नुरिस्तानी भाषा
नुरिस्तानी भाषा, ज्यांना आधी काफिरी भाषा म्हणून ओळखले जात होते, या हिंद-आर्य, दार्दी आणि इराणी भाषांसोबत हिंद-इराणी भाषा कुटुंबातील चार गटांपैकी एक आहेत. [१] [२] या भाषा बोलणारे अंदाजे २,१४,००० लोक आहेत, जे प्रामुख्याने ईशान्य अफगाणिस्तानातील नुरिस्तान आणि कुनर प्रांतांमध्ये आणि पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाच्या चित्राल जिल्ह्यातील काही लगतच्या खोऱ्यांमध्ये राहतात. नुरिस्तानी लोकांचा प्रदेश दक्षिण हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे व पश्चिमेला आलींगार नदी, मध्यभागी पेच नदी आणि पूर्वेला बाश्गल आणि चित्राल नद्या या प्रदेशातून वाहतात. अधिक व्यापकपणे सांगायचे झाल्यास, नुरिस्तान प्रदेश भारतीय उपखंड आणि इराणी पठाराच्या उत्तरेकडील छेदनबिंदूवर वसलेला आहे.
१९व्या शतकापर्यंत नुरिस्तानी भाषांचे साहित्यात वर्णन केले गेले नव्हते. तेथील रहिवाशांच्या इस्लामाच्या आदले धार्मिक प्रथांमुळे या प्रदेशाचे जुने नाव 'काफिरिस्तान'(विधमी-प्रदेश) होते, परंतु या प्रदेशातील रहिवाशांनी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर आधीचे नाव सोडून 'नुरिस्तान' ('प्रकाशाची भूमी') असे नाव ठेवले.
भाषा
[संपादन]
नुरिस्तानी भाषांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाऊ शकते:
- <b id="mwPw">कात</b>, जिला काती, कांविरी, किंवा कंकता-वारी असेही म्हणतात, ही १,५०,००० बोलणाऱ्या लोकांसोबत सर्वाधिक बोलली जाणारी नुरिस्तानी भाषा आहे. यामध्ये पश्चिम, ईशान्य आणि आग्नेय बोली असे आहेत.
- <b id="mwSA">प्डस्यू</b>, जिला वासी-वारी असेही म्हणतात, ही ८,००० भाषिकांद्वारे वापरली जाते. प्रसून ही या गटातील सर्वात भिन्न भाषा मानली जाते, जिचे स्वतःचे वेगळे व्याकरण आणि ध्वनीशास्त्र आहे.
- <b id="mwTQ">अष्कुड</b>, जिला अष्कुडू किंवा सानू-विरी असेही म्हणतात, ही भाषा ४०,००० भाषिक वापरतात. जरी अष्कुडमध्ये इतर नुरिस्तानी भाषांशी साम्य असले तरी, तिच्यात काही असे ध्वनी बदल आहेत जे इतर कोणत्याही सदस्य भाषेत आढळत नाहीत.
- <b id="mwUg">नुरिस्तानी कालाषा</b>, १२,००० भाषिकांद्वारे वापरली जाते. ती त्रेगामी आणि झमलामी यांच्याशी बऱ्यापैकी जवळून संबंधित आहे. नुरिस्तानी कालाषा ही कालाषा-मुन पेक्षा वेगळी आहे, जी एक हिंद-आर्य भाषा आहे.
- <b>त्रेगामी</b> (अर्थ. 'तीन गाव') ही भाषा अफगाणिस्तानच्या कुनर प्रांतातील वटापूर जिल्ह्यातील गंबिर, कटार आणि देवोज या तीन गावांमध्ये ३,५०० भाषिक वापरतात.
- <b id="mwYA">झमलामी भाषा</b> ५०० भाषकांकडून वापरली जाते. ही आतापर्यंत ज्ञात असलेली सर्वात लहान नुरिस्तानी भाषा आहे. स्थानिक परंपरा नुरिस्तानी कालाषासोबतच्या ऐतिहासिक संबंधाची पुष्टी करतात.
इतिहास
[संपादन]
नुरिस्तानी भाषा या हिंद-युरोपियन असून, त्या अंतिमतः आदिम-हिंद-युरोपीमधून विकसित झाल्या आहेत. नुरिस्तानी भाषेचा पूर्व-इतिहास अस्पष्ट आहे, परंतु असे दिसते की ती हिंद-इराणी शाखेचा भाग म्हणून इतर हिंद-युरोपी भाषांपासून वेगळी झाली.
इ.स.पू. ३ऱ्या सहस्रकाच्या उत्तरार्धातील आदिम-हिंद-इराणी भाषा ही एक पुनर्रचित पूर्वज भाषा आहे, जिचे नुरिस्तानी भाषांचे संस्कृत आणि अवेस्ती हे समान मूळ आहे. यामुळे नुरिस्तानी भाषा हिंदुस्तानी आणि फारशीसारख्या हिंद-इराणी भाषांशी जवळून संबंधित आहेत, आणि लिथुएनी व इस्लेन्स्कासारख्या इतर हिंद-युरोपी भाषांशी अधिक दूरचे नाते आहे. हिंद-इराणी शाखेतील तिच्या वर्गीकरणावर अलीकडील संशोधनाने हिंद-आर्य किंवा इराणीपेक्षा वेगळी, तिसरी शाखा म्हणून तिचे स्थान निश्चित करेपर्यंत वादविवाद होता, तरीही तिच्यावर व्यापक हिंद-आर्य प्रभाव आढळून येतो.
आदिम-नुरिस्तानी ही आजच्या सगळ्या नुरिस्तानी भाषांची पुनर्रचित पूर्वज भाषा आहे, जी त्या भाषा एकसंध राहिल्याचा शेवटचा टप्पा दर्शवते. इ.स.पू. ८व्या शतकाच्या सुमारस आदिम-नुरिस्तानी भाषा वेगवेगळ्या भाषांमध्ये विभागली जाऊ लागली. त्यांच्या संपूर्ण इतिहासात विविध नुरिस्तानी-भाषिक जमातींच्या स्थलांतर आणि वसाहतीच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे, सुरुवातीच्या नुरिस्तानी भाषांवर आसपासच्या हिंद-आर्य आणि इराणी भाषांचा प्रभाव अत्यंत गुंतागुंतीचा राहिला आहे. [३]
नुरिस्तानी लोकांच्या प्रमुख भाषा म्हणून नुरिस्तानी भाषांचा विकास होत राहिला. या लोकांचा जवळच्या हिंद-आर्य लोकांशी आणि नंतर अफगाणांशी संवाद साधण्याचा इतिहास होता, जे त्या भागात प्रबळ झाले. १८९० च्या दशकात, भू-राजकीय दबावामुळे नुरिस्तान प्रदेश अखेरीस अफगाणिस्तानमध्ये आले. आज, नुरिस्तानच्या लोकसंख्येपैकी ९९% पेक्षा जास्त लोक वांशिक नुरिस्तानी आहेत. [४] एकूण नुरिस्तानी लोकसंख्येपैकी सु. ७८% लोक आणि ८४% गावांमध्ये नुरिस्तानी भाषा बोलली जाते. [४]
आज, खोवर, पाशाई आणि कालाषा-मुन यांसारख्या हिंद-आर्यन दार्दी भाषा आणि मुंजी, संगलेची आणि यिद्घा यांसारख्या पूर्व इराणी भाषा नुरिस्तानच्या शेजारील प्रदेशात मूळतः बोलल्या जातात, ज्यामुळे भाषा संपर्क होतो. दामेली, एक शेजारील हिंद-आर्य भाषा, मध्ये नुरिस्तानी भाषांमधून मोठ्या प्रमाणात शब्दसंग्रह घेतला गेला आहे आणि त्यामुळे पूर्वी तिचे वर्गीकरण चुकून नुरिस्तानी भाषा म्हणून केले गेले होते. तथापि, दामेलीची रूपरचना आणि सर्वनामिक प्रणाली वैशिष्ट्यपूर्णरित्या हिंद-आर्य आहे, ज्यामुळे तिचे दार्दी असे पुनर्वर्गीकरण करण्यात आले. [५]
शब्दसंग्रह
[संपादन]नुरिस्तानी शब्दसंग्रह याचा सर्वात जुना स्तर हा आदिम-हिंद-युरोपीमधून मिळालेला सामायिक वारसा आहे, जो इतर हिंद-युरोपी भाषांमध्येही आढळतो. उदा., त्रेगामीमधील 'त्रे' हा शब्द इंग्रजीतील ' थ्री', रशियनमधील 'म्पू' (त्रि) आणि स्पॅनिशमधील 'त्रेस' या शब्दांशी सजातीय आहे. [ <span title="This claim needs references to reliable sources. (January 2026)">संदर्भ आवश्यक</span> ]
नुरिस्तानी शब्दसंग्रहाचा बराचसा भाग इसवी सन पूर्व तिसऱ्या सहस्रकाच्या उत्तरार्धातील आदिम-हिंद-इराणी भाषेमधून आला आहे ( अष्कुड 'चेस' - "मारखोरचे केस" आणि मराठी 'केस' - हे बघा). २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत नुरिस्तान प्रदेशाच्या तुलनेने वेगळेपणामुळे, नुरिस्तानी भाषांनी हिंदू धर्म आणि पारशी धर्माच्या आधीच्या प्राचीन हिंद-इराणी धर्मातील काही वारसा शब्द टिकवून ठेवले आहेत असे मानले जात होते. तथापि, नुरिस्तानी देवनामांवरील अलीकडील संशोधन हिंद-आर्य धार्मिक परिभाषांशी मजबूत अर्थविषयक आणि भाषिक सामान्य दर्शवते, जे नुरिस्तानी धर्मशास्त्र आणि धार्मिक शब्दसंग्रहावर महत्त्वपूर्ण उत्तर-वैदिक हिंदू प्रभावाकडे निर्देश करते. [६] आतापर्यंत अज्ञात व्युत्पत्ती असलेल्या काही प्डस्यू देवनामांमध्ये वारसा हिंद-इराणी घटकांचे अवशेष टिकून राहिले असावेत. [६] याउलट, नुरिस्तानी शब्दसंग्रहावर पारशी प्रभावाचा कोणताही निशाना आढळत नाही, यावरून असे सूचित होते की ज्या भागांमध्ये पारशी धर्माचे पालन केले जात होते, तेथे नुरिस्तानी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जात नव्हत्या. [७]
खालील तक्त्यामध्ये आजचे नुरिस्तानी भाषांमधील काही मूलभूत शब्दसंग्रह यांची तुलना केली आहे.
| मराठी | प्डस्यू | कात | अष्कुड | नुरिस्तानी कालाषा | त्रेगामी |
|---|---|---|---|---|---|
| एक | उपुन | एव | अच | एव | यो |
| दोन | लू | द्यू, दू | दू | दु | दू |
| तीन | च्शी | त्रे | त्रे | त्रे | त्रे |
| चार | च्पु | श्तेवो, श्तो | चता | चता | चाता |
| पाच | वुचू | पुच | पोंच | पुंच | पोच |
| सहा | वुष | षु | षो | षु | षु |
| सात | सेते | सूत | सोत | सोत | सूत |
| आठ | अस्ते | उष्ट | ओष्ट | ओष्ट | वोष्ट |
| नऊ | नु | नु | नो | नू | नूं |
| दहा | लेजे | दुच | दोस | दोश | दॉश |
| डोळा | इझीं | अचें | अचिं | अचें | अचीं |
| जीभ | लुजुक | दिज | झूं | जिप | जिप |
| आतडे | वु | रु | झो | व्रु | |
| नाव | नोम | नुम | नाम | नाम | |
वाक्यरचना
[संपादन]काही नुरिस्तानी भाषांमध्ये, इतर बहुतेक हिंद-इराणी भाषांप्रमाणे, कर्ता-कर्म-क्रियापद असा शब्दक्रम असतो आणि जवळिल दार्दी काश्मिरी भाषेच्या विपरीत, ज्याच्यात क्रियापद द्वितीय स्थानी असते.
नमुना वाक्ये
[संपादन]कात
[संपादन]व्ये॑-र्-प्-अमुर्-ए पर्दि॑क वु॑-गये॑ "खालच्या मजल्यामधली म्हातारी बाई वरती गेली." (कुलेमचे पश्चिमी बोलीभाषा)[८]
प्रसून
[संपादन]लुस्त् लेन्यवो॑ग्नी ओयिनी॑ग् नाडम् रे-स् "[इस्लामिक प्रमाणे] हात धूतल्याबिना [ऋतूसरे पदार्थ] खाणे हे बेशिस्त/बेकायदेशीर होते."[९]
संदर्भ
[संपादन]- ↑ Morgenstierne, G. (1975). "Die Stellung der Kafirsprachen" [The position of the Kafir languages]. In Morgenstierne, G. (ed.). Irano-Dardica (जर्मन भाषेत). Wiesbaden: Reichert. pp. 327–343.
- ↑ Strand, Richard F. (1973). "Notes on the Nûristânî and Dardic Languages". Journal of the American Oriental Society. 93: 297–305. doi:10.2307/599462. JSTOR 599462.
- ↑ स्ट्रॅंड, रिचर्ड एफ. (२०२३). "Kâmboǰâs and Sakas in the Holly-Oak Mountains: On the Origins of the Nûristânîs". In Cacopardo, Alberto M., and Augusto S. Cacopardo, eds., Roots of Peristan: The Pre-Islamic Cultures of the Hindukush/Karakorum. Serie Orientale Roma, n.s. 37, Part II: 781–808. Roma.
- 1 2 "Nuristan Provincial Profile" (PDF). रोजी मूळ पानापासून संग्रहित7 October 2010. 14 September 2017 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ↑ साचा:Cite encyclopaedia
- 1 2 Halfmann, Jakob (2023). "Nuristani Theonyms in Light of Historical Phonology". Roots of Peristan, Rome, Italy: 350.
- ↑ Halfmann, Jakob (2023). "Nuristani Theonyms in Light of Historical Phonology". Roots of Peristan, Rome, Italy: 320.
- ↑ Halfmann, Jakob (2024). A Grammatical Description of the Katë Language (Nuristani) (PhD thesis). Universität zu Köln.
- ↑ Buddruss, G.; Degener, A. (2017). Materialien zur Prasun-Sprache des afghanischen Hindukusch. Vol. 2: Grammatik [Materials on the Prasun language of the Afghan Hindu Kush. Vol. 2: Grammar] (जर्मन भाषेत). Harvard Oriental Series 80. Harvard University Press. Cambridge, MA. pp. 437–438.