवर हातोडा मारला आणि राजेशाहीची अधिक ठळक चिन्हे, जसे की फ्लर-द-लीस प्रतीक आणि राजेशाही न्यायाचा हात जाळवले. [२४] तरीही, बहुतेक मध्ययुगीन शिल्पकला त्या मनाने सुस्थितीत टिकून राहिली. [२]
- तेराव्या लुईचा राज्याभिषेक, १७ ऑक्टोबर, १६१०
- चौदाव्या लुईचा राज्याभिषेक, ७ जून, १६५४
- तेराव्या लुईच्या राज्याभिषेकाची मिरवणूक (१७२४)
- सोळाव्या लुईचा राज्याभिषेक (१७७५)
१९ व्या शतकात
[संपादन]नेपोलियनच्या पतनानंतर फ्रांसच्या राजेशाहीची पुनर्स्थापना झाल्यावर, रेंस येथे राज्याभिषेकाची प्रथा पुन्हा सुरू झाली, पण ती फक्त थोड्या वेळासाठीच. तेथे राज्याभिषेक झालेला फ्रान्सचा शेवटचा राजा दहावा चार्ल्स होता, ज्याचा राज्याभिषेक १८२५ मध्ये झाला. पॅरिसमध्ये त्याचे राज्य अत्यंत अलोकप्रिय होते आणि फ्रान्सच्या दुसाऱ्या क्रांतीत त्याला पदच्युत केले आणि त्याच्या जागी पहिला लुई फिलिप या सांविधानिक राजाला गादीवर बसवले, ज्याचा रेंसमध्ये राज्याभिषेक करण्याऐवजी पॅरिसमधील संसदेत शपथविधी झाला. [२]
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जीर्णोद्धाराचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले, ज्यात पहिले पश्चिम दर्शनी भागावरील त्रिकोणी छत आणि पुतळ्यांवर (१८२६-३०) आणि नंतर जां-जाक आर्वफच्या नेतृत्वाखाली वरच्या दालने, खिडक्या आणि मनोऱ्यांवर (१८४५-६०) लक्ष दिले. १८६० मध्ये त्यांच्या जागी ओजेन व्यॉले-ल-दिक आले, ज्यांनी गायकवृंदाची दालन आणि चापपटल त्यांच्या मूळ मध्ययुगीन स्वरूपाच्या जवळ आणण्यासाठी सुधारित केले. [२५] त्यांच्या नंतर ओजेन मीले आणि व्हिक्तॉर रुप्रीश-रॉबेर्त हे आणखी दोन वास्तुविशारद आले, ज्यांनी अधिक कल्पकतेने १३ व्या शतकातील गॉथिक शैलीत चर्चच्या मुख्य भागातील दालनांची पुनर्रचना करताना बऱ्याच प्रमाणात स्वातंत्र्य घेतले. १८८८ मध्ये त्यांच्यापाठोपाठ दनी दार्सी आणि पोल गू आले, ज्यांनी ऐतिहासिक वास्तुकलेचा अधिक बारकाईने अभ्यास केला, खास करून पश्चिमेकडील गुलाबाच्या खिडकीच्या जीर्णोद्धारामध्ये. [२६]
- फ्रान्स्वा जेरार यांनी १८२५ मध्ये रेंस येथे फ्रान्सच्या दहाव्या शार्लचा राज्याभिषेक
- आद्रियें दोजास यांनी काढलेले १८४५ मध्ये जीर्णोद्धाराखाली असलेले रेंस कॅथेड्रल
२० वे शतक – पहिले महायुद्ध आणि जीर्णोद्धार
[संपादन]पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला, कॅथेड्रलला रुग्णालय म्हणून कार्यान्वित केले आणि त्याच्या जवळच्या परिसरातून सैन्य आणि शस्त्रे काढली. [२७] [२८] [२९] ४ सप्टेंबर १९१४ रोजी, जर्मनीचे बारावे कोर शहरात दाखल झाले आणि नंतर त्याच दिवशी शाही जर्मन सैन्याने शहरावर तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. ७ किमी दूर ले मेनोमध्ये असलेल्या बंदुका, जेव्हा बाराव्या कोरने शहरावर तोफगोळा हल्ला थांबवण्यास सांगण्यासाठी दोन अधिकारी आणि एक शहर कर्मचारी पाठवले तेव्हा त्यांनी गोळीबार थांबवला. [३०]
१२ सप्टेंबर रोजी, कब्जा करणाऱ्या जर्मन सैन्याने त्यांच्या जखमींना कॅथेड्रलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला, [३१] आणि या उद्देशासाठी कॅथेड्रलच्या मजल्यावर १५,००० गवताच्या पेंढ्या पसरवल्या. दुसऱ्या दिवशी सेनफ्रँचेत डी'एस्परे यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैनिकांनी शहरात पुन्हा प्रवेश केला, परंतु जखमी जर्मन सैनिकांना कॅथेड्रलमध्येच सोडण्यात आले. [३०]
सहा दिवसांनंतर, बिशपच्या वाड्यात एक गोळा फुटला, त्यात तीन जण ठार आणि १५ जण जखमी झाले. [३२] १८ सप्टेंबर रोजी दीर्घकाळ भडिमार सुरू झाला आणि १९ सेप्टेंबर रोजी शिशाचे आवरण असलेल्या छताखाली असलेल्या लाकडी तुळयांच्या 'जंगलावर' गोळे आदळले, ज्यामुळे आग लागली आणि छत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. घंटा वितळल्या, खिडक्या फुटल्या आणि शिल्प व भिंतींच्या काही भागांचे नुकसान झाले. छतामधील शिसे वितळून दगडी गार्गोइलच्या मुखातून आत शिरले, ज्यामुळे लगतच्या बिशपच्या वाड्याचे नुकसान झाले. युद्धादरम्यान संतप्त फ्रेंच लोकांनी कॅथेड्रलच्या अवशेषांची छायाचित्रे दाखवली आणि जर्मनांवर राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध इमारतींचा हेतुपुरस्सर नाश केल्याचा आरोप केला, [३०] तर जर्मन प्रचाराने कैद्यांच्या मृत्यूसाठी फ्रेंचांना जबाबदार धरले, ज्यांनी बंदुकीच्या धाकाने त्यांना आगीतून पळून जाण्यापासून रोखले. [३०] पंधराव्या पोप बेनेडिक्ट यांनी वारंवार विनंती करूनही, अनेक वर्षे त्या उद्ध्वस्त इमारतीवर एकेक तोफगोळा आदळत राहिला. [३३]
युद्ध संपल्यावर, युद्धातील बळींच्या स्मरणार्थ स्मारक म्हणून कॅथेड्रलला त्याच्या नुकसान झालेल्या स्थितीत ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण हा प्रस्ताव शेवटी नाकारला गेला. फ्रेंच ऐतिहासिक स्मारकांच्या सेवेचे मुख्य वास्तुविशारद हेन्री देनोच्या नेतृत्वाखाली १९१९ मध्ये एक मोठा जीर्णोद्धार प्रकल्प सुरू झाला. या जीर्णोद्धाराला रॉकफेलर संस्थेकडून मोठा निधी मिळाला आणि संरचनेला अधिक मजबूत करण्यासाठी कधीकधी पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटसह आधुनिक तंत्रज्ञान आणि सामग्री वापरला. १९२० च्या दशकात, कॅथेड्रलखाली कारोली काळातील पूर्वीच्या चर्चचा पाया सापडला आणि त्याचे उत्खनन केले. काम पूर्ण झाले आणि १९३८ मध्ये कॅथेड्रल पुन्हा उघडले. [२] [३४]
- कॅथेड्रलवर भडिमार (१९१४)
- भडिमारच्यानंतर कॅथेड्रलचा दर्शनी भाग
- भडिमारच्यानंतर छताविना असलेले कॅथेड्रल
- भडिमारच्यानंतर कॅथेड्रलचा आतील भाग
बाह्य
[संपादन]पश्चिम दर्शनी भाग
[संपादन]पश्चिमेकडील दर्शनी भाग, कॅथेड्रलचा प्रवेशद्वार, खास करून राजेशाहीचा गौरव करतो. त्यातील बहुतेक काम एकाच वेळी पूर्ण झाले, ज्यामुळे त्याच्या शैलीत एक विलक्षण एकरूपता आली. ते सुसंवादी किंवा संतुलित असून, त्यात समान उंचीचे दोन मनोरे आणि गर्भगृहात प्रवेश करणारी तीन प्रवेशद्वारे आहेत. अनेक शिल्पे असलेल्या कमानींनी युक्त प्रवेशद्वारांचे सज्जे मुख्य भिंतीतून बाहेर डोकावतात. [३५]
मध्यवर्ती प्रवेशद्वाराच्या वर आणि किंचित मागे, उंच खिडक्यांच्या पातळीवर एक मोठी गुलाबाच्या आकाराची खिडकी आहे, जिच्या दोन्ही बाजूंना पुढे आलेल्या टोकदार छतांखाली पुतळे आहेत. या पातळीच्यावर राजांची दालन असून, त्यात ४.५ मी उंचीचे ५६ पुतळे आहेत. मध्यभागी फ्रांकांचा पहिला ख्रिस्ती राजा, क्लोव्हिस, त्याच्या उजवीकडे क्लोतिल्द आणि त्याच्या डावीकडे संत रेमी. मूळ योजनेनुसार दोन्ही घंटा मनोऱ्यांना कळस बांधून ते मुख्य सभागृहापेक्षा तिप्पट उंच करण्याचे ठरले होते, पण त्यांची कधीही पुनर्बांधणी झाली नाही.
- पश्चिम दर्शनी भाग आणि प्रवेशद्वारे
- राजांची गॅलरी
- रेंस, नोत्र-देम कॅथेड्रल. पश्चिम दर्शनी भाग, डावे प्रवेशद्वार (अंदाजे १२३०–१२५५)
- रेंस, नोत्र-देम कॅथेड्रल. पश्चिम दर्शनी भाग, उजवे प्रवेशद्वार (अंदाजे १२३०–१२५५)
- रेंसमधील नोत्र-देम कॅथेड्रलच्या पश्चिम प्रवेशद्वाराच्या उत्तर स्तंभाच्या पश्चिम बाजूवरील उठावदार शिल्प
- रेंसमधील नोत्र-देम कॅथेड्रलच्या पश्चिम प्रवेशद्वाराच्या दक्षिण स्तंभावरील दक्षिणी शिल्पकला
- रेंसमधील नोत्र-देम कॅथेड्रल. कुमारीच्या अभिषेकाचे चित्रण असलेली दर्शनी भिंत (बहुधा १२४५ ते १२५५ दरम्यान).
पश्चिम प्रवेशद्वार
[संपादन]त्या तीन प्रवेशद्वारांमध्ये एक विस्तृत शिल्पकला योजना आहे, जी निरक्षर भक्तांना बायबलमधील संदेश स्पष्ट करून सांगते. मध्यवर्ती प्रवेशद्वार कॅथेड्रलच्या संरक्षक असलेल्या कुमारी मरियेला समर्पित आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या त्रिकोणी छताखालील मुख्य दृश्यात, मरियेच्या रूपाने दर्शविलेल्या ख्रिस्ताचा त्याच्या मंडळीसोबतचा प्रतिकात्मक लग्न दाखवले आहे. दाराच्या मध्यभागी असलेल्या पुतळ्याच्या स्तंभावरची आकृतीसुद्धा मरिया आहे. [२]
दक्षिण प्रवेशद्वारावरील शिल्पकलेत न्यायाचा दिवस आणि प्रकटीकरण चित्रित केले आहे; या दोन संकल्पना एकत्र आणणारे हे एकमेव प्रमुख गॉथिक कॅथेड्रल आहे. न्यायनिवाडा करणाऱ्या ख्रिस्ताची आकृती प्रवेशद्वाराच्या वरच्या त्रिकोणी छताखाली ठेवलेली आहे, आणि देवदूत ख्रिस्ताच्या दुःखाची प्रतीके घेऊन जात आहेत. इतर आकृत्या प्रकटीकरणाचे चार घोडेस्वार, तसेच असंख्य देवदूत आणि दुर्गुण व सद्गुणांची रूपकात्मक प्रतीके दर्शवतात. [३६]
उत्तर प्रवेशद्वारावरील शिल्पात ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळण्याचे चित्रण आहे, जे प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला असलेल्या चांदईखाली दाखवले आहे; इतर दृश्यांमध्ये पुनरुत्थान आणि येशूचे स्वर्गारोहण दाखवले आहे. उत्तर प्रवेशद्वाराच्या डावीकडे मरियेसोबत हसरा देवदूत गाब्रिएल दिसतो. पहिल्या महायुद्धादरम्यान नुकसान झाले होते, पण दुरुस्ती करून पुतळ्याला परत त्याच्या जागी आणले.
- दक्षिण प्रवेशद्वारावरील शिल्प - शिमोन, योहान बाप्तिस्ता आणि यशया
- मध्यवर्ती प्रवेशद्वारावरील शिल्प:
कुमारी मरियेचा अभिषेक - उत्तर प्रवेशद्वाराचे आलिंगन, ज्यामध्ये कुमारी मरियेच्या शेजारी हसरा देवदूत आहे.
मनोरे
[संपादन]१४८१ मध्ये आगीने मूळ छत आणि कळस नष्ट केले: आडव्या सभागृहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या चार मनोरांपैकी, आता छताच्या उंचीच्या वर काहीही शिल्लक राहिलेले नाही.
नैऋत्य मनोऱ्यामध्ये २.४६ मी व्यासाची आणि दहा टन वजनाची एक भव्य घंटा आहे, जी १५७० मध्ये कार्डिनल लॉरेनच्या शार्लने कॅथेड्रलला दिली होती; तसेच त्यात सात टन वजनाची आणि २.२ मी व्यासाची दुसरी घंटा देखील आहे. ही घंटा १८४९ मध्ये बनवली होती [३७]
- पश्चिम दर्शनी भागाचे मनोरे
- उत्तर मनोऱ्याचा तपशील
- दक्षिण मनोऱ्याचा तपशील
संदर्भ
[संपादन]Page साचा:Reflist/styles.css has no content.
- ↑ Reims Cathedral page on culture.fr Archived 2016-07-17 at the वेबॅक मशीन..
- 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 Kurmann & Villes 2001. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "FOOTNOTEKurmannVilles2001" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Kurmann & Villes 2001, पान. 23.
- ↑ Demouy 1995, पाने. 11.
- ↑ Sadler 2017.
- 1 2 Demouy 1995. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "FOOTNOTEDemouy1995" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - 1 2 Lambert 1959. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "FOOTNOTELambert1959" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Bourassé 1872.
- ↑ Demouy 1995, पाने. 11–12.
- 1 2 3 Demouy 2011, पान. 9. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "FOOTNOTEDemouy2011" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Bordonove 1988, पान. 97.
- 1 2 Lambert 1959, पान. 244.
- ↑ Demouy 2011, पान. 9.
- ↑ Kurmann & Villes 2001, पान. 13.
- ↑ Bourassé 1872, पान. 45.
- ↑ Demouy 1995, पान. 12.
- ↑ McLaughlin 2010, पान. 56.
- ↑ Robinson 1990.
- ↑ Brown 1992, पान. 43.
- 1 2 Branner 1961, पान. 23.
- 1 2 Lillich 2011, पान. 1.
- ↑ Santosuosso 2004, पाने. 245–46.
- ↑ Tucker 2010, पाने. 333, 335.
- ↑ Souchal 1993, पाने. 61, 68.
- ↑ Auzas 1982, पान. 158.
- ↑ Kurmann & Villes 2001, पान. 20.
- ↑ New York Times, 4 December 2015.
- ↑ "Reims Cathedral Burns". 19 September 2014. 18 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 April 2018 रोजी पाहिले.
- ↑ Peace Palace Library: The Destruction of the Cathedral of Reims, 1914.
- 1 2 3 4 Landrieux 1920.
- ↑ Landrieux 1920, पान. 22.
- ↑ Landrieux 1920, पान. 28.
- ↑ Landrieux 1920, पान. 144–48.
- ↑ Fleming, Jenna (April 14, 2020). "Rebuilding a Cathedral: The Media, American Money, and French Heritage". RE:Source, A Publication of the Rockefeller Archive Center.
- ↑ Kurmann & Villes 2001, पान. 27.
- ↑ Kurmann & Villes 2001, पान. 39.
- ↑ Kurmann & Villes 2001, पान. 44.