नियतीचा खेळ (लोककथा)
सुखदुःखाकडे समानतेने पाहू शकणाऱ्या एका राजपुत्राची ही लोककथा.
कथेचा आशय
[संपादन]इराण मधील खोरासान प्रांतातील ही कहाणी आहे. अमीर हा खोरासानचा राजपुत्र होता आणि तो मोठ्या ऐशोआरामात राहात असे. असे म्हणतात की, जेव्हा तो युद्धाला निघायचा, तेव्हा त्याच्या स्वयंपाकघरासाठी भांडी आणि ताटवाट्या वाहून नेण्यासाठी तीनशे उंट लागत असत.
एका युद्धामध्ये त्याचा पराजय झाला. आणि त्याला खलिफा इस्माईलने कैदी बनवले. अमीरची रोजच्या जेवणाची वेळ झाली होती. पोटात अन्नाचा कण नव्हता. तेव्हा त्याचे लक्ष जवळच कोणीतरी स्वयंपाक करत होते त्याच्याकडे गेले. मला काहीतरी खायला देशील का? अशी विनंती त्याने त्या माणसाकडे केली.
त्या माणसाकडे मांसाचा एकच तुकडा शिल्लक होता, तो त्याने चुलीवर एका भांड्यात टाकला. तो करत असलेल्या त्या पदार्थाला काहीतरी चव यावी म्हणून परसातून काही भाज्या आणाव्यात म्हणून तो तेथून बाहेर पडला. तेथून जाणाऱ्या एका कुत्र्याला मांसाचा गंध आला आणि ते खाण्यासाठी म्हणून त्याने तोंड भांड्यात घातले. पण, त्या विस्तवाच्या धगीने पोळला जाऊन तो पटकन मागे सरकला. पण गंमत अशी झाली की त्या भांड्याचे तोंड होते लहान. मागे सरकण्याच्या खटपटीत असताना त्याचे डोके त्या भांड्यात अडकले. ते काढण्यासाठी तो खूप खटपट करू लागला पण त्यात काही त्याला यश आले नाही. तसाच झटापट करत तो दूर पळून जाऊ लागला.
अमीर ते दृश्य पाहून मोठमोठ्याने हसू लागला. त्याचे हसणे पाहून, पहारेकऱ्याने विचारले, "तुम्ही दुःखी व्हावे अशी परिस्थिती असतानासुद्धा तुम्ही एवढे का हसत आहात?"
अमीरने छावणीतून दूर जाणाऱ्या कुत्र्याकडे निर्देश केला आणि म्हणाला, "नियतीचा खेळ कसा अजब आहे बघ. मला या विचाराने हसू येत आहे की, सकाळी माझ्या स्वयंपाकघरातील सामानाची ने-आण करण्यासाठी तीनशे उंट लागले आणि आता एक कुत्रा ते सर्व वाहून नेण्यासाठी पुरेसा आहे!" अमीर स्वतःच्या नियतीकडे पाहूनसुद्धा आनंदी कसा राहू शकतोय, या विचाराने तो पहारेकरी स्तंभित झाला होता.
तात्पर्य
[संपादन]अमीर जर इतक्या दुर्दैवी परिस्थितीत आनंदी राहू शकत असेल तर आपणही तसेच आनंदी राहण्याचा प्रयत्न का करू नये? असा विचार देणारी ही लोककथा.[१]
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.