Jump to content

डोडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोडो
डोडो
डोडो
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: कपोताद्या
कुळ: कपोताद्य
उपकुळ: Raphinae
जातकुळी: Raphus
ब्रिसन, १७६०

जीव: R. cucullatus
शास्त्रीय नाव
Raphus cucullatus

डोडो हा एक नामशेष झालेला न उडणारा पक्षी होता. तो हिंदी महासागरातील मॉरिशस या बेटावर आढळत असे. जरी डोडोला उडता येत नसे, तरी आनुवांशिकतेने तो कबुतरांच्या जास्त जवळचा होता.

हवेत उडण्यास असमर्थ व बोजड शरीराचा विलुप्त झालेला एक पक्षी. कोलंबिफॉर्मिस गणातील रॅफिडी कुलात या पक्ष्यांचा समावेश होत असे. रॅफस क्युक्युलेटस, रॅफस सॉलिटेरस आणि पेझोफॅप्स सॉलिटेरिया अशा त्यांच्या तीन जाती असून हिंदी महासागरातील अनुक्रमे मॉरिशस, रीयुनियन आणि रॉड्रिगेस बेटांवर त्यांचा अधिवास होता. कबुतराचा हा नातेवाईक होता, असे मानले जाते. पोर्तुगीजांनी १५०७ मध्ये डोडो पाहण्यापूर्वी त्यांचा या बेटांवर हजारो वर्षांपासून अधिवास होता. या काळात त्यांना कोणी नैसर्गिक शत्रू नसल्यामुळे हा पक्षी आकाराने वाढत गेला आणि त्याची उडण्याची क्षमता नाहीशी झाली.

डोडो (प्रतिकृती)

[संपादन]

डोडो पक्ष्याच्या शरीरवैशिष्ट्यामुळे तो बेढब दिसत असे. त्याची उंची सुमारे १ मी., वजन २०—२३ किलोग्रॅम., डोके मोठे आणि चोच सुमारे. २३ सेंमी. लांब, काळी, भक्कम आणि टोकाला वाकलेली होती. शरीराचा रंग फिकट राखाडी किंवा निळसर राखाडी, गळा आणि पोटाचा भाग पांढरा असून पंख खुरटे, पांढरे किंवा पिवळे होते. शेपूट लहानशी, वर वळलेली व कुरळ्या पांढऱ्या पिसांची झुपक्यासारखी होती. पाय आखूड पण दणकट होते. चोचीच्या पुढील भागावर नाकपुड्या होत्या. माती व पालापाचोळा उकरत ते भक्ष्य शोधत असत. मुख्यत: फळे, बिया हे त्यांचे खाद्य होते. ते मासेही खात असावेत.

रॅफस सॉलिटेरस हा पक्षी मॉरिशस बेटावरील डोडोसारखा होता. परंतु तो रंगाने पूर्णपणे पांढरा होता. १७५० सालच्या सुमारास तो विलुप्त झाला. पेझोफॅप्स सॉलिटेरिया ही जाती आकाराने दोन्ही डोडोंएवढीच होती. परंतु त्यांचा रंग करडा होता आणि चोच लहान व वळलेली नव्हती. ही जाती सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत अस्तित्त्वात होती.

डोडो इ.स. १५०७ मध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज खलाशांनी त्यांना हजारोंच्या संख्येने पाहिले. नंतरच्या काळात या बेटांवर आलेल्या प्रवाशांनी केवळ मौजेखातर त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली. तसेच त्या प्रवाशांसोबत डोडोंच्या अधिवासात कुत्रा, मांजर, उंदीर, डुकरे आणि माकडे अशा पाळीव प्राण्यांचा प्रवेश झाला आणि परिणामी डोडोंची संख्या घटत गेली. पळत पाठलाग करून काठीने या पक्ष्याला सहज मारता येत असे. मात्र त्यांचे मांस अजिबात रुचकर किंवा लुसलुशीत नव्हते, असा उल्लेख आहे. सतराव्या शतकाच्या मध्यापासून अखेरपर्यंत डोडोच्या तीनही जाती पूर्णपणे विलुप्त होऊन नामशेष झाल्या.

भारतातदेखील १६०० मध्ये दोन जिवंत डोडो आणले गेले होते. मोगल राजवटीतील चित्रकारांनी अन्य पक्ष्यांसोबत त्यांचीही सुरेख चित्रे काढून ठेवली आहेत. यूरोपातही हौशी प्रवाशांनी काही डोडो नेले होते. मात्र तेथे ते टिकू शकले नाहीत. मॉरिशसमध्ये दलदलीच्या ठिकाणी डोडोंची अनेक हाडे मिळाली आहेत. ती जुळवून त्यांचे काही सांगाडे बनवून ते संग्रहालयात ठेवले आहेत. मनुष्याद्वारे एखाद्या जातीचे कसे विलुप्तन होऊ शकते, याचे उदाहरण द्यायचे झाल्यास डोडोंच्या विलुप्तनाचे उदाहरण अधिक समर्पक ठरेल.

जगातील प्राणि विविधता

[संपादन]

जंगलांची कत्तल, जलसंपदेचा ऱ्हास आणि जमीन, वायू तसेच पाणी प्रदूषणामुळे निसर्गाची आणीबाणी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, असा इशारा ५० देशांतल्या ५०० पेक्षा जास्त तज्ज्ञांनी दिला होता. संयुक्त राष्ट्रानेही त्यांच्या या अहवालाला पाठबळ दिले होते. वाढत चाललेली वातावरणातली उष्णता ही त्याचीच ग्वाही देत आहे.

Intergovernmental Science-Policy Platform on Biodiversity and Ecosystem Services (IPBES) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालातून निसर्गाच्या बचावासाठीची कोणती तातडीची पावलं उचलण्याची गरज आहे, याचा आराखडा येणंही अपेक्षित होतं.

'जगातली जैवविविधता झपाट्याने संपते आहे

इंटरनॅशनल युनियन फॉर कॅन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) ने जाहीर केलेली अस्तित्त्व धोक्यात आलेल्या प्रजातींची यादी आपण निसर्गाला किती मोठ्या प्रमाणात धोका पोहोचवलेला आहे, ते सांगते.

अस्तित्त्व धोक्यात आलेल्या प्रजाती म्हणून यामध्ये आतापर्यंत एक लाख प्रजातींचा अभ्यास करण्यात आलेला आहे. यापैकी 25 टक्क्यांपेक्षा जास्त प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यामध्ये मादागास्करमधल्या लेमूरपासून ते बेडूक आणि सॅलामांडर सारख्या उभयचर प्राण्यांचा, कोनिफर्स आणि ऑर्किड्ससारख्या रोपांचाही समावेश आहे.

ही पाहणी अजूनही पूर्ण झालेली नाही आणि या जगाच्या पाठीवर नेमके किती प्राणी, झाडेझुडुपे किंवा किती प्रकारच्या बुरशी आहेत, हे आपल्याला अजूनही माहीत नाही. काहींचा अंदाज आहे की जगभरामध्ये वीस लाख प्रजाती आहेत तर काही जण अब्जावधी प्रजाती असल्याचा अंदाज वर्तवतात. पण बहुतेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की हा आकडा १,१ कोटी किंवा त्यापेक्षा कमी असावा.

पण पृथ्वीवर लवकरच मोठ्या प्रमाणावर अनेक प्रजाती नामशेष होणार असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. गेल्या पाच कोटी वर्षांमध्ये असे फक्त सहा वेळा घडलेले आहे.

"या ग्रहावरच्या प्रजाती झपाट्याने नामशेष होत असल्याचे भरपूर पुरावे आता आपल्याकडे आहेत," रॉयल बोटॅनिक गार्डन्सचे संचालक प्रो. अलेक्झांड्रे एन्तोनेल्ली यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.

अशनी (धूमकेतू) पृथ्वीवर आदळल्यामुळे ६.६ कोटी वर्षांपूर्वी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण यावेळी मात्र "मनुष्य कारणीभूत असल्याचे" ते सांगतात.

मनुष्य अस्तित्त्वात येण्यापूर्वी प्रजाती नामशेष होण्याचा जो वेग होता त्यापेक्षा आताचा दर हजार पटींनी जास्त आहे. आणि असा अंदाज आहे की लवकरच हा वेग दहा हजार पटींनी जास्त होईल.

ज्या भूभागांमध्ये विलक्षण सृष्टीसौंदर्य आहे तिथे ही चिंता जास्त भेडसावते आहे. आफ्रिका खंडामध्ये विविध प्रजातींचे मोठे सस्तन प्राणी सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतात. तिथे ही गंभीर बाब आहे.

आफ्रिकेतले जवळपास अर्धे पक्षी आणि सस्तन प्राणी सन २१०० च्या अखेरीपर्यंत मानवजातीच्या विविध कृत्यांमुळे संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचे IPBES(?)ने गेल्यावर्षी प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात म्हणले आहे.

गेल्या दशकभरामध्ये युरोप आणि मध्य आशियातील जमिनीवर राहणारे प्राणी आणि झाडांच्या प्रजातींमध्ये ४२ टक्क्यांची घट झाल्याचेही यामध्ये म्हणले आहे.