दूधसागर धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुधसागर धबधबा या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑगस्ट महिन्यातील पावसाळ्यातील दूधसागर धबधब्याचे विहंगम दृष्य
दूधसागर धबधब्याचे पायथ्यापासूनचे दृष्य

दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे. हा धबधबा मडगाव-बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला ४६ किमी आणि बेळगावच्या दक्षिणेला ८० किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी (१०१७ फूट) आणि सरासरी रुंदी ३० मी आहे.[१][२]

हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये हा धबधबा अतिशय नेत्रदीपक नसला, तरी पावसाळ्यामध्ये विशेषतः ऑगस्ट मध्ये याचे दृष्य विलोभनीय असते. दुधसागर धबधबा बराच प्रसिद्ध असल्याने येथे दरवर्षी ८ ते १० हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात. हा धबधबा अभयारण्यात असल्याने तेथे जाण्यासाठी वन खात्याची परवानगी घ्यावी लागते.[३]

धबधब्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग[संपादन]

धबधब्यापसून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कॅसलरॉक रेल्वे स्थानक आहे. या स्थानकापर्यंत रस्त्यानेसुद्धा पोहोचता येते. तिथून रेल्वेने दूधसागर धबधब्यापर्यंत जाता येते. दूधसागर रेल्वे थांब्याला फलाट नाही. प्रवासी आणि पर्यटकांना रेल्वेच्या या अनियोजित १ ते २ मिनिटांच्या थांब्यामध्ये रेल्वेतून उतरून रुळावरून धबधब्यापर्यंत १-२ किमी चालत जावे लागते. अलिकडे भारतीय रेल्वेने प्रवाश्यांना दूधसागर थांब्याला उतरण्यास मनाई केली आहे.[४] धबधब्याच्या आसपास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची कुठेही सोय नाही. तसेच तिथे मोबाईल सिग्नलही मिळत नाही आणि रस्त्यानेही तिथपर्यंत पोहोचता येत नाही. धबधब्याला भेट देताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दूधसागर धबधबा ट्रेकिंगचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक ट्रेकिंग संस्था पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचे ट्रेक आयोजित करतात ज्यामध्ये कॅसलरॉक स्टेशनपासून धबधब्यापर्यंतचे अंदाजे २१ किमीचे ट्रेक आणि धबधब्याच्या पायथ्याशी एक दिवसाचा मुक्काम यांचा समावेश आहे.पावसाळ्यात दुधसागर धबधबा बघण्यासारखा असतो. बऱ्याच फिल्म्समध्ये हा धबधबा दाखवलेला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "वर्ल्डस् हायेस्ट वॉटरफॉल्स (World's highest waterfalls)" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-06-11. २७-०२-२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "दूधसागर फॉल्स – वर्ल्ड वॉटरफॉल डेटाबेस: वर्ल्डस् टॉलेस्ट वॉटरफॉल्स (World Waterfall Database: World's Tallest Waterfalls)" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-06-11. २७-०२-२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ गांवकर, विजय (२०१४). हिरवाईची भावस्पंदने. गोवा: निधी प्रकाशन. pp. ४७.
  4. ^ "Visiting Dudhsagar falls? Trekking along the rail route may be a bad idea" (इंग्रजी भाषेत). २७-०२-२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)