दखनी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


'दखनी' ही [दक्षिण भारतीय] बोलीभाषा आहे. तिचा विकास मध्ययुगीन काळात झाला आहे. मध्ययुगीन काळात दखनी भाषेत खूप मोठी साहित्य निर्मिती झाली आहे. सुफी संत, राजदरबारातील काही कवी आणि मुहम्मद कुली कुतुबशाह व इब्राहीम आदिलशहा या कवींनी दखनी भाषेत आपले साहित्य लिहिले आहे. काही मराठी संतानी दखनी भाषेत पण देवनागरी लिपीत लिखाण केले आहे. दखनीला उर्दूची बहिण मानली जाते. या भाषेला उर्दू भाषिक "कदीम उर्दू" (जुनी उर्दू) तर हिंदी भाषिक हिंदी भाषेची दाक्षिणात्य बोली "दक्खनी हिंदी" असे म्हणतात. या भाषेला हिंदीत 'दख्खनी' किंवा 'दक्कनी' असेही म्हणतात. ही बोलीभाषा उर्दूतून जन्मली आहे. महाराष्ट्रातील व तेलंगनामधील मुसलमानांची दखनी ही प्रमुख बोली भाषा मानली जाते. मूळात दखनी हिंदी हे हिंदीचे जूने स्वरूप आहे. या भाषेचा विकास १४ व्या शतकात झाला.[ संदर्भ हवा ]

दखनीचे संपूर्ण काव्य मुळी हिंदू-मुसलमानाच्या एकतेसंबंधी आहे. समन्वयाची ही प्रक्रिया अकबरापासून सुरू झालेली आहे. प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांनी त्यांच्या 'मुस्लिम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप' या पुस्तकात दखनी भाषेबद्दल म्हटले आहे की, संत रामदासांना दखनी भाषेत काव्य व दखनी-उर्दू भाषेत पदावल्या लिहिल्या आहेत'[१]

दक्षिण भारतातील तीन राज्ये वगळता  काश्मीरपासून कर्नाटकापर्यंत मुस्लिम समाजाची मातृभाषा ही उर्दुच आहे. प्रदेशनिहाय त्यात काही बदल झाले असले तरी मातृभाषा मात्र उर्दुच राहीली आहे. बिहार आणि उत्तरेच्या राज्यात उर्दूचा हिंदी आणि भोजपूरीशी संयोग झाला आहे. महाराष्ट्रात मराठीशी संयोग झाल्यामुळे दखनी धाटणीची उर्दू मुस्लिम समाजाकडून बोलली जाते.[ संदर्भ हवा ]

भाषा अभ्यासक डॉ. श्रीधर कुलकर्णी यांनी अनेक पुरावे देऊन हे सिद्ध केले आहे की दखनीचा जन्म सिद्धनाथ, सुफी व बैरागी यांच्या समन्वयात्मक संस्कृतीतून दक्षिणेत झालेला आहे. कुलकर्णी यांच्या मते 'दखनी ही स्वतंत्र वेगळी भाषा असून तिचे मूळ नाथपंथाच्या बैरागी भाषेत आहे.'[ संदर्भ हवा ]

दखनी भाषेतील साहित्य प्रामुख्याने (फारसी लिपीत लिहिलेले ) गोवळकोंडा (कुतुबशाही ) आणि विजापूर (आदिलशाही ) या परिसरात आणि राजवटीत मोठया प्रमाणात निर्माण झाले. देवनागरीत दखनी कविता प्रथम संत नामदेव (१३वे शतक) यांनी लिहिल्याची माहिती आहे. तर १५व्या शतकातील निजामी या कवीने ती प्रथम फारसीत लिहिली. विजापूर आणि गोवळकोंडा राज्यात दखनीला राजभाषेचा दर्जा होता. मराठवाड्याचे कवी डी.के. शेख यांच्या मते इ.स. १६०० ते १७०० हा काळ दखनी काव्याचे सुवर्णयुग होते. वली दखनी औरंगाबादी हा या भाषेतील शेवटचा कवी मानला जातो. दखनीतले अलीकडचे मोठे नाव म्हणजे गुलबर्गा येथील कवी सुलेमान खतीब.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "शोध.. समर्थकृत दखनी-उर्दू रचनांचा!". Loksatta. 2015-06-14. 2018-08-03 रोजी पाहिले.