दुसरे महायुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुसरे महायुध्द या पानावरून पुनर्निर्देशित)
दुसरे महायुद्ध
डावीकडून: वाळवंटात कॉमनवेल्थचे सैन्य; जपानी सैनिक चिनी नागरिकांना जिवंत पुरताना; अंतर्गत बंडाळीमध्ये रशियन सैन्य; जपानी युद्ध विमाने; बर्लिनमध्ये रशियन सैन्य; एक जर्मन पाणबुडी.
डावीकडून: वाळवंटात कॉमनवेल्थचे सैन्य; जपानी सैनिक चिनी नागरिकांना जिवंत पुरताना; अंतर्गत बंडाळीमध्ये रशियन सैन्य; जपानी युद्ध विमाने; बर्लिनमध्ये रशियन सैन्य; एक जर्मन पाणबुडी.
दिनांक १९३०२ सप्टेंबर, १९४५
स्थान युरोप, पॅसिफिक समुद्र, आग्नेय आशिया, चीन, मध्य-पूर्व, भूमध्य समुद्रआफ्रिका
परिणती दोस्त राष्ट्रांचा विजय
युद्धमान पक्ष
दोस्त राष्ट्रे
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ(१९४१-४५)
Flag of the United States अमेरिका(१९४१-४५)
भारत ध्वज भारत
चीन(१९३७-४५)

फ्रान्स ध्वज फ्रान्स
पोलंड ध्वज पोलंड
कॅनडा ध्वज कॅनडा,
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
Flag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया (१९४१-४५)
नॉर्वे ध्वज नॉर्वे(१९४०-४५)
बेल्जियम ध्वज बेल्जियम (१९४०-४५)
चेकोस्लोव्हाकिया ध्वज चेकोस्लोव्हाकिया
Flag of the Philippines फिलिपिन्स (१९४१-४५)
ब्राझील ध्वज ब्राझील (१९४२-४५)
व इतर....
अक्ष राष्ट्रे
नाझी जर्मनी ध्वज जर्मनी
जपान ध्वज जपान(१९३७-४५)
इटली ध्वज इटली(१९४०-४३)

हंगेरी ध्वज हंगेरी (१९४१-४५),
रोमेनिया ध्वज रोमेनिया (१९४१-४४),
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया (१९४१-४४),
थायलंड ध्वज थायलंड (१९४१-४५),
सहकारी राष्ट्रे
फिनलंड ध्वज फिनलंड (१९४१-४४),
इराक ध्वज इराक (१९४१),
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ (१९३९-४१),
व इतर....

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपआशियामध्ये दोस्त राष्ट्रेअक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.[१][२] यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटलीजपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.[३][४][५][६]

आढावा[संपादन]

युरोप[संपादन]

सप्टेंबर १, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. जर्मनीचा नेता ॲडॉल्फ हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने सोव्हिएत संघाशी त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोव्हिएत संघाने सप्टेंबर १७च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंग्डमफ्रान्सने सप्टेंबर ३ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर १९४०मध्ये जर्मन सैन्याने नॉर्वे, नेदरलँड्स, बेल्जियमफ्रान्स पादाक्रांत केले व १९४१मध्ये युगोस्लाव्हिया आणि ग्रीसचा पाडाव केला. इटलीने उत्तर आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली. १९४१ च्या मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश पश्चिम युरोप आपल्या टाचेखाली आणले होते परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते रॉयल एर फोर्सरॉयल नेव्हीने दिलेली कडवी झुंज.

आता हिटलर सोव्हिएत संघावर उलटला व जून २२, १९४१ रोजी त्याने अचानक सोव्हिएत संघावर चाल केली. ऑपरेशन बार्बारोसा या सांकेतिक नावाने योजलेल्या या मोहिमेत जर्मनीला सुरुवातीला भरभरून यश मिळाले. १९४१ शेवटीशेवटी जर्मन सैन्याने मॉस्कोपर्यंत धडक मारली परंतु येथे ही मोहीम अडकून पडली. सोव्हिएत सैन्याने कडवा प्रतिकार करीत जर्मनीचा रेटा मोडून काढला. पुढे सोव्हिएत सैन्याने स्टालिनग्राडला वेढा घालून बसलेल्या जर्मनीच्या सहाव्या सैन्यालाच प्रतिवेढा घालुन पूर्ण सैन्याला युद्धबंदी बनवले. कुर्स्कच्या युद्धात सोव्हिएत सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला व लेनिनग्राडचा वेढा. उठवला. जर्मन सैन्याने अखेर माघार घेतली. लाल सैन्याने त्यांचा बर्लिनपर्यंत पाठलाग केला. बर्लिनमध्ये जर्मन सैन्याने व सामान्य नागरिकांनी घराघरातून सोव्हिएत सैन्याला झुंज दिली परंतु प्रचंड प्रमाणात मिळत असलेल्या कुमकेच्या जोरावर सोव्हिएत सैन्याने बर्लिन जिंकले. याच सुमारास (एप्रिल ३०, १९४५ रोजी) हिटलरने आपल्या भूमिगत बंकरमध्ये आत्महत्त्या केली.

इकडे पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रांनी १९४३मध्ये इटलीवर चाल केली. १९४४मध्ये त्यांनी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर हल्ला केला व फ्रान्सला जर्मन आधिपत्यातून मुक्त केले. जर्मनीने चढवलेल्या प्रतिहल्ल्याला ऱ्हाईन नदीच्या किनाऱ्यावर बॅटल ऑफ द बल्ज नावाने प्रसिद्ध लढाईत दोस्त राष्ट्रांनी जबरदस्त उत्तर दिले व येथून आगेकूच करित त्यांनी जर्मनी गाठले आणि एल्ब नदीच्या किनाऱ्यावर पूर्वेकडून चालून आलेल्या सोव्हिएत सैन्याशी संधान बांधले. यावेळी जर्मनीच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली व हार मान्य केली.

युरोपमध्ये चाललेल्या या धुमश्चक्री दरम्यान जर्मन राष्ट्राकडून चालविण्यात आलेल्या वंश हत्येत ६०,००,००० ज्यू व्यक्तींचा बळी गेला. याला ज्यूंचे शिरकाण अथवा होलोकॉस्ट म्हणण्यात येते.

आशिया व प्रशांत महासागर[संपादन]

युरोपमध्ये युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी जपानने जुलै ७, १९३७ रोजी चीनवर आक्रमण केले.,[७][८] जपानचा रोख चीनमधून पूर्व आणि आग्नेय आशियावर स्वारी करीत एकएक देश जिंकायचा होता. यात मिळालेल्या यशानंतर जपानने डिसेंबर ७, १९४१च्या दिवशी अनेक राष्ट्रांवर एकाच वेळी हल्ला केला. याच दिवशी पर्ल हार्बर येथे अमेरिकेच्या नौदलावरही हल्ला चढवला गेला. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने युद्धात उतरण्याचे निश्चित केले.

पुढील सहा महिने जपानला घवघवीत यश मिळाले पण कॉरल समुद्राच्या लढाईत अमेरिकन नौसैन्याने त्यांचा प्रतिकार केला व मिडवेच्या लढाईत जपानने हार पत्करली. यात जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवून अमेरिकेने जपानी नौसैन्याचा कणाच मोडला. येथून दोस्त राष्ट्रांनी जपानवर प्रतिहल्ला चढवला व मिल्ने बेग्वादालकॅनालच्या लढाईत त्यांनी विजय मिळवला. नैर्ऋत्य प्रशांत महासागरातमध्ये विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी मग प्रशांत महासागराच्या मध्य भागावर रोख धरून मोहीम काढली. यात जपानी सैन्याने त्यांचा कडवा प्रतिकार केला. या मोहीमेदरम्यान फिलिपाईन समुद्राची लढाई, लेयटे गल्फची लढाई, इवो जिमाओकिनावाची लढाई, इ. अनेक भयानक सागरी युद्धे लढली गेली.

या दरम्यान अमेरिकन पाणबुड्यांनी जपानकडे जाणारी रसद तोडण्यात यश मिळवले. याने जपानची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा होऊ लागली. १९४५मध्ये दोस्त राष्ट्रांच्या वायुदलाने जपानवर अनेक वादळी हल्ले चढवले. मुख्यत्वे नागरी वस्त्या व कारखान्यांवर झालेल्या या हल्ल्यांनी जपानची युद्धप्रवण राहण्याची शक्ती कमी झाली.

अखेर ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर परमाणु बॉम्ब टाकला. ऑगस्ट ९ला अमेरिकेने नागासाकी शहरावर असाच हल्ला केला व जोपर्यंत जपान शरण येत नाही तोपर्यंत एक एक करित जपानी शहरे बेचिराख करण्याची धमकी दिली. जपानने ऑगस्ट १५, १९४५ रोजी बिनशर्त शरणागती पत्करली व दुसऱ्या महायुद्धाचा अधिकृतरीत्या अंत झाला.[९]

पर्यवसान[संपादन]

या अतिभयानक युद्धात अंदाजे ६,२०,००,००० (सहा कोटी वीस लाख) व्यक्ती मरण पावल्या. हे म्हणजे जगाच्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्या २.५ % होय.[१०] अर्थात, हा केवळ अंदाज आहे व प्रत्येक राष्ट्राचे अंदाज वेगवेगळे आहेत. युरोपमधील आणि आशियामधील अनेक देश या युद्धात बेचिराख झाले. त्यातून सावरायला त्यांना पुढील अनेक दशके घालवावी लागली. दुसऱ्या महायुद्धाचे राजकीय,[११] सामाजिक, आर्थिक[१२][१३][१४] तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगावर झालेले प्रभाव आजदेखील दिसून येतात.

कारणे[संपादन]

जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण व जपानचे चीन, अमेरिका व ब्रिटिश आणि डच वसाहतींवरचे आक्रमण ही दुसऱ्या महायुद्धाची कारणे समजली जातात.[१५] [१६]जगाच्या दोन्ही बाजूच्या या घटनांचे कारण होते जर्मनी व जपानमधील हुकूमशाही सत्ताधीश व त्यांची जगज्जेते होण्याची महत्त्वाकांक्षा. जरी या दोन्ही सत्तांनी आपले पाय पसरवण्यास आधीच सुरुवात केली असली तरी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली ती या झोंडशाहीला झालेल्या सशस्त्र विरोधाने.

जर्मनीत नाझी पक्ष जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आला असला तरी एकदा हातात सत्ता आल्यावर पक्षाधिकाऱ्यांनी जर्मनीतील लोकशाही व्यवस्थेची लक्तरे काढली.[१७] असे असून जर्मन जनतेने त्यांना पाठिंबा दिला कारण पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यावर त्यांना जर्मन स्वाभिमानाला जागे करणारे सरकार प्रथमतःच मिळालेले होते.[१८] पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करताना व्हर्सायच्या तहातील २३१वे कलम जर्मन जनतेला असह्य झाले होते.[१९] या शिवाय साम्यवाद-विरोध आणि आर्थिक सुबत्ता व प्रगतीच्या वचनांना भुलून जर्मनीने नाझी पक्षाला व पर्यायाने एडॉल्फ हिटलरला अमर्याद सत्ता बहाल केली. हिटलरने जर्मनीला आपल्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या सगळ्या देशांना जर्मन सत्तेखाली आणण्याचे वचन दिले व त्यादृष्टीने पावलेही उचलली. नाझी पक्षाने (व स्वतः हिटलरनेही) हिटलरला जर्मनीचा तारणहार असल्याचे भासवले,[२०] व येथून एका भस्मासुराचा जन्म झाला.

इकडे जपानमध्ये क्रिसॅंथेमम (जास्वंदी) वंशाच्या राजांचे राज्य असले तरी खरी सत्ता होती ती सैन्यातील अत्त्युच्च अधिकाऱ्यांच्या टोळक्याकडे. जपानला जगातील महासत्ता करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जपानने या नेतृत्वाखाली मांचुरियावर १९३१मध्ये व चीनवर १९३७मध्ये आक्रमण केले होते. यामागचे कारण होते ते चीन व मांचुरियातील नैसर्गिक संपत्ती बळकावून त्याद्वारे आपला प्रभाव अधिक मजबूत करणे. युनायटेड किंग्डमअमेरिकेने या युद्धात जरी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी त्यांनी चीनला आर्थिक व सैनिकी मदत केली. याशिवाय त्यांनी जपानविरुद्ध आर्थिक नाकेबंदी करीत जपानला मिळणारे खनिज तेल व इतर रसद कापली. यामुळे जपानला चीन व मांचुरियातील युद्ध जास्त काळ चालू ठेवणे अशक्य झाले व त्यांनी तेथून काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. आता जपानकडे उपाय होते म्हणजे चीनचा जिंकलेला प्रदेश परत करणे, खनिज तेल व इतर कच्च्या मालाची इतर पुरवठे शोधणे किंवा हे मिळवण्यासाठी अजून काही देश/प्रांत जिंकणे. आग्नेय आशियातील फिलिपाईन्स आणि डच, फ्रेंच व ब्रिटिश वसाहतींमधून या खनिजांचा मुबलक पुरवठा होता व हा भाग चीनमधून हल्ला करण्याच्या टप्प्यातही होता. जपानचा समज होता की आशियातील युरोपीय सत्ता युरोपमध्ये सुरू झालेल्या युद्धात गुंतल्या होत्या व आशियात लक्ष देण्याची त्यांना फुरसत नव्हती. सोव्हिएत संघ जर्मनीशी संधान बांधून असले तरी त्यांच्यात कुरबुर सुरूच होती आणि अमेरिका युद्ध करण्याआधी संधी/करार करण्याचा प्रयत्न करेल. ही परिस्थिती जपानने आग्नेय आशिया गिळंकृत करण्यास साजेशीच होती. हा अंदाज बांधून जपानने डच व ब्रिटिश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड फुटले.

सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. त्याला खीळ घालण्यासाठी जपानने डिसेंबर ७, १९४१रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बर येथील नौसेना तळावर जबरदस्त हल्ला केला व तेथील आरमार उद्ध्वस्त केले. अमेरिकेला आता युद्धात उतरणे भागच होते. अशा प्रकारे अमेरिकेचा या युद्धात प्रवेश झाला.

घटनाक्रम[संपादन]

युद्धाची सुरुवात - इ.स. १९३९[संपादन]

युरोपियन रणांगण[संपादन]

जर्मनीची आगळीक

१९३९ च्या सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंडझेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत.

युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला.

हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्स द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, बेकारी व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने ऱ्हाइनलॅंडरुह्र प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला.

हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे (रोमा जिप्सी, ज्यू, इ.) सर्रास शिरकाण सुरू केले.

युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार

जर्मनीत हे सुरू असताना ब्रिटिश व फ्रेंच सरकारने त्याविरुद्ध पावले उचलायच्या ऐवजी जर्मनीच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यांना जर्मनीशी उघड संघर्ष टाळायचा होता कारण पहिले महायुद्ध संपून जेमतेम २० वर्षे होत होती. संपूर्ण युरोप त्यातून सावरत होता व अजून एक युद्ध झाल्यास युनायटेड किंग्डमफ्रान्सच नव्हे तर युरोपमधील प्रत्येक देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांनी जर्मनीला ढील देणेच पसंत केले. याचे पर्यवसान १९३८ च्या म्युनिक करारात झाले. याआधी जर्मनीने चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेश बळकावले होते व अजून पुढे सरकण्याच्या तयारीत असताना फ्रान्स व ब्रिटनने जर्मनीची ही आगळीक मान्य केली व चेकोस्लोव्हेकियाचे प्रदेश जर्मनीला देऊन टाकले. चेम्बरलेनने जाहीर केले की म्युनिक करार हा "आपल्या काळातील शांततेचेच प्रतीक" आहे. मऊ लागल्यावर कोपराने खणल्यासारखे जर्मनीने मार्च १९३९मध्ये उरलेले चेकोस्लोव्हेकियासुद्धा बळकावले. जर्मनीच्या मनसूब्यांबद्दल भ्रमात राहिलेल्या दोस्त राष्ट्रांकडे नुसते बघत बसण्यापेक्षा काही गत्यंतर नव्हते. या व अशा छोट्या-मोठ्या चालींनंतर वर्षभरात युद्धाला तोंड फुटले.

म्युनिक करार निष्फळ ठरल्यावर ब्रिटन/फ्रान्ससना कळले की हिटलरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून चालणार नव्हते व जर्मन महत्त्वाकांक्षा नुसते आसपासचे प्रदेश गिळंकृत करून थांबणार नव्हती. मे १९, १९३९ला पोलंडने व फ्रान्सने परस्पर-मैत्री करार केला व एकावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतील धावून येण्याचे मान्य केले. ब्रिटन व पोलंडमध्ये असाच करार मार्चमध्ये झालेला होता. इकडे जर्मनी व सोव्हिएत संघाने ऑगस्ट २३, १९३९ला मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करारावर सह्या केल्या. या करारात जर्मनी व सोव्हिएत संघाने युरोप जिंकून घेणे गृहित धरले होते व त्यानंतर युरोप आपापसात कसा वाटून घ्यायचा याची नोंद होती. तोपर्यंत दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या सैनिकी कार्रवाईत दखल न देण्याचे कबूल केले व सोव्हिएत संघाकडून जर्मनीला खनिज तेल व इतर रसद पुरवण्याची तरतूद घातली. या कलमामुळे जर्मनीची उत्तर समुद्रातून येणाऱ्या मालवाहतूकीवरील भीस्त कमी झाली. पहिल्या महायुद्धात हा वाहतूकमार्ग रोखून धरून ब्रिटनने जर्मनीच्या नाकीतोंडी पाणी आणले होते. ही तरतूद झाल्यावर हिटलरची पोलंड व वेळप्रसंगी ब्रिटन व फ्रान्सशीही युद्ध करण्याची तयारी झाली. पुढचे पाउल होते ते काहीतरी कुरापत काढणे. जर्मनीने जाहीर केले की डान्झिगच्या स्वतंत्र शहरात जर्मन व्यक्तींवर अन्याय होत आहे व याचा उपाय करण्यासाठी जर्मनी डान्झिग व पोलंडमधील अन्य शहरे जिंकून घेईल. हे पाहून पोलंड ने ऑगस्ट २५रोजी युनायटेड किंग्डमशी नव्याने मैत्री करार केला, पण त्याचा जर्मन बेतांवर काही प्रभाव पडला नाही.

जर्मनी व सोव्हिएत संघाचे पोलंडवर आक्रमण

जर्मन आक्रमकांशी लढणारे पोलिश सैनिक, सप्टेंबर १९३९

सप्टेंबर १, १९३९रोजी जर्मनीने खोटी पोलिश हल्ल्याची सबब सांगून पोलंडवर आक्रमण केले. युद्धोत्तर अहवालात कळून आले की पोलंडने जर्मन ठाण्यावरील तथाकथित हल्ला झालाच नव्हता. सप्टेंबर ३ला भारतासह युनायटेड किंग्डम व फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. काही दिवसातच कॅनडा, ऑस्ट्रेलियान्यू झीलंडनेही त्यांचा साथ देण्याचे जाहीर केले. फ्रान्सने जरी युद्ध जाहीर केले असले तरी त्यांची हालचाल संथ होती. सार प्रांतात नावापुरती चढाई केल्यावर काही दिवसात तीसुद्धा सोडून दिली. युनायटेड किंग्डमला नौसेनेच्या कवायती करण्याशिवाय काही करणे शक्य नव्हते. इकडे जर्मनीने पोलिश सैन्याची वाताहत करीत सप्टेंबर ८ रोजी पोलंडची राजधानी वॉर्सोपर्यंत धडक मारली.

सप्टेंबर १७ला सोव्हिएत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारात ठरवल्याप्रमाणे पोलंडवर पूर्वेकडून चाल केली. पोलिश सैन्याला आता दुसरी आघाडी उघडणे भाग पडले व त्यामुळे आधीच खिळखिळी झालेली बचावाची फळी कोलमडली. पराभव अटळ दिसताना पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व सरसेनापतीने दुसऱ्याच दिवशी रोमेनियात पळ काढला. वॉर्सोतील सैन्याने महिनाभर तग धरली पण ऑक्टोबर १ रोजी जर्मन सैन्य शहरात घुसले. ४-५ दिवस घराघरातून युद्ध करून ऑक्टोबर ६ला पोलिश सैन्याने हत्यारे खाली ठेवली. काही तुकड्या पळून शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या व तेथून त्यांनी भूमिगत सशस्त्र चळवळ उभारली. या चळवळीने युद्धाच्या अखेरच्या दिवसांत दोस्त राष्ट्रांची मोठी मदत केली. जरी राजधानी व जवळजवळ संपूर्ण देशाचा पाडाव झाला तरी पोलंडने अधिकृतरीत्या जर्मनीकडे शरणागती पत्करली नाही.

खोटे युद्ध

पोलंडच्या पाडावानंतर १९३९ च्या हिवाळ्यात जर्मनीने आपली वाटचाल तात्पुरती थांबवली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आपली बचावफळी पक्की केली व पुढील हल्ल्यांची योजना आखणे चालू ठेवले. इकडे ब्रिटन व फ्रान्सने आपले बचावात्मक धोरण चालूच ठेवले. एप्रिल १९४०पर्यंत कोणीच काही मोठी हालचाल केली नाही. वृत्तपत्रांनी या कालावधीला खोटे युद्ध अथवा सिट्झक्रीग असे उपहासात्मक नाव दिले.

अटलांटिकची लढाई

पूर्व युरोपमध्ये लढाई सुरू होताच उत्तर अटलांटिक समु्द्रात जर्मन यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या या पाणबुड्यांची संख्या जास्त नसली तरी ही कसर त्यांनी त्यांची कुशलता, हिंमत व नशीबाने भरून काढली. ब्रिटिश क्रुझर एच.एम.एस. करेजस अशाच एका यु-बोटीला बळी पडली तर अजून एका यु-बोटीने एच.एम.एस. रॉयल ओक या युद्धनौकेला बंदरातून बाहेर पडण्याची संधी न देताच जलसमाधी दिली. युद्धाच्या पहिल्या चार महिन्यात यु-बोटींनी ११० जहाजे बुडवली व व्यापारी जहाजवटीवर भीतीचे सावट पसरवले.

दक्षिण अटलांटिक समुद्रात जर्मन पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पीने नऊ ब्रिटिश व्यापारी नौका बुडवल्या. अखेर एच.एम.एस. अजॅक्स, एच.एम.एस. एक्झेटरएच.एम.एन.झेड.एस. अकिलीस ने तिला मॉॅंटेव्हिडियोजवळ गाठले. प्लेट नदीच्या लढाईत ग्राफ स्पीला पराभव अटळ दिसता तिच्या कप्तान हान्स लांग्सदोर्फ याने समुद्राकडे प्रयाण केले व पकडले जाण्यापेक्षा स्वतःच ग्राफ स्पीला जलसमाधी दिली.

पॅसिफिक रणांगण[संपादन]

दुसरे चीन-जपान युद्ध

पूर्वेतील युद्ध युरोपच्या आधीच दोन वर्षे सुरू झाले होते. जपानने १९३१मध्ये मांचुरिया जिंकून तेथे तळ ठोकलेला होता. जुलै ७, १९३७ रोजी जपानने मांचुरियाची हद्द ओलांडून बिजींगवर (तेव्हाचे बिपींग) हल्ला चढवला. विद्युतवेगाने आगेकूच करीत जपानी सैन्य शांघायपर्यंत पोचले परंतु तेथे त्यांची प्रगती थांबली. डिसेंबर १९३७मध्ये शांघाय पडले व लगेचच राजधानीचे शहर नानजिंग (तेव्हाचे नानकिंग) ही जपानने जिंकले. चीनी सरकारने नानजिंगहून पळ काढून चॉॅंगकिंग येथे कामचलाऊ राजधानी उभारली. नानजिंग जिंकल्यावर जपानी सैन्याने तेथील युद्धकैदी व नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले (पहा - नानकिंगची कत्तल)व एका महिन्यात सुमारे ३,००,००० व्यक्तींची कत्तल केली.

दुसरे रशिया-जपान युद्ध

जपानमंगोलियाच्या सरहद्दीवर खाल्का नदी आहे. मांचुरियातील जपानी राजवटीनुसार ही मांचुरिया-मंगोलियाच्यामधील हद्द होती. मंगोलियाच्या मते हद्द नदीपलीकडे ३० किमी पूर्वेस होती. मे ८, १९३९ रोजी ७०० मोंगोल घोडेस्वार नदी पार करून पूर्वेस आले. ते पाहताच मांचुरियन सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही दिवसातच सोव्हिएत संघाने मंगोलिया व जपानने मांचुरियाच्या सैन्याच्या मदतीला आपले सैन्य पाठवले व तुंबळ युद्धास सुरुवात झाली. सप्टेंबरपर्यंत चालू असलेल्या या युद्धात १८,००० जपानी तर ९,००० सोव्हिएत-मंगोल सैनिक मृत्यू पावले. येथे सुरू असलेले युद्ध थांबले नसते व एकाच वेळी येथ तसेच जर्मनीशीसुद्धा लढायची पाळी आली तर सोव्हिएत संघाला दोन्ही आघाड्या संभाळणे कठीण गेले होते. सोव्हिएत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारावर सही करण्यामागे हेही एक कारण होते.

युद्ध पसरले - इ.स. १९४०[संपादन]

युरोपीय रणांगण[संपादन]

सोव्हिएत संघाचे बाल्टिक देशांवर आक्रमण

जर्मनीसोव्हिएत संघात युद्धाच्या आधी झालेल्या मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारानुसार फिनलंडला सोव्हिएत संघाचे मांडलिक राष्ट्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार सोव्हिएत संघाने नोव्हेंबर ३०, १९३९ रोजी फिनलंडवर हल्ला केला. येथून सुरू झालेल्या युद्धाला हिवाळी युद्ध म्हणतात. सोव्हिएत संघाने फिनिश सैन्याच्या चौपट सैनिक पाठवले तरीही त्यांची पुरेशी प्रगती झाली नाही. फिनिश बचावाची फळी भक्कम होती व त्यांनी पहिला हल्ला रोखून धरला. हळूहळू लाल सैन्याने आपले हल्ले तिखट केले व फळी फोडण्यात यश मिळवले. फिनलंडने तहाची बोलणी सुरू केली व लेनिनग्राडला लागून असलेले व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश सोव्हिएत संघाला दिले. या अकारण सुरू केलेल्या युद्धाविरुद्ध जगातील इतर देशांनी विरोध दर्शविला व डिसेंबर १४ला सोव्हिएत संघाची लीग ऑफ नेशन्समधून हकालपट्टी झाली. यामुळे सोव्हिएत संघाला जणू अधिक आगळीक करण्याची मुभाच मिळाली. जून १९४०मध्ये त्यांनी लात्व्हिया, लिथुएनिया आणि एस्टोनियाचा पाडाव केला व तेथील सत्ताधारी व्यक्तींना सैबेरियातील गुलागमध्ये पाठवून दिले. याशिवाय सोव्हिएत संघाने रोमेनियाकडून बेसारेबियाउत्तर बुकोव्हिना हे प्रांतही बळकावले.

जर्मनीचे डेन्मार्कवर व नॉर्वेवर आक्रमण

सोव्हिएत संघ व फिनलंडमधील हिवाळी युद्ध संपताना जर्मनीने एप्रिल ९, १९४०ला एकाच वेळी डेन्मार्कनॉर्वेवर ऑपरेशन वेसेरुबंग या सांकेतिक नावाखाली मोहीम काढली. डेन्मार्कने लगेचच नांगी टाकली पण नॉर्वेने प्रतिकार केला. युनायटेड किंग्डमने नॉर्वेवर चढाई करण्याचा बेत आखलेलाच होता. त्यांनी आपले सैनिक उत्तर नॉर्वेत उतरवले पण जूनपर्यंत जर्मन सैन्य वरचढ ठरले व दोस्त राष्ट्रांनी नॉर्वेतून काढता पाय घेतला. नॉर्वेच्या सैन्याने शरणागती पत्करली व जवळजवळ संपूर्ण नॉर्वे जर्मनीच्या ताब्यात आले. नॉर्वेचा राजा आपल्या कुटुंबियांसह लंडनला पळून गेला. नॉर्वेचा सागरी किनारा हातात आल्यावर जर्मनीने तेथे हवाई व नौसेनेचे तळ उभारले व आर्क्टिक समुद्रातून होणाऱ्या पुढील मोहीमेची तयारी सुरू केली.

जर्मनीचे फ्रान्सवर व 'खालच्या देशांवर' आक्रमण

पॅरिसच्या शॉंझ एलिझे रस्त्यावर जर्मन सैनिक, जून १९४०

लक्झेम्बर्ग, बेल्जियमनेदरलँड्स हे समुद्रसपाटीपासून समतल व काही प्रदेशात समुद्राच्या पातळीच्याही खाली आहेत म्हणून त्यांना लो कन्ट्रीज अथवा खालचे देश असे म्हणतात. मे १०, १९४० रोजी जर्मनीने या तीनही देश व शिवाय फ्रान्सवर हल्ला केला. या घटनेने खोटे युद्ध संपले व खरे युद्ध परत सुरू झाले. जर्मनीला रोखण्यासाठी ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स व फ्रेंच सैन्य उत्तर बेल्जियममध्ये घुसले. दक्षिणेत फ्रान्सने मॅजिनो लाईनवर आपली बचावफळी तयार केलेली होती. तेथे जर्मन सैन्याला अडवून ठेवून उत्तरेत गनिमी काव्याने जर्मनीशी लढायचे असा त्यांचा बेत होता पण जर्मनीने ब्लिट्झक्रीग अथवा विद्युतवेगी युद्धाचा अत्युत्तम नमूना दाखवत फ्रेंच व ब्रिटिश सैन्याचा धुव्वा उडवला. इकडे लुफ्तवाफेने नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरावर बॉम्बफेक करून शहराचा विनाश केला.

हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात वेह्रमाख्टची (जर्मन सेना) पॅन्झरग्रुप फोन क्लाईस्ट ही तुकडी सुसाट आर्देन्नेस पार करून गेली. दोस्त राष्ट्रांचा अंदाज होता की दाट जंगल असलेला हा प्रदेश यांत्रिकी व रणगाड्यांना पार करणे अशक्य होते. हा अंदाज चुकीचा ठरवत जर्मन सैन्याने सेदान येथे येऊन धडकले. सेदानचे रक्षण करणारे सैन्यदल हे फ्रेंच सैन्याचे नेहमीचे सैनिक नव्हते. येथे हल्ला होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने येथे कुमक जास्त नव्हती. वेह्रमाख्टने सहजगत्या बचावाची फळी फोडली आणि पश्चिमेकडे आगेकूच करीत थेट इंग्लिश चॅनेल पर्यंत जाऊन पोचले. जर्मन सैन्याच्या दुसरे सैन्याने बेल्जियम, लक्झेम्बर्ग व नेदरलँड्सचा सहजगत्या पाडाव केला. आता दोस्तराष्ट्रांचे सैन्य दुभागले गेले व उत्तर फ्रान्स व खालच्या देशातले सैनिक जर्मन सैन्याच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या समोर आता आत्मसमर्पण करणे किंवा पळ काढणे हेच पर्याय होते. ऑपरेशन डायनॅमो या मोहिमेअंतर्गत ३,३८,००० दोस्त सैनिकांना डंकर्कहून उचलण्यात आले. युद्धनौका, होड्या, व मिळेल त्या तरंगणाऱ्या वाहनांतून या सैनिकांनी इंग्लंड गाठले.

जून १०ला इटली जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले व फ्रान्सच्या दक्षिणेकडून त्यांनी हल्ला केला. जर्मन सैन्याने फ्रान्समध्ये अनिर्बंध कूच सुरू ठेवली व जवळजवळ सगळे फ्रान्स आपल्या टाचेखाली आणले. जून २२, १९४० रोजी फ्रान्सने शस्त्रसंधीची याचना केली व शरणागती पत्करली. जर्मन सैन्याने पॅरिसमध्ये तळ ठोकला व आग्नेय फ्रान्समध्ये विची फ्रान्स हे नावापुरते स्वतंत्र परंतु खरेतर जर्मनधार्जिणे सरकार बसवले. अशाप्रकारे बॅटल ऑफ फ्रान्स ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

बॅटल ऑफ ब्रिटन

फ्रान्सवरची मोहीम विजयी होत असताना जर्मनीने युनायटेड किंग्डमवर ऑपरेशन सी लायन या नावाच्या मोहिमेची आखणी सुरू केली. ब्रिटिश सैन्याने डंकर्कहून पळ काढताना बरीचशी हत्यारे, जड तोफा व रसद तेथेच टाकून दिली होती व त्यामुळे ब्रिटिश सैन्याची स्थिती अगदी केविलवाणी झाली होती. असे असता जर एक घणाघाती घाव घातला तर युनायटेड किंग्डमने गुडघे टेकले असते. पण ब्रिटनवर हल्ला करायचा तर त्यासाठी समुद्र पार करावा लागणार होता किंवा आरमारी वेढा घालावा लागला असता. रॉयल नेव्हीशी टक्कर देणे जर्मन आरमाराला शक्य नव्हते पण काही करून ब्रिटीिद्वीपांवर सैन्य उतरवता आले व त्याला हवेतून आधार देता आला तर विजय निश्चित होता. त्यासाठी आधी रॉयल एर फोर्सचा समाचार घेणे आवश्यक होते. लुफ्तवाफेरॉयल एर फोर्सच्या या लढाईला बॅटल ऑफ ब्रिटन म्हणतात. लुफ्तवाफेने सुरुवात केली ती रॉयल एर फोर्सच्या विमानतळ व रडारचा वेध घेऊन. मोडक्यातोडक्या धावपट्ट्यांवरूनसुद्धा उड्डाणे भरून आर.ए.एफ.च्या वैमानिकांनी त्यांचा प्रतिकार सुरू केला व धाव घेतली थेट बर्लिनकडे. राजधानी बर्लिनवरील झालेल्या बॉम्बफेकीमुळे ॲडॉल्फ हिटलरचा संताप झाला व त्याने लंडन शहरावर हल्ले सुरू करण्याचे आदेश दिले. द ब्लिट्झ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये लंडनचे अतोनात नुकसान झाले. आर.ए.एफ.ने आपल्या स्पिटफायरहरिकेन विमानांनी कसेबसे का होईना हे हल्ले परतवून लावले व लुफ्तवाफेला हवेत वर्चस्व मिळू दिले नाही. इकडे समुद्रात रॉयल नेव्हीने जर्मन आरमाराला रोखून धरले व इंग्लंडवर चढाई करण्याचा हिटलरचा मनसुबा धुळीत मिळाला. आता युनायटेड किंग्डमचा नाद सोडून हिटलरने आपली नजर पूर्वेकडे वळवली.

इटलीचे ग्रीसवर आक्रमण

युद्धापूर्वीच इटलीने आल्बेनियावर चढाई केलेली होती. ऑक्टोबर २८, १९४० रोजी तेथून त्यांनी ग्रीसवर हल्ला केला. ग्रीक सैन्याने तिखट उत्तर दिले व पुढील दोन महिन्यात इटलीलाच मागे रेटत अल्बेनियाचा एक चतुर्थांश भाग काबीज केला. रॉयल नेव्हीने ग्रीसच्या मदतीला येऊन इटलीच्या आरमाराविरुद्ध कारवाया सुरू केल्या. या धामधुमीत इटलीचे ५,३०,००० सैनिक अडकून पडले व त्यांची प्रगती खुंटली.

आशियातील व प्रशांत महासागरातील रणांगण[संपादन]

दुसरे चीन-जपान युद्ध

१९४० च्या सुमारास येथील युद्ध थंडावले होते. इतस्ततः हल्ल्यात कोणत्याच बाजूला निर्णायक विजय मिळत नव्हता. अमेरिका जरी अधिकृतरीत्या तटस्थ असले तरी चीनला त्यांची भरघोस आर्थिक मदत होती, शिवाय चिनी वायुदलाच्या मदतीला काही अमेरिकन वैमानिकही पाठविण्यात आले होते.

आग्नेय आशियातील युद्ध

जुलै १९४०मध्ये फ्रेंच इंडो-चायनामध्ये आपल्याला लष्करी तळ उभारण्यासाठी जागा पाहिजे असल्याचे जपानने सूतोवाच केले. फ्रान्स व इतर पाश्चिमात्य देशांनी अर्थातच ही मागणी धुडकावून लावली. अमेरिकेने १९११ च्या जपान-अमेरिका व्यापारी करारातून अंग काढून घेतल्याचे जाहीर केले व जपानला युद्धसामग्री निर्यात करण्यावर बंदी घातली. जपानने सप्टेंबर २२ रोजी जपानी सैन्याने उत्तर फ्रेंच इंडो-चायना वर चाल केली.

उत्तर आफ्रिकेचे रणांगण[संपादन]

फ्रेंच आरमाराने नांगी टाकल्यावर भूमध्य समुद्रातील वर्चस्वासाठी रॉयल नेव्हीइटलीच्या आरमारात चढाओढ सुरू झाली. रॉयल नेव्हीने आपल्या जिब्राल्टर, माल्टाइजिप्तच्या अलेक्झांड्रिया, इजिप्त बंदरातील तळांवरून कारवाया सुरू ठेवल्या. ऑगस्टमध्ये इटालियन सैन्याने ब्रिटिश सोमालीलॅंड जिंकले व पुढील महिन्यात लिबियामधून इजिप्तमधील ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला. इटलीचा बेत होता सुएझ कालवा जिंकायचा. असे झाल्यावर भारत व इंग्लंडमधील नौकानयन बंद पडले असता व इंग्लंडला मिळणारी रसद व पैसा कमी होऊन युद्धातील जोर कमी झाला असता. या हल्ल्याला ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व भारतीय फौजांनी ऑपरेशन कंपास या मोहीमेत प्रत्युत्तर दिले व कालवा ब्रिटिश हातातच ठेवला. जर्मनीने आपली आफ्रिका कॉर्प्स नावाने नंतर ख्यातनाम झालेली रणगाड्यांची सेना जनरल इर्विन रोमेलच्या नेतृत्वाखाली लिब्यात उतरवली.

युद्ध जगभर पसरले - इ.स. १९४१[संपादन]

युरोपीय रणांगण[संपादन]

लेंड लीझ

फ्रान्समध्ये प्रयत्नांची शर्थ करताना युनायटेड किंग्डमचे लश्करी बळ रोडावले होते. भारत व इतर वसाहतींतून अमाप संपत्ती ओढूनसुद्धा राष्ट्र आता भिकेला लागण्याची चिह्ने होती. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकन काँग्रेसला पटवून दिले की अमेरिकेने जर ब्रिटिश साम्राज्याला मदत नाही केली तर युद्ध अमेरिकेच्या दाराशी येण्यास वेळ लागणार नाही. कॉॅंग्रेसने युद्धात उतरण्यास नकार दिला परंतु युनायटेड किंग्डम व ३७ इतर दोस्त राष्ट्रांना ५,००,००,००,००० (पाच अब्ज) अमेरिकन डॉलरचे युद्धसाहित्य व इतर रसद पुरवण्याचे मान्य केले. यातील ३,४०,००,००,००० डॉलर हे युनायटेड किंग्डमसाठी राखीव होते. अमेरिकन कॉॅंग्रेसचा हा ठराव लेंड लीझ नावाने ओळखण्यात येतो. कॅनडाने देखिल ४,७०,००,००,००० (चार अब्ज सत्तर कोटी) अमेरिकन डॉलरचे साहित्य युनायटेड किंग्डमला पाठवले.

जर्मनीचे ग्रीसवर, क्रीटवर व युगोस्लाव्हियावर आक्रमण

मार्च २८ला रॉयल नेव्हीने इटालियन आरमाराशी भूमध्य समुद्रात केप माटापानजवळ झुंज घेतली. जवळजवळ एकतर्फी झालेल्या या लढाईत इटालियन आरमाराने तीन विनाशिका व पाच क्रुझर गमावल्या. रॉयल नेव्हीची दोन विमाने खर्ची पडली. पांगळ्या झालेल्या इटालियन आरमाराची ग्रीसमध्ये समुद्रमार्गे सैनिक पोचवण्याची कुवत कमी झाली. एप्रिल ६, १९४१ रोजी जर्मनी, इटली, हंगेरीबल्गेरियाच्या सैन्यांनी युगोस्लाव्हियावर चढाई केली. नाममात्र प्रतिकार मोडून काढत हे आक्रमक १० दिवसांत राजधानीपर्यंत पोचले व शरण आलेल्या युगोस्लाव्हियात त्यांनी अक्ष-धार्जिणे सरकार बसवले. जरी युगोस्लाव्ह सैन्याने लढा दिला नसला तरी तेथील नागरिकांनी दोन भूमिगत सशस्त्र चळवळी उभारल्या. या दोन्हींनी अक्ष राष्ट्रांबरोबर एकमेकांवरही हल्ले सुरू ठेवले. याच दिवशी (एप्रिल ६) जर्मनीने बल्गेरियातून ग्रीसवर हल्ला केला. इटलीला प्रखर लढा देणाऱ्या ग्रीक सैन्याची कुवत जर्मनीच्या अफाट सैन्यापुढे कमी पडली व त्यांनी माघार घेतली. एप्रिल २७ला अथेन्सचा पाडाव होण्यापूर्वी युनायटेड किंग्डमने ५०,००० ग्रीक सैनिकांना उचलले. जरी ग्रीस पडले असले तरी जर्मनीचे सैन्य बरेच दक्षिणेला आले होते. परत आपल्या आघाडीवर जाण्यात त्यांचे जवळजवळ ६ आठवडे खर्ची पडले. याची जर्मनीला पुढे मोठी किंमत मोजावी लागणार होती.

मे २०, १९४१ रोजी जर्मनीने आपल्या ७वी फ्लायगर डिव्हिजन५ माउंटन डिव्हिजन या युद्धकुशल तुकड्या क्रीटमध्ये उतरवल्या. ग्रीसमधून पराभूत होऊन आलेल्या ११,००० ग्रीक सैनिकांनी व २८,००० स्थानिक अर्धसैनिक दलांनी त्यांचा प्रतिकार केला. बेटावरील तीन विमानतळांवर लक्ष केंद्रित केलेल्या जर्मन सैन्याचे पहिल्या दिवशी अतोनात नुकसान झाले पण मालेमे विमानतळ काबीज करण्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी विमानाद्वारे अधिक कुमक मागवली व लवकरच ग्रीक सैन्याचा बीमोड केला. जरी जर्मनीने ही लढाई जिंकली असली तरी ग्रीक सैन्याने हवाईहल्ल्यांविरुद्ध दाखवलेल्या शौर्यामुळे हिटलरने हवाई हल्ले करणे बंद केले.

जर्मनीचे सोव्हिएत संघावर आक्रमण

ऑपरेशन बार्बारोसा - जर्मनीची सोव्हिएत संघावर चाल - जून ते डिसेंबर १९४१.

जर्मनी व सोव्हिएत संघाने ऑगस्ट १९३९मध्ये मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करार केला व त्यानंतर एकमेकांना युद्धात सहकार्य केले. तेव्हापासून १९४१ च्या मध्यापर्यंत सोव्हिएत संघाने जर्मनीला युद्धसाहित्य, रसद, इ. साहाय्य केले. जून २२, १९४१ला जर्मनी सोव्हिएत संघावर उलटला. या दिवशी ऑपरेशन बार्बारोसा ही आधुनिक इतिहासातील मनुष्यबळाच्या बाबतीत सगळ्यात मोठी मोहीम सुरू झाली. जर्मनीने तीन सैन्यसमूह, अंदाजे ४०,००,००० सैनिक सोव्हिएत संघात घुसवले. लाल सैन्याला या व्यूहात्मक धक्क्यातून सावरायची संधी न देता ही टोळधाड रशियात विद्युतवेगाने शिरली. रशियन सैन्याच्या तुकड्यांना वेढा घालायचा व त्याचा घेरा आवळत आवळत शत्रूला नामशेष करायचे हा जर्मन सैन्याचा या लढायांमधील खाक्या होता. लाल सैन्याचे संपूर्ण पश्चिम सैन्य याप्रकारे नेस्तनाबूद झाले. अक्ष राष्ट्रांचे लक्ष विचलित करायला सोव्हिएत संघाने जून २५ला फिनलंडवर परत हल्ला केला व दुसरी आघाडी उघडली. असे असूनसुद्धा जर्मनीला समोरासमोर टक्कर देता येत नाही हे पाहून सोव्हिएत सैन्याने दग्धभू(स्कॉर्च्ड अर्थ) व्यूह अंगिकारला. जर्मन सैन्य जेथे चढाई करणे अपेक्षित होते त्या भागातील कारखाने व इतर व्यवसाय होते तसे मोडले व भराभर युरल पर्वतांच्या पलीकडे नेउन जशीच्या तशी परत उभे केले. शेतातील उभी पिके जाळली, अन्नभांडार नष्ट केले व पूर्वेकडे माघार घेतली. नोव्हेंबर १९४१ च्या सुमारास जर्मन सेना लेनिनग्राड, मॉस्कोरोस्तोव्हच्या वेशीवर येऊन ठेपली. आता अतिकठीण असा रशियन हिवाळा सुरू झाला व पाच महिने अव्याहत चाललेली जर्मन आगेकूच ठप्प झाली. जर्मन सेनाधिकाऱ्यांचा अंदाज होता की रशियातील थंडी सुरू व्हायच्या आतच जर्मन ब्लिट्झक्रीगपुढे रशिया गुडघे टेकेल व हिवाळ्यात युद्ध करायची गरजच उरणार नाही. ग्रीसमध्ये घालवलेले ६ आठवडे आता त्यांच्या अंगाशी येणार होते. जर्मन सेनेला स्थानिक रसद मिळणे दुरापास्तच होते. त्यांना पोलंड व जर्मनीतून युद्धसाहित्य, यंत्रसामग्री व अन्न-धान्यदेखील मागवावे लागत होते. कडाक्याच्या थंडीत हे सगळे आघाडीवर पोचायला अनेक आठवडे लागत होते व जर्मन सैन्याची कुचंबणा व काही ठिकाणी तर उपासमारदेखील होऊ लागली.

इकडे या थंडीची सवय असलेल्या लाल सैन्याने आपली लश्करभरती चालूच ठेवली होती. जर्मन सैन्य मॉस्कोपासून हाकेच्या अंतरावर आले असता सोव्हिएत सैन्याने प्रतिहल्ले सुरू केले. आपली राजधानीच इरेला पडलेली पाहून त्यांनी केलेल्या या कडव्या हल्ल्यांनी आधीच अगतिक झालेले जर्मन सैन्य मागे हटले. सोव्हिएत रेटा इतका जबरदस्त होता की अक्ष सैन्याने काही दिवसातच १५०-२५० कि.मी. पीछेहाट केली. दुसऱ्या महायुद्धातील अक्ष राष्ट्रांची ही पहिली माघार होय.

अटलांटिकचे युद्ध

मे ९, १९४१ रोजी रॉयल नेव्हीची विनाशिका एच.एम.एस. बुलडॉगने एक जर्मन यू-बोट पकडली व त्यातून संपूर्णावस्थेत असलेले एनिग्मा यंत्र जप्त केले. जर्मनीचे कूटसंदेश समजण्यासाठी हे यंत्र अतिमहत्त्वाचे होते. मे २४ रोजी जर्मन युद्धनौका बिस्मार्क युद्धात उतरली. डेन्मार्कच्या अखातातील लढाईत बिस्मार्कने रॉयल नेव्हीचा मानदंड असलेली बॅटलक्रुझर एच.एम.एस. हूडला जलसमाधी दिली. चिडलेल्या रॉयल नेव्हीने बिस्मार्कचा शोध घेण्यासाठी युद्धनौकांचा तांडा सोडला. तीन दिवस सतत चाललेल्या या शोधाच्या अंती बिस्मार्क सापडली. हा लपाछपीचा खेळ २,७०० कि.मी. चालला. यात ब्रिटिश आरमाराच्या आठ युद्धनौका, दोन विमानवाहू नौका, अकरा क्रुझर, एकवीस विनाशिका व सहा पाणबुड्यांनी भाग घेतला होता. एच.एम.एस. आर्क रॉयल या विमानवाहू नौकेवरील विमानांनी बिस्मार्कवर टॉरपेडोने हल्ला केला. हल्ल्याने नुकसान फारसे झाले नाही पण बिस्मार्कचे सुकाणू अडकून बसले. दिशाहीन झालेल्या बिस्मार्कला मग इतर युद्धनौकांनी गाठले व बुडवले.

आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण[संपादन]

अमेरिकेचे युद्धात पदार्पण

हिटलरच्या सोव्हिएत संघावरील आक्रमणाची जपानला पूर्वकल्पना नव्हती. सोव्हिएत संघाला याची कुणकुण होती व एकाचवेळी दोन्हीकडून हल्ला होण्याचे टाळण्यासाठी सोव्हिएत संघाने जपानशी मैत्री करण्याचे ठरवले. एप्रिल १३, १९४१ रोजी सोव्हिएत-जपान तटस्थता करार करण्यात आला. यात सोव्हिएत संघाला पूर्वेकडून हल्ला न होण्याचे आश्वासन होते तर जपानला खात्री मिळाली की पश्चिमेकडून त्यांच्यावर हल्ला होणार नाही. जपानला आता आशिया-प्रशांत महासागरामधील युद्धावर लक्ष केंद्रित करायला मोकळीक मिळाली.

जपानी विमानहल्ल्यांमुळे बुडालेली यु.एस.एस. कॅलिफोर्निया

१९४१ च्या ग्रीष्मात अमेरिका, युनायटेड किंग्डमनेदरलँड्सने जपानला खनिजतेल विकण्यावर निर्बंध घातले. याने जपानची युद्ध चालू ठेवण्याची कुवत धोक्यात आली. जपानने होत्या त्या रसदीनिशी चीनमधील आगेकूच चालूच ठेवली. जपानचा बेत होता अमेरिकेवर अचानक धाड टाकून त्यांच्या आरमाराला निकामी करायचे व त्याच वेळी डच ईस्ट ईंडीझमध्ये घुसून तेथील तेलसाठे बळकावायचा. त्यानुसार डिसेंबर ७, १९४१ रोजी जपानी आरमाराने अमेरिकेच्या हवाई प्रांतातील पर्ल हार्बर येथील आरमारी तळावर प्रचंड शक्तीनिशी हल्ला केला. या धाडीत अमेरिकेच्या आरमाराचे प्रचंड नुकसान झाले. सहा युद्धनौका बुडाल्या, दोन निकामी झाल्या व इतर अनेक नौकांचा विनाश झाला. या शिवाय नौका-दुरूस्ती केंद्र, रसद साठा व इतर अनेक व्यवसाय विनाश पावले. शेकडो सैनिक व नागरिक मृत्युमुखी पडले. अमेरिकेच्या सुदैवाने जपानी धाडीचे मुख्य लक्ष्य असलेल्या चार विमानवाहू नौका त्या वेळी कवायतींसाठी बाहेर पडलेल्या होत्या त्या वाचल्या व तळावरील इंधनसाठ्यालाही धक्का पोचला नाही. दुसऱ्या दिवशी अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. या हल्ल्यामुळे आत्तापर्यंत तटस्थ असलेले अमेरिकन जनमत पूर्णतः बदलले व या हल्ल्याचा वचपा काढण्याची मागणी होऊ लागली.

अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारताच जर्मनीने डिसेंबर ११ला अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. ॲडॉल्फ हिटलरचा अंदाज होता की याने जर्मनीला जपानची सहानुभूती मिळेल व जपानकडून जर्मनीच्या सोव्हिएत संघावरील आक्रमणाला पाठिंबा मिळेल. परंतु जपान आपल्या सोव्हिएत संघाला दिलेल्या शब्दाला जागले व त्यांच्याविरुद्ध युद्धात भाग नाही घेतला. उलट, जर्मनीच्या या कृतीमुळे अमेरिकेतील युरोपमधल्या युद्धात भाग घेण्याविरुद्धचा उरलासुरला विरोधदेखील मावळला व युद्ध आता खरोखरचे जागतिक युद्ध झाले.

जपानची आगेकूच

त्याचवेळी डिसेंबर ८ रोजी (म्हणजे अमेरिकेतील डिसेंबर ७लाच) जपानने हॉंग कॉंगवर हल्ला केला व त्यानंतर लगेचच मलाया, फिलिपाईन्स, बॉर्नियोबर्मावरही हल्ला केला. येथे त्यांना भारतीय, ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन, केनेडीयन, अमेरिकनन्यू झीलंडच्या सैन्याने कडवा प्रतिकार केला परंतु हे सगळे प्रदेश जपानने काही महिन्यातच काबीज केले. सिंगापूर बळकावताना जपानने हजारो ब्रिटिश व भारतीय सैनिकांना युद्धबंदी बनवले.

चीनने अखेर जपानविरुद्ध अधिकृतरीत्या युद्ध पुकारले. जपानने प्रशांत महासागरातील रॉयल नेव्हीच्या तांड्यावर हल्ला चढवून एच.एम.एस. प्रिन्स ऑफ वेल्स, एच.एम.एस. रिपल्स या युद्धनौका व त्यासोबत ८४० खलाश्यांना यमसदनी धाडले. याचा युनायटेड किंग्डमला मोठाच धक्का बसला.

पर्ल हार्बरवरील हल्ला[संपादन]

७ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी जपानाने अमेरिकेच्या पर्ल हार्बर, हवाई येथील नाविक तळावर आकस्मिक हल्ला चढवला. अमेरिकेच्या पॅसिफिक नौदलाने जपानाच्या आग्नेय आशियातील साम्राज्यविस्तारासाठी ब्रिटन, नेदरलँड्स् आणि अमेरिकेच्या ताब्यातील प्रांतांविरुद्ध आखण्यात आलेल्या लष्करी कारवायांत अडथळा आणू नये, म्हणून शाही जपानी नौदलाने ७ डिसेंबर, इ.स. १९४१ च्या सकाळी (जपानी प्रमाणवेळेनुसार ८ डिसेंबर, इ.स. १९४१) हा हल्ला केला.

३५३ जपानी लढाऊ विमाने, बॉंब आणि टॉर्पेडो विमाने यांचा वापर करून तळावर हल्ला केला. अमेरिकन नौदलाच्या आठही लढाऊ जहाजांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांपैकी चार जहाजे बुडाली. या आठपैकी सहा जहाजे पुन्हा मिळवून्, दुरुस्त करून त्यांचा वापर पुढे युद्धात करण्यात आला. जपानी नौदलाने तीन क्रूझर, तीन विनाशिका, एक विमानविरोधी प्रशिक्षण नौका आणि एक सुरूंगनौका यांचेही नुकसान केले. अमेरिकेची १८८ विमाने नष्ट झाली, २,४०२ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले, १,२८२ अमेरिकन लोक जखमी झाले. वीजकेंद्र, गोदी, इंधन व टॉर्पेडो साठवण्याची गोदामे तसेच, पाणबुडीचे धक्के आणि मुख्यालय (जे हेरखात्याचे केंद्र होते) यांवर हल्ला केला गेला नाही. अमेरिकेच्या तुलनेत जपानाचे कमी नुकसान झाले: २९ विमाने आणि ५ लहान पाणबुड्या नष्ट झाल्या, ६५ सैनिक कामी आले वा जखमी झाले व केवळ् एक जपानी सैनिक पकडला गेला.

ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला व त्याने अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले. ८ डिसेंबर, इ.स. १९४१रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानाविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनाच्या बाजूने युद्धात उतरली. यापुढील अमेरिकन कारवायांमुळे जर्मनीइटली यांनी ११ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. त्याला अमेरिकेने तसेच प्रत्युत्तर दिले.

या आकस्मिक जपानी हल्ल्यामागे बराच पूर्वेतिहास होता, परंतु, सामोपचाराने बोलणी चालू असताना, कुठलीली पूर्वसूचना न देता झालेल्या ह्या हल्ल्यामुळे तत्कालीन अमेरिकन साष्ट्रपती फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी ७ डिसेंबर, १९४१ या दिवसाबद्दल 'अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी' (बदनाम, असंतोषजनक दिवस)  असे उद्गार काढले आहेत.

आफ्रिकेतील रणांगण[संपादन]

उत्तर आफ्रिका व मध्यपूर्व

उत्तर आफ्रिकेत उतरलेल्या फील्ड मार्शल रोमेलच्या सैन्याने पूर्वेकडे आगेकूच चालू ठेवली व टोब्रुक या बंदराला वेढा घातला. टोब्रुक सोडवायचे दोस्त राष्ट्रांचे दोन प्रयत्न निष्फळ झाले शेवटी ऑपरेशन क्रुसेडर या मोहीमेंतर्गत मोठ्या सैन्यानिशी हल्ल्याला उत्तर दिल्यावर रोमेलने टोब्रुकचा वेढा उठवला वा इतरत्र प्रयाण केले. एप्रिल-मे १९४१मध्ये युनायटेड किंग्डमने इराकवर हल्ला करून इराक परत जिंकून घेतले. जूनमध्ये दोस्त सैन्याने सीरियालेबेनॉन जिंकले. तटस्थ राहिलेल्या इराणवर सोव्हिएत संघाने व ब्रिटनने हल्ला केला व तेथील तेलसाठा बळकावला. इराणमधील तेलवाहिन्यांतून सोव्हिएत संघाला खनिज तेलाचा मुबलक पुरवठा सुरू झाला.

तिढा - इ.स. १९४२[संपादन]

युरोपीय रणांगण[संपादन]

मध्य व पश्चिम युरोप

मे १९४२मध्ये चेकोस्लोव्हेकियातील भूमिगत सशस्त्र चळवळीच्या सद्स्यांनी 'शेवटच्या उपायाचा' योजक राइनहार्ड हेड्रिख याचा खून केला. याचा वचपा काढण्यासाठी हिटलरने चेकोस्लोव्हेकियामधील लिडाईस हे गाव बेचिराख केले. ऑगस्टमध्ये केनेडीयन सैनिकांनी ऑपरेशन ज्युबिली नावाखाली फ्रान्सच्या दियेपे गावाजवळ धाड घातली. ही मोहीम सपशेल फसली व अनेक सैनिक मृत्युमुखी पडले वा युद्धबंदी झाले पण यातून दोस्त सेनापतींनी धडे घेतले व ऑपरेशन टॉर्चऑपरेशन ओव्हरलॉर्डच्यावेळी ते गिरवले.

शिशिरामधील व वसंतातील सोव्हिएत हल्ले

उत्तर युरोपमध्ये लाल सैन्याने जानेवारी ९ ते फेब्रुवारी ६च्या दरम्यान टोरोपेट्स-खोल्म मोहीम उघडुन अँड्रियापोलदेम्यान्स्कजवळ जर्मन तुकड्यांना हरवले. याशिवाय खोल्म, वेलिझवेलिकी लुकीच्या आसपास जर्मन सैन्याला थोपवण्यात त्यांना यश मिळाले. दक्षिणेत मे महिन्यात सोव्हिएत सैन्याने जर्मनीच्या सहाव्या सैन्याविरुद्ध आघाडी उघडली. खार्कोव्हजवळ १७ दिवस चाललेल्या लढाईत २,००,०००पेक्षा जास्त लाल सैनिक मृत्यू पावले.

ग्रीष्मातील अक्ष हल्ले

जून २८ला अक्ष राष्ट्रांनी ऑपरेशन ब्लू ही मोहीम सुरू केली. जर्मन सैन्य आग्नेयेला डॉन नदी पासुन व्होल्गा नदीपर्यंत कॉकेसस पर्वतांच्या दिशेने कूच करू लागली. सैन्यसमूह बी स्टालिनग्राड शहर जिंकायच्या अपेक्षेने निघाला. स्टालिनग्राड जिंकून जर्मन सैन्याची डावी आघाडी सुरक्षित होताच सैन्यसमूह ए दक्षिणेतील तेलसाठे जिंकून घेणार होता. ग्रीष्म संपता झालेल्या कॉकेससच्या लढाईत जर्मनीने हे तेलसाठे जिंकून घेतले.

स्टालिनग्राड
मुख्य पान: स्टालिनग्राडचा वेढा

स्टालिनग्राडच्या भग्नावशेषातून लढणारे सोव्हिएत सैनिक

जर्मन सैन्यसमूह बी ऑगस्ट २३, १९४२ रोजी स्टालिनग्राडच्या उत्तरेला व्होल्गा नदीच्या किनारी येऊन पोचला. यासुमारास लुफ्तवाफेने केलेल्या बॉम्बफेकीत गावाच्या मध्यावर असलेल्या लाकडी इमारती व कारखाने उद्ध्वस्त झाले. महिन्याभरात उरलेसुरले उद्योग-धंदेही नष्ट झाले व शहराच्या पिछाडीस असलेले पूल व रस्तेसुद्धा जर्मन तोफखान्याच्या पल्ल्यात आले. आता स्टालिनग्राडला रसद/कुमक मिळणेही मुश्किल झाले. जर्मन सैन्याने आता शहरात धाडी घालणे सुरू केले. सोव्हिएत सैनिकांनी व स्टालिनग्राडच्या नागरिकांनी त्यांचा चौकाचौकातून व घराघरातून सामना केला. अत्यंत भयानक अश्या हातोहात लढाया रोजच व्हायला लागल्या. हळूहळू रशियन हिवाळा जर्मन सैन्यालाही गारठू लागला पण लढाईची तीव्रता तितकीच राहिली. दमछाक व उपासमारीने दोन्हीकडील सैन्याला पछाडले. स्टालिनग्राडची स्थिती तर अगदीच केविलवाणी होती पण तरीही तेथील नागरिक जिद्दीने मुकाबला करीत राहिले. आता ॲडॉल्फ हिटलरही ईरेला पेटला. काही केल्या स्टालिनग्राड जिंकायचेच असे हुकुम त्याने सोडले. जर्मन सेनापतींनी व्यूहात्मक माघार घेउन हिवाळ्यानंतर परत हल्ला करायचे सुचवले पण हिटलरने ते धुडकावून लावले. आता स्टालिनग्राडच्या लढाईत हिटलर बर्लिनमधून स्वतः व्यूह रचू लागला. जनरल फोन पॉलसने वैतागून नोव्हेंबरमध्ये शहरावर निर्वाणीचा हल्ला चढवला जर्मनीचे सहावे सैन्य स्टालिनग्राडमध्ये घुसले. त्यांनी शहराचा ९०% भाग काबीज केला. सोव्हिएत सैन्याने स्टालिनग्राडच्या बाहेर सैन्य गोळा करण्यास सुरुवात केलेली होती. जर्मन सैन्याचा मोठा भाग शहरात होता व तेथील हातोहात लढायां गुंतलेला होता. परिणामी त्यांच्या बाजू दुबळ्या पडल्या. ही संधी साधून सोव्हिएत सैन्याने ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू केली व नोव्हेंबर १९ रोजी जर्मन सैन्याच्या दोन्ही बाजूने एल्गार केला. हा हल्ला परिणामकारक ठरला व जर्मन सैन्याचा प्रतिकार खचला. दोन्हीकडून आलेले सोव्हिएत सैन्य स्टालिनग्राडच्या नैर्ऋत्येला कलाच शहराजवळ एकत्र झाले. परिणामी स्टालिनग्राडमध्ये घुसलेले सहावे जर्मन सैन्य आता चारही बाजूंनी वेढले गेले.

स्टालिनग्राडची लढाई

अडकलेल्या जर्मन सैन्याने हिटलरकडे वेढा फोडून बाहेर पडण्याची (त्यायोगे स्टालिनग्राड परत सोव्हिएत सैन्याला देण्याची) परवानगी मागितली पण ती नाकारली गेली. हिटलरने सहाव्या सैन्याला स्टालिनग्राडमध्येच थांबायचा हुकुम सोडला व बाहेरून सैन्य पाठवून वेढा फोडण्याचे आश्वासन दिले. त्यादरम्यान लुफ्तवाफेद्वारा रसद पुरवण्याचीही ग्वाही दिली. पण लुफ्तवाफेकडून होणारी मदत ही गरजेच्या एक षष्ठांशही नव्हती व लवकरच जर्मन सैन्याची गत महिन्याभरापूर्वीच्या स्टालिनग्राडच्या नागरिकांसारखीच झाली. लाल सैन्याला हिटलरच्या व्यूहाचा अंदाज होताच. त्यांनी मॉस्कोजवळ ऑपरेशन मार्स सुरू केले व मध्य सैन्यसमूहाची लांडगेतोड करण्यास सुरुवात केली. परिणामी जर्मनीला तेथून स्टालिनग्राडच्या मदतीला कुमक पाठवणे अशक्य झाले. मॉस्कोकडून कुमक येत नसल्याचे पाहून दक्षिण सैन्यसमूहाच्या सेनापती फोन मॅनस्टीनने डिसेंबरमध्ये आपल्या सैन्यातून काही तुकड्या स्टालिनग्राडच्या मदतीला पाठवल्या पण स्टालिनग्राडपासून ५० कि.मी. अंतरावरील लढाईत त्यांचा पराभव झाला व त्यांनी माघार घेतली. स्टालिनग्राडमधील सहाव्या सैन्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.

हिटलरला अजूनही स्टालिनग्राडमध्ये पराभव मान्य नव्हता. जानेवारीत त्याने जनरल पॉलसला फील्डमार्शलपदी पदोन्नती दिली. जर्मनीच्या इतिहासात एकाही फील्डमार्शलने शत्रूसमोर शरणागती पत्करली नव्हती तसेच एकही फील्डमार्शल शत्रूच्या हाती जिवंत लागलेला नव्हता. फोन पॉलसच्या पदोन्नतीतून हिटलर जणू काही फोन पॉलस व सहाव्या सैन्याला संदेशच देत होता की त्यांनी शरणागती पत्करणे हिटलरला मंजूर नव्हते. अपेक्षित होते ते मरेपर्यंत लढणे व हरल्यास मरणे. परंतु फोन पॉलसला हे पटले नाही. आपल्या सैन्याची दयनीय अवस्था पाहून त्याने फेब्रुवारी २ रोजी सोव्हिएत सैन्यासमोर शरणागती पत्करली. असलेल्या सैनिकांपैकी २२ जनरलांसह फक्त ९१,००० सैनिकांना जिवंतपणी युद्धबंदी केले गेले. यांपैकीसुद्धा केवळ ५,००० युद्धाच्या अंतापर्यंत जिवंत राहिले.

अतिशय दारुण अशा या लढाईत दोन्ही पक्षांचे अपरिमित नुकसान झाले. दोन्हीकडचे मिळून २०,००,००० व्यक्ती मरण पावल्या. पैकी अक्ष राष्ट्रांचे ८,५०,००० सैनिक व उरलेले सोव्हिएत सैनिक व नागरिक होते. तोपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील मृतांच्या आकड्याच्या दृष्टीने ही सगळ्या मोठी लढाई ठरली.

प्रशांत महासागरातील रणांगण[संपादन]

नैर्ऋत्य व मध्य प्रशांत महासागर

जपानविरुद्ध युद्धाची तयारी करीत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेत राहणाऱ्या जपानी, इटालियन व जर्मन वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात धाडण्याचा हुकुम सोडला. युद्ध संपेपर्यंत हे लोक हलाखीच्या अवस्थेत तुरुंगसदृश जागेत राहिले. त्यादरम्यान त्यांची संपत्ती सरकार व इतर नागरिकांनी बळकावली.

एप्रिल १९४२मध्ये अमेरिकेने जपानवर पहिला हल्ला केला. टोक्योवरील बॉम्बफेकीने नुकसान जास्त झाले नसले तरी अमेरिकन जनतेच्या अंगावर मूठभर मांस चढले व जपानने आपले काही सैन्य व आरमार स्वतःच्या किनाऱ्याजवळ परत बोलावले. मेमध्ये जपानी आरमाराने न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी शहरावर हल्ला केला. दोस्त राष्ट्रांच्या आरमाराने कॉरल समुद्राच्या लढाईत जपानला रोखले परंतु अमेरिकेची यु.एस.एस. लेक्झिंग्टन ही विमानवाहू नौका त्यात बळी पडली. कॉरल समुद्राची ही लढाई विमानवाहू नौकांची आमनेसामने झालेली पहिलीच लढाई होती. पुढच्या महिन्यात दोन्ही आरमारात पुन्हा टक्कर झाली ती मिडवेच्या लढाईत. तोपर्यंत अमेरिकेच्या तंत्रज्ञांनी जपानी कूटसंदेशलेखनपद्धती उकलली होती व त्यामुळे त्यांना जपानी बेतांची पूरेपूर माहिती होती. अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवल्या व जपानी आरमाराचा कणा मोडला. इतिहासकारांच्या मते ही लढाई युद्धातील निर्णायक क्षणांपैकी होती. येथून जपानच्या अनिर्बंध सत्ताप्रसाराला खीळ बसली.

ग्वादालकॅनालमध्ये अमेरिकन सैनिक

मेमध्ये न्यू गिनीवर समुद्रीमार्गाने केलेले आक्रमण फसल्यावर जपानने जुलैमध्ये जमिनीवरून हल्ला केला. पोर्ट मोरेस्बीच्या पश्चिमेस जंगलात जमा होऊन कोकोडा पायवाटेवरून जपानी सैन्याने हल्ला केला. त्यावेळी पोर्ट मोरेस्बीचा बचाव करण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियन सैन्यावर होती. ५,००० सैनिकांनी मिळेल त्या हत्यारांनिशी आपल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या सैन्याचा यशस्वी प्रतिकार केला व जपानी सैन्याला मागे रेटले. यानंतर दोन्ही सैन्यांनी कुमक मागवली व सप्टेंबरमधील मिल्ने बेच्या लढाईनंतरही जानेवारी १९४३पर्यंत चकमकी होत राहिल्या पण दोस्त सैन्याने पोर्ट मोरेस्बी शत्रूच्या हाती पडू दिले नाही. जपानी सेनेचा जमिनीवरील युद्धात हा प्रथम पराभव होता.

ऑगस्ट ७ला अमेरिकेचे मरीन सैनिक ग्वादालकॅनालच्या लढाईत उतरले. ग्वादालकॅनाल बेटावर वर्चस्व मिळवण्यासाठी झालेली ही लढाई सहा महिने चालली. यादरम्यान आसपासच्या समुद्रात अनेक आरमारी लढाया झाल्या त्यातील काही म्हणजे साव्हो बेटाची लढाई, केप एस्पेरान्सची लढाई, ग्वादालकॅनालची आरमारी लढाई, तासाफरोंगाची लढाई, इ.

चीन-जपान युद्ध

पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर जपानने चीनवर नव्याने हल्ला केला. यावेळी त्यांचा रोख चांग्शा शहर जिंकण्यावर होता. जपानने १,२०,००० सैनिकांसह केलेल्या हल्ल्याला चीनने ३,००,००० सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. दोन बाजूंनी चीनी सैन्याच्या कचाट्यात सापडलेल्या जपानने तेथून काढता पाय घेतला.

आफ्रिकेतील रणांगण[संपादन]

ईशान्य आफ्रिका

जर्मनीच्या पॅंझर कोरचे रणगाडे आफ्रिकेत

१९४२च्या सुरुवातीला दोस्त राष्ट्रांना आफ्रिकेतील काही सैन्य पूर्वेच्या आघाडीवर पाठवावे लागले. याच वेळी जनरल रोमेलने लिब्यातील बेंगाझी शहर काबीज केले. त्यानंतर त्याने गझालाच्या लढाईत दोस्त सैन्याला हरवले व टोब्रुक जिंकून घेत दोस्त सैन्याची वाताहत केली. टोब्रुकला हजारो युद्धबंदी व मोठी रसद मिळवून रोमेलने इजिप्तवर चढाई केली.

इजिप्तमध्ये अल अलामेनची पहिली लढाई जुलै १९४२मध्ये झाली. रोमेलने दोस्त सैन्याला मागे रेटत अलेक्झांड्रिया, इजिप्तसुएझपर्यंत ढकलले पण आता जर्मन सैन्याकडील इंधन व अन्नसाठाही संपत आलेला होता व कोपऱ्यात सापडलेल्या दोस्त सैन्याचा प्रतिकारही तिखट झाला होता. अल अलामेनच्याच जवळ दुसरी लढाई झाली ती ऑक्टोबर २३नोव्हेंबर ३च्या दरम्यान. लेफ्टनंट जनरल बर्नार्ड मॉॅंटगोमरीच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश आठव्या सैन्याने रोमेलला माघार घेण्यास भाग पाडले. रोमेलने आफ्रिका कोरसह ट्युनिसियात माघार घेतली

वायव्य आफ्रिका

दोस्त राष्ट्रांनी नोव्हेंबर ८, १९४२ रोजी ऑपरेशन टॉर्च नावाची मोहीम सुरू केली. कॅसाब्लांका, ओरानअल्जीयर्समधून सैनिक घुसवून उत्तर आफ्रिका जिंकण्याच्या बेताने उतरलेल्या या सैन्याला काही दिवसांनी बोने येथे उतरलेल्या सैनिकांची साथ मिळाली. हा सगळा जथा ट्युनिसियातील रोमेलच्या सैन्यावर चाल करून गेला. रस्त्यात विची फ्रान्सच्या सैन्याने नाममात्र प्रतिकार केला पण शत्रूची संख्या व कुवत पाहून लगेचच हत्यारे खाली ठेवली. यामुळे चिडलेल्या ॲडॉल्फ हिटलरने वीचि फ्रान्सवर हल्ला करून तेथील नाममात्र सरकारसुद्धा पदच्युत केले व लष्करी कायदा लावला. आता ट्यूनीशियातील जर्मन व इटालियन सैन्य अल्जीरियालीबियाकडून चाल करून येणाऱ्या दोस्त सैन्याच्या कचाट्यात सापडले. रोमेलने ही कोंडी फोडण्यासाठी कॅसरीन पासच्या लढाईत अमेरिकन सैन्याला धूळ चारली व अक्ष सैन्याचा एक भाग सोडवला. पण उरलेल्या अक्ष सैन्याने लवकरच पराभव पत्करला.

बदलते वारे - इ.स. १९४३[संपादन]

युरोपीय रणांगण[संपादन]

सोव्हिएत कारवाया

स्टालिनग्राडच्या विजयानंतर लाल सैन्याने जर्मन सैन्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. मुख्यत्वे डॉन नदीच्या आसपासच्या या कारवायात सोव्हिएत सैन्याला सुरुवातीस यश मिळाले पण लवकरच जर्मनीने नव्या दमाने त्यांचा प्रतिकार केला व एकामागोमाग लढाया जिंकल्या. खार्कोव्ह शहर परत जर्मनीच्या हातात गेले.

सोव्हिएत सैन्याने वर्षअखेर खार्कोव्ह परत मिळवले. सोवयेत सैन्याची चढती कमान पाहून ॲडॉल्फ हिटलरने आपल्या सैन्याला ड्नाइपर नदीपर्यंत माघार घेण्याची परवानगी दिली. सप्टेंबरपर्यंत ड्नाइपरच्या तीरावर बचावफळी तयार करण्यात आली पण लवकरच सोव्हिएत सैन्याने तेथून जवळच ड्नाइपर ओलांडली व एकामागोमाग शहरे काबीज करण्यास सुरुवात केली. झापोरोझ्येड्नेप्रोपेट्रोव्ह्स्क नंतर लाल सैन्याने युक्रेनची राजधानी क्यीव्हकडे मोर्चा वळवला. नोव्हेंबरमध्ये क्यीव्हच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करीत सोव्हिएत सैन्य शहरात दाखल झाले. डिसेंबर २४ला कोरोस्टेन जिंकून घेउन तेथून रेल्वेमार्गाच्या बाजूने चाल करीत सोव्हिएत व युक्रेनियन सैन्याने १९३९ च्या सोव्हिएत-पोलंड सीमेपर्यंत धडक मारली.

जर्मन कारवाया

१९४३चा वसंत जर्मन आणि सोव्हिएत सैन्यांनी पुनर्बांधणीत घालवला. तयारी पूर्ण न झाल्यामुळे जर्मनीने आघाडी उघडणे लांबवले. अखेर जुलै ४च्या सुमारास वेह्रमाख्टने दुसऱ्या महायुद्धातील आपले सगळ्यात मोठे दल जमा केले आणि कुर्स्क शहरावर चाल केली. याची कल्पना असलेल्या लाल सैन्याने येथे मातीचे कामचलाउ किल्ले उभारून त्याआडून प्रतिकार केला. जर्मनीने रशियन व्यूहरचनेतील पान उचलून कुर्स्कच्या उत्तर व दक्षिणेकडून एकदम चाल केली होती. त्यांचा बेत सोव्हिएत सैन्याच्या पिछाडीचा प्रदेश काबीज करून स्टालिनग्राडप्रमाणे रशियाच्या ६० डिव्हिजन पकडण्याचा होता. उत्तरेकडून आलेल्या जर्मन सैन्याला फारशी प्रगती करता नाही आली पण दक्षिणेतून त्यांनी बरीच मजल मारली. वेढले जाण्याची शक्यता ओळखून सोव्हिएत सैन्याने आपली राखीव दलेसुद्धा आता युद्धात उतरवली. यावेळी झालेली कुर्स्कची लढाई ही रणगाड्यांची युद्धातील सगळ्यात मोठी लढाई ठरली. प्रोखोरोव्ह्का शहराजवळ झालेल्या या लढाईत दोन्ही बाजूंनी होतीनव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली. जर्मनीचे सैन्य गेली चार वर्षे अव्याहत लढत होते व त्यांच्याकडे राखीव असे सैन्य नव्हतेच. उलटपक्षी रशियाने आपले ताज्या दमाचे राखीव सैन्य रणात उतरवले होते. याची परिणती लवकरच दिसून आली. जर्मन हल्लेखोरांचा धुव्वा उडवत सोव्हिएत सैन्याने त्यांना युद्धाच्या सुरुवातीपेक्षा मागे रेटले.

दोस्तांचे इटलीवर आक्रमण

ऑगस्ट १९४३मध्ये रोमेलने कॅथेरीन पासच्या लढाईत दोस्त सैन्याला गुंगारा दिला होता पण ट्युनिसियातील उरलेले अक्ष सैन्य फारसा प्रतिकार करू शकले नाही व २,५०,००० सैनिकांनी तेथे आत्मसमर्पण केले. यात इटलीच्या सैन्यदलातील बहुसंख्य सैनिक होते. दरम्यान जुलैमध्ये दोस्त राष्ट्रांनी ऑपरेशन हस्की मोहीमेंतर्गत सिसिलीवर चढाई केली व महिन्याभरात बेट जिंकून घेतले. शत्रु दाराशी येऊन ठेपलेला बघताच इटलीतील बेनितो मुसोलिनीचे सरकार गडगडले. राजा व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसऱ्याने मुसोलिनीला पदच्युत केले व ग्रेट फाशिस्ट काउन्सिलच्या संमतीने त्याला अटकही करवली. पीयेत्रो बॅदोग्लियोच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने युद्ध चालू ठेवण्याचे जाहीर केले पण एकीकडे दोस्त राष्ट्रांशी गुप्त वाटाघाटी सुरू केल्या. यात ठरल्याप्रमाणे दोस्तांनी सप्टेंबर ३ रोजी इटलीवर चढाई केली. चार-पाच दिवस नाममात्र प्रतिकार करून इटलीने शरणागती पत्करली. राजा व त्याचे कुटुंब बॅदोग्लियोच्या सरकारसह रोमहून दक्षिणेला पळून गेले. नेतृत्वहीन इटालियन सैन्याने तुरळक लढाया केल्या पण थोड्याच दिवसांत त्यांनीही शस्त्रे खाली ठेवली. हे पाहताच उत्तरेतून जर्मन सैन्य पुढे सरसावले व त्यांनी दोस्त सैन्याला रोमच्या दक्षिणेला गुस्ताव रेषेवर चार-पाच महिने रोखून धरले. जर्मनीने उत्तरेत सालोचे इटालियन समाजवादी प्रजासत्ताक या नावाखाली जर्मनधार्जिणे सरकार मुसोलिनीच्या हाती देऊन बसवले. याचवेळी जर्मनीने युगोस्लाव्हियात आपले सैनिक पाठवून तेथील भूमिगत चळवळ चिरडण्याचा प्रयत्न केला.

अटलांटिकची लढाई

जर्मनीने आपल्या यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या आरमाराला गेली चार वर्षे सळो की पळो केलेले होते. आता दोस्तांनी त्यांचे आरमारी व्यूह बदलले व यु-बोटींचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. १९४३मध्ये यु-बोटींना नौकांचे दोन तांडे बुडवण्यात यश आले पण शत्रूने अनेक यु-बोटीही बुडवल्या. जर्मनीत नवीन यु-बोटी तयार होणे जवळजवळ थंडावलेच होते. आपली संख्या कमी होत असलेली पाहून यु-बोटींनी खुल्या समुद्रात हल्ले करण्याचे सोडले व किनाराऱ्याच्या जवळ राहून शिकार शोधणे पसंत केले.

यु-बोटींचा धोका कमी होताच दोस्त आरमारांनी आर्क्टिक समुद्रातून रशियाकडे रसद धाडण्यास पुनः सुरुवात केली. यामुळे सोव्हिएत संघाचे पारडे जड होणार असे दिसताच जर्मन आरमाराने आपला मोर्चा तिकडे वळवला. नॉर्थ केपच्या लढाईत रॉयल नेव्हीच्या एच.एम.एस. ड्यूक ऑफ यॉर्क, एच.एम.एस. बेलफास्ट व इतर काही विनाशिकांनी मिळून जर्मनीची शेवटची बॅटल क्रुझर शार्नहॉर्स्टला जलसमाधि दिली.

आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण[संपादन]

मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर

दोस्त सैन्याने जानेवारी २ला न्यू गिनीतील बुना शहर जिंकले व पोर्ट मोरेस्बीवरील जपानी टांगती तलवार दूर केली. जानेवारी २२ पर्यंत पुढे चाल करीत त्यांनी जपानी सैन्याचे पूर्व आणि पश्चिम न्यू गिनीमध्ये ये-जा करण्याचे मार्गही बंद केले. त्यामुळे दोन्हीकडच्या जपानी सैन्यांना हरवणे सोपे झाले.

अमेरिकन सैन्याने फेब्रुवारी ९ला ग्वादालकॅनाल मुक्त केले व सोलोमन द्वीपांवर चढाई केली व वर्षअखेर तेही जिंकून घेतले.

चीन-जपान युद्ध

चांग्डेची लढाई

चीनच्या हुनान प्रांतातील चांग्डे शहरावर जपानने नोव्हेंबर २, १९४३ रोजी १,००,००० सैनिकांसह हल्ला केला. पुढील काही दिवसांत हे शहर जपान व चीनच्या हाती पडले पण अंती चीनने जपानी आक्रमकांना हुसकावून लावले व बाहेरून मदत मिळेपर्यंत शहर लढवले. स्टालिनग्राडप्रमाणे चाललेल्या या युद्धात दोन्हीकडचे मिळून १,००,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या

आग्नेय आशिया

चीनमध्ये सम्राट च्यांग कै-शेकच्या नेतृत्वाखालील कॉमिन्टांग सैन्य आणि साम्यवादी माओ झेडॉॅंगच्या नेतृत्वाखालील चीनी सैन्य जपानी आक्रमणाचा सामना करीत असले तरी दोघांत एकवाक्यता नव्हती व एकमेकांत कुरबुरी सुरूच होत्या. इकडे ब्रिटनने दोन्ही सैन्यांना बर्मा रोड नावाने ओळखल्या जाणाऱ्या घनदाट जंगल व कठीण पर्वत पार करीत आसाम पासुन ब्रह्मदेश(आताचे म्यानमार)मार्गे रसद पुरवठा सुरू ठेवला होता. जपानने म्यानमार हस्तगत केल्यावर हा मार्ग बंद पडला. यावर उपाय म्हणून रॉयल एरफोर्सने ईशान्य भारतातील विमानतळांवरून ही मदत सुरू ठेवली होती. जपानी सैन्य ब्रह्मदेशातून हटत नाही ही पाहिल्यावर ब्रिटनने चीनी सैन्याला अरुणाचल प्रदेशमार्गे भारतात आणले व अमेरिकन जनरल जोसेफ स्टिलवेलने त्यांना नवी तालीम व शस्त्रास्त्रे दिली. या चीनी सैन्याच्या पाठबळावर आता ब्रिटनने भारतातून चीनला जाण्यासाठी लेडो मार्ग बांधण्याचे काम सुरू केले.

शिकाऱ्याचीच शिकार? - इ.स. १९४४[संपादन]

युरोपीय रणांगण[संपादन]

शिशिर-वसंतातील सोव्हिएत कारवाया

लाल सैन्याने जानेवारीत लेनिनग्राडचा वेढा उठवल्यावर जर्मनीने पद्धतशीरपणे माघार घेत तेथून दक्षिणेला बचावफळी उभारली. त्या भागातील तळ्यांचा आधार घेत जर्मनीला ही आघाडी उभारण्यात यश आले पण त्या सुमारास जनरल हान्स-व्हॅलेन्टिन ह्युबचे पहिले पॅन्झर सैन्य दोन बाजूंनी चालून आलेल्या सोव्हिएत सैन्याच्या कचाट्यात सापडले. सात आठवड्यांनी त्यांनी आपली सुटका करून घेतली पण बरेचसे जर्मन रणगाडे व तोफा शत्रूच्या हाती पडल्या.

वसंत ऋतुत जर्मनीने युक्रेनमधूनही माघार घेतली पण त्यांच्या दक्षिण सैन्यसमूहातील सतरावे सैन्य बचावासाठी तेथे थांबले. वसंतअखेर लाल सैन्याच्या तिसऱ्या युक्रेनियन आघाडीने त्यावर हल्ला करून जर्मन सैन्याचा धुव्वा उडवला. रशियन सैन्याने या लढाईत काळ्या समुद्रापार माघार घेणाऱ्या जर्मन सैन्याचा रस्ताही तोडला व २,५०,००० जर्मन व रोमेनियन सैनिकांना यमसदनी धाडले.

याच सुमारास सोव्हिएत सैन्याने रोमेनियातील इयासी शहरावर चढाई केली. महिनाभर शहर लढवल्यावर जर्मन-रोमेनियन सैन्याने टारगुल फ्रुमोसच्या लढाईनंतर हार पत्करली व शहर सोव्हिएत सैन्याच्या हातात आले. यामुळे आता सोव्हिएत संघाला रोमेनियावर पुढील चाल करणे सोपे झाले. शत्रूची ही चाल पाहून ॲडॉल्फ हिटलरने अंदाज बांधला की हंगेरी पक्ष बदलून सोव्हिएत संघाला सामील होइल. हे टाळण्यासाठी जर्मनीने हंगेरीवर चढाई केली व आपले सैन्य देशभर पसरवले.

उत्तरेत फेब्रुवारीत फिनलंडने स्टालिनशी तहाची बोलणी सुरू केली पण स्टालिनने पुढे केलेली तहाची कलमे त्यांना मंजूर नव्हती. जून ९ रोजी सोव्हिएत संघाने कारेलियन द्वीपकल्पावरून चौथे आक्रमण केले व तीन महिन्यात फिनलंडला नमवून तह करणे भाग पाडले.

इटली व मध्य युरोप

इटलीने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैन्याने इटालियन द्वीपकल्पाचा बचाव करण्याचे ठरवले व रोमच्या दक्षिणेस एपेनाइन पर्वतातून गुस्ताव रेषेवर बचावाची फळी उभारली. अनेक प्रयत्नांनंतरसुद्धा दोस्तांना ही फळी फोडता आली नाही. पर्यायाने त्यांनी त्यास वळसा घालण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन शिंगल नावाखाली केलेल्या या मोहिमेने आंझियो येथे जानेवारी २२, १९४४ रोजी समुद्रातून हल्ला केला खरा पण किनाऱ्यावर उतरलेल्या सैन्याला लगेचच जर्मन सैन्याने वेढले व हाही प्रयत्न फसला.

गुस्ताव रेषा पार करण्यासाठी बेचैन झालेल्या दोस्त सैन्याने परत समोरासमोरचे हल्ले सुरू केले. ५२४मध्ये उभारलेली मॉॅंते कॅसिनो येथील ख्रिश्चन साधूंची वस्ती अमेरिकन वायु सेनेने फेब्रुवारी १५ रोजी उद्ध्वस्त केली. त्यांचा असा समज झाला होता की या वस्तीत राहून जर्मन सैन्य त्यांच्या तोफखान्याला गुप्त बातम्या पुरवत होते. बेचिराख झालेल्या या वस्तीत जर्म सैनिक फेब्रुवारी १७ला आले व त्यांनी आता तेथे ठाण मांडले. मे १८ पर्यंत चार वेळा दोस्त सैन्याने येथे हल्ले केले. यात २०,००० जर्मन तर ५४,००० दोस्त सैनिक मृत्युमुखी पडले.

अखेर गुस्ताव रेषेवरची बचावाची जर्मन फळी फुटली व दोस्त सैन्याने उत्तरेकडे आगेकूच सुरू केली. जून ४ला हे सैनिक रोममध्ये पोचले तर ऑगस्टमध्ये फ्लोरेंसला. हेमंत ऋतूच्या सुमारास जर्मन सैन्याने टस्कनीतील एपेनाइन पर्वतातील गॉथिक रेषेवर पुन्हा जमवाजमव करून त्यांना रोखले

युरोपमधील युद्धाचा एकंदर रागरंग बघून जर्मनीने मध्य युरोपमधून माघार घेतली व हंगेरीत आपल्या सैन्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. रोमेनियाने ऑगस्ट १९४४मध्ये दल बदलून जर्मनीवर युद्ध पुकारले. यामुळे युक्रेनमधून माघार घेणाऱ्या जर्मन सैन्याला धोका निर्माण झाला. बल्गेरियाने सप्टेंबरमध्ये शरणागती पत्करली.

बॉम्बहल्ले

जून इ.स. १९४४मध्ये जर्मनीने सर्वप्रथम क्रुझ क्षेपणास्त्रांचा उपयोग युद्धात केला. व्ही-१ उडत्या बॉम्बने युनायटेड किंग्डमवर प्रत्यक्ष हल्ले होऊ लागले. काही महिन्यांनी जर्मनीने ही कला अधिक विकसित केली व व्ही-२ हे द्रव-इंधन वापरणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वापरण्यास सुरुवात केली.

या हल्ल्यांना उत्तर व लुफ्तवाफेच्या कारवाया रोखण्यासाठी म्हणून अमेरिका, यु.के. व कॅनडाच्या वायुदलांनी व्यूहात्मक बॉम्बफेकींनी सुरुवात केली. सुरुवातीला सरहद्दीवरच्या गावांवरील या धाडी हळूहळू जर्मनीच्या मुख्य शहरांपर्यंत पोचल्या. एर चीफ मार्शल हॅरिसने आखणी केलेल्या या हल्ल्यांनी जर्मन प्रजा संत्रस्त होऊ लागली. हे ओळखून विन्स्टन चर्चिलने मग दहशतवादी धाडी मारण्याचे आदेश दिले. यात विमानांच्या अनेक स्क्वॉड्रन (५०० ते १,००० विमाने) एकाचवेळी अनेक दिशांनी एकाच शहरावर चाल करून जायच्या व संपूर्ण शहरच्या शहर बेचिराख करण्याची योजना होती. हे पार पाडणारी विमाने अग्निजन्य बॉम्ब वापरून आपली निशाणे संपूर्णतः उद्ध्वस्त करीत. अशा अनेक हल्ल्यांमध्ये विमानतळ, कारखाने, पाणबुड्यांची आश्रयस्थाने, रेल्वे-यार्ड, तेलसाठे तसेच व्ही-१ व व्ही-२ क्षेपणास्त्रांचे तळ नष्ट करण्याचा उद्देश होता. सहसा या हल्ल्यांमध्ये आसपासच्या नागरिक वस्त्याही बळी पडत. या टोळधाडींचा मुकाबला करण्यास आता लुफ्तवाफे कमी पडू लागली व उरलासुरला विरोधही मोडून काढणे दोस्त वायुसेनांना सोपे झाले. इ.स. १९४४ च्या अंतापर्यंत पश्चिम आघाडीवर लुफ्तवाफेकडे फक्त तुरळक प्रमाणात विमानांच्या तुकड्या उरल्या होत्या. परिणामतः इ.स. १९४५ च्या मध्यापर्यंत जर्मनीतील जवळजवळ सगळी मुख्य शहरे बेचिराख झालेली होती.

वॉर्सोत उठाव

लाल सैन्य वॉर्सोच्या जवळ आल्याची बातमी ऐकून तेथील जनतेला वाटले की आता वॉर्सोची मुक्ती जवळच आहे. त्यामुळे ऑगस्ट १ रोजी त्यांनी जर्मन सैन्याविरुद्ध उठाव केला. ऑपरेशन टेम्पेस्ट मोहिमेतून त्यांना मदत मिळेत अशी त्यांना आशा होती. अंदाजे ४०,००० क्रांतिकाऱ्यांनी वॉर्सो काबीज केले. परंतु लाल सैन्याने आपली कूच अलीकडेच थांबवली व शहराबाहेरुनच तोफांचा मारा करून मदत करण्याचे चालू ठेवले. इकडे जर्मन सैन्याने कुमक पाठवून उठाव दाबण्याचे सुरू केले. शेवटी ऑक्टोबर २ रोजी हा उठाव संपला. जर्मन सैन्याने संपूर्ण शहर बेचिराख केले.

ग्रीष्म-हेमंतातील सोव्हिएत कारवाया

बुखारेस्ट मध्ये लाल सैन्याचे स्वागत करीत असलेले नागरिक (ऑगस्ट ३१, इ.स. १९४४.

आर्मी ग्रुप सेंटरचा नायनाट केल्यावर लाल सैन्याने जुलै १९४४ च्या मध्यास दक्षिणेला असलेल्या जर्मन सैन्यावर हल्ला चढवला व महिन्याभरात युक्रेनमधून जर्मनीची हकालपट्टी केली. यासाठी सोव्हिएत दुसऱ्या व तिसऱ्या युक्रेनी फळीने जर्मनीच्या हीरेस्ग्रुप स्युडयुक्रेन या बचावफळीचा विनाश केला व थेट रोमेनियापर्यंत धडक मारली. या प्रभावी हालचालीने रोमेनियाने पक्ष बदलला व जर्मनीची साथ सोडून ते आता दोस्त राष्ट्रांना सामील झाले.

ऑक्टोबर १९४४मध्ये जनरल मॅक्सिमिलियन फ्रेटर-पिकोच्या सहाव्या जर्मन सैन्याने डेब्रेसेन जवळ सोव्हिएत मार्शल रोडियोन याकोव्लेविच मॅलिनोव्स्कीच्या ग्रुप प्लियेवच्या तीन कोरना वेढा घालून त्यांचा धुव्वा उडवला. पूर्व आघाडीवरचा जर्मन सैन्याचा हा अखेरचा विजय होता.

डिसेंबर १९४४ पासुन लाल सैन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या बाल्टिक आघाडींनी जर्मन आर्मी ग्रुप सेंटरचा उरला सुरला भाग व आर्मी ग्रुप नॉर्थशी झटापटी करून बाल्टिक प्रदेश काबीज केला. यात जर्मनीच्या दोन्ही सैन्यसमूहांची ताटातूट झाली व लात्व्हियात कूरलॅंड पॉकेटची रचना झाली. डिसेंबर २९, १९४४ ते फेब्रुवारी १३ १९४५पर्यंत सोव्हिएत सैन्याने बुडापेस्टला वेढा घातला. बुडापेस्टचा बचाव करण्यासाठी हंगेरीच्या सैन्याबरोबरच वाफेन-एस.एस.ची कुमक होती. या वेढ्यात दोन्ही बाजूंची अपरिमित हानी झाली.

दोस्तांचे पश्चिम युरोपवर आक्रमण

ओमाहा बीचवर उतरणारे अमेरिकन सैनिक, डी-डे (जून ६, इ.स. १९४४).

जून ६, इ.स. १९४४ रोजी पाश्च्यात्य दोस्त राष्ट्रांनी (अमेरिका, युनायटेड किंग्डम व कॅनडा) जर्मन आधिपत्याखालील फ्रान्सच्या नॉर्मंडी किनाऱ्यावर हल्ला केला. त्याला जर्मनीने खंबीर उत्तर दिले. ओमाहा बीचकेन शहरांच्या आसपास तुंबळ युद्ध झाले पण दोस्तांना पाय रोवण्यात यश मिळाले. महिनाभर नॉर्मंडीच्या आसपास जम बसवल्यावर जुलैच्या अखेरीस अमेरिकन सैन्याने ऑपरेशन कोब्रा मोहीमेंतर्गत आपले वर्चस्व पसरविण्यास सुरुवात केली. ॲडॉल्फ हिटलरला या चालीची खबर मिळताच त्याने नॉर्मंडीच्या आसपासच्या जर्मन सेनेला प्रतिहल्ला चढवण्यास फर्मावले पण हा प्रतिहल्ला सपशेल फसला. याचे मुख्य कारण म्हणजे चाल करून येणारे जर्मन सैन्य आता दोस्त वायुसेनेचे सोपे शिकार झाले. यापूर्वी आपल्या लपवलेल्या ठाण्यांत दबा धरून बसलेल्या जर्मन सैन्याला टिपणे अशक्य असले होते, पण आता उघड्या रानातून चाल करून येणाऱ्या जर्मन सैन्याची दोस्त वायुसेनांनी वाताहत उडवली. बाजूने चाल करून येण्याऱ्या जर्मन सैन्याला थोपवण्यासाठी अमेरिकन सैन्याने आपल्या बाजूच्या फळ्या भक्कम ठेवल्या होत्या. पुढे सरकत अमेरिकन फौजेने जर्मनीच्या सातव्या सैन्याला व पाचव्या पॅंझर सैन्याला फलैसजवळ वेढा घातला. यात ५०,००० जर्मन सैनिक हाती लागले पण सुमारे १,००,००० सुटले. तोपर्यंत जर्मन सैन्याने रोखून धरलेली ब्रिटिश व केनेडियन सैन्येही आता बचावफळी फोडून पुढे होण्याच्या बेतात होती. या रेट्याला फ्रान्समध्येच रोखून धरण्यासाठी जर्मनीला कुमकेची आवश्यकता होती पण ही कुमक त्यांनी आधीच प्रतिहल्ला करण्यात खर्ची घातली होती. आता दोस्त राष्ट्रे फ्रान्स ओलांडून पुढे येणार हे जवळजवळ निश्चित झाले. ऑगस्ट १९४४मध्ये इटलीतील दोस्त सैन्याने दक्षिणेकडून फ्रेंच रिव्हियेरावर हल्ला चढवला आणि उत्तरेत असलेल्या फौजेशी संधान बांधले. फ्रेंच क्रांतिकाऱ्यांनी ऑगस्ट १९ला पॅरिसमध्ये उठाव केला. फिलिप लक्लर्क दि हॉक्लॉकच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्याच्या एक डिव्हिजनने पॅरिसमधल्या जर्मन सेनेची शरणागती स्वीकारली व ऑगस्ट २५ला पॅरिस मुक्त केले.

पॅरिसच्या शॅंझे लिझी रस्त्यावरून मिरवणारे अमेरिकन सैनिक.

शिशिरातील दोस्तांची मोहीम

ऑपरेशन मार्केट गार्डन मोहीमेंतर्गत नेदरलँड्समध्ये उतरणारे ब्रिटिश छत्रीधारी सैनिक

नॉर्मंडीतून पुढे सरकणाऱ्या दोस्त सैन्यांची रसद अजूनही नॉर्मंडीतूनच येत होती. दूर अंतर पार करून येणारी ही रसद वेळेवर व नेमकी पोचेल अशी खात्री फार कमी वेळा असायची. असे असतानाही जर्मन सैन्याच्या वर्मी घाव घालण्यासाठी दोस्तांनी छत्रीधारी सैनिक व चिलखती दल ऱ्हाइन नदीपल्याड नेदरलँड्समध्ये घुसवून पाहण्याचा प्रयत्न केला. पण सप्टेंबरअखेर त्यांना तेथून माघार घ्यावी लागली. शेल्टच्या लढाईत केनेडियन सैन्याच्या निर्णायक विजयानंतर ॲंटवर्पचे बंदर खुले करण्यात त्यांना यश मिळाले व नोव्हेंबर १९४४पासून येथून रसदपुरवठा सुरू झाला. दरम्यान सप्टेंबरमध्ये अमेरिकन सैन्याने हर्टगेनच्या जंगलातून चाल केली. जंगल व दऱ्याखोऱ्यांच्या आश्रयाने लढणाऱ्या जर्मन सैन्याने आपल्यापेक्षा अनेकपटीने मोठ्या असलेल्या या फौजेला पाच महिने झुंजवत ठेवले. इकडे ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने आखन हे जर्मनीचे मोठे शहर प्रथमतःच काबीज केले.

जर्मनीचे प्रत्युत्तर

मुख्य पान: बॅटल ऑफ द बल्ज

पूर्वेकडे आपल्या सेनेची धूळधाण उडत असलेली पाहून हिटलरने डिसेंबर १९४४मध्ये आपली पश्चिमेकडील शेवटची मोठी मोहीम उघडली. बॅटल ऑफ द बल्ज नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लढाईतून त्याला १९४० च्या आर्देनेस मोहीमेप्रमाणे यश अपेक्षित होते. चिलखती दल व रणगाड्यांनी दोस्त राष्ट्रांना पश्चिमेस समुद्रापर्यंत रेटत नेल्यास त्यांच्याशी संधी करून पूर्वेस आपली सगळी शक्ती पणाला लावता येईल अशी ही योजना होती. अशा कडव्या प्रतिहल्ल्याची अपेक्षा नसल्याने दोस्त राष्ट्र गाफील होते व त्यामुळे सुरुवातीस जर्मन सेनेला नेत्रदीपक यश मिळाले. जोखेन पायपरच्या नेतृत्वाखालील कॅंफग्रुप पायपर हा आघाडीच्या पॅंझर तुकड्याचा समूह दोस्तांच्या प्रदेशात इतका आत घुसला की त्यामुळे अमेरिकन सैन्याच्या फळीत त्यांनी जणू काही फुगवटा (बल्ज) तयार केला. यावरून नंतर या लढाईला नाव दिले गेले.

या हल्ल्याच्या सुरुवातीच्या दिवसात हवामान अतिशय खराब होते व याचा फायदा जर्मनीने पूरेपूर उठवला. दोस्त विमाने उडू शकत नसल्याने त्यांना हवेतून रोखणारी शक्ती नव्हतीच. अमेरिकन सैन्याच्या सेंट विथ आणि बॅस्टोइन येथील कडव्या प्रतिकाराने जर्मनीची चाल मंदावली. बॅस्टोइन येथे घेरल्या गेलेल्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनने पराक्रमाची शर्थ करून हा तिठा अमेरिकेच्या हातात राखला. जॉर्ज पॅटनच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या तिसऱ्या सैन्याने या धडकमोहिमेला खीळ घातली व हल्ला परतवला. जर्मन सैन्याचा पाठलाग करताना अमेरिकन सैन्याने अनेक जर्मन तुकड्या पकडल्या व उरलेल्यांना थेट जर्मनीपर्यंत माघार घेण्यास भाग पाडले. या मोहीमेत अमेरिकन सैन्याची ही मोठी हानी झाली. अमेरिकेच्या इतिहासातील ही सगळ्यात हानिकारक लढाई होती.

आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण[संपादन]

मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर

फेब्रुवारी १९४४ च्या अखेरीस अमेरिकेने नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील मार्शल द्वीपसमूह काबीज केला वा आपली आगेकूच चालू ठेवली. त्याच सुमारास ४२,००० अमेरिकन सैनिक क्वाजालाइन एटॉलवर उतरले व आठवड्याभरात ते बेट जिंकले. त्यानंतर त्यांनी एनिवेटोकच्या लढाईत जपानला हरवले.

या चालींचा व्यूहात्मक उद्देश होता जपानच्या जवळातजवळ वायुसेनेचा तळ उभारण्याचा. यासाठी मेरियाना द्वीपसमूहातील सैपान, तिनियानगुआमची बेटे जिंकणे आवश्यक होते. जून ११ला अमेरिकन आरमाराने सैपानवर बॉम्बफेक सुरू केली. ३२,००० सैनिकांनीशी लढणाऱ्या जपानी सैन्यावर जून १४ला ७७,००० अमेरिकन मरीन सैनिकांनी चाल केली व जुलै ७ला सैपान अमेरिकेच्या हातात आले. जपानने आपले उरलेसुरले आरमार फिलिपाईन्सच्या समुद्राच्या लढाईत पणाला लावले पण तेथेही त्यांना हार पत्करावी लागली तसेच त्यांची जवळजवळ सगळी विमाने व युद्धनौका नष्ट झाल्या. यानंतर जपानी आरमार केवळ नावापुरतेच उरले आणि आता जपान अमेरिकेच्या बी.२९ सुपरफोर्ट्रेस या बॉम्बफेकी विमानांच्या पल्ल्यात आले.

"मी परत आलो आहे." - जनरल मॅकआर्थरचे लाइफ नियतकालिकाच्या कार्ल मायडान्सने घेतलेले एक प्रसिद्ध छायाचित्र

जुलै २१ला गुआमवर हल्ला झाला व ऑगस्ट १०ला हेही बेट पडले पण येथे जपान्यांनी कडवी झुंज दिली. बेटाच्या कडे-कपारींतून लढणाऱ्या जपानी सैनिकांनी अमेरिकन सैन्याला सळो की पळो करून सोडले. बेट पडल्यावरही अनेक आठवडे या चकमकी सुरू होत्या. जुलै २४ला अमेरिकेने तिनियान बेटावर चाल केली व ऑगस्ट १ला ते जिंकून घेतले.

ऑक्टोबर २०ला जनरल डग्लस मॅकआर्थरचे सैनिक लेयटे बेटावर उतरले. जपानने असे होणार ही कल्पना असल्यामुळे येथे भक्कम बचावफळी उभारली होती. ऑक्टोबर २३ ते २६ दरम्यानच्या या लढाईत जपानने प्रथमतः कामिकाझे वैमानिकांचा उपयोग केला. जगातील सगळ्यात मोठ्या अशा या आरमारी युद्धात जपानची मुसाशी हे युद्धनौका, जी आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या लढाऊ नौकांपैकी एक होती, बुडाली. ही बुडवण्यासाठी १९ टोरपेडो व १७ बॉम्ब लागले.

१९४४मध्ये अमेरिकेच्या पाणबुड्या व विमानांनी जपानच्या व्यापारी व मालवाहू जहाजांवर हल्ले करून जपानकडे जाणाऱ्या कच्च्या मालाची रसद अगदी कमी केली होती. या एका वर्षात पाणबुड्यांनी जपानचे २० लाख टन सामान समुद्रतळास पोचवले होते.[२१] जपानचा खनिज तेलाचा साठा १९४४ च्या अंतापर्यंत जवळजवळ रिकामा झाला होता. याने जपानची आर्थिक व औद्योगिक स्थिती बिकट झाली.

चीन-जपान युद्ध

एप्रिल १९४४मध्ये जपानने आपण पादाक्रांत केलेल्या ईशान्य चीन, कोरिया व आग्नेय एशियाला जोडणारा लोहमार्ग जिंकण्यासाठी ऑपरेशन इचिगो ही मोहीम सुरू केली. त्याचबरोबर या भागातील अमेरिकेचे तळ उद्ध्वस्त करणे हाही एक हेतु होता. जून १९४४मध्ये जपानने ३,६०,००० सैनिकांनिशी चांग्शा शहरावर चौथ्यांदा आक्रमण केले. ४७ दिवसांच्या रणधुमाळीनंतर शहर जपानी हातात आले. नोव्हेंबर पर्यंत जपानने ग्विलिनल्युझू शहरेही जिंकली व तेथील अमेरिकन वायुसेनेचे तळ नष्ट केले. तथापि हे करेपर्यंत अमेरिकेने उतरत्त नवीन तळ उभारले होते. डिसेंबर १९४४मध्ये जपानी सैन्य फ्रेंच इंडोचायना पर्यंत पोचले व ऑपरेशन इचिगोचे उद्दिष्ट साध्य झाले पण हे करताना जपानलाही मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

आग्नेय आशिया

भारतीय सेनेची गोरखा रेजिमेंट इम्फाल-कोहिमा रस्त्यावर कूच करताना. (जानेवारी २७, इ.स. १९४५. १९४५ च्या सुरुवातीला जपानी सैन्याला म्यानमारमध्ये थोपवून धरण्याची कामगिरी गोरखा रायफल्सनी पार पाडली होती.

१९४४मध्ये अमेरिकन सैन्य भारतातून चीनला जाण्यासाठीचा लेडो मार्ग बांधत असताना जपानने आग्नेयेतून भारतावर चाल केली. ही चलो दिल्ली मोहीम जपानी सैन्य, म्यानमारमधील स्वातंत्र्यसैनिक व सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय सेनेने उभारली होती. इंफालजवळ या सैन्याने कडाडून हल्ला चढवला पण ब्रिटिश सैन्याने (ज्यात मुख्यत्वे भारतीय सैनिकच होते) त्यांना थोपवून धरले. तुंबळ युद्धानंतर कोणालाच सरशी मिळाली नाही पण जपानी/भारतीय राष्ट्रीय सेनेने इंफालला वेढा घातला. ब्रिटिशांनी इंफाल व कोहिमाला विमानाद्वारे रसद व कुमक पोचवली. त्याचवेळी पश्चिम व उत्तरेकडून ताज्या दमाच्या फौजा पाठवून वेढा फोडून अडकलेल्या सैन्याची सुटका केली. हल्लेखोरांना वाटले होते की भारतीय प्रदेश जिंकल्यावर तेथूनच रसद मिळेल व ब्रिटिशांतर्फे लढणारे भारतीय सैनिक आपल्याला सामील होतील, त्यामुळे त्यांनी त्याची काही सोय केलेली नव्हती. आता आक्रमक स्वतःच वेढ्यात अडकले व कुमक न मिळाल्याने अतिशय हालात माघार घ्यालला लागले. उपासमार, रोगराई व शत्रूच्या हल्ल्यांना ८५,००० सैनिक बळी पडले. जपानच्या सगळ्यात मोठ्या पराभवात हा गणला जातो. या पराभवाबरोबरच ब्रिटिशांना सशस्त्र मार्गाने भारतातून हुसकावून लावण्याची अजून एक आशा मावळली.

युद्धाचा अंत - इ.स. १९४५[संपादन]

युरोपमधील रणांगण[संपादन]

बर्लिनप्रागवरील मोहीम, १९४५.

हेमंतातील सोव्हिएत कारवाया

जानेवारी १९४५मध्ये सोव्हिएत सैन्य ताज्या दमाने पुढच्या मोहीमेसाठी सज्ज होती. इव्हान कोनेव्हने आपल्या फौजेनिशी दक्षिण पोलंडमधील जर्मन शिबंदीवर हल्ला चढवला व त्यांचा पाठलाग करीत सॅंडोमियेर्झजवळ व्हिस्चुला नदी ओलांडली. जानेवारी १४ला कॉन्स्टान्टिन रोकोसोव्स्कीने नारेव नदी ओलांडून वॉर्सोच्या उत्तरेला आक्रमण केले व पूर्व प्रशियाची राखण करणारी जर्मन बचावफळी मोडीत काढली. झुकोवच्या सैन्यानेही त्यानंतर वॉर्सोवर हल्ला केला व जर्मन आघाडी होत्याची नव्हती केली.

जानेवारी १७ला झुकोवने वॉर्सो घेतले. १९ तारखेला लॉड्झही जिंकले. त्याचदिवशी कोनेव्हचे सैन्य युद्धपूर्वीच्या जर्मन सीमेवर येऊन थडकले. या एका आठवड्यात सोव्हिएत सैन्याने ६५० कि.मी. रुंदीची आघाडी उघडून १६० कि.मी. आत धडक मारली होती. फेब्रुवारीच्या मध्यास लाल सैन्याने बुडापेस्ट जिंकले. ही टोळधाड शेवटी ओडर नदीच्या किनारी बर्लिनपासून ६० कि.मी.वर येऊन थांबली.

पश्चिमेतील हेमंत कारवाया

जानेवारी १४ रोजी दुसऱ्या ब्रिटिश सैन्याने मास नदीरोअर नदीच्या मधील रोअर त्रिकोणातून जर्मनीला हुसकावण्यासाठी ऑपरेशन ब्लॅककॉक ही मोहीम सुरू केली. जानेवारी २७ला जर्मन सैन्य रोअर नदीच्या पूर्वेस रेटले गेले होते.

याल्टा परिषद

याल्टा येथे जमलेले विन्स्टन चर्चिल, फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टजोसेफ स्टालिन.
मुख्य पान: याल्टा परिषद

युद्धाचे पारडे आपल्या बाजूला झुकत असल्याचे पाहून फेब्रुवारी १९४५मध्ये विन्स्टन चर्चिल, फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टजोसेफ स्टालिन यांनी याल्टा येथे भेटून युद्धानंतर युरोपची राजकीय व भौगोलिक स्थिती काय असावी यावर चर्चा केली. यात अनेक दूरगामी निर्णय घेण्यात आले.

  • एप्रिल १९४५मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्थापना करणे.
  • पोलंडमध्ये मुक्त निवडणूका घेणे.
  • पोलंडची पश्चिम सीमा पूर्वेकडे सरकवणे यासाठी जर्मनीच्या पूर्व भागाचा लचका तोडून पोलंडमध्ये समाविष्ट करणे.
  • सगळ्या सोव्हिएत नागरिकांना सोव्हिएत संघाकडे सोपवणे.
  • जर्मनी शरण आल्याच्या तीन महिन्यात सोव्हिएत संघाने जपानवर आक्रमण करणे.

वसंतातील सोव्हिएत मोहीम

एप्रिल १६ रोजी लाल सैन्याने पोलिश सैन्याच्या ७८,५५६ सैनिकांसह बर्लिनवर आक्रमण केले. एप्रिल २४ला सोव्हिएत सैन्यातील तीन फौजांनी बर्लिनला पूर्णपणे वेढा घातला. शेवटचा शर्थीचा प्रयत्न म्हणून हिटरलने शहरातील आबालवृद्ध नागरिकांना फोक्सस्टर्म या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले व चढाई करीत येणाऱ्या लाल सैन्याशी झुंज घेण्याचे हुकुम सोडले. त्यांच्याबरोबरीने सीलोच्या लढाईत पराभूत होऊन आलेली जर्मन फौज होती. लाल सैन्य बर्लिन शहरात घुसल्यावर झालेल्या असंख्य झटापटी दारुण होत्या. घराघरातून व रस्त्यातून आमनेसामने सैनिक व नागरिकांच्या चकमकी होत होत्या व बळींची संख्या लाखांच्या घरात गेली. सोव्हिएत सैन्याने ३,०५,००० सैनिक गमावले तर ३,२५,००० जर्मन नागरिक व सैनिक फक्त बर्लिनमध्ये मृ्त्युमुखी पडले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून ॲडॉल्फ हिटलर व त्याचे मंत्रीमंडळ फ्युह्ररबंकरमध्ये आश्रयाला गेले. शेवटी एप्रिल ३०, इ.स. १९४५ रोजी हिटलरने त्याची सोबतीण एव्हा ब्रॉनसह आत्महत्या केली.

वसंतातील पश्चिमेकडील आघाडी

अमेरिकेच्या जनरल ओमर ब्रॅडलीकडे जर्मन भूमिवरील आक्रमणाचे नेतृत्व होते.

जानेवारीअखेरीस पश्चिमेकडील दोस्त राष्ट्रांनी जर्मनीत पाय ठेवला. ऱ्हाइन नदीच्या तीरावरील जर्मन प्रतिकार मोडून काढीत त्यानी मार्चअखेर नदी ओलांडली. रेमाजेन येथील लुडेनडॉर्फ पूल हस्तगत झाल्यावर ही आगेकूच अजून गतिमान झाली.

ऱ्हाइन ओलांडल्यावर ब्रिटिश फौजा ईशान्येस हांबुर्गकडे सुटल्या. त्यांनी एल्ब नदी ओलांडून डेन्मार्कबाल्टिक समुद्राकडे धडक सुरू केली. अमेरिकेची नववी फौज दक्षिणेस रुह्रला घातलेल्या वेढ्याच्या उत्तर टोकापर्यंत पोचली तर पहिली फौज उत्तरेला याच वेढ्याच्या दक्षिण घेऱ्याला जाऊन भिडली. १३,००,००० सैनिक असलेल्या या फौजांचे नेतृत्व जन्रल ओमर ब्रॅडलीकडे होते. आता रुह्रला चारही दिशांनी वेढा पडला. फील्ड मार्शल वॉल्टर मॉडेलच्या नेतृत्वाखालील जर्मन सैन्यसमूह बी आता येथे पूर्णपणे अडकला. येथे अंदाजे ३,००,००० सैनिक युद्धकैदी झाले. यानंतर या अमेरिकन फौजा पूर्वेकडे निघाल्या व एल्ब नदीच्या तीरी सोव्हिएत सैन्याशी भेट झाल्यावर ही त्यांची विजयदौड थांबली.

इटली
इटालियन द्वीपकल्पातील दुर्गम पर्वत व येथील फौज फ्रान्समध्ये हलवल्यामुळे १९४५ च्या हिवाळ्यात दोस्तांची प्रगती हळूहळू होत होती. एप्रिल ९ला अमेरिका व युनायटेड किंग्डमची १५वी फौज गॉथिक रेषेवरचा प्रतिकार मोडून काढीत उत्तरेला सरकली व पो नदीच्या खोऱ्यात आली. येथून पुढे सरकत त्यांनी खोऱ्यातील जर्मन सैन्याला घेरले. याच वेळी अमेरिकेची पाचवी फौज पश्चिमेकडे गेली व तेथील फ्रेंच शिबंदीशी त्यांनी सूत जमवले. न्यू झीलंडच्या दुसऱ्या डिव्हीजनने त्रियेस्ते शहरातून युगोस्लाव्ह बंडखोरांना हुसकून लावले.

इटलीतील जर्मन सैन्याने शरणागती पत्करल्यावर मुसोलिनीने स्वित्झर्लंडला पळ काढण्याचा प्रयत्न केला पण इटलीतील क्रांतीकाऱ्यांनी त्याला पकडले व त्याची सोबतीण क्लारा पेटाची सह त्यांना मृत्युदंड दिला. त्यांचे मृतदेह मिलानला नेण्यात आले व जाहीर स्थळी उलटे टांगण्यात आले.

जर्मनीची शरणागती

ॲडॉल्फ हिटलरच्या मृत्यूनंतर ॲडमिरल कार्ल डोनित्झने जर्मन सैन्याचे सूत्रे हातात घेतली पण लवकरच हा डोलारा कोसळला. बर्लिनमधील जर्मन सैन्यबलाने मे २, इ.स. १९४५ रोजी सोव्हिएत सैन्यासमोर शरणागती पत्करली.

इटलीतील जर्मन सैन्याने २ मेलाच जनरल अलेक्झांडरच्या मुख्यालयात शरणागती पत्करली तर उत्तर जर्मनी, डेन्मार्क व नेदरलँड्समधील फौज ४ मेला शरण गेले. इटलीतील शरणागतीपूर्वी सोव्हिएत संघाने युनायटेड किंग्डम व अमेरिकेवर सोव्हिएत संघाशिवाय शरणागती घेण्याची तयारी करण्याचा आरोप ठेवला. मे ७ रोजी उरलेल्या सैन्याने जनरलोबेरोस्ट आल्फ्रेड जोड्लच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या ऱ्हाइम्स शहरात शरणागती पत्करली. मे ८ला पश्चिमी दोस्तांनी व्ही.ई. दिन साजरा केला. सोव्हिएत संघाने मे ९ला विजय दिन साजरा केला. जर्मन मध्य सैन्यसमूहातील काही तुकड्यांनी मे ११-१२ पर्यंत चकमकी सुरू ठेवल्या होत्या.

पॉट्सडॅम
दोस्तांनी बर्लिनच्या उपनगर पॉट्सडॅममध्ये आपली शेवटची परिषद भरवली. जुलै १७ ते ऑगस्ट २ पर्यंत चाललेल्या या परिषदेत दोस्तव्याप्त जर्मनीबद्दलची धोरणे जाहीर करण्यात आली तसेच जपानला बिनशर्त शरणागती पत्करण्यासाठीचे अखेरचे आवाहन करण्यात आले.

प्रशांत महासागरातील रणांगण[संपादन]

मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर

जानेवारीत अमेरिकेचे सहावे सैन्य लुझोन या फिलिपाईन्सच्या मुख्य बेटावर उतरले. मार्चपर्यंत त्यांनी राजधानी मनिला काबीज केली. फेब्रुवारीतील इवो जिमावरील व एप्रिल-जूनमधील ओकिनावावरील विजयांमुळे आता जपान अमेरिकेच्या आरमारी व वायुसेनेच्या पल्ल्यात आले. राजधानी टोक्योसह अनेक शहरांवर अमेरिकेने तुफान बॉम्बफेक केली. यात ९०,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. जपानमधील शहरे व वस्त्या दाट असल्यामुळे ही हानी जास्त होती. या बरोबरच तेथील घरे मुख्यत्वे लाकडी असतात त्यामुळे बॉम्बफेकीनंतर लागलेल्या आगींमध्येही जीवितहानी बरीच झाली. या शिवाय अमेरिकेने जपानमधील मुख्य बंदरे व जलमार्गांवर विमानांतून सुरूंग पेरले व जपानचा बाहेरच्या जगाशी संपर्क कमी केला.

१९४५ च्या मध्यातील बॉर्नियो मोहीम ही नैर्ऋत्य प्रशांतातील शेवटची मोहीम होती. तेथील जपानी सैन्याला हरवून त्यांच्या ताब्यातील दोस्त युद्धकैदी सोडविण्यासाठी ही मोहीम आखली होती.

आग्नेय एशिया

१९४४ च्या मॉन्सून मध्ये भारतावर चालून आलेल्या जपानी सैन्याला तेथील ब्रिटिश सैन्याने चिंदविन नदीपर्यंत मागे ढकलले होते. पाऊस संपताना अमेरिकन व चिनी सैन्याने लेडो मार्ग बांधून पूर्ण केला. तोपर्यंत जपानी सैन्याने माघार घेतल्यामुळे या कठीण रस्त्याचा दोस्तांना युद्धात फारसा उपयोग झाला नाही. आता भारतात जमलेल्या भारतीय, ब्रिटिश व आफ्रिकन फौजांनी जपान्यांचा पाठलाग सुरू केला व आघाडी मध्य ब्रह्मदेशपर्यंत नेली. मे २ला दोस्तांनी रंगून घेतले व जपानी तसेच भारतीय राष्ट्रीय सेनेला भारतातून पळवून लावले.

हिरोशिमा व नागासाकीवर परमाणुहल्ले

नागासाकीवर टाकलेल्या परमाणु बॉम्बचा स्फोट झाल्यावर अग्निज्वाला व धूर हवेत १८ कि.मी. वर गेला होता.

युद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. वस्तुतः नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने जपानवर खुश्कीदलासह हल्ला करण्याचे योजिले होते पण ओकिनावाच्या लढाईनंतर त्यांना कळून चुकले की जपानचा प्रतिकार कडवा असेल व अशा हल्ल्यात जपानइतकीच अमेरिकेचीही हानी होईल. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार अशा जमिनीवर केलेलल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. तसेच जपानी नागरिकही लाखांत मेले असते. या अंदाजांबद्दल अद्यापही शंका व्यक्त केली जाते.

ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले. ऑगस्ट ९ रोजी बॉक्सकार नावाच्या बी.२९ विमानाने फॅट मॅन नावाचा परमाणु बॉम्ब नागासाकी शहरावर टाकून तेही शहर नष्ट केले.

दूरपूर्वेतील सोव्हिएत आक्रमण

हिरोशिमावर बॉम्ब पडल्यावर दोनच दिवसात सोव्हिएत संघाने याल्टात नक्की केल्याप्रमाणे आपला जपानबरोबरचा अनाक्रमण तह धुडकावून लावला व मांचुरियातील जपानी सैन्यावर चाल केली. दोन आठवड्यात १०,००,००० जपानी सैनिकांचा पराभव करीत लाल सैन्य ऑगस्ट १८ला उत्तर कोरियात घुसले.

जपानची शरणागती

मुख्य पान: जपान विजय दिन

अमेरिकेचा परमाणुप्रयोग व सोव्हिएत संघाचे मांचुरियावरील आक्रमण पाहून जपानी सम्राट हिरोहितोने प्रधानमंडळाला न विचारता युद्धसमाप्तीचे प्रयत्न सुरू केले. ऑगस्ट १७ला केलेल्या दूरवाणीवरील आपल्या भाषणात त्याने आपल्या सैनिकांना हत्यारे खाली ठेवण्याचा आदेश दिला तसे करताना त्याने कारण सोव्हिएत आक्रमणाचे दिले व परमाणुबॉम्बचा उल्लेख टाळला.

ऑगस्ट १४, इ.स. १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली व हे अतिभयानक युद्ध अधिकृतरीत्या समाप्त झाले.

हताहत, नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार[संपादन]

गुप्त कारस्थाने व भूमिगत सशस्त्र चळवळी[संपादन]

युद्धाचे परिणाम[संपादन]

दुसऱ्या महायुद्धाने मानवी इतिहासात कधीही न पाहिलेली अतोनात हिंसा पाहिली. जगातील सर्वच राष्ट्रे यात भरडली गेली. काही युद्धग्रस्त होतेच तर काहींना त्याचे परिणाम भोगावे लागले. जर्मनी, पोलंड व रशिया व जपानमध्ये सर्वाधिक लोक बळी पडले. वर नमूद केल्याप्रमाणे मृतांची संख्या सहा कोटीवर असण्याची शक्यता आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व रशिया या देशांतील शहरेच्या शहरे हवाई हल्यांमध्ये संपूर्णपणे बेचिराख झाली. या देशांना पुढील अनेक दशके ती शहरे पुन्हा उभारण्यात घालवावी लागली.

दुसऱ्या महायुद्धावरील मराठी पुस्तके[संपादन]

  • एरिक लोमॅक्सच्या दीर्घ प्रवास : दुसऱ्या महायुद्धातील गोष्ट (अनंत भावे)
  • कथा महायुद्धाच्या (डॉ. मिलिंद आमडेकर)
  • दहा हजार नयन : दुसऱ्या महायुद्धात फ्रेंचांच्या अपार त्यागाची गाथा ! (पंढरीनाथ सावंत)
  • दुसरे महायुद्ध (किरण गोखले)
  • दुसरे महायुद्ध (वि.स. वाळिंबे)
  • ('अद्भुत' महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी) दुसरे महायुद्ध : काही कथा (अनंत भावे)
  • दुसऱ्या महायुद्धातील महिला आघाडी (ग.म. केळकर)
  • दुसऱ्या महायुद्धातील शौर्यकथा (निरंजन घाटे)
  • द्वितीय महायुद्धानंतरचे जग (१९४७ ते १९९७) (य.ना. कदम)
  • फिफ्टी इअर्स ऑफ़ सायलेन्स : दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान अनेक वेळा बलात्कार झालेल्या स्त्रीची आठवणगाथा (मूळ लेखिका - जॅन रफ ओ हर्; मराठी अनुवाद - नीला चांदोरकर)
  • महायुद्ध १९३९ ते १९४४ (ज.पां. देशमुख)
  • युद्धकथा : दुसऱ्या महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या १२ कथा (अनंत भावे)
  • हिटलरचे महायुद्ध (वि.ग. कानिटकर)

हेसुद्धा पहा[संपादन]

माध्यमे[संपादन]

चित्रपटात दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव जगातील बहुतेक राष्ट्रांवर पडला. अनेक साहित्य कृती, नाटके, चित्रपट दुसऱ्या महायुद्धावर अथवा त्यांच्या परिणामांवर बनले. त्यातील चित्रपट मुख्य युद्धातील घटनांवर आधारित होते तर काही त्याच्या परिणाम किंवा युद्धकालातील जीवनावर आधारित होते. काही सत्य घटनांवर तर काही काल्पनिक घटनांवर अथवा मिश्रित बनवले गेले. त्यातील काही प्रसिद्ध चित्रपट खालील प्रमाणे.

ट्व्हेल ओ क्लॉक हाय (१९४९), ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई (१९५७), पॅटन (१९७०), दास बुट (१९८१), सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९८८), पर्ल हार्बर(२००१), व्हेअर इगल्स डेअर, द डायरी ऑफ यंग गर्ल, स्टालिन्ग्राड

छळछावण्यामधील जीवनावर आधारीत चित्रपटांमध्ये अनेक ऑस्कर विजेते चित्रपट आहेत. त्यातील प्रमुख चित्रपट म्हणजे शिंडलर्स लिस्ट, ऍने फ्रांक, लाईफ इज ब्युटिफुल, द पियानिस्ट इत्यादी.

जगातील अनेक भाषांमध्ये दुसऱ्या महायुद्धाबद्दल कलाकृती निर्माण झाल्या आहेत.

यात शेकडो काल्पनिक चित्रपटही आहेत. यात ट्वेल्व ओ'क्लॉक हाय (१९४९), द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय (१९५७), द डर्टी डझन (१९६७), पॅटन (१९७०), डास बूट (जर्मन, १९८१), सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९९८), पर्ल हार्बर (२००१) इ. विशेष आहेत.

आजतगायत लिहिल्या गेलेल्या हजारो पुस्तकांतून या महायुद्धाचा उल्लेख आहे. यात जोसेफ हेलरचे कॅच-२२, अकियुकि नोसाकाचे ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईझ, ॲन फ्रॅंकचे द डायरी ऑफ अ यंग गर्ल आणि कर्ट व्होनेगटचे स्लॉटरहाउस-५ यांचा समावेश आहे.

ग्रंथ यादी[संपादन]

  • Bauer, E. Lt-Colonel The History of World War II, Orbis (2000) General Editor: Brigadier Peter Young; Consultants: Brigadier General James L. Collins Jr., Correli Barnet. (1,024 pages) ISBN 1-85605-552-3
  • I.C.B. Dear and M.R.D. Foot, eds. The Oxford Companion to World War II (1995), 1300 page encyclopedia covering all topics
  • Ellis, John. Brute Force: Allied Strategy and Tactics in the Second World War (1999)
  • Gilbert, Martin Second World War (1995)
  • Mark Harrison. "Resource Mobilization for World War II: The U.S.A., UK, U.S.S.R., and Germany, 1938-1945" in The Economic History Review, Vol. 41, No. 2. (May, 1988), pp. 171–192. in JSTOR
  • Keegan, John. The Second World War (1989)
  • Liddell Hart, Sir Basil History of the Second World War (1970)
  • Murray, Williamson and Millett, Allan R. A War to Be Won: Fighting the Second World War (2000)
  • Overy, Richard. Why the Allies Won (1995)
  • Shirer, William L. The Rise and Fall of the Third Reich, Simon & Schuster. (1959). ISBN 0-671-62420-2.
  • Smith, J. Douglas and Richard Jensen (2003). World War II on the Web: A Guide to the Very Best Sites. ISBN 0-8420-5020-5.
  • Weinberg, Gerhard L.A World at Arms: A Global History of World War II (2005) ISBN 0-521-44317-2
  • Poteri narodonaseleniia v XX veke : spravochnik. ISBN 5-93165-107-1.

हेसुद्धा पहा[संपादन]

धारिका[संपादन]

साधारण माहिती[संपादन]

संचिका[संपादन]

माहिती[संपादन]

चित्रपट[संपादन]

दुसरे महायुद्ध
घटनाक्रम     ठळक घटना     काही लेख     सहभागी देश    

पूर्वघटना:

मुख्य रणभूमी:

साधारण घटनाक्रम:

  

१९३९:

१९४०:

१९४१:

१९४२:

१९४३:

१९४४:

१९४५:

  

नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार:

पर्यवसान:

  

दोस्त राष्ट्रे
युनायटेड किंग्डम
सोवियेत संघ
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
चीन
पोलंड
फ्रांस
नेदरलँड्स
बेल्जियम
कॅनडा
नॉर्वे
ग्रीस
युगोस्लाव्हिया
चेकोस्लोव्हेकिया
भारत
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलँड
दक्षिण आफ्रिका
इजिप्त
फिलिपाईन्स
ब्राझिल
आणखी...

अक्ष राष्ट्रे
जर्मनी
जपान
Kingdom of Italy इटली
विची फ्रांस
हंगेरी
बल्गेरिया
रोमेनिया
फिनलंड
क्रोएशिया
स्लोव्हेकिया
थायलंड
आणखी...

हेसुद्धा पहा

दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे वर्गीकृत लेख
आधुनिक संस्कृतीतील दुसर्‍या महायुद्धाचे उल्लेख
दुसर्‍या महायुद्धातील सैनिकी सन्मान
दुसर्‍या महायुद्धादरम्यान उत्तर अमेरिकेवरील हल्ले
दुसर्‍या महायुद्धातील सैनिकी पदव्या


दुसर्‍या महायुद्धाबद्दल (इंग्लिशमध्ये) अजून माहिती:

इंग्लिश विक्शनरीवर दुसरे महायुद्ध
विकिबुक्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची पुस्तके
विकिक्वोट्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे उद्गार
विकिसोर्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची मूळ लिखाणे
विकिकॉमन्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची चित्रे व चित्रफिती
विकिन्यूजवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलच्या बातम्या

  • हा लेख इंग्लिश विकिपिडीयावरील या लेखावर आधारित आहे

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ वाइनबर्ग २००५, पान. ६.
  2. ^ वेल्स, ॲन शार्प (२०१४) हिस्टॉरिकल डिक्शनरी ऑफ वर्ल्ड वॉर टू : द वॉर अगेन्स्ट जर्मनी ॲंन्ड इटली. रोव्हमन ॲंन्ड लिटलफील्ड पब्लिशिंग, पृ ७
  3. ^ गिल्बर्ट २००१, पान. २९१.
  4. ^ जेम्स ए. टायनर (3 March 2009). वॉर, व्हायोलन्स ॲंड पॉप्युलेशन: मेकिंग द बॉडी काउंट (इंग्लिश भाषेत). द गिलफोर्ड प्रेस; पहिली आवृत्ती. p. 49. ISBN 1-6062-3038-7.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ Sommerville 2008, p. 5 (2011 ed.).
  6. ^ "BBC - Tyne - Roots - Non-Jewish Holocaust Victims : The 5,000,000 others". www.bbc.co.uk (इंग्लिश भाषेत). 27 August 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ फेरिस, जॉन; मॉड्सले, एव्हन (2015). द कॅम्ब्रिज हिस्टरी ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर, खंड १: फायटिंग द वॉर (English भाषेत). Cambridge: Cambridge University Press.CS1 maint: ref=harv (link) CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ फॉर्स्टर & गेसलर २००५, पान. ६४.
  9. ^ Beevor 2012, p. 776.
  10. ^ "U.S. Census BureauWorld Population Historical Estimates of World Population". March 4, 2016 रोजी पाहिले.
  11. ^ Barber & Harrison 2006, p. 232.
  12. ^ Rahn 2001, p. 266.
  13. ^ Liberman 1996, p. 42.
  14. ^ Milward 1992, p. 138.
  15. ^ Eastman 1986, पाने. 547–51.
  16. ^ Beevor 2012, पान. 342.
  17. ^ Brody 1999, पान. 4.
  18. ^ Zalampas 1989, पान. 62.
  19. ^ Kantowicz 1999, पान. 149.
  20. ^ Adamthwaite 1992, पान. 52.
  21. ^ किंग, ॲडमिरल अर्नेस्ट जे. "मार्च १९४४ ते ऑक्टोबर १९४५पर्यंतचे प्रशांत महासागरातील आरमारी हालचाली" (English भाषेत). २००६-०७-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)