निवडुंगाच्या खोडाची पणती
निवडुंगाच्या खोडाची पणती ही एक नैसर्गिक गोष्टी वापरून केलेली पणती आहे.
पणतीचे प्रकार
[संपादन]निवडुंगाच्या खोडाचा उपयोग दिपावलीच्या उत्सवात पणत्या बनविण्यासाठी केला जातो. विशेषतः पालघर जिल्ह्यातील बऱ्याच गावामध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी निवडुंगाच्या खोडाच्या पणत्या केल्या जातात.
निवडुंगाच्या खोडाची पणती बनविण्याची पद्धत
[संपादन]दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समुद्र किनारी, शेताच्या बांधावर,रानमाळावर असलेल्या निवडुंगाच्या झुडुपातील खोड कापून आणतात.विळा,कोयता,चाकू वगैरे शेतीला लागणाऱ्या अवजाराने निवडुंगाच्या खोडावर असलेले काटे काढतात.काटे काढल्यानंतर खोडाचे तीन ते चार इंच लांबीचे तुकडे करतात. अश्या खोडाच्या तुकड्यांना पणत्याचा आकार देतात. तेल घालण्यासाठी खोडातील गर काढतात आणि खोलगट भाग तयार करतात.खोडाच्या कडेला कापसाची वात तेलात ठेवण्यासाठी लहान जागा करतात.अश्या प्रकारे तयार केलेल्या पणत्या उन्हात एक दोन तास सुकवल्या जातात.प्रत्येक कुटुंब अश्या तीस चाळीस पणत्या तयार करतात. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी अश्या पणत्या एका पाटावर लक्ष्मीपूजन केले जाते त्या पाटावर सगळ्या तेल व कापसाच्या वाती घालून प्रज्वलित करतात. नंतर एकेक पणती उचलून अंगण,ओटा, पायऱ्या,देवघर,स्वयंपाकघर,गोठा,विहीर,बैलगाडी,आसपास असलेल्या शेजारच्या घरी, नजीकच्या देवळाच्या दिपमाळ वगैरे ठिकाणी ठेवल्या जातात. अश्या प्रकारे पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा केला जातो. पालघर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील गावांमध्ये अश्या प्रकारे दिवाळीत दीपोत्सव साजरा केला जातो. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार,२२ ऑक्टोबर २०२५