ट्विंकल कालिया
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | 1982 |
| व्यवसाय | स्वतंत्र विमा प्रतिनिधी, रुग्णवाहिका चालक, सामाजिक कार्यकर्ता |
| निवासस्थान | दिल्ली |
| पुरस्कार | नारी शक्ती पुरस्कार |
ट्विंकल कालिया (जन्म: १९८२) या एक दिल्ली स्थित भारतीय महिला आहेत. त्या आणि त्यांचे पती, हिमांगशू कालिया स्वखर्चाने रुग्णवाहिका चालवतात. या संबंधित योगदानासाठी ट्विंकल कालिया यांना २०१८ मध्ये भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.[१]
आयुष्य
[संपादन]कालियाचा जन्म १९८० मध्ये झाला. २००२ मध्ये त्यांच्या भावी पती, हिमांगशू कलियाने हुंडा मागितला नाही. त्यावेळी हिमांगशू हे भाड्याने घेतलेली रुग्णवाहिका चालवत होते. सामाजिक कार्यासाठी त्यांना स्वतःची रुग्णवाहिका घ्यायची होती. त्यासाठी ट्विंकल यांच्या घरच्यांनी यासाठी हिमांगशू यांना एक रुग्णवाहिका भेट दिली. हिमांगशू जेव्हा १४ वर्ष वयाचे होते, तेव्हा एका अपघातामुळे त्यांचे वडील सहा वर्ष कोमात गेले होते. जर तेव्हा वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. सबब हिमांगशू स्वतःची रुग्णवाहिका गरजू व्यक्तींना मोफत उपलब्ध करून देतात. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ट्विंकल आपल्या पतीला याकामी मदत करतात. त्या स्वतः देखील रुग्णवाहिका चालवतात.[२] तेव्हापासून, हे जोडपे गरजू रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. यासाठी त्यांनी 'शहीद भगत सिंग हेल्प अँड केअर फॉर सोसायटी' नावाची एक सेवाभावी संस्था सुरू केली. त्यांनी जनजागृतीसाठी आपले फोन नंबर युक्त पोस्टर्स विविध ठिकाणी लावले. हळूहळू, त्यांना मदतीसाठी फोन येऊ लागले. “आम्ही कुटुंबांनी सोडून दिलेल्या मृतदेहांवर अग्निसंस्कार करतो आणि ज्या लोकांना ते परवडत नाही, अशा लोकांना इतर रुग्णवाहिका सेवा पुरवतो. विशेषतः कोविड-१९ महामारीच्या काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली, कारण नातेवाईकांना संसर्गाची भीती वाटत होती,” असे हिमांशू सांगतात. २०२० पर्यंत या दांपत्याने १४ रुग्णवाहिका आणि दहा चालकांचा ताफा तयार केला आहे. चालक दिवसा काम करतात, तर रात्रीच्या पाळ्यांची जबाबदारी हे दांपत्य सांभाळते. २०२० पर्यंत या जोडप्याने ८०,००० रुग्णांना मदत केली आहे. विशेष म्हणजे पतिपत्नी दोघेही उदरनिर्वाहासाठी विमा व्यवसाय करतात आणि आपल्या कमाईतून या रुग्णवाहिका चालवतात. भारतातील विविध राज्यांमध्ये ही सेवा पुरवताना त्यांना आर्थिक तंगीचा मोठा सामना करावा लागतो. ड्रायव्हरची पगार, घरखर्च, मुलांची शाळेची फीस अनेकदा थांबते.[१][३]
कालिया यांना दूषित पाण्यामुळे कावीळ देखील झाला होता. यामुळे त्यांनी परिसरातील उघड्या नाले आणि गटारी संबंधित तक्रारी नोंदवल्या. यावर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सबब त्यांनी स्वतः यासाठी राजकारणात उतरण्याचे ठरवले. २०१७ साली कालिया यांनी स्थानिक परिषदेसाठी निवडणूक लढवली.[४]

२०१९ मध्ये कालिया यांना नारी शक्ती पुरस्कार (२०१८) देण्यात आला. हा पुरस्कार भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.[५]
संदर्भ
[संपादन]- 1 2 Nitnaware, Himanshu (2021-07-02). "Free Ambulance Rides for 80000 Patients: Couple's Story of 20 Years of Sacrifices". The Better India (इंग्रजी भाषेत). 2023-02-20 रोजी पाहिले.
- ↑ Pankhuri, Yadav. "How a personal loss 25 years ago inspired a mission to save lives | Delhi News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-04-25 रोजी पाहिले.
- ↑ "Free ambulance service provider to come to Kolkata". thestatesman.com (इंग्लिश भाषेत). २०२६-०२-०१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ Banka, Richa (2017-03-21). "City's 'first woman ambulance driver' joins civic poll fray". DNA India (इंग्रजी भाषेत). 2020-04-25 रोजी पाहिले.
- ↑ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2020-04-11 रोजी पाहिले.