डबल बास
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
या वाद्यास डबल बास असेही म्हणतात. पाश्चात्य वाद्यवृंदातील व्हायोलिनगटातील (फॅमिली) सर्वांत मोठे व खालच्या पट्टीचे एक तंतुवाद्य. ते संकरज (Hybrid) तंतुवाद्य असून त्यावर व्हायोलिनगट व गम्बा (वाद्य) यांचा प्रभाव आहे. हे सर्वसाधारणत: चार तारांचे असते; कधी कधी तीन अथवा पाच ताराही आढळतात. डबल बेस वाद्याची उत्पत्ती वाद्यवृंदात खर्ज स्वराचा परिणाम दुप्पट करण्याच्या उद्देशाने झाली आहे. गजाने तारांचे घर्षण करून अथवा केवळ तारा छेडून (पिस्सिकातो) अशा दोन्ही प्रकारांनी ते वाजविले जाते. हे वाद्य उभे राहून वाजवितात. डबल बेस हे दोन भिन्न प्रकारच्या गजांचा (Bow) वापर करूनही वाजविता येते. फ्रेंच किंवा बोतेझिनी गज हे सेलो गजसदृश आहेत; परंतु ते जड व अखूड आहेत. दुसरा गजप्रकार म्हणजे जर्मन सिमांडी किंवा बटलर होय. मात्र हे स्वतंत्र वाद्य म्हणून क्वचित वाजविले जाते. विद्यमान परिस्थितीत ते प्रामुख्याने चित्रपट संगीतातील वाद्यवृंदात लयवाद्य म्हणून वापरले जाते. पाश्चात्य संगीतात त्याच्या धीरगंभीर आवाजाचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे चेंबर म्युझिकसाठीही कधी कधी त्याचा उपयोग केला जातो. याशिवाय त्याचा वापर सामान्यत: जॅझ, नृत्यसंगीत, लोकसंगीत आणि विशेषतः सैन्य आणि बॅण्ड पथकांतून केला जातो. या वजनदार वाद्याची अनेक उपनामे रूढ असून त्याला कोण्ड्रा बेस, स्ट्रिंग बेस, बेस, बेस व्हाइअल, बेस फिडल किंवा बुल फिडल असेही संबोधतात. व्होल्फ्गांग मोट्सार्ट (१७५६–१७९१) या थोर संगीतकाराने त्याची एक अलौकिक सांगीतिक कृती द अरिया परक्वेस्टाबेलामानो यात डबल बेसचा वापर केला असून ती मुद्रित व प्रकाशित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे.
बेथोव्हन (१७७०–१८२७) या जर्मन संगीतकाराने आणि त्याच्या उत्तरकालीनांनी या वाद्यास सिंफनी वाद्यवृंदामध्ये खास प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. सुमारे पंधराव्या शतकापासून या गंभीर ध्वनी तंतुवाद्याने यूरोपीय वाद्यवृंदात स्थान पटकाविले असून आजमितीच्या लोकप्रिय संगीतामध्ये आपला नैसर्गिक ध्वनिसदृश आवाज टिकवून ठेवला आहे. प्रतिष्ठित, ख्यातनाम कुशल डबल बेस वादक व संगीतकार दोमेनीको द्रागोनेत्ती (१७६३-१८८६), जोव्हान्नी बोतेझिनी (१८२१-१८८९) आणि सर्ग कूसोव्हिट्स्की (१८७४-१९५१) यांनी डबल बेसची प्रदीर्घ परंपरा व प्रतिष्ठा जपली आहे. त्यांनी काही काँचेर्टोही सादर केले आहेत. विसाव्या शतकाच्या मध्यास बेस गिटार वापरात येऊनही बेस वाद्याची लोकप्रियता आणि वापर यत्किंचितही कमी झालेला नाही.
- Baines, Anthony, European and American musical Instruments, London, 1966.