नारायण सुबराव हरडीकर
नारायण सुब्बराव हर्डीकर हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे अनुयायी होते. त्यांना इसवी सन १९५८ मध्ये त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले होते.
जीवन व कारकीर्द
[संपादन]डॉ. नारायण सुब्बराव हर्डीकर यांचा जन्म बॉम्बे संस्थानातील धारवाड मध्ये एका अगदी गरीब सारस्वत कुटुंबात दिनांक ७ मे १८८९ रोजी झाला.शालेय शिक्षण पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी कलकत्ता येथे गेले.कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्यापुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी मिशिगन युनिव्हर्सिटी येथे एमएससी, पब्लिक हेल्थ पदवी प्राप्त केली. पीएचडी चा अभ्यास करीत असताना त्यांचा लाला लजपतराय यांच्याशी परिचय झाला आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी काम करावयास सुरुवात केली. डॉ. हर्डीकर यांनी भारतातील स्वातंत्र्य लढ्याला मदत करणाऱ्या अमेरिकी भारतीयांना संघटित केले. तसेच अमेरिकन मुत्सद्दी, मान्यवर नेते यांचाही पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्यलढ्याविषयी हर्डीकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये पत्रव्यवहार होत असे त्यामध्ये त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याची माहिती मिळते. डॉ. हर्डीकर यांनी न्यू यॉर्क येथे इंडियन लेबर युनियन ऑफ अमेरिका संस्था स्थापन करून तेथील हिंदू, मुस्लिम कष्टकरी वर्गाला एकत्र आणून त्यांना इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था केली. अमेरिकन पार्लमेंटची हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला संमती मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकमान्य टिळक परदेशी उच्चशिक्षण किंवा व्यवसाय शिक्षण यासाठी जाणाऱ्या भारतीय लोकांना आर्थिक तसेच अन्य प्रकारची मदत करीत असत.लोकमान्य टिळक डॉक्टर हर्डीकर यांना पत्र लिहून तसे कळवीत.डॉक्टर हर्डीकर यांच्याकडे ते मदत पाठवित असत व पत्राद्वारे कळवित असत. खालील लोकांना त्याप्रमाणे मदत करण्यासाठी डॉ. हर्डीकर यांना सांगून मदत केली होती.
- पेण येथील व्ही.एच. मनोहर
- कानडेशास्त्री
लोकमान्य टिळक यांचा डॉक्टर नारायण सुब्बराव हर्डीकर यांच्यावर पूर्ण विश्वास होता.डॉ. हर्डीकर यांनी टिळकांनी दिलेल्या आर्थिक मदतीने न्यू यॉर्क मध्ये भारत देशाच्या संदर्भातील पुस्तकांचे दुकान चालू केले होते आणि अनेक वाचकांना जोडून अमेरिकेत जनमत जागृत केले होते. डॉ. हर्डीकर हे टिळकांचे निस्सीम भक्त होते.
स्वातंत्र्यलढा
[संपादन]परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या अनेक भारतीयांनी इंडियन नेशनल काँग्रेस ची इसवी सन १८८५ मध्ये स्थापना झाल्यापासूनच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले होते. त्यावेळी न्यू यॉर्क मध्ये राहणारे डॉक्टर नारायण सुब्बराव हर्डीकर यांनीसुद्धा लोकमान्य टिळक यांच्या होमरूल लीग च्या मुखपत्र असलेल्या यंग इंडिया च्या संपादनाची जबाबदारी न्यू यॉर्कमध्ये पाहत असत. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर डॉक्टर हर्डीकर इसवी सन १९२१ मध्ये भारतात परतले आणि काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम करू लागले.इसवी सन १९२३ मध्ये त्यांनी हिंदुस्थानी सेवादल ही कडक लष्करी शिस्तीची काँग्रेसची संघटना चालू केली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली डॉक्टर हर्डीकर यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक आंदोलनात भाग घेतला. हिंदुस्थानी सेवादल हे नंतर फक्त सेवादल झाले. सेवादल संघटनेने सविनय कायदेभंग चळवळीत महत्वपूर्ण काम केले.सेवादल ही पुढे काँग्रेसची मध्यवर्ती संघटना झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर हर्डीकर हे दोन वेळा राज्यसभेत निवडून गेले होते.
पुरस्कार
[संपादन]भारत सरकारने त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल इसवी सन १९५८ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव केला. इसवी सन १९८९ मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसारित केले होते.
मृत्यू
[संपादन]डॉक्टर हर्डीकर यांचे दिनांक २६ ऑगस्ट १९७५ रोजी निधन झाले.२६ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या निधनाला ५० वर्षे पूर्ण झाली. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, रविवार,३१ ऑगस्ट २०२५