निसर्ग पर्यटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



पर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. जगातील काही देशांची तर बहुतांशी अर्थव्यवस्थाच तेथील पर्यटनावर अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील पर्यटनही गेल्या दशकभरात २५त ३० टक्क्यांनी वाढले आहे आणि त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पर्यटन वाढीचे एक मुख्य कारण आहे त्या त्या देशातील निसर्ग संपन्न प्रदेश, वैभवशाली इतिहास आणि स्थानिक संस्कृती! तस बघायला गेलं तर उंचसखल डोंगरदऱ्या, समृद्ध जंगले, शांतरम्य समुद्रकिनारे, वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता,पर्यावरण जीवनदायिनी नद्या, फेसाळ धबधबे, वाळूची पुळण व खाड्या, कांदळवने, छोटी मोठी बेटे, गवतांचे गालिचे पसरलेली पठारे, पाण्याचे तलाव, अंधाऱ्या गुहा आणि पूर्वापार देवराया म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच!

निसर्गाची ही सर्व रूपे पर्यटकांसाठी तर आकर्षणाचा बिंदू आहेतच, पण त्याही पुढे जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक जैवविविधतेसाठी अधिवास म्हणून त्यांचे महत्त्व खूपच जास्त आहे. अनेक प्राणी, पक्षी, छोटे कीटक, सरीसृप, अन्नसाखळीतील छोटे मोठे घटक यांचे जीवन या अधिवासांवर अवलंबून आहे. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यामधे या घटकांचा वाटा फार मोठा आहे. त्यामुळेच पर्यटनाचा आनंद घेतानाच या अधिवासांची म्हणजेच तेथील पर्यावरणाची काळजी घेनही तेवढच अत्यावशक आहे. पण सद्यपरिस्थितीत चालू असलेल्या पर्यटनावर एक नजर फिरवली तर या अधिवासांची व पर्यायाने तेथील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसून येते आहे. अनियंत्रित पर्यटन व योग्य नियोजनाच्या अभावामुळे एकेकाळी सौंदर्यपूर्ण व निसर्गसंप्पंन असलेली ही पर्यटनस्थळे आता बकाल होऊ लागली आहेत. परिणामतः या ठिकाणी अस्वच्छता, वृक्षतोड, वाढती गर्दी, पर्यटनस्थळांची नासधूस, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यांत्रिकीकरण व आधुनिकीकरणाच्या वेगात हे प्रमाण जास्तच वाढले आहे. या सगळ्याला वेळीच आवर घातला नाही तर निसर्गाचा हा सगळा अनमोल ठेवाच नाहीसा होण्याची शक्यता आहे. पर्यटनाच्या प्रगतीबरोबरच स्थानिक पर्यावरणाची काळजी घेणंही तेवढच गरजेच आहे. यासाठी अनियंत्रित व बकाल पर्यटनाऐवजी सुनियोजित व शाश्वत अशी ‘निसर्ग पर्यटन’ ही संकल्पना राबविणे अत्यावशक बनले आहे.

‘निसर्गाची हानी न होता केले जाणारे पर्यटन’ म्हणजे निसर्ग पर्यटन अशी निसर्ग पर्यटनाची साधी सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुज्ञ व कमीतकमी वापर आणि स्थानिक लोकांचा आर्थिक-सामाजिक विकास ही निसर्ग पर्यटनाची मुख्य उद्दिष्टे होत. निसर्गाची धारणक्षमता ओळखून, स्थानिकांच्या शाश्वत विकासासाठी व पर्यटकांच्या आनंदासाठी निसर्ग पर्यटन राबविणे गरजेचे असून पर्यटक, व्यावसाईक व स्थानिक लोक या सर्वांची यात महत्त्वाची भूमिका आहे. एखाद्या पर्यटन स्थळी जाताना फक्त मौजमजा करायला न जाता, तेथील निसर्ग अभ्यासपूर्वक जाणून घेतला तर त्याचा खरा आस्वाद आपल्याला घेता येईल. आपल्या कोणत्याही कृतीमुळे स्थानिक पर्यटनास बाधा पोचनार नाही, पर्यटन स्थळी स्वच्छता राहील व तेथील सौंदर्य अबाधित राहील याची दक्षता पर्यटकांनी घेतली पाहिजे. पर्यटन व्यावसाईकांनी फक्त आपल्या जलद फायद्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडली तर उद्या हेच व्यवसाय बुडीत निघायला वेळ लागणार नाही व याची गत सोन्याच अंड देणाऱ्या कोंबडी सारखी होईल. यासाठी त्यांनी आपल्या व्यवसायामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडणार नाही तसेच स्थानिक पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. स्थानिक लोक हे या साधनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांनीही आपल्या परिसरात पर्यटनामुळे होणारे दुष्परिणाम टाळून विकास कसा साधता येईल हे पहिले पाहिजे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

निसर्ग पर्यटन राबविण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांनी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या नैसर्गिक ठेवणीमध्ये बदल करू नये हे त्यात प्रामुख्याने सांगितले आहे. उलट ही भूरूपे, जैवविविधता यांचा पर्यटनासाठी वापर करून निसर्गभ्रमंती, जंगलभेटी, गिर्यारोहण, प्रस्तरारोहण, नौकानयन, जंगली श्वापदांचा मागोवा, पक्षीनिरीक्षण, औषधी वनस्पतींचा अभ्यास, वननिवास अशा अनेक संकल्पना राबविता येतील ज्याद्वारे तेथील निसर्गाचे संरक्षण व संवर्धन होईल. तसेच कृषी पर्यटन व ग्रामिण पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास साधता येईल. शहरातील चकचकीत झगमगाटापेक्षा खेड्यातील साधे राहणीमान, स्थानिक परंपरा व खाद्यसंस्कृती याबद्दल पर्यटकांना कुतूहल असते. शेतीच्या विविध पद्धती, जेवणात शेतात पिकलेली ताजी भाजी, ताजी फळे, शेतीकामात सहभाग याद्वारा पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळू शकतो. या जराशा ‘हटके’ उपक्रमांचे व संकल्पनांचे पर्यटक स्वागतच करतात, एव्हाना त्यासाठी जादाचे पैसे मोजायलाही तयार असतात. यामधे बाहेरून आलेल्या व्यवसाइकांपेक्षा मुख्यत्वेकरून स्थानिक लोकांचाच आर्थिक फायदा जास्त होईल तसेच तेथील निसर्गाशी स्थानिकांची नाळ जोडलेली असल्याकारणाने पर्यावरणाचेही संरक्षण, संवर्धन होईल. गरज आहे ती फक्त चंगळवादी वृत्ती बदलण्याची, काही सवयी अंगी बानवण्याची व डोळसपणे निसर्गाकडे बघण्याची. या समृद्ध नैसर्गिक ठेव्याचा आपण आनंद घेतानाच उद्याच्या पिढीलाही त्याची गोडी चाखायला मिळावी एवढीच काळजी एक जागरूक पर्यटक म्हणून घेऊया. मामाच्या गावाला तर भेटून झालं, आता म्हणूया कि चला, निसर्गाच्या गावाला जाऊया !

अनुप गरगटे
पर्यावरणशास्त्र विभाग
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.