ठिबक सिंचन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरतात. ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.या पद्धतीत,जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने अथवा सूक्ष्म धारेने दिले जाते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी,जमिनीच्या निरनिराळ्या प्रकारच्या जलधारणा शक्ती, वाफसा, तसेच पाणी जिरण्याचा व जमिनीच्या पोकळीतून वाहण्याचा वेग इ. भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.

ठिबक सिंचनाच्या पद्धती[संपादन]

पृष्ठभागावरील(ऑनलाईन)पद्धत, पृष्ठभागाअंतर्गत(इनलाईन) पद्धत, मायक्रो स्प्रिंकलर्स आणि मायक्रो जेट्स असे ठिबक सिंचनाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात.

पृष्ठभागावरील ठिबक सिंचनात सूक्ष्म नलिका, दाब नियंत्रण असणाऱ्या वा नसणाऱ्या तोट्या (ड्रिपर्स) आसतात. लॅटरलचे आत दाब नियंत्रण ड्ड्रिपर्स पद्धतीची (इनलाईन) गरज असते. पृष्ठाभागांतर्गत पद्धतीत बायवॉल, टर्बोटेप, टायक्रुन, क्विनगील व पोटस पाईप या पद्धतींचा समावेश होतो. ठिबक सिंचन पद्धतीत मोटार व पंपसेट, मुख्य वाहिनी, उपवाहिनी, गाळण्या, नियंत्रण झडपा, ड्रिपर, लॅटरल, खत सयंत्र इत्यादी घटक असतात.

ठिबक सिंचनाचे मुख्य फायदे[संपादन]

१. पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते.

२. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते.

३. पिकाला रोजच अगर दिवसाआड अथवा गरजेनुसार पाणी दिले जाते.

४. मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती, हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो.

५. पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. त्यामुळे ते मुळाच्या सभोवती जिरते. ठिबक सिंचनाच्या या गुणमुळे पिके चांगली जोमाने वाढतात व दर्जेदार पीक उत्पादन मिळते.

ठिबक सिंचनाचे अन्य फायदे [संपादन]

१. ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते.

२. ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते.

३. बचत झालेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्रात वापर करता येतो.

४. कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.

५. दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते.

६. ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते.

७. पाणी साठून राहत नाही.

८. पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते.

९. क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तरीही पिकांचे उत्पादन घेता येते.

१०. जमिनी खराब होत नाही.

११. चढ-उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात.

१२. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पिके घेऊन उत्पादन काढता येते.

१३. ठिबकने द्रवरूप खते देता येतात. खताचा १००% वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो.

१४. जमिनीची धूप थांबते.

१५. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे. १६. २५-३०% उत्पन्नात वाढ होते