नीलमोहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नीलमोहर
Jacaranda flowers bunch.jpg
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: जॅकरांडा
जात: जे. मिमोसिफोलिया
वर्ग: युडिकॉटस
कुळ: बिग्नोनिएसी
शास्त्रीय नाव
जॅकरांडा मिमोसिफोलिया

नीलमोहर हा एक जांभळ्या फुलांचा वृक्ष आहे. त्याचे इंग्रजी नाव जॅकरांडा आहे.

मुळचा दक्षिण अमेरिकेतील[१] पण आता उत्तर आणि  पश्चिम भारतात सर्वत्र आढळणारा एक मध्यम उंचीचा वृक्ष आहे. तो १५ मीटर उंचीपर्यंत वाढू शकतो. ह्या झाडाचे गुलमोहराशी बरेच साम्य आहे म्हणून त्याला निळा गुलमोहर किंवा नीलमोहर असे म्हणतात. मात्र प्रत्यक्षात गुलमोहर आणि नीलमोहर हे वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत.

कोवळे असताना ह्या वृक्षाचे खोड हिरवे व गुळगुळीत असते पण कालांतराने झाड वाढता वाढता खोडाचा रंग बदलत जाऊन ते  हळूहळू राखाडी काळपट होऊ लागते. गुळगुळीतपणा जाऊन त्यावर उभ्या रेषा दिसू लागतात आणि ते खडबडीत दिसू  लागते.

नीलमोहराची पाने संयुक्त असून द्विसंयुक्त (Bipinnate ) प्रकारची असतात. पाने साधारण ४५ सें मी लांब असतात. पानाच्या मध्यशिरेच्या दोन्ही बाजूला  जोडी जोडीने पर्णिका असून टोकाला एकच पर्णिका असते. पर्णिकांची लांबी साधारण एक सें मी असते आणि त्यांचा रंग हिरवागार असतो. पर्णिका नेच्याच्या पानांप्रमाणे टोकेरी असतात. थंडीमध्ये  झाडाची पानगळ होऊन बरीच पाने गळून पडतात.[२]

थंडी संपून उन्हाळा सुरू होताच नीलमोहराचा बहर सुरू होतो. हा बहर मार्च ते मे असा दोन तीन महिने टिकतो. झाडाला साधारण ३० सें मी लांबीच्या मंजिऱ्या येऊन त्यांना विपुल संख्येने गडद जांभळी फुले  येतात. फुलांचा फुगीर देठ, त्या पुढे गोलाकार पण थोडी बाकदार नळी आणि त्यापुढे पाच एकत्र जुळलेल्या जांभळ्या पाकळ्या अशी फुलाची रचना असते. बाकदार नळीमुळे फुले पुढे थोडी उचलली गेल्याचा भास होतो. गोल नळीच्या आतच स्त्रीकेसर आणि पुंकेसर असतात.[२]  फुलांची लांबी साधारण सहा ते सात सें मी असते. फुले सुकल्यावर गळून पडणाऱ्या फुलांचा जांभळा गालिचा झाडाखाली पसरलेल्याचा भास होतो.

बहर संपल्यानंतर ह्या झाडाला पुरीसारख्या थोड्या लांबट गोलाकार पण  चपट्या अशा अंदाजे ५ ते ७ सें मी व्यासाच्या हिरव्या शेंगा लागतात. जसजसं त्या पिकतील तसतसा त्यांचा रंग बदलत तपकिरी होतो आणि त्या लाकडासारख्या कठीणही होतात. कालांतराने त्या उकलतात आणि त्यांचे दोन भाग होऊन त्यातून अनेक हलक्या पातळसर बिया बाहेर पडतात. बिया पडून गेल्यावरही उकललेली शेंगांची कवचे झाडावर तशीच लोंबकळताना दिसतात.

बियाद्वारे किंवा छाट कलमाद्वारे नीलमोहराची लागवड सहज करता येते[१]. पाण्याचा चांगला  निचरा होणाऱ्या जमिनीत हा वृक्ष झपाट्याने वाढतो. साधारण पाच वर्षात त्याला फुले येऊ लागतात.  सुंदर निळी फुले, हिरवीगार शोभिवंत पाने आणि चांगली सावली ह्यामुळे हा वृक्ष बागांमध्ये तसेच रस्त्याच्या कडांना दुतर्फा लावला जातो.

विख्यात कवी श्री वसंत बापट ह्यांनी ह्या झाडाबद्दल ‘जॅकरांडा’ ही कविता केली आहे.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b फुलझाडे - एम एस रंधावा अनु- व्यंकटेश वकील. नवी दिल्ली: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया. 2004. p. 82. ISBN 81-237-3640-1.
  2. ^ a b "निळ्या निळाईचा नीलमोहर".