ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी ही एक नोंदणीकृत बहु उद्देशीय धर्मादाय सामाजिक संस्था आहे.[१] संस्थेची स्थापना २०१८ साली झाली. संस्थेचे मुख्यालय डोंबिवली येथे असून, सध्या विनोद देशपांडे संस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.  आज पर्यंत “अतुल्य भारत”, “शब्दांगण”, “विचार चिंतन सत्र”, व्याख्यानमाला  असे अभिनव उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले आहेत.

विविध विषयावरील व्याख्याने, स्पर्धा , गटचर्चा आणि वादविवाद  या माध्यमातून ज्ञानाधारित समाजनिर्मितीसाठी ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी कार्यरत आहे.  भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या जाणिवेचा परमोच्च साक्षात्कार म्हणजे ज्ञान असे भारतीय संस्कृती मानते.  सध्याच्या काळात माहितीच्या उपलब्धतेचा प्रचंड साठा उपलब्ध आहे परंतु माहितीला ज्ञानामध्ये रूपांतरित करणे मात्र अवघड होत चालले आहे. त्यासाठी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्यासाठी, समाजामध्ये ज्ञानविषयक लालसा निर्माण करण्यासाठी आणि ज्यांच्याकडे ही लालसा आहे त्यांची ज्ञानतृष्णा भागविण्याच्या उद्देशाने ध्रुव आय. ए. एस. अकॅडमी प्रणीत, ध्रुव नॉलेज सोसायटी ही संस्था कार्यरत आहे.


संस्थेचे नित्य उपक्रम

अतुल्य भारत

जॉर्ज ऑरवेल म्हणाला होता की एखाद्या, समाजाला नष्ट करायचे असेल तर त्यांच्या इतिहासाशी असलेली त्या समाजाची नाळ तोडा. त्यांच्या इतिहासाचे त्यांचे आकलन विकृत करा.  एका बाजूला भारतीय समाज ५००० वर्षांच्या संस्कृतीत तर राहतोय, परंतु आपली मुळे मात्र विसरत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला समाजाचा असाही  एक घटक आहे जो प्राचीन भारताचे आंधळे उदात्तीकरण करतोय. शास्त्रीय संवादाच्या युगात हा घटक आपला इतिहास अभिनिवेशाने मांडतो, परंतु त्यात माहिती व विश्लेषणाचा अभाव असल्याने त्याचे म्हणणे खोडून काढणेही सहज  शक्य होते. इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानकाळ यात सातत्याने असलेला संवाद. भारताचे उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर त्याचा इतिहास डोळसपणे आपण समजून घ्यायला हवा. या हेतूने ध्रुव नॉलेज सोसायटी ‘अतुल्य भारत: प्राचीन भारताचे एक वस्तुनिष्ठ विश्लेषण’ ही व्याख्यानमाला आयोजित  केली होती. या व्याख्यानमालेअंतर्गत १२ महिन्यात, आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील १८ तज्ज्ञांच्या १२ व्याख्याने आणि ६ कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. या व्याख्यानमालेत श्री.अविनाश धर्माधिकारी, डॉ. देगलूरकर, डॉ. अभिजित दांडेकर, श्री प्रशांत पोळ, डॉ. शुभांगना अत्रे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, श्री. विवेक घळसासी, डॉ. धर्म भावुक, डॉ. जामखेडकर, डॉ. मायकेल डॅनिनो, डॉ. वसंत शिंदे , श्री गुरू गोविंद प्रभू अशा विविध वक्त्यांनी प्राचीन भारताचे अनेकविध पैलू उलगडले.


शब्दांगण

दर गुरुवारी सायंकाळी ८.१५ वाजता सदस्य / कुणीही तज्ञ एका पुस्तकावर अगर विषयावर - विषय मांडणी करतो. आत्तापर्यंत अशी ७३ सत्रे झाली आहेत. विख्यात अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक, इतिहास तज्ञ डॉ. सच्चिदानंद शेवडे,  कवी प्रल्हाद देशपांडे, जितेंद्र पेंढारकर, जयंत कुलकर्णी यांनी या सत्रांमध्ये श्रोत्यांना मार्गदर्शन केले आहे. हे व्यासपीठ केवळ तज्ञांनाच नव्हे तर नवोदितांनाही उपलब्ध असते. नरहर कुरुंदकरांपासून, युवाल नोआह हरारी, संस्कृत नाटके, पसायदान, अशा अनेक साहित्यिक रचनांवर शिवाय काव्य मैफिली आणि भारतीय दिनदर्शिका मापन अशा अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर ही सत्रे झाली आहेत.  

Sahityayatri final.jpg

साहित्ययात्री

जागतिकीकरणाच्या गतिमान युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. सुसंस्कृत शहरातली वाचनालये पुरेशा वाचकसंख्येअभावी बंद पडत आहेत. हे समाजाच्या  अधोगतीचे लक्षण आहे. वाचन संस्कृती माणसाला जगायला शिकवते. विविध विषयांवरची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात, त्यांतील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन विशाल होतो. यामुळेच ही वाचन संस्कृती नुसती टिकवायला हवी असे नाही तर ती बहरायला हवी. नव नवे वाचक पुस्तकांकडे वळायला हवेत. रसिक वाचकांची दखल घेतली जावी व त्यांचा उचित सन्मान व्हावा या हेतूने ध्रुव नॉलेज ॲन्ड वेल्फेअर सोसायटीने रसिक वाचकांसाठी, मराठी व इंग्रजी पुस्तकांच्या वाचनावर आधारित “साहित्ययात्री” ही एक अनोखी सांघिक स्पर्धा आयोजित केली. महाराष्ट्र शासनाने ही स्पर्धा पुरस्कृत तर केलीच शिवाय, मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील ही स्पर्धा आयोजित केली होती.   

गुंतवणूक माझ्यासाठी

'आर्थिक गुंतवणूक' हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातलया  स्थिरतेसाठी अत्यंत कळीचा विषय. पण गुंतवणूक नक्की कुठे? किती? आणि कधी? प्रत्यक्ष शेअर मार्केट / की म्युच्युअल फंड कि बँक बरी की LIC इन्शुरन्स चांगले? आणि गुंतवणूक कोणासाठी आवश्यक - साधारण उत्पन्न असणाऱ्यांसाठी की अधिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी?  बहुतांशी समाजातली चर्चा फक्त उत्पादनांवर चालते. त्यामागच्या विचारांवर नाही. आपला पैसा फक्त सुरक्षित राहायला हवा की वाढायला हवा? जोखीम कुठवर घ्यावी? अशा अनेक विषयांवर गुंतवणूकदार  पुरेसा विचार करत नाहीत. किंवा तो कसा करायचा यावरही मार्गदर्शन नसते.  हे मार्गदर्शन करण्याकरता ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी 'गुंतवणूक माझ्यासाठी ' ही चन्द्रशेखर टिळक  यांची आर्थिक गुंतवणुकीवर सशुल्क कार्यशाळा आयोजित करत असते. 

 

व्याख्याने

डॉ. अजिंक्य नवरे यांची हिंदू विचार चिंतन मालिका, चंद्रशेखर टिळक यांची भारतीय अर्थकारणामागचे राजकारण आणि समाजकारण, अटलजी आणि मोदीजी यांच्या नेतृत्व शैलीची तुलना अशा विविध विषयांवर व्याख्याने ध्रुव नॉलेज सोसायटीने आयोजित केली आहेत.


ज्ञानबोली प्रकल्प

मराठीतून ज्ञानाची उपलब्धता ही काळाची गरज आहे. केवळ भाषेवर प्रेम म्हणून नव्हे तर, डिजिटल भारतात इंग्रजीवर प्रभुत्व नाही म्हणून एक मोठा समाज घटक ज्ञानापासून वंचित राहतोय. समाज म्हणून आपण मराठी ज्ञानभाषा स्वीकारली जायची असेल तर त्यासाठी तशी उपलब्धता हवी. यासाठी ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी आपल्या परीने प्रयत्नरत आहे.  मराठी ही ज्ञानभाषा बनली पाहिजे म्हणून आम्ही ज्ञानबोली प्रकल्पांतर्गत मराठी भाषेतून विकिपीडिया वर माहिती उपलब्ध करून देत आहोत. शासनाचे विश्वकोष, शब्द कोष आहेतच परंतु लोकप्रिय माध्यम म्हणून विकिपीडिया सुद्धा वापरला जातो. त्यावर मराठी भाषेतून ज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून हा प्रकल्प कार्य करतो .

  1. ^ "शब्दांगण सत्र ५६".