Jump to content

दशक्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दशक्रिया हा हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिसंचयन करण्यापासून ते दहा दिवसापर्यंत विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये स्नान, मृत्तिकास्नान, एकपिंडदान, विषमश्राद्ध, वपन, पाच मडक्यांवर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधींचा समावेश होतो.[]

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे मानतात.

आख्यायिका

[संपादन]

दशक्रियेविषयीची खालिल आख्यायिका प्रसिद्ध आहे.

एकदा श्रीराम आणि सीतामाता वनवासात विश्राम करीत असतात. तेथे एक कावळा येतो आणि तो सीतामातेला त्रास देत असतो. काही केल्या तो त्यांचा पिच्छा सोडत नाही, तेव्हा त्रासून त्या श्रीरामांना उठवतात आणि कावळा त्रास देत आहे अशी तक्रार करतात. त्यावेळेस श्रीरामांकडे धनुष्यबाण तसेच दुसरे कोणतेही शस्त्र नसते, म्हणून ते जवळच पडलेली एक गवताची काडी (दर्भ) मंत्रून कावळ्यावर फेकतात, तो दर्भ कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतो आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो म्हणून कावळ्याला 'एकाक्ष' सुद्धा म्हणतात. त्याच वेळेस सीता माता त्याला शाप देतात की तू एकाक्ष असल्याने सर्वजण तुला अशुभ मानतील, तेव्हा कावळा गयावया करून उःशाप मागतो तेव्हा त्याची दया येऊन सीता त्याला उःशाप देते की, मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही आणि शिवाय ही दर्भाची काडी सुद्धा त्यावेळेस उपयोगी पडेल अशी आख्यायिका आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ अंत्येष्टी व एकोद्दिष्ट श्राद्ध पोथी ज्ञान प्रबोधिनी पुणे प्रकाशन