देयता
व्यवसायाला किंवा व्यक्तीला इतरांना द्यावी लागणारी सर्व रक्कम 'देयता' (इंग्लिश : Liability) म्हणून ओळखली जाते. घेतलेले कर्ज किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केले फायदे याच्या मोबदल्यात रक्कम देण्याची जबाबदारी म्हणजे देयता होय.
प्रकार
[संपादन]१) स्थिर देयता (इंग्लिश : Fixed or Long Term Liability) - दीर्घकालीन सुरक्षित कर्जाला स्थिर देयता असे म्हणतात. हा व्यवसायाचा प्रमुख निधीस्त्रोत आहे.
उदा. बँकेचे दीर्घकालीन कर्ज, काही वर्षांनी परतफेड करण्याचे कर्जरोखे , प्रतिभूती
२) चल देयता (इंग्लिश : Current Liability) - एक वर्षाच्या कालवधीत देय असणाऱ्या रकमेला चल देयता असे म्हणतात.
उदा. उधारीवर घेतलेला माल, कर देयता, बँकेतून घेतलेली तात्पुरती उचल, रोख पत खात्याची नावे रक्कम.
३) संभाव्य देयता (इंग्लिश : Contingent Liability ) - देय असणारी अशी जबाबदारी जिची देय रक्कम किंवा देण्याची जबाबदारी अजून संभ्रमात आहे / नक्की झालेली नाही.
उदा. कंपनीवर काही नुकसान भरपाईचा खटला चालू आहे, बँकेच्या पतपत्र व्यवहारातील देणी, बँक हमी संदर्भातील देणे
द्विनोंदी लेखापालनातील वागणूक
[संपादन]देय खात्यांच्या बाबतीत द्विनोंदी लेखापद्धतीत खालील नियम पाळला जातो.संपत्ती खात्याच्या बाबतीत असणारे नियम इथेही उलट पद्धतीने लागू होतात
देणे देऊन टाकले की देयतेचे खाते नावे केले जाते (इंग्लिश : Debit the receiver )
देयतेची जबाबदारी आली की देयतेचे खाते जमा केले जाते (इंग्लिश : Credit the giver )
उदाहरण
[संपादन]१) अबक कंपनीने बँकेकडून रुपये १,००,०००/-चे कर्ज घेऊन यंत्र सामुग्री विकत घेतली.
या व्यवहारात बँकेला रुपये १,००,०००/- देण्याची जबाबदारी वाढली म्हणून बँकेचे खाते जमा केले जाईल. बँक धनको बनेल. तसेच यंत्रसामुग्री ही संपत्ती व्यवसायात आली म्हणून यांत्रासामुग्रीचे खाते नावे होईल
यंत्रसामुग्री खाते रुपये १,००,०००/- नावे बँक खाते रुपये १,००,०००/- जमा
२) अचानक गरज पडली म्हणून श्री क्षयज्ञ यांच्या कडून रुपये ५,०००/- उसने घेतले
श्री क्षयज्ञ यांना रुपये ५,०००/-चे देणे देण्याची जबाबदारी वाढली म्हणून त्यांचे खाते जमा होईल रोख रकमेत रुपये ५,०००/-ची वाढ झाली म्हणून रोख संपत्तीचे खाते नावे होईल
रोख खाते रुपये ५,०००/- नावे श्री क्षयज्ञ रुपये ५,०००/- जमा